Thursday, 22 November 2018

मेंटल हॉस्पिटल


मेंटल हॉस्पिटल
.........................
             ..बातमीदारीच्या निमित्तानं येरवड्याच्या  जेलमध्ये अनेक वाऱ्या झाल्या...पण तिथं समोरच् असलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचा प्रसंग सुरुवातीला बरीच वर्षं आला नव्हता..कथा,कादंबऱ्या अन काही चित्रपटांमुळं, वाचलेल्या  मेंटल हॉस्पिटलची  निराळीच प्रतिमा मनात होती.. .बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट... 1995 च्या सप्टेंबर महिन्यात तिथं एक गैरप्रकार घडल्याचं कानावर आलं.तेव्हा पत्रकारितेत तसा नवखाच् होतो..त्या हॉस्पिटलमध्ये सहज आत जाणं अन माहिती घेणं तेव्हाही शक्य नव्हतं...मग त्या भागातले मित्र शोधले...विक्रमला घेऊन छुप्या रस्त्यानं हॉस्पिटलमध्ये शिरलो.. रक्षकांना गुंगारा देत अख्खा दिवस तिथं घालवला...तिथलं वातावरण अनुभवलं..  स्वतःची ओळख हरवून बसलेले , भलत्याच मनोविश्वात वावरणारे रुग्ण पाहिले..शॉक ट्रीटमेंटच्यावेळी असह्य वेदनांमुळं त्यांनी मारलेल्या  किंकाळ्या ऐकून मुळासकट हादरलो..त्यांचं निकृष्ट अन्न,  मळके कपडे, असह्य दुर्गंधी अन एकंदरीतच् कोंडवाड्यातल्या जनावरापेक्षाही भयाण अशी त्यांची त्यांची  अवस्था आठवली की आजही अंगावर सरर्कन काटा उभा राहतो. तिथल्या चांगल्या वाईट घटनांच्या बातम्या देऊ लागल्यावर सयाजीसारखे  तिथले अनेक कर्मचारी  मित्र झाले..जुने रुग्णही ओळखायला लागले.. तिथं जाणं, सयाजीला, तिथल्या कर्मचा-यांना भेटणं नित्त्याचं झालं होतं...अलीकडच्या काही वर्षांत मात्र त्यात काहीसा खंड पडलाय
            गेल्या आठवड्यात सयाजी भेटला..चहा प्यालो.नाश्ता केला..खूप दिवसांनी भेट झाल्यानं खूप गप्पा झाल्या....मेंटल हॉस्पीटलमधल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या..  मनोविकाराने पछाडलेल्या, नरकयातना भोगत असलेल्या रुग्णांचे चेहरे नजरेसमोर आले..निष्प्राण डोळ्यांनी रुग्णालयाच्या आवारात फिरत असलेले अन
कर्मचा-यांच्या मारहाणीला भेदरून झाडांमागं, झाडावर लपून बसलेले कित्येक चेहरे लक्खपणे आठवले.ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्या बंधुंशी तिथं झालेली भेट ताजी झाली..

         घनदाट जंगलानं वेढलेल्या दीडशे एकरच्या विस्तीर्ण परिसरात असलेलं येरवड्याचं मेंटल हॉस्पिटल  आशिया खंडातलं सर्वात मोठं मानसोपचार रुग्णालय..पण होतंय काय की एकतर ते शहराच्या बाहेरच्या बाजूला आहे अन कारणाशिवाय सामान्य लोकांना तिथं जायला प्रवेश नाही...त्यामुळ आत काय चाललंय हे काही कळू शकत नाही..वीस वर्षांपूर्वी  मोबाईल, इंटरनेट नसण्याच्या जमान्यात तर तिथलं काहीच बाहेर यायचं नाही...अधिकृत तुटपुंजी माहिती मिळवायला 6692543 हा तिथला फोन होता.. संध्याकाळनंतर तो ही बंद असायचा...त्या काळात सयाजीनं मला खूप मदत केली..तो तिथं वोर्ड बॉय होता.. काळ्याभिन्न रंगाच्या, धिप्पाड सयाजीचं मन कोमल अन संवेदनशील...स्वभाव बोलघेवडा..वडिलांच्या जागेवर तो त्या नोकरीत चिकटला अन त्या रुग्णालयाच्या अनोख्या विश्वाचा एक भाग बनून राहिला. ..तिथल्या रुग्णांच्या अनेक करूण कहाण्या त्यानं सांगितल्या..कित्येक धोकादायक, हिंसक रुग्ण मला जवळ नेऊन दाखवले...तिथं असलेल्या जवळपास निम्म्या रुग्णांचे नातलग त्यांना एकदा तिथं सोडून गेले की पुन्हा परततही नाहीत... .कित्येक लोक खोटा नाव पत्ता द्यायचे...रुग्ण बरा झाल्यानंतरही केवळ नेमकं नाव गाव याचा पत्ता नसल्यानंसैरभैर व्हायचा....पळून जायचा.एकतर स्वतःच्या घरी किंवा त्यांनी पुन्हा इथे आणून ऍडमिट करू नये म्हणून लांब कुठल्या तरी गावी मजुरीची कामं करू लागायचा..नातलगांचा खरा पत्ता नसल्याने वाऱ्यावर आलेल्या रुग्णांची वाताहात रोखणारी व्यवस्था किमान तेव्हा तरी अस्तित्वात नव्हती..

                    रुग्णालयात या रुग्णांना दिली जाणारी पशुवत वागणूक दिसली.. मानवतेचे गोडवे गाणाऱ्या या समाजातील नाती किती कोरडी आहेत याचं प्रत्यंतर देणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची अमानुषताही नजरेस पडली...वेड्या मायेनं रुग्णांना कुरवाळणारे तिथले कर्मचारी पाहिले अन खोटा नाव पत्ता देऊन एकदा दाखल केलेल्या रुग्णाकडे आयुष्यभर पाठ फिरवणारे काहींचे अमानुष अनुभवही समजले.. भोपळ्याचे तोंडात मावणार नाही एवढया मोठया आकाराचे तुकडे  चुलीवर शिजत असलेलं कालवण पाहिलं...जनावरंही तोंड लावणार नाहीत अशा त्यांना दिल्या जात असलेल्या जाड्याभरड्या कोंड्याच्या चपात्या पाहिल्या..त्यांच्या अंगावर ना  धड कपडे ...ना धड अंथरुण,  ना धड पांघरूण... कित्येक रुग्ण ऐन हिवाळ्यात तिथल्या थंडगार फरशीवर कुडकुडताना पाहिले....कित्येकजण वेदनांमुळं विव्हळायचे...रात्र रात्र जागायचे.. आठपंधरा दिवसातून एकदा कधीतरी सर्कसमधल्या प्राण्यांना घालतात तशी पाण्याच्या फवाऱ्यानं  रुग्णांना सामूहिक आंघोळ... साहजिकच् अस्वच्छतेमुळं अनेकांना खरूज, नायट्यासारखे त्वचारोग जडतातच्....काहींना काबूत आणण्यासाठी होत असलेली अमानुष मारहाणही केली जाते असं समजलं अन् एकंदर सारा प्रकार पाहून माणूसकीवर, व्यवस्थेवर विश्वास तरी का ? आणि कसा ठेवायचा असा मला प्रश्न पडला.. .बरं याबद्दल दाद मागायची कुणी ? कशी ? आणि कुणाकडं ? इथल्या रुग्णांना काही कळत नाही..ज्यांना कळतं त्यांना बोलायची बंदी...कुठं वाच्यता केली तर आणखी मार बसायचीही भीती...निम्म्याहून अधिक रुग्णांचे नातलग भेटायलाच येत नाही..अन जे येतात ते लक्ष देत नाही...सारा असा गुंतागुंतीचा मामला.......एकंदर परिस्थितीमुळं शरीरानं अन् मनानं हतबल झालेल्या  इथल्या रुग्णांच्या निष्प्राण डोळ्यांतून टपकणारे अश्रू आठवले की आजही मनात कालवाकालव होते. महिलांच्या वोर्डमधली स्थिती तर अतिशय केविलवाणी. संवेदनांची,देहाची जाणीव नसलेल्या, शून्यात नजर लावून बसलेल्या कित्येक महिलांचे निस्तेज चेहरे आजही डोळ्यांसमोर उभे राहतात...तिथल्या एकंदरच साऱ्या रुग्णांच् पुढं काय होतं ? हा मला कायम अस्वस्थ करणारा प्रश्न आहे...वर्षनुवर्षे या हॉस्पिटलमधल्या साधारणतः अडीच हजार मानसिक रुग्णांच्या सान्निध्यात राहिल्यानं तिथल्या अनेक कर्मचा-यांचंही मानसिक संतुलन ढळत जातं हे ही एक तिथलं कटुवास्तव...

          रुग्णालयाच्या या साऱ्या प्रवासात सयाजी माझ्यासोबत असायचा..तो अगदी कोवळ्या वयापासून या रुग्णालयात फिरलाय..तिथली इंच न इंच त्याला माहिती...सुट्टीच्या दिवशीही तो रुग्णालयातच फिरत असतो...तिथल्या रुग्णांशी हवापण्याच्या गप्पा करतो...कोण नवीन आलंय,कुणाला कसला त्रास आहे, कुणाला काय आवडतं,   कोण बरं झाल्याचं सोंग आणतयं,  कोण खरंच बरं झालंय याची त्याला इत्यंभूत माहिती..खरंतर मेंटल हॉस्पिटल म्हणजे सर्वसामान्यांना फारशी माहिती नसलेली, त्याबद्दल औत्सुक्य असलेली काहीशी भीतीप्रद जागा..अन ते खरंही आहे...पण सयाजी तिथं एवढा रूळलाय की मनोरुग्णांच्या शरीरातून सुटणारा विशिष्ट उग्र दर्प आता त्याच्याही अंगाला येत असतो...त्यानंच् रुग्णालयातला एक जरा सुस्थितीत असलेला वोर्ड दाखवला....तिथं मधू लिमये यांचे धाकटे बंधू भालचंद्र लिमये पेपर वाचत पहुडले होते..ते बऱ्याच वर्षांपासून तिथं ऍडमिट होते..ते पेपरमधल्या काही ओळी ते बॉलपेनाने खोडून काढत होते.. त्यांच्याशी मी संवाद साधला...थोडं नीट काही असंबद्ध ते बोलले.... मधू लिमये निवर्तल्याचं ठाऊक आहे का ? असं मी त्यांना विचारलं.... त्यावर, पेपरवाले काहीपण छापतात असं म्हणून ते हसले व पुन्हा पेपर वाचनात गढले.... तिथल्या अनुभवांबाबत   मनोरुग्णांच्या नरकयातना ' ही माझी वृत्तमालिका 'सकाळ' ने ' चार भागात प्रसिद्ध केली अन एकच गदारोळ उठला...सेना-भाजपचे सरकार नुकतेच सत्तेत आलं होतं..पुण्याच्या मंत्र्यासंत्र्यानी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली...माझे मित्र आमदार दीपक पायगुडे तेव्हा पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले होते...त्यांनी या रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबाबत आवाज उठवला...शासन दरबारी या वृत्त मालिकेची दखल घेतली गेली...रुग्णालयावर नवी समिती नेमली गेली...निधी मंजूर झाला..काही इमारतींची कामं सुरू झाली..रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा जरा  सुधारला..पूर्वीपेक्षा आता परिस्थिती बरी आहे..आताही निरनिराळी कामं, उपक्रम तिथं सुरू झाल्याचं समजतं.. नुसती व्यवस्था बदलून उपयोग नाही...सयाजीसारख्या कनवाळू मनाच्या लोकांची तिथं गरज आहे.....

             खरंतर तुरुंग अन् मेंटल हॉस्पिटल ही दोन्ही ठिकाणं एकापरीनं वाईटच्... म्हणजे कैदी किंवा मनोरुग्ण होऊन तिथं जाणं अत्यंत वेदनादायी......विस्कळीत  मनोव्यापार सुरळीत करण्यासाठी या  व्यवस्था निर्माण केल्या गेल्यात...... सामाजिक तत्त्वामुल्यांशी विसंगत, विघातक वृत्तीचं तिथं नियमन होणं अभिप्रेत असतं..त्यासाठी कैद्यांना अन रुग्णांना  विलक्षण यातना सोसाव्या लागतात... वेदनांचे अनंत कल्लोळ तिथं नित्यनवे उमटत असतात.. जितेपणीच् कितीतरीजण रोज तिथं मरत अनुभवत असतात.. .समाजात त्याविषयी नेमकी माहिती अन् पुरतं गांभिर्य नसावं बहुधा..त्यामुळंच कित्येकदा सहज संवादातही जेल अन मेंटल हॉस्पिटलबद्दल सवंग विनोद केले जातात; तेव्हा मनोरुग्णांचे चेहरे डोळ्यासमोर  येतात....त्या मूक वेदना काळीज कुरतडायला लागतात अन् तिथं पुन्हा जायला मी नव्याने सज्ज होतो...





1 comment:

  1. ब्लाॅग वाचून खूप दुःख झाले,
    हे रुग्ण मानसिक यातनांबरोबरचं
    शारिरीक यातना ही भोगत आहेत
    जेल ,मेंटल हॉस्पिटल,
    आनाथ आश्रमांमागची वस्तुस्थिती विदारक आहे
    गरज आहे माणुस म्हणुण त्यांना
    वागवण्याची कारण घरपरतीचे
    सगळे रस्ते जाणून बंद केले जातात

    ReplyDelete