Tuesday, 20 November 2018

भोग

भोग
- - - -
बालगंधर्वला गेल्या आठवड्यात एक समारंभ झाला..एका जुन्या कार्यकर्त्यांच्या सत्काराचा.. तिथं सर्वच पक्षातले बरेच जुने, नवे कार्यकर्ते भेटले..कार्यक्रम आटोपल्यावर  मित्रांसमावेत कँटीनमध्ये चहा, गप्पा सुरू होत्या..अधेमधे काहीजण भेटून जात होते...तिथंच् महाराज भेटला.. तो अवचित भेटल्यानं  मी काहीसा चमकलो..म्हणजे तो  भेटणं अपेक्षित नव्हतं आणि त्याचा चेहरामोहरा एवढा उजळला असलं अशीही अपेक्षा नव्हती...ख्यालीखुशाली विचारून तो गर्दीत मिसळला..मी एकाला  विचारलं...तो म्हटला जेलमधून पॅरोल मिळालाय ..त्यामुळं सध्या तो बाहेरच आहे...त्यानं केलेली दादागिरी, त्याचा दरारा मी बघितलाय अन् जेलमध्ये गेलेली रयाही पाहिलीयं...त्याला भोगावे लागलेले भोगही  जवळून पाहिलेत...

            महाराज हा शहरातला जुना गुंड...एका कुप्रसिद्ध टोळीतला तो मोहरा..जुन्या, नव्या  गुंडांमध्ये त्याची दहशत...तसा तो 80 -90 च्या दशकात जास्त सक्रिय.. त्याच्यावर बऱ्याच केसेस झाल्या..अनेकदा अटक झाली..येरवडा जेलच्याही वाऱ्या झाल्या..काही गुन्ह्यांमध्ये तो थेट सापडला नाही; पण, त्याच्या सहभागाची कुजबूज असायची...त्यावेळी अनेक  गुंडांच्या नावापुढं भाई, भाऊ,अण्णा, अप्पा, पैलवान, आबा, शेठ अशी काहीबाही बिरूदं लागलेली...याला महाराज नाव पडलं..डॉट गेम, मटका, पत्त्यांचे क्लब असले त्याचे उद्योग...गुन्हेगारी वर्तुळात सॉलिड नेटवर्क..मध्यम उंचीचा, गोरापान आणि जिभेवर साखर असलेला महाराज कधी, काय करेल याचा नेम नसायचा... मागं एकदा घरात घुसून त्याच्यावर फायरींग झालं. चॉपरचे वार झालेले...तेवढ्यातूनही तो बचावला..

         90 च्या दशकात गुन्हेगारीचं स्वरूप बदलायला लागलं.. नवनवे चेहरे गुन्हेगारीत आले..तंत्र बदलली...भाषा बदलली..पूर्वी केवळ वर्चस्वासाठी असलेल्या दादागिरीत पैसा आला. 'मॅटर'  हा परवलीचा शब्द बनला.इथले काही गुंड मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधल्या दाऊद, गवळी, नाईक  टोळ्यांचे शिलेदार बनले...काहींच्या मागून त्यांच्या परदेशातील डॉनचे चेहरे डोकावू लागले...बदलता काळ लक्षात घेऊन आधीच्या पिढीतले अनेक गुंड बाजूला झाले...काहींना बाजूला केलं गेलं.. उगवत्या पिढीला नमस्कार करून महाराजनेही अलग रस्ता धरला.. क्षेत्र बदललं..समाजकारणातून पुढे गेला...पेहराव बदलला.त्याच्या सिल्कच्या शर्टची जागा पांढऱ्या शुभ्र खादीनं घेतली..अर्थात,तरीही त्याच्यावरचा राजन गॅंग चा शिक्का काही पुसला गेला नाही...

महाराजवर पूर्वी बरेच गुन्हे असले, तरी कधी त्याला सजा लागली नव्हती...एकापाठोपाठ एकेक केस क्लिअर करून तो राजकारणात स्थिरावू लागला..नावाचं वलय होतं.. दहशत, दरारा होता..शूटर्सचे चेहरे  कार्यकर्त्यांचे झाले.. बरेचसे जुने हिशेब मिटवले होते....पण जुनी  संगत काय सुटली नाही..त्याच्या बैठकीत जुने भाई लोक आवर्जून दिसायचे..तरीपण थेट गुन्हेगारीपासून तो बराच लांब झाला होता....पण, मध्यंतरी एक भलतीच् घटना घडली...महाराज  काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता...समोरून एक पैलवान आला..तो यांच्या जुन्या दुष्मनीतला...महाराज चिलमीची छापी गुंडाळत असतानाच त्यांच्यातल्या एकाची त्या पैलवानाशी बाचाबाची झाली...भिडाभिडी सुरू झाली..महाराज मध्यस्थीसाठी धावला अन त्याचवेळेला एकाने कमरेचा जांबिया उपसून पैलवानच्या छातीत खुपसला....दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून पडला...महाराज अन आणखी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या...समाजकारणात, राजकारणात  गाडी रुळावर येत असलेल्या महाराजची रवानगी तुरुंगात झाली. जरा सुधारण्याच्या वाटेवर असताना, वयाची पन्नाशी उलटल्यावर तो पुन्हा त्या दलदलीत फसला....अनेकांना आश्चर्य वाटलं...या गुन्ह्यात त्याचा काहीच थेट सहभाग नाही, असं अनेकांनी छातीठोकपणे सांगितलं...आणि त्या खटल्याकडं,सुनावाणीकडं मी बारकाईनं पाहू लागलो....

                   शंभर गुन्हेगार निर्दोष सुटले तरी चालतील....पण एकाही निष्पापाला सजा मिळणार नाही हा आपल्या कायद्याचा लौकिक...पण, नेमकं काय बिनसलं समजलं नाही...कोर्टातले सारे साक्षी पुरावे महाराजच्या विरोधात गेले...सारी दानं उलट पडत गेली...महाराजसह तिघांविरोधात खुनाचा गुन्हा शाबीत झाला...त्यांना वीस वर्षं जन्मठेपेची सजा लागली.. खडी फोडायला त्यांची रवानगी नाशिक कारागृहात झाली....या काळात त्याच्याबद्दल बरंच काही कानावर येत होतं.. त्यानं उच्च न्यायालयात दाद मागीतल्याचं समजलं...मध्यंतरी एकदा ससून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो..ओपीडीमधून काही नोंदी घेत होतो..तिथल्या कॉटवर नुकतेच आणलेले अपघात, मारामाऱ्यामधले जखमी रुग्ण होते..मला कुणीतरी हाक मारल्यासारखा आवाज आला...पण त्या गर्दीत पट्कन कोण ? हे समजलं नाही.....पुन्हा हाक ऐकू आली... आवाजाच्या दिशेनं पाहिलं... कोपऱ्यातल्या कॉटवर महाराजला झोपवलं होतं...बाजूला चार पोलीस होते..मी जवळ गेलो... कुणी ओळखणार नाही असा महाराजचा अवतार  झाला होता.आजारी असल्यानं त्याला या रुग्णालयात आणलं होतं....खूप बारीक झाला होता तो...खंगला होता..चेहऱ्यावरचं तेज हरवलं होतं...आवाज खोल गेला होता...बोललो त्याच्याशी...माझी खरंच काही चूक नाही...त्यात मी नव्हतो हो असं सांगताना तो रडवेला झाला होता..

           महाराजचं एकंदर प्रकरण विचार करायला भाग पाडणारं होतं... अस्वस्थ करणारं होतं... पत्रकारितेत मी कोर्ट बीट अनेक वर्षं पाह्यलंय...एकदा परिचित वकिलांच्या गप्पामध्ये मी हा विषय छेडला... त्यावर  उलटसुलट मतं व्यक्त झाली... महाराजने जर तो खून केलाच्  नाही, तर तो कायद्यानं दोषी कसा ठरला ? याचं नेमकं उत्तर मिळालं नाही....मग एक वाचलेला किस्सा आठवला....एक न्यायाधीश कारमधून गावी निघालेले असतात..प्रवासात त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं..मग एका आडगावाजवळ ते गाडीतून उतरतात... .पाणी पितात.. चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारतात.....फ्रेश होतात... काही हालचाल जाणवते म्हणून ते समोर बघतात.दोन तरुणांची झटापट सुरू असते...एकजण दुसऱ्याला चाकूने भोसकतो..दोघांचेही चेहरे त्यांना स्पष्ट दिसतात....खुनी पळून जातो...सोबत कुणीच नसल्यानं हे न्यायाधीश गांगरतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात..योगायोगाने काही वर्षांनी त्यांची बदली त्याच गावी होते...त्या खुनाच्या खटल्याची सुनावणी त्यांच्याचसमोर सुरू होते...आरोपीला पाहून त्यांना धक्का बसतो...कारण, त्यांनी पाहिलेला खुनी आणि हा आरोपी पूर्णपणे वेगळे असतात.. खटल्याची कागदपत्रे तपासतानाही ते अचंबित होतात...कारण, प्रत्यक्षात ज्याने खून केला नाही पण जो आरोपी म्हणून त्यांच्यासमोर उभा असतो; त्याच्याविरुद्ध भक्कम साक्षी पुरावे असतात..त्यानेच खून केलाय हे दर्शवणारे साक्षीदार अन पंचनामेही असतात..केस पूर्णपणे त्याच्या विरोधी असते. त्याला  निर्दोष मुक्त केले, तर लाच खाऊन निकाल दिला असा न्यायाधीशावर ठपका बसण्याची शक्यता अधिक असते...त्यामुळं ते संभ्रमात पडतात..त्यावर खूप विचार करतात...निकालाचा दिवस उजाडतो..कोर्ट सुरू झाल्यावर ते आरोपीला अँटी चेंबरमध्ये बोलवतात...त्याला त्याचे म्हणणे विचारतात...साहेब, यात माझा कसलाही संबंध नाही....मी खून केला नाही असे म्हणत तो न्यायाधीशांच्या पायावर लोळण घेतो...त्यावर ते म्हणतात, यात तू दोषी नाहीस हे मला माहित आहे...पण सर्व साक्षी पुरावे तुझ्या विरोधात असल्यानं तुला सजा देणं भाग आहे...एक मला सांग...तू हा खून केला नाहीस ...पण, यापूर्वी तुझ्या हातून असे काही दुष्कृत्य घडले होते का ? त्यावर तो म्हणतो....हो साहेब....बारा वर्षांपूर्वी माझ्या हातून एक खून झालाय... पण, त्याचा कुणालाच् पत्ता नाही... त्याची कुठंच नोंद नाही....
न्यायाधीश म्हणतात....हे बघ कायदा आंधळा असतो असं म्हणतात..पण, कुठल्या निष्पापाला अपराधी म्हणून शिक्षा देण्याइतपत ही तो अंध नाही....काय आहे की या साऱ्या न्यायालयांच्यावर ही एक  दैवाचं न्यायालय असतं.... काहीजण त्याला नियती म्हणतात...ती केलेल्या गुन्ह्यांची  भोगायलाच् लावते...अन या जन्मांतले भोग याच् जन्मात भोगायला लागतात....तू तो खून पचवलास.. पण या गुन्ह्यात अडकलास...त्या खुनाचे भोग म्हणून तुला या गुन्ह्याची शिक्षा भोगायला लागणार.....

        हा किस्सा लक्षात घेता असं वाटतं महाराज जरी निर्दोष असला, तरी पूर्वीच्या कुकर्माचे भोग त्याला  न केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून भोगावे लागले असावेत..तरुणपणात केलेल्या उन्मादाची फळं आत्ता त्याला मिळाली असावीत...मधल्या काळात उच्च न्यायालयात दाद मागून तो सुटला...पण, फिर्यादी पक्षाने सर्वोच्च दाद मागितलीय.....त्याचा निकाल लागेल लवकरच्...सुप्रीम कोर्ट अन् वरची अदालत म्हणजे नियती काय फैसला देतेय याकडं आता लक्ष लागून राह्यलंय...


No comments:

Post a Comment