Wednesday, 21 November 2018

वृत्तपत्रातलं बंड

वृत्तपत्रातलं बंड :
 - - - - - - - - - -
 आटपाट नगर होतं..राजा अन प्रजा खाऊन पिऊन सुखी होते..वैचारिक मशागतीसाठी तिथं नानाभाऊंनी दैनिक चालू केलं होतं...लोकांचं प्रबोधन अन ते ही साध्या सरळ भाषेत करण्यासाठी त्यांनी हा डोलारा उभा केला होता..उत्कृष्ठ दर्जाच्या पेपरमुळं आटपाट नगरीतच नव्हे तर सा-या राज्यात पेपरचा डंका वाजू लागला..

 नानांचं नाव मोठं होतं..त्यात प्रतिष्ठेची अन किर्तीची भर पडली...वर्षानुवर्ष दैनिकाचं काम चालवून नाना थकले होते..आता मुलीकडं सारी सूत्र द्यायचा त्यांचा विचार होता..पण काहीतरी गडबड झाली..एका 'पावर'फुल आसामीनं हा पेपर खरेदी केला..त्यांनी नानांची परंपरा जपली..एकाहून एक सरस संपादकांच्या परंपरेनं पेपरचा लौकीक वाढवला.. त्या प्रवासात त्यांना विजयराव भेटले..विजयराव मोठा माणूस..हुषार, प्रतिभावंत,कल्पक अन  चाणाक्ष..अल्पावधीतच त्यांनी दैनिकात जम बसवला..कामाचा दबदबा निर्माण केला..पत्रकारांना उत्तेजन दिलं..प्रोत्साहित केलं..पेपर कसदार करण्यासाठी, पुरवण्या दर्जेदार करण्यासाठी मेहनत घेतली..त्याचं फळ त्यांना मिळालं..अंकाचा खप चारी दिशांनी वाढू लागला..पेपरची अन विजयरावांची किर्ती दशदिशांत पसरली...

 विजयरावांची कार्यपद्धती पाहून  मालकांनी त्यांना सा-या आवृत्त्याचं संपादक केलं..मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं..त्यांच्याही खुर्चीचा मान वाढ्ला होता..नगरपालाच्या खुर्चीच्या तोलामोलाची ही खुर्ची झाली होती..त्यात त्यांचं कर्तृत्व होतं अन सोबत पेपरची ताकदही..राज्यभर त्यांचा लौकीक पसरला ...साहित्य, कला, संस्कृती,राजकारण अन् चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचा संचार होता... निरनिराळ्या गावांतील मान्यवर संस्थांच्या कार्यक्रमांची निमंत्रणं त्यांना यायची..महत्वाच्या पुरस्कारांच्या निवडीमध्ये त्यांच्या शब्दाला मोल होतं...साहित्यिक मंडळींच्या संमेलनामध्ये, त्यांच्या निवडणुकींतही त्यांच्या शब्दाला किंमत प्राप्त झाली होती...संस्थेची घोडदौड  वेगाने सुरू होती..  इतर कोणतंही दैनिक कसल्याचबाबतीत  स्पर्धेत टिकत नव्हतं..  वृत्तपत्राचा दर्जा खूप अव्वल झाला...मान्यवर साहित्यिक, दर्जेदार लेखक व लोकप्रिय स्तंभलेखकांच्या सहभागामुळे अंक कसदार होत होता....रोजचा कसदार अंक अन हरत-हेच्या दर्जेदार पुरवण्या यांमुळं अंकाचा खप दिवसेंदिवस वाढतच होता..पेपरमधल्या सा-या पत्रकारांचीही पत वाढत होती...विजयरावांची किर्ती-प्रतिष्ठा तर कळसावर पोचली होती.. पण, त्यांनी साधलेली प्रगती संस्थेतील काहीजणांच्या डोळ्यांत खुपू लागली होती..काहीजण स्वत:च स्वत:ला त्यांचे समर्थक समजायचे अन काहीजण विरोधक..पण खरं तर सर्व विजयरावांचे होते अन् ते कुणाचेच नव्हते...

 इतर आवृत्त्यांचे संपादक, वार्ताहरही विजयरावांना भेटायला येऊ लागले होते... त्यांच्या अडिअड्चणीं मांडू लागले.. पेपरचा खप वाढवण्याबाबत चर्चा झडू लागल्या...विजयरावांचा वाढता संपर्क, संस्थेतलं वाढतं वजन मालक मंडळींना खटकू लागलं..खुपू लागलं...संस्थेचा प्रमुख कोण? मालक की संपादक? असा मुद्दा काहींनी पुढं केला अन मालक मंडळींत अन विजयरावांच्यात तेढ पडली..काहीतरी अफवा पसरवून वातावरण कलुषित करण्याचे उद्योग सुरू झाले..खटके उडू लागले..विजयराव एककल्ली आहेत, हुकूमशहा आहेत असा व्यवस्थापनाचा आक्षेप होता...तर, व्यवस्थापन अवमानकारक वागणूक देते..कोंडी करते असा विजयरावांचा आरोप होता.. ही तेढ वाढत गेली...संपूर्ण पेपरवर, संस्थेतील सर्व विभागांवर असलेला विजयरावांचा वाढता पगडा व्यवस्थापनाला सहन होत नव्हता.. .वातावरण गढूळ होत गेलं......लवकरच संस्थेत काहीतरी मोठ्ठी घटना घडणार याची चिन्हं दिसू लागली..
 एके दिवशी विजयराव कार्यालयात आलेच नाहीत..साधारण बाराच्या सुमाराला मालकांनी तातडीची बैठक बोलवली.. ..मोजक्या लोकांची...ही निवडही खूप पारखून केली होती...काहीजण विजयरावांचे पक्के टिकाकार...काही खंदे समर्थक...काही जुने...काही नवे...सगळ्या संस्थेत नेमका संदेश जाईल अशी व्यवस्था झाली..मालकांनी बोलायला सुरुवात केली...'' संपादक रजेवर गेलेत..ते पुन्हा परततील असं वाटत नाही...सर्वांनी नेहमीप्रमाणेच कामकाज चालू ठेवावं...काही अडचण असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा ...''....या आकस्मिक घटनेमुळं सा-यांनाच धक्का बसला....नेमकं काय घडलंय हे कळण्यापूर्वी बैठक आटोपतीही घेतली गेली..दिवसभर संस्थेत चर्चेला उधाण आलं...वातावरण कमालीचं गढूळ झालं...कुणी कुणासोबत मोकळेपणानं बोलेना...कुणाशी सलगीनं वागेना...उगा आपल्या कोणत्या कृतीचा काय अर्थ निघेल या धास्तीनं अनेकांच्या वागण्या बोलण्यात संकोच आला...त्याच रात्री विजयराव राजीनामा देणार असं वृत्त येऊन थडकलं..आणि एकच खळबळ उडाली. अल्पावधीतच सगळीकडं ही बातमी पसरली...उलट्सुलट चर्चा रंगू लागल्या...अफवांचं पेव फुटलं...गावोगावच्या वार्ताहरांची, सा-या आवृत्त्यांच्या संपादकांची परस्परांशी अन विजयरावांशी फोनाफोनी सुरू झाली...काही सहकारी विजयरावांच्या घरी धावले..राजीनाम्याचं वृत्त खरं होतं...अन घेतलेल्या निर्णयावर विजयराव ठाम होते...सर्वजण त्यांना राजीनामा परत घ्यायचा आग्रह करीत होते...गावोगावच्या आवृत्त्यांच्या संपादक मंडळींच्या वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या..विजयरावांना खंबीर पाठींबा द्यायचं त्यांनी ठरवलं..त्यासाठी काय करता येईल याचा खल सुरू झाला. कोलापूरच्या अनंतरावांनी त्यासाठी पुढाकार घेतला..सा-यांची एकत्र मोट बांधली....तसं ही सारी मंडळी विजयरावांपेक्षा सर्वच बाबतीत बरीच लहान......सारेच्या सारे एकनिष्ठ...त्यांचे भक्तच जणु.....त्यांच्या राजीनाम्यानं हे सारे अस्वस्थ झाले...व्यवस्थापनाच्या आरोपांनी व्यथित झाले..विजयरावांना दिलेल्या अवमानकारक वर्तणुकीमुळं चिडले..सा-या संपादकांच्यावतिनं अनंतरावांनी सांगितलं.. '' तुम्हाला आमचा भक्कम पाठिंबा आहे....आम्ही सारे संपादकही राजीनामे देतो...मालकांना त्यांची जागा दाखवून देऊ...आपण बंड करू...क्रांती करू...जगाला दाखवून देऊ...मालक कितीही 'पावर'फूल असला तरी आम्ही अन्याय सहन करणार नाही..'' अनंतरावांच्या खमक्या भूमिकेत सूर मिसळत सा-याच संपादकांनी आपणही राजीनामे देणार हे निक्षून सांगितलं....वर्तमानपत्राच्या दुनियेत एक इतिहास निर्माण होत होता..परीस्थिती आणिबाणीची होती...सारीच अनिश्चितता दाटून आलेली...काय घडणार हे कोणालाच काही समजेना .. ...काहीतरी खळबळ उडणार हे पत्रकारीतेतील धुरीणांच्या लक्षात आलं...मालक 'पावर'फुल्ल असले तरी सा-या संपादकांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानं  विजयरावांचं पारडं जड झालं होतं......

 विजयरावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत फोनाफोनी सुरू होती..दर मिनिटाला निराळी घडामोड घडत होती..सा-या संपादकांनी अनंतरावांच्या नेतृत्वाखाली विजयरावांसाठी सामुहिक राजीनामे देऊन बंड करण्याचा अंतीम निर्णय घेतला...तो विजयरावांच्या कानावर घातला.... दुस-याच दिवशी कोलापूर आवृत्तीचा वर्धापन दिन होता..त्या समारंभावर या घटनेचं सावट पडेल असं काही करू नका असं विजयरावांनी अनंतरावांना अन इतर संपादकांना बजावलं....पण, हा संपादकीय विभागाच्या सन्मानाचा मुद्दा आहे...संपादकांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे म्हणत अनंतराव राजीनामा देण्यावर ठाम राहीले...इतर संपादकांनाही त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करायला सांगितली...विजयरावांच्या मागे सारे संपादक कसे एकदिलाने उभे आहेत, हे चित्र दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता..संस्थेतील ज्येष्ठ मंडळींची फोनाफोनी सुरूच होती..व्यवस्थापनातीलही काही अधिका-यांचे समजूत घालायला फोन येत होते..एकापाठोपाठच्या फोन्समुळे...घडत असलेल्या घटनांमुळे विजयराव अस्वस्थ झाले होते...मध्यरात्र उलटून गेली होती..उद्या नेमकं काय करायचयं? कसं करायचं? कुठं जमायचंय? हे विचारायला एका संपादकानं कोलापूरला  अनंतरावांना फोन केला...पण फोन काही लागेना..इतर संपादकांनाही तोच अनुभव आला..हा लाईनमधला घोटाळा नव्हे मालकांनी पॉवर वापरून फोन बंद पाडला असल्याचा वास लागला अन सारेच चवताळले.....उद्या काय होणार? हेच कळेना...सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहीली...

 दुसरा दिवस उजाडला...संस्थेच्या प्रथेनुसार कोलापूरच्या वर्धापन दिनाला सा-या आवृत्त्यांचे प्रमुख लोक गेले होते...आटपाट नगरातून मुख्य वार्ताहर अरूण सासवडे तिथं गेला..कोलापूरात विजयरावांच्या अनुपस्थित समारंभ सुरू झाला होता...इकडं आटपाट नगरात मात्र विजयराव राजीनामा मागे घेणार का? त्यांचा राजीनामा मालक स्विकारणार का? नवे संपादक कोण? संस्थेतल्याच कुणाच्या गळ्यात माळ पडणार का? आटपाट नगरीतल्याच कुणाला संधी मिळणार? इतर आवृत्तीकडे हा मान जाणार? की इतर वृत्तपत्रातील तोलामोलाच्या व्यक्तीला संधी दिली जाणार?व्यवस्थापन काय भूमिका घेणार? अशा अनेक प्रश्नांचे काहूर कित्येकांच्या मनात माजले होते....

 मालक मंडळी कोलापुरात असल्यानं सगळ्यांचं लक्ष तिकडं लागलं होतं..आटपाट नगरीतल्या कार्यालयात संध्याकाळी फोन खणखणला..क्राईम रिपोर्टर समीरनं फोन उचलला..कोलापुरातून मुख्य वार्ताहर अरूण बोलत होता..हे बघ समीर...वातावरण खराब आहे.. काही समज-गैरसमज असतील तर विसरून जा बाबा....यापुढं मतभेद बाजूला सारून आपण एकदिलानं काम करायचं....आणि होऽऽऽऽ हे इथले कोलापूरचे अनंतराव...आता आपले नवे साहेब झालेत..बर्र का....आताच सायबांनी समारंभात तशी घोषणा केली... म्हणत त्यांनी फोन ठेवला....

 समीर हादरलाच..त्याने निरोप कार्यालयात सा-यांना दिला...सारेच गडबडले... काही तासांपूर्वी अनंतराव बंड घडवण्याची भाषा बोलतात काय! क्रांती करण्याचा इशारा देतात काय!..संपादकांच्या सन्मानाची भाषा बोलतात...काय!...व्यवस्थापनाला धडा शिकवण्याची डरकाळी फोडतात काय!..त्यासाठी धडपड करतात काय! अन तेच अनंतराव विजयरावांच्या खुर्चीत रुबाबात येऊन बसतात काय....!!!! सारंच काही अनाकलनीय....कुणाला काहीच समजेनासं झालं...खरंच मालकांनी अनपेक्षित खेळी केली होती...संस्थेत होऊ घातलेलं बंड फसलं होतं...बंडाचा सूत्रधार बळी गेला नव्हता..उलट त्याला सोन्याचं सिंहासन मिळालं होतं...बंडाची भाषा करता करता गद्दारी करून अनंतराव मालकांशीही बोलणी करत होते...सर्वांना फसवत होते..बोलणी यशस्वी झाल्यानंच त्यांनी फोन बंद केला होता....त्यांच्या त्या रात्री बंद झालेल्या फोनचं गूढ सा-यांनाच उलगडलं...आटपाट नगरीतल्या वृत्तपत्र संस्थेत फसलेल्या क्रांतीची बीजं मालक चिरडून टाकत असल्याचं स्वप्न समीरच्या  डोळ्यासमोर अजूनही दिवसाढवळ्याही तरळतं......

No comments:

Post a Comment