Wednesday, 21 November 2018

यझदी चा फिटर

यझदीचा फिटर . ..
 - - - - - - - - - - - - - - -

 बुलेटच्या मागच्या चाकात जरा हवा कमी असल्याचं काल जाणवलं......अशावेळी जवळचा  पंक्चरवाला अण्णा पटकन आठवत नाही....मग कलमाडी पंपावर गेलो...तिथं समजलं की आफीसच्या पलिकडंच आहे हवेवाला अण्णा...पुन्हा आलो तिथं....हवा भरली...त्या बोळकांडीतून गाडी तशीच मागे आणण्याऐवजी पुढून वळवून यावं या विचाराने पुढे नेली...त्या छोट्याशा जागेत गाडी वळवत असतानाच तिथल्या एका काळोख्या खोलीकडे लक्ष गेलं....काहीतरी मनात चाळवलं....इथं आपण यायचो असं अंधूक आठवलं...थोडावेळ थबकलो...आणि लक्षात आलं अरे, ही तर सुभाषची खोली . . .

 मधल्या वीस वर्षांत मी पार विसरून गेलो होतो....सुभाष त्यावेळी यझदी गाडीचा फिटर म्हणून प्रसिद्ध होता पुण्यात.... बुलेटप्रमाणेच यझदी ही देखणी व दणकट बाईक.. 90 च्या दशकात कंपनी बंद झाल्यामुळे या गाड्या पाहता पाहता नामशेष झाल्या...या गाडीचे अनेक चाहते आजही आहेत...तेव्हाही होते....अनेकजण जुन्या यझदी मोटारसायकल्स विकत घेऊन त्या नव्याने बनवून घेत असत....सगळ्या गॅरेजमध्ये या गाड्यांची दुरुस्ती व्हायची नाही....खास जुने फिटरच ही कामे करायचे...शिवाजीनगरचा सुभाष त्यापैकीच एक.......

 1991 च्या सुमारास लोकसत्तामध्ये मी उमेदवारी करायचो....इंडियन एक्स्प्रेसचं आणि आमचं एकत्रच आफीस होतं....नरेन करूणाकरन, सत्यजित जोशी, सुजाता देशमुख, आव्हरटीनो मिरांडा, माधव गोखले, अनोष मालेकर असे त्यांचे रिपोर्टर आणि आमचे 5-7 रिपोर्टर कायम एकमेकांच्या संपर्कात असायचो....एकत्र असल्याने आमच्यात छान मैत्रीही झाली होती....त्यात विश्वास हिरेमठची भर पडली....तो मूळचा कर्नाटकचा....काहीसा बुजरा, शांत पण उमद्या मनाचा . . .काहीशी कमल हसनसारखी पर्सनालिटी...अधूनमधून क्राईम रिपोर्टींगचं काम त्याच्याकडे असलं की आम्ही सोबतच कमिशनर आफीसला जायचो....विश्वनाथची यझदी होती....त्याच्या त्या मस्त रोडकिंग मॉडेलच्या बाईकवरून आम्ही अनेकदा भटकायचो...


 यझदीवर विश्वनाथचा खूप जीव...गाडीची सारखी घासपूस करत बसायचा तो...अधूनमधून लॉंग ड्राईव्हवर जायचा यझदी घेऊन...कधी कधी आम्ही जायचो फिरायला....मलाही त्याची ती यझदी आवडायला लागलेली....सगळ्या आफीसमध्ये यझदी आणि तिच्यावर विश्वनाथचा असलेलं प्रेम हा चर्चेचा विषय झालेला. . .मधल्या काळात त्याच्याकडे मोटारसायकल दिसली नाही....दुरूस्त करायला दिलीय असं तो म्हणाला....मग त्याचा गावातला प्रवास बहुदा रिक्षानं व्हायचा....कधीमधी मित्रांच्या गाड्यांवरून .....बरेच दिवस कसले..बरेच महिने झाले तरी त्याची यझदी दिसायची चिन्हं दिसेनात....होतीये दुरुस्त तो म्हणायचा....मग एक-दोघांनी सांगितलं की त्याने ज्याच्याकडे गाडी दिलीय तो मेकॅनिक गाडीच परत देईना.... ..विश्वनाथला विचारलं...बिचारा खेटे घालून दमला होता त्याच्याकडं...पण गाडी काही मिळत नव्हती...एकतर गाडी नसल्यानं त्याची रोजच्‌ गैरसोय होत होती....आणि गाडी मिळतेय की नाही याबाबत धास्तीही वाटत होती.....पण त्याच्याबद्दल तरीही विश्वनाथ मृदू बोलत होता...तो फिटर भामटा नाही...चांगला आहे, पण जरासा मूडी आहे.....त्यामुळं त्याच्या कलानं घेतोय...., असं म्हणायचा विश्वनाथ....तीन-चार महिने होऊन गेले होते....  एके दिवशी विश्वनाथने मलाच गळ घातली...सगळे उपाय करून थकला होता तो....विनोद सातव होते तेव्हा डेक्कन पोलीस स्टेशनला...त्यांच्या कानावर घातलंच....मग त्यांनी एक पोलीसच नेमला खास...गंमत अशी की त्या पोलिसांच्याही हाती काही हा मॅकेनिक म्हणजेच सुभाष लागलाच नाही.  ..मग विश्वनाथसोबत मी ही अनेक खेटे घातले....पण हा पठ्ठ्या काही सापडेना ....त्या बोळात एका छोटेखानी टपरीत त्याचं गॅरेज होतं...तिथल्याच खोलीत तो रहायचा...पण कधीही गेलो की टपरी बंद असायची..घरही बंद असायचं...कधी तो नुकताच येऊन गेला असायचा...तर कधी येणार आहे असा निरोप ठेवून गेलेला असायचा....दिवसा-रात्री आम्ही निरनिराळ्या वेळी जाऊन सुभाषला गाठायचा प्रयत्न केला...पण छे...तो काही हाती लागेना...चौकातली पोरं म्हटली तो आता खूप प्यायला लागलाय...तिकडं असतो दिवसभर वडारवाडीत....कधीतरी इकडे येतो....अनेकजण त्याला शोधत येतात इथे....त्यांच्या गाड्या दुस्रुस्तीसाठी घेतल्यात आणि पत्ताच नाही त्याचा...तुमची यझदी असली, इथं तर घेऊन जा सरळ....आम्ही बघितलं...तर विश्वनाथची मोटारसायकलही कुठे दिसेना. . . बरं पठ्ठ्या कुठं आहे हे ही समजेना....त्याचे वडील वडारवाडीत कुठंतरी राहतात असं समजलं होतं .. .तिथंही जाऊन आलो...पण त्याचा ठावठिकाणा काही  लागेना....


 विश्वनाथची यझदी आता आफीसच्या चिंतेचा विषय बनला होता.....आमचं सुभाषकडं चकरा मारणं सुरूच होतं...एके रात्री विश्वनाथ खूपच भावनावश होऊन कुठल्याही परीस्थितीत यझदी मिळालीच पाहिजे असं म्हणाला.....मग मनाशी ठरवलं....प्रदीप सोनवणे त्यावेळी पुण्याचा भाई होता....अरूण गवळीचा मित्र ...भलेभले टरकायचे त्याचं नुस्त नाव ऐकून...होता एकदम उमद्या मनाचा.... शाळेपासूनचा माझा दोस्त.... गेलो दुस-या दिवशी सकाळी विश्वनाथला घेऊन त्याच्याकडे . .. त्याचा दरबार भरलेला...आम्हाला बघून लगबगीने आला...सगळं बरं चाललंय ना? काय प्राब्लेम आहे का??  त्यानं विचारलं. . .त्याला सांगितलं सगळं ....मी पहिल्यांदाच त्याला काहीतरी काम सांगितलेलं....त्यात तो सुभाष नेमका त्याच्या घराजवळचा निघाल्याने तो चांगलाच वैतागला.....काहीच काळजी करू नकोस..आज रात्रीच यझदी मिळेल...तू जा बिंधास्त.. प्रदीपचे बॉडीगार्डस, त्याचा दरबार अणि तिथलं एकंदरच सगळं वातावरण पाहून विश्वनाथ गडबडलेला...त्यात प्रदीपने नाश्ता करायचा आग्रह केल्यावर तर तो बिचारा अगदी  बुजून गेला....गाडी आपली नक्की मिळणार ...हे तिथलं वातावरण पाहूनचं त्यानं ताडलं...


 आम्ही परतलो खरे,पण त्या दिवशी गाडी काही मिळाली नाही....जरा धीर धर असं विश्वनाथला सांगितलं मी...पण आठवडा झाला तरी प्रदीपचा काहीच निरोप आला नाही....प्रदीपला कॉन्टॅक्ट करावं असं मी ठरवलं आणि त्याचाच फोन आला..... पुन्हा विश्वनाथला घेऊन त्याच्या अड्ड्यावर गेलो.. सुभाषचे वडील बिचारे उभे होते तिथं....सुभाष प्रदीपच्या पोरांच्याही हाताला लागला नव्हता...पण त्याच्या पोरांनी त्याच्या वडिलांना उचलून आणलेलं....तेथील एकंदर चित्र पाहून विश्वनाथच घाबरला. . . ....सुभाषचे वडील पाय धरायला धावले...गयावया करायला लागले...त्यांना थांबवलं...फक्त आमची गाडी द्या... ..तुमची चूक नाहीये हे माहितीय मी म्हणालो..... ..संध्याकाळी या गॅरेजवर मी स्वत: गाडी देतो...तुमची.....ते म्हणाले...खूप हायसं वाटलं ....कधी एकदा संध्याकाळ होतेय असं झालेलं...

 संध्याकाळी  गेलो आम्ही गॅरेजवर.....सुभाषचे वडील वाटच बघत होते....आमची नजर विश्वनाथची त्याची गाडी शोधत होती...पण यझदी काही दिसत नव्हती...आमच्या नजरा ओळखून त्यांनी मानेनेच या असा इशारा केला . ..आम्ही त्यांच्यामागे गेलो सुभाषच्या रूममध्ये....चाळीस वॅटचा बल्ब मंद जळत होता...आत एक लाकडी बाज...काही कपडे...अंथरूण पडलेलं....एका कोप-यात पाण्याचा माठ . ..काही पोती पडली होती आजुबाजूला... काहीच कळेना..... ते म्हणाले, तुमची गाडी कशी होती माहिती नाही...आमचा सुभाष खरंच गुणी फिटर...पण दारूपायी वाया गेला...त्याने ब-याच गाड्या खोलून ठेवल्यात....आणि पुन्हा जोडल्याच नाहीत...पण त्याची एक सवय आहे चांगली...एखादी गाडी खोलली की त्याचं सुटं सामान एकत्र एकाच पोत्यात ठेवायचं...ही पोती अशीच आहेत....प्रत्येक पोत्यात एकेक यझदी आहे....मी त्या पोत्यांकडं पाहतं बसलो...विश्वनाथ माझ्याकडं पाहत होता.... हसावं की रडावं अशी अवस्था झालेली.  ..काहीच न बोलता बाहेर पडलो.....पुढे विश्वनाथने दुसरी गाडी घेतली....यझदी तो ही विसरून गेला असावा...मध्यंतरी सुभाष गेला ...प्रदीपला त्याचा मार्ग भोवला..दहा वर्षापुर्वि त्याची गेम झाली... वर्षभरापूर्वी विश्वनाथही  देवाघरी गेला...बहुदा बेंगलोरमध्ये.... काल बुलेटमध्ये हवा भरायच्या निमित्ताने त्या टपरीवर गेलो आणि यझदीसह सुभाष, विश्वनाथ आणि प्रदीप डोळ्यांसमोर तरळून गेले....

No comments:

Post a Comment