Wednesday, 21 November 2018

दादा


दादा
- - - -
साधारणत: 90-91 चं वर्ष असेल ते. मंडईतल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणजेच  भाऊशी माझे सूर जुळून छान मैत्री फुलली होती..त्यामुळं चौकात नेहमी येणंजाणं व्हायचं..तिथं भाऊचा मस्त ग्रुप होता.. (अजूनही आहे)..आमच्या गप्पा रंगायच्या..तिथल्या महेश दवेच्या अमृततुल्यमध्ये कधीही गेलं तरी मस्तपैकी घट्ट् चहाने स्वागत व्हायचं...विविध क्षेत्रातल्या दादा मंडळींची याच चौकात ओळख झाली..एकदा दुपारचा गेलो होतो तिथं... एकजण कुठल्यातरी विषयावर  व्याख्यान देत होता.. माईकविना, कोणत्याही विषयावर, कधीही कुठंही, भाषण देणा-यांचं पेवच फुटलं होतं तेव्हा पुण्यात...त्यातलाच तो प्रकार होता..चौकातल्या पोरांचा घोळका जमला होता त्याच्याभोवती...त्या गर्दीत गो-यापान वर्णाच्या, कमावलेल्या बांध्याच्या, तेजस्वी कांतीच्या एकाकडं सहज लक्ष जात होतं....मी भाऊला विचारलं.. हे कोण? तो म्हणाला हा तर आपला दादा...त्याने माझी दादाशी ओळख करून दिली..दादाची झालेली ती पहिली भेट चोवीस वर्षांनंतर अजूनही जशीच्या तशी स्मरणात आहे. त्यानंतर आमची ओळख काही काळच मैत्रीपुरती सीमित राहीली..नंतर ती भावाच्या नात्यात कधी बदलली हे आमच्याही लक्षात आलं नाही...
मुकुंद रमाकांत पंडित.. . हे दादाचं नाव...सारे त्याला दादा म्हणतात ...आणि ते त्याला शोभतंही...अलिकडच्या काळात कुणालाही भाऊ, भाई, अप्पा, अण्णा, बाप्पू असं काही म्हणायची टूम निघालीय...पण त्या आधीपासूनच साधारण 70-80 च्या दशकात दादाचं नामकरण झालंय.....ते कसं आणि का? याचा इतिहास शोधायचा असला, तर मंडई विद्यापीठातील एकाहून एका सरस किश्शांची, घटनांची पडताळणी करावी लागेल :)..एकाहून एक सरस माणसं पाहिलेल्या मंडई विद्यापीठाच्या वर्तुळात त्याला दादा हे नाव दिलं गेलं..याचाच अर्थ इतरांपेक्षा त्याच्यामध्ये नक्कीच काही जास्त असणार हे ओघानंच आलं..शिक्षणाचा साक्षरतेशी, सभ्यतेशी काही संबंध नसतो याचं दादा हे ढळढळीत उदाहरण..लौकीकार्थाने त्याचं शिक्षण खूप झालं नसेलही..पण त्याची साक्षरता विलक्षण आहे...तो पुरेपूर सभ्य आहे..
मराठी आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्याचं त्याचं वाचन पाहून थक्क व्हायला होतं...उत्तमोत्तम हिंदी,मराठी चित्रपट तर तो पाहतोच... तसाच हॉलीवूडच्या मूव्हीजचाही तो चाहता आहे..
दादाच्या आईचा मंडईत मिरचीचा गाळा...तिच्याबरोबरच दादानंही खूप कष्ट उपसलेत..खूप खस्ता खाल्यात..त्यामुळंच परीस्थितीची त्याला जाणीव आहे..मदत करणा-यांना तो विसरत नाही...अन केलेली मदत लक्षात ठेवत नाही...कुणाचे कणभर उपकार असतील, तर ते मणभर मानायचे ही त्याची वृत्ती...मंडई विद्यापीठाचे धडे गिरवलेल्या दादाची शरीरयष्टी मजबूत..कधीकाळी उभी मेणबत्ती पेटवून ती विझेपर्यंत जोर बैठका मारायचा त्याचा दंडक..त्यामुळं तो, अंबर गायकवाड, अप्पा अमराळे, अशोक मेहेंदळे हा त्यांचा सारा ग्रुपच बलदंड शरीरयष्टीचा...खंबीर मनाचा...नीडर वृत्तीचा...त्यांनी कधी उन्माद केला नाही...अन् उन्माद करणा-यांना कधी सोडलं नाही...दादा तसा मितभाषीच...पण, नेहमीच्या मंडळींमध्ये बसला की गप्पांची मैफल रंगवणार..तो अनप्रेडिक्टेबल आहे..कोणत्या घटनेबाबत  काय अँगलने विचार करतोय हे ओळखणंच कठीण जातं..त्याचे तर्क फारच क्वचित चुकतात...दादाच्या दोस्तीचं नेटवर्क अचाट...भलेभले भाईही त्याला खूप मानतात..त्याच्यावर प्रेम करणा-या चाहत्यांचीही संख्या असंख्य..त्यामुळंच कुणी त्याला प्रेमानं, कुणी त्याला वचकून दादा म्हणतं...
दादा बजाज आटोमध्ये युनियन लिडर होता..तेव्हाचा त्याचा काळ खूप मंतरलेला ..कंपनीमधील इतर युनियन्सच्या स्पर्धेत टिकून राहणं सोपं नव्हतं... त्याच्या जबरी नेटवर्कमुळं, साम, दाम, दंड भेद नीतीचा अवलंब करून तो खंबीरपणे टिकून राहिला...गंमतीचा भाग म्हणजे त्याची संघटना होती शिवसेनाप्रणित कामगार सेनेची..आणि तो तर कॉंग्रेसचा कार्यकर्ता....त्यानं सेनेत यावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. .शिवाजी मंदिरात झालेल्या सभेत दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शेकडो कामगारांच्या सभेत ' मुकुंद पंडित यांनी शिवसेनेत यावे' अशी साद दिली...त्यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत दादाला मावळमधून शिवसेनेतर्फे उमेदवारी द्यायचंही सेना नेतृत्वानं ठरवलं होतं...पण, दादानं कॉंग्रेसपासून बाजूला जाणं टाळलं...त्यावर अनेकांनी टीका केली..अनेकांना आजही त्याच्या आयुष्याचा तो टर्निंग पॉईंट ठरला असता असं वाटतं...त्यात नक्कीच तथ्य आहे...पण जी व्यक्ती प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण, मोजूनमापून जगत असेल, प्रत्येक पाऊल खूप विचाराअंती टाकत असेल...त्याला कसला आलाय टर्निंग पॉईंट?? त्याच्या आयुष्यात असे कित्येक टर्निंग पॉईंट हुकलेत...त्याचं त्याला कधी वैषम्य वाटत नाही.. पश्चाताप होत नाही.. सामाजिक जीवनात शेकडोंनी मित्र, कार्यकर्ते जोडलेल्या दादाला राजकारणात कधी यश मिळालं नाही..भल्याभल्या राजकीय नेत्यांनी त्याची मदत घेतलीये...पण पदं वाटताना कायम त्याला गृहीत धरलं गेलं..
तसं तर  निवडणुकीत निवडून येण्याची सर्वोत्तम क्षमता असतानाही दीपक मानकर, बाळासाहेब दाभेकर, जया किराड असे अनेक मित्र बरेच मागे पडलेत...त्यांना जे काही मिळालं, ते त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत खूपच नगण्य आहे... दादाच्याही बाबतीत हेच घडलंय..दादाच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या, त्याने उमेदीच्या काळात मोलाची मदत केलेल्या कित्येकांची पुढं नशीबं फळफळली...कुणी राजकारणात चमकलं, कुणी समाजकारणात, तर कुणी आणखी भलत्याच क्षेत्रात...त्यातल्या कितीजणांनी दादाची जाण ठेवलीये हे माहित नाही...पण, ज्यांनी ती ठेवली नाही, ते कितीही मोठे झाले असले, तरी दादाच्या भेटीत ते नजरेला नजर भिडवू शकत नाहीत हे ही तितकंच खरं...
पूर्वीपासूनची व्यायामाची आवड दादानं आजही जपलीय..वयोमानानुसार त्यात बदल केलाय इतकच्.. तो पहाटे आणि रात्रीही पर्वती, तळजाईवर घामानं अंग़ भिजेपर्यंत फे-या मारत राहतो..व्यायामामुळं त्याच्या चेह-यावर आगळंच तेज विलसत असतं..त्याचं राहणीमान टापटिप..चांगल्या कपड्यांची, गॉगल्सची, घड्याळांची आवड..80 च्या दशकात चौकड्याच्या शर्टसची फॅशन आली होती.. दादा ' जयहिंद' मध्ये  शर्टपीस आणायला गेलेला..त्याने तिथल्या एकूण एक प्रकारच्या चौकड्यांचे शर्टपीस घेतले..अखेर, जवळचे पैसे संपले..त्याने घरून आणखी पैसे मागवले...पण, घरी गेला ते दुकानातले चौकड्यांचे सारे प्रकार घेऊनच...असं त्याचं कपड्यांचं वेड...सफारीही शिवणार तर एकदम डझनभर... ते ही 'गॅलेक्सी' मध्ये...त्या दुकानात केव्हाही जा...दादाची कित्येक कापडं त्या टेलरकडं पडून असायची..असा सगळा त्याचा रुबाबाचा कारभार.. दादा काळानुसार बदलतोय...तसं पाहिलं तर माझ्याच पिढीतली कित्येक मंडळी मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, मेल, फेसबुक, वॉट्सअप, पेन ड्राईव्ह यापासून दूर आहेत..पण, दादा हे सारं आमच्याही आधी शिकला...आमच्यापेक्षा त्यात त्याची गती अधिक आहे ..पुण्यात अगदी पहिल्यापासून  तो मोबाईल वापरतोय..कॉम्प्युटर वापरतोय..आपण मागच्या पिढीतले म्हणून नवं तंत्रज्ञान शिकायला तो कधी नाही म्हणत नाही..
गुगलच्या मॅपवर पुण्यातल्या मंडईच्या भागाचा परिसर पाहिला, की त्यात ' दादाचा वाडा ' अशी एक पाटी दिसेल..दादाचं अवघं आयुष्य गेलेल्या या लंके वाड्यात, दादाच्या आफीसमध्ये कितीतरी क्षेत्रातल्या, भल्या भल्या मंडळींनी पायधूळ झाडलीये..हे आफीस  आमच्या गप्पांच्या मैफीलीचं ठिकाण..गेल्या चोवीस वर्षांपासून मी या वाड्यावर जातो..दर खेपेस नव्या विषयांवर गप्पा करतो...मनावर कधी ताण आला, टेंशनमध्ये असलो की पावलं हमखास दादाच्या वाड्याकडं वळतात..मनातल्या सा-या व्यथा त्याला सांगतो..त्याच्या मनात काही जाचत असलं, तर तो ही मन मोकळं करतो...मला काही प्राब्लेम असला तर पहिल्यांदा त्याच्याशी बोलतो..त्याच्याकडं प्रत्येक समस्येला उत्तर असतं..पुण्यातल्या भल्याभल्या मंडळींचे प्राब्लेम त्याने याच वाड्याच्या साक्षीने निरनिराळ्या क्लुप्ती वापरून सोडवल्यात...त्याच्याशी गप्पा मारल्या की मन हलकं होतं..दादानं माझ्यावर भावासारखीच माया केलीय..भावाचं स्थान दिलंय..सुखदु:खात तो पाठीशी उभा राहतो..काही चुकीचं पाऊल पडतंय असं वाटलं तर बोलवून समजावून सांगतो..कधी रागवतोही...मूळच्याच नीडर स्वभावाला दादाची साथ लाभल्यानं मी कधी कुणापुढं झुकलो नाही...घाबरलो नाही...दादाच्या भक्कम कवचामुळंच माझी पत्रकारीता  बहरली यात काहीच शंका नाही...दादा, मोहन आणि मच्छिंद्र हे तिघे सख्खे भाऊ....मोहनअण्णा दोन वर्षांपूर्वी अचानक  गेला..अण्णा म्हणजे दादाची सावलीच होता जणु.. ..तो गेल्यानं दादाचा आधार हरपला...दादा खचला असं काही काळ वाटत होतं...खूप प्रयत्नांनी त्यानं स्वत:ला सावरलं..घराला सावरलं...पुन्हा नव्यानं त्यानं वाटचाल सुरू केलीय अण्णाला पापणीत साठवून... 3 डिसेंबर हा दादाचा वाढदिवस...गेल्या चोवीस वर्षांत कधी विसरलो नाही...कोणत्याच जन्मात विस्मरण होणार नाही...दादा...वाढदिवसाच्या आभाळभरून शुभेच्छा.....

No comments:

Post a Comment