Wednesday, 21 November 2018

राजपूत कॅप्टन

राजपूत कॅप्टन
-  -  -  -  -  -
उन्हाळ्याच्या सुट्टीत गोंदवल्याला असताना
बाबा कदमांचं पहिलं पुस्तक वाचलं...नाव आठवत नाही...पण बाबांची नेहमीची मस्त स्टाईल...गावातील मुजोर पुढारी...त्याचा जाच..आणि त्याला वठणीवर आणणारा तेथील धाब्याचा फौजी मालक...पुढे बाबांच्या अनेक कादंब-यांमधून असे धाबेवाले भेटू लागले....एक तर ते सैन्यातील निवृत्त जवान असायचे....रिटायर्ड पोलीस अधिकारी किंवा दूर प्रांतातील पळून आलेला दिलदार गुन्हेगार......कुठल्यातरी गावापासून दूर अंतरावर  एकाकी आयुष्य जगायचं हे त्यांचं वैशिष्ठ्य.....का कुणास ठावूक पण असा कुणीतरी, कधीतरी भेटावं असं नेहमी वाटायचं....तसं कधी घडलं नव्हतं....पण, इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते परवाच्या जव्हार-विक्रमगडच्या दौ-यात घडलं....अगदी बाबा कदमांच्या कादंबरीत डिट्टो शोभेल असा द-याखो-यात एकाकी स्वत:च्या गढीत बंदुक घेऊन राहणारा कॅप्टन मला भेटला....तसाच दिलदार...निडर...आणि व्यवस्थेशी लढणारा.....

 जव्हारपासून कशिवलीकडे जाताना डावीकडे एक रस्ता जातो....तेथून सरळ पाचशे फूट खाली दरी आहे....तीन बाजूंनी डोंगररांगा ...आणि एका बाजूला रस्ता....त्या डोंगररांगांच्या घळीत राहतो हा कॅप्टन...अंतरीक्ष भारद्वाज त्याचं नाव...वय असेल चाळीस--पंचेचाळीस...गर्द सावळा रंग.. पावणेसहा फूट उंची...मजबूत बांधा.. पीळदार मिशा.....शुद्ध हिंदी आणि पॉलीश्ड इंग्रजीत बोलतो.....त्या एवढ्या मोठ्या गढीवजा घरात एकटा राहतो....दोन नोकर आणि त्यांची दोन छोटी मुलं असतात सोबतीला.....एका कॉन्टॅक्टकडून कॅप्टनची माहिती मिळाली होती....पण विश्वास बसत नव्हता.. इतक्या दुर्गम भागात कुणी राहत असेल म्हणून.....पण जे पाहिलं ते वास्तव आहे.... आत्ता तिथं गढी बांधली असली, तरी ती जागा ताब्यात घेण्यासाठी कॅप्टनला बरीच यातायात करावी लागली.....तोपर्यंत केवळ एक तंबू बांधून शिकारी कुत्र्यासह बंदुक घेऊन दोन वर्ष राहीला तो तिथं...खायच्या गप्पा नाहीत....एवढ्या किरर्र जंगलात....लाईट...पाण्याची कसलीही व्यवस्था नसलेल्या दुर्गम भागात एकट्याने असं राहणं मला नाही वाटत कुणाला शक्य होईल....पण हा निडर गडी सैन्यातला....त्यामुळं इरेला पेटला...आणि इथंच राहीला.....आदिवासी पाड्यावर जाताना त्याला आवर्जून भेटलो...दोस्तच झाला तो.....

 पुण्याला निघायच्या आदल्या रात्री मी त्याच्याकडे निघालो होतो... ....रस्त्यापासून खाली दरीत जाईपर्यंत काळोखच काळोख होता..... सफारी, स्कॉर्पिओशिवाय दुस-या गाडीचं कामचं नाही इथं....बंदुक आणि एक अल्सेशियन गाडीत होता...नाइलाजच होता......चोर -दरोडेखोर आणि त्यापेक्षाही वन्य प्राण्यांची भीती असते...माहितीचा परिसर नाही...आजुबाजूला दहा किलोमीटरवर कुठं वस्ती नाही....सगळीकडे रातकिड्यांचा किर्र् आवाज येत होता.....दूर अंतरावरील 'राजपुताना'वर मिणमिणता लाईट दिसत होता फक्त...राजपुताना हे कॅप्टनच्या गढीचं नाव....त्याला खूप अभिमान आहे तो राजपूत असल्याचा...त्याच्या बोलण्या चालण्यातून राजपुती दिमाख सहजपणे लक्षात येतो....मी गेलो तेव्हा लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता...भलामोठा दिवाणखाना....त्याला जोडूनच फ्रेंच विंडो असलेली गॅलरी....गॅलरीत बसलो आम्ही....गढीचं काम अजून सुरूच आहे....पण जे काही केलंय ते मस्तच...सारं काही राजस्थानी स्टाईलचं....अगदी पलंगपोस...खुर्च्या...सोफे...गढीची रचना सर्व काही....शिसवी टी पॉयवर ब्लॅक डॉगची बॉटल होती....त्यातील स्कॉच ग्लासांमध्ये अदबीने ओतली.. सावकाशपणे तो बोलू लागला....राजस्थान ते या दुर्गम भागातील प्रवासाचा पट त्याने उलगडला.....मूळचा  राजस्थानचा...  कोट्टामध्ये त्याचे बापजादे सरदार घराण्यातले....हा शिकला मुंबईत..कॉलेजमधे....दमयंती नावाच्या मुलीच्या खूप प्रेमात पडला...पण काही जमलं नाही बहुदा त्याचं...मग खूप निराशेच्या गर्तेत सापडला....त्याचे आई-वडिल दोघेही अवध एक्स्प्रेसच्या अपघातात गेले...आणखी खचला तो...त्याची लाडकी बहिण, मावशी लंडनमध्ये असत....मध्यंतरी मावशीही गेली....त्यामुळं तसा तो एकाकीच पडला...शॉर्ट सर्व्हीस कमिशन घेऊन तो आर्मीत दाखल झाला....पाच-सात वर्षांपूर्वी परतलाय....त्यानंतर, काही दिवस दिल्लीत राहीला.....मग मुंबईत आला....फिल्म लाईनमध्ये आहे.....बड्या बॅनर्सच्या पिक्चर्सना फायनान्स करणा-या कंपनीसोबत काम करतो....महिन्यातला आठवडाभर मुंबईत....बाकी या आदिवासी भागात.....इथं यायचं कारण भलतंच....त्याला विक्रमगडला कमी किंमतीत मोठी जमीन मिळाली...तिथं हॉटेल, रिसॉर्ट सुरू करायचा त्याचा मानस होता....त्यासाठी मुंबईचा फ्लॅट विकला...विक्रमगडच्याही जमिनीत फसवणूक झाली....घर का ना घाट का अशी अवस्था झाली त्याची....पण हा पडला फौजी....विक्रमगडच्या त्या माणसाकडून त्याने पैसे वसूल केले...आणि एका मध्यस्थामार्फत जव्हारनजिकची ही दहा एकर जागा खरेदी केली.....इथंही फसगत झाली होती....मग याचं फौजी डोकं भडकलं.....जागेला कुंपण घालून तंबू बांधून तो इथंच राहीला... सिस्टीमशी लढला....गाववाल्यांशी लढला आणि त्यांना पुरूनही उरला....आधी इथं साधा लाईटचाही पोल नव्हता...टेलिफोनची...मोबाईलची तर बातच नाही....कॅप्टनने खूप प्रयत्न केले...चिकाटीने पाठपुरावा केला...मुंबई-दिल्लीतले त्याचे सोर्सेस वापरले...मग हळूहळू लाईट आली....टेलिफोनचा टॉवर उभा राहीला.... टी शर्ट आणि शॉर्ट हा त्याचा नेहमीचा वेष....तशाच कपड्यांत बुलेटवरून तो गावात जातो.... त्याचं एकाकी राहणं...त्याचा अबलख घोडा, शिकारी कुत्री, त्याची बंदुक यामुळे लोकांना कमालीचं कुतूहूल ...टरकून असतात लोक....कॅप्टन म्हणतात त्याला....गावातील मान्यवरांशी चांगले संबंध आहेत त्याचे....या दुर्गम भागात कित्येक हिंदी पिक्चर्सचं शूटींग चालतं....ती मंडळी आवर्जून कॅप्टनकडे येतात...मग मोकळ्या माळावर रात्री शेकोटी पेटवून छान मैफल जमते...कॅप्टन उत्तम कुक आहे...शाकाहारी-मांसाहारी नावीन्यपूर्ण पदार्थ बनवून पाहुण्यांना खिलवायचा शौक आहे...त्यादिवशी मधात घोळवलेले प्रॉन्स त्याने मस्त बनवले होते...मुंबई-दिल्लीतले कित्येक पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी कॅप्टनचे दोस्त...ते ही येतात कधीमधी त्याला भेटायला...त्याचा तिथला ठिकाणा पाहून नवल करतात...कॅप्टन आर्मीत असताना त्याचा एक मित्र शहिद झाला..त्याच्या मुलीची रेशूची पूर्ण जबाबदारी कॅप्टननं उचलली...तिचं उच्च शिक्षण त्यानं पूर्ण केलं...ती आता चांगल्या कंपनीत सेटल् झालीये....दमयंतीच्या प्रेमात पोळल्यानंतरही कॅप्टनने पुन्हा एकदा तिच चूक केली....मुंबईत एका मुलीच्या तो प्रेमात पडला...पण ती पक्की मुंबईकर....ती इकडे यायला तयार नाही...याला तिकडं जायचं नाही....त्यामुळे ते ही प्रकरण फिस्कटलं...

 आकाश आणि लिना हे  जोडपं कॅप्टनकडं कामाला आहे....ते तिथंच राहतात.... त्याची सारी व्यवस्था....घराची साफसफाईची आणि सर्व कामं करतात...दोन मस्त छोटी मुलं आहेत त्यांना... कॅप्टनही त्यांची काळजी घेतो...पण कधी कधी आकाशवर वैतागतोही...त्याने फारच काही वेंधळेपणा केला, तर रात्री अपरात्री मग कॅप्टन वैतागतो आणि त्याला हाकलून काढतो....मग लिनाचा दीनवाणा चेहरा पाहून त्याला माफ करतो....महिना-दोन महिन्यातून एक-दोनवेळा हा सीन ठरलेला असतो...या इथल्या जंगलात उच्चभ्रू वर्गासाठी एक उत्कृष्ठ रिसोर्ट उभारायचा कॅप्टनचा मानस आहे....त्याचं प्लॅनिंग तयार आहे.....एका बाजूला मासेमारीसाठी तळं उभारतोय...बार्बेक्यूसाठी एकीकडे भट्टी उभारणं चालू आहे....पण दमादमानं....इथं कामगारांची वानवा....सिमेंट, वाळू, खडी, लोखंड आणि बांधकामाचं काहीही साहित्य लागत असलं की नाशिक किंवा ठाणे गाठण्याशिवाय पर्याय नाही...त्यामुळं एखाद्या छोट्‌य़ा गोष्टीसाठीही काम अडून राहतं...सध्या बंदच आहे...जून-जुलैमध्ये तर शक्यच नाही...कारण या भागाइतका पाऊस महाबळेश्वरलाही पडत नाही...पण वर्षभरात होईल सगळं....नक्कीच होईल....पेग संपवत कॅप्टन बोलला...बाहेरपर्यंत मला सोडवायला आला...दुस-या दिवशी सकाळी जेवायचं आमंत्रण दिलं....मी निघालो तितक्यात दमयंतीऽऽऽअसा त्याचा आवाज आला.....मी चमकून पाहिलं....आकाश व लिनाच्या मुलीला कॅप्टनने कवेत घेतलं होतं....मी त्याकडं पाहिल्यावर मिश्कीलपणे हसत म्हणाला.....इसका भी नाम दमयंती है....मी हसलो....लिनाच्या मुलीचं नामकरण  केलं होतं यात शंकाच नव्हती....

No comments:

Post a Comment