Wednesday, 21 November 2018

दूर-ए-नजफ

दूर ए नजफ
........................
पेठांचा परिसर आणि रुपाली, वैशाली हॉटेलचे कट्टे म्हणजेच पुणं असं समजणारा किंवा त्या भ्रमात असणारा एक वर्ग पुण्यात पूर्वापार नांदतोय..खरं तर पुण्याच्या पूर्वेला असलेल्या कॅम्प एरियाला पेठेइतकीच् पुरातन संस्कृती आहे..तिथली जुनी घरं, वाडे अद्याप टिकून आहेत. हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि इराणी लोक तिथं वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात आणि ते ही अस्सल पुणेकरच् आहेत..याच कॅम्पमध्ये एकदा अंगठया, इराणी रत्न, खडे विकणाऱ्या नझर अली ची दहा-बारा वर्षांपूर्वी ओळख झाली..पुढे  काही ना काही कारणाने ते नेहमी भेटत राहिले.... पुढे हे रत्न माझ्या मित्रांच्या खजिन्यात कायमचं सामावलं गेलं..

         नझरअली अली अकबर सांची हे त्यांचं पूर्ण नाव....कालच्या भेटीत विचारलं तेव्हा समजलं...एरवी ते माझ्यासाठी फक्त नझर अली..आणि त्यांच्या भाषेत मी जर्नालिस्ट.. त्यांचे आजोबा वगैरे नातलग इराणचे रहिवासी..पन्नास च्या दशकात तिथं मोठा दुष्काळ पडला...तेव्हा त्यांचे वडिल पुण्यात आले.. नझर अलींचा जन्म इथल्याच् ससून हॉस्पिटलमधला..ते आधी पर्शियन शाळेत शिकले..मग उर्दू, मग इंग्रजी माध्यमात...बुधवार पेठेतल्या सराफ कट्ट्यावर व्यापाऱ्यांशी जेव्हा ते खड्यांच्या भावात घासाघीस करतात,तेव्हा त्यांचं मराठीवरचंही प्रभुत्व लक्षात येतं.. पुण्यात शिया पंथीय मुस्लिम फारच कमी, जेमतेम पाच-सात हजार आहेत...नझर अली त्यांच्यापैकी एक. पूर्वज,नातलग इराणचे असल्यानं तिथलं आकर्षण त्यांच्या मनात नक्कीच् आहे...अन् पुण्याबद्दलचं  प्रेमही तितकंच सच्च आहे.. शिया समाजाची एकमेव मशीद कॅम्पमध्ये आहे...इमामबाडा या नावाने ती ओळखली जाते....परिसर मोठा, प्रशस्त आहे...नझर अली त्याच भागात लहानाचे मोठे  झाले...तिथल्या इंचाइंचावर त्यांच्या काही ना काही आठवणी दडलेल्या आहेत...त्यामुळं आजही दिवसातून बराचसा वेळ ते तिथंच असतात..ग्रहांची उपरत्न, विशेषतः इराणी रत्न विकण्याचा त्यांचा मूळ व्यवसाय..म्हणजे कसं की साधारण पुष्कराज, माणिक, हिरा, मोती, पाचू अशी  ग्रहांची रत्ने आपल्याकडं जास्त वापरली जातात...काही लोक ओपल, चंद्रमणी, फिरोझा, अकिक अशी उपरत्न वापरतात...त्यातले बहुतांश खडे इराणमधून येतात..तिथून पुण्यामुबंईला येणारे नझर अलींचे मित्र खास त्यांच्यासाठी ही रत्न आणतात..इराणचे बसरा मोतीही त्याच्याकडं मस्त मिळतात.. ग्रहांचे खडे वापरावे की नाहीत ? त्यावर कुणी किती विश्वास ठेवायचा ? हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय...नझर अलींचं वैशिष्ठय म्हणजे ते निरनिराळ्या विकारांवर म्हणजे विकार बरे होण्यास उपयुक्त ठरतील अशी रत्ने देतात..त्यातली त्यांना खोल माहिती आहे....त्यालाही  एक पार्श्वभूमी आहे..ऐन तारुण्यात त्यांच्यावर एक निराळाच् बाका प्रसंग उद्भवला...निरनिराळ्या मार्गाने त्यांनी त्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला ...पण, उलट ते त्या समस्येच्या गर्तेत अधिक अडकत गेले...अखेर, मध्यप्रदेशमधल्या रतलामजवळ असलेल्या हुसैनी टेकडीवर सर्वशक्तिमान विधात्याला ते शरण गेले..तिथल्या धार्मिक संकुलात चार सहा महिने राहिले. मनोभावे उपासना केली..त्या काळात  तिथं बरेच मित्र झाले..तिथं लखनौहून अली खान नावाचे एक अवलिया गृहस्थ आले होते..ते रत्न शास्त्रात पारंगत होते..त्यांनी नझर अलींना या शास्त्राची माहिती दिली..ते ही मन लावून सारं शिकले....तिथून परतल्यावर त्यांनी पुण्यात हा व्यवसाय सुरू केला...आता या गोष्टीला जवळपास तीन दशकं उलटून गेलीत.... पण, मर्यादित वर्तुळातच् त्यांचा हा व्यवसाय चालतो..रत्नांची माहिती आहे म्हणून त्याचा त्यांनी बाजार मांडला नाही..गरजू माणसाच्या भावनेचा कधी गैरफायदा घेतला नाही...मुळात फक्त पैसे कमवण्याचं त्यांचं हे साधन नाही..त्यांना त्या गुरूनं सांगितलंय की हे फकिरी काम आहे..फसवाफसवी करायची नाही..खोटंनाटं काम करायचं नाही...नकली खडे कधी विकायचे नाही... अस्सल खड्यांची उपलब्धता कमी असल्यानं इतर छोटी मोठी कामं करत ते हा व्यवसाय करतात.....इमामबाड्यात दिवसभर बसून ते शिया समाजाची कॅलेंडर्स, खास इराणहून मागवलेली पिस्त्याची मिठाई, सुकामेवा विकतात..इराणहून आलेल्या पर्यटकांसाठी पुण्यामुंबईत गाईडचं, दुभाषांचं काम करतात...ते दिसायला  साधेसुधे..राहणीमान अगदी साधं...पण इथल्या प्रत्येक  इराणी माणसाच्या गळ्यातला ते ताईत आहेत..इथल्या प्रत्येक इराणी कुटुंबाची, प्रत्येक माणसाची त्यांना खडानखडा माहिती आहे..कुठल्याही इराणी माणसाकडं पोचायचा नझर अली पासवर्ड आहे..
       नझर अलींशी गप्पा मारायला खूप मजा येते....दूर ए नजफ, दाना फिरंगी, जबरजद्द, कंटकीज, जहर मोहरा, यूक्लेज, कालसी डोनी, निलीयर, स्वर्णमख्खी, संगे माहेमरीम, मुए नजफ अशी एरवी फारशी माहिती नसलेल्या रत्नांची नावं त्यांच्या बोलण्यातून समजत जातात..आणि ही रत्न योगानेच एकाकडून दुसऱ्याकडे जातात असं ते मानतात..त्या योगायोगांवर त्यांचा विश्वास आहे...छोट्या कागदी पुड्यांच्या विशिष्ठ घड्या करून त्यात त्यांनी हे खडे ठेवलेले असतात...आधी ते या रत्नाच्या तयार अंगठ्या विकायचे..मागे एकदा त्यांच्या घरीही गेलो होतो..त्यांच्याकडच्या दुर्मिळ रत्नांचा खजिना पाहून आलो. नाना पेठेतल्या  छोटेखानी घरात इराणी हलवा आणि  बरेचसे स्वादिष्ट पदार्थ त्यांनी प्रेमाने खाऊ घातले होते..एकदा  इराणहून एका मित्राने  'दूर ए नजफ' नावाचा एक अस्सल खडा त्यांना दिला..तो त्यांना बेहद्द आवडला होता...पण, नंतर तो कसा काय पण त्यांच्याकडे असलेल्या रत्नांमध्ये मिसळला गेला..आणि विकलाही गेला.त्यांनी खूप शोधलं.अनेकांना विचारलं..पुन्हा तसा खडा घ्यायचा खूप प्रयत्न केला..पण, पुन्हा तसलं रत्न काही त्यांच्या हाती लागलं नाही...खूप हळहळले ते....तो खडा पुन्हा त्याच्याकडं येईल अशी त्यांना आशा आहे...पण तेव्हापासून त्यांनी पुन्हा  कुठलं रत्न धारण केलं नाही....आणि हा व्यवसायही कमी करून टाकला..
      ..साधारणतः आपण कुणाला काही प्रश्न विचारला आणि ती व्यक्ती डाव्या भुवईच्या कोपऱ्यात पहात विचार करू लागलं की ती खरं उत्तर देत असते असा एक अनुभव आहे..उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला बघत उत्तरं देणारे विचार करत असल्याचं  फक्त भासवत असतात असं वाटतं.. नझर अली कुठल्याही प्रश्नाचं उत्तर डावीकडे वर बघत देत असतात..त्यांचा सच्चेपणा, भाबडेपणा त्यातनं जाणवत असतो..ते लहान मुलासारखे निरागस आहेत अन् मिश्किलही....त्यांच्या गप्पा म्हणजे मस्त मेजवानीच् असते..खास इराणी पद्धतीचा चहा पाजून ते निरनिराळे किस्से चष्म्याआड  डोळ्यांची विशिष्ठ मिचमीच् करत मिश्किलपणे सांगत राहतात..इराणी लोकांचे रीतीरिवाज, परंपरा, खाद्यसंस्कृती, वैशिष्ट्यपूर्ण  स्थळांची,वस्तुंची, रत्नांची माहिती देत असतात.. गप्पा मारत असतानाच्  सलमान आणि हुसैनी कॅलेंडरची, मिठाईचीही विक्री सुरू असते..तसं तर इराणी वर्तुळाबाहेरच्या फार कमी लोकांशी त्यांचा संपर्क आहे..वयाच्या साठीतही त्यांचा  सायकलवरून प्रवास आणि व्यवसाय सुरू असतो...आपण बरं आणि आपला व्यवसाय बरा या वृत्तीनं त्यांचं काम सुरू असतं... त्यांना माझी रत्नाबाबतची रुची माहित आहे..मी नेहमी निरनिराळी  रत्न बदलत असतो म्हणून ते वैतागतातही...त्यांना चिडवायला आवडतं मला.. .बऱ्याच दिवसांनी काल ते भेटले...गप्पा मारता मारता मुद्दाम त्यांना म्हटलो..मला द्या हो एखादा एकदम हटके खडा....अल्लाउदिनचा दिव्यासारखाच् निघाला पाह्यजे...ते काहीसे चिडले..मला म्हटले, " तुम ज्यादा इस झंझट में मत पडो हा, फकीर बनके घुमते रहोगे..." .आमचं बोलणं चालू असताना एकजण आला.त्यांनी ओळख करून दिली..तो शाह आलम होता...नुकताच इराणहून काही कामासाठी आला होता..आम्ही तिघे गप्पा मारत होतो..नझर अली काहीसे अस्वस्थ वाटले..त्यांची नजर काहीतरी बेचैन वाटली.. त्याच्या अंगठ्या ते निरखून पाहत होते..बोलत असतानाच एकाएकी त्यांच्या नजरेत चमक आली .  तो  निघाला... उभयतांमध्ये पर्शियन भाषेत काही बोलणं झालं..त्यानं पट्कन आपल्या बोटातली अंगठी काढून नझर अलींच्या बोटात घातली...त्यांनी त्याला गाढ आलिंगन दिलं..आधी काही लक्षात आलं नाही....पण नंतर काहीसा  अंदाज आला.. मी नझर अलींकडं पाह्यलं...आनंद भरलेल्या डोळ्यांनी डाव्या कोनातून पहात त्यांनी हात उंचावला...अनामिकेमधलं रत्न लकाकलं.... बहुदा त्यांना त्यांचा  'दूर ए नजफ' गवसला होता....

No comments:

Post a Comment