Wednesday, 21 November 2018

मिर्ची सेठ


मिर्चीसेठ . . .
- - - - - -
'' मला भारतात परत जायचयं... माझ्यावरचे दोषारोप चुकीचे आहेत...मला नको त्या गुन्ह्यांत गोवलंय...माझा काहीच संबंध नाही गुन्हेगारीशी...जिथं मी हयात घालवली त्या मातृभूमीची मला खूप आठवण येतेय...तिथं परतायची आस लागलीये मला... केवळ यशस्वी उद्योगपती असल्यानं माझ्यावर खोटेनाटे आरोप केले जाताहेत.... एक दिवस नक्कीच मला न्याय मिळेल व मी घरी परतू शकेन. जय हिंद . . .'' माफीया डॉन दाऊद इब्राहिम याचा खास दोस्त व आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया इक्बाल मिर्ची याने हे निवेदन गृहमंत्रालयाला पाठवलं होतं. अर्थात, त्याच्या या पत्राला ना पोलिसांनी भिक घातली ना गृह मंत्रालयाने... त्यामुळे मुंबईची आस लागलेल्या महंमद इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची उर्फ मिर्चीसेठला विदेशातच अख़ेरचा श्वास घ्यावा लागला. मुंबापुरीसह, दुबई, आफ्रीकन व युरोपियन राष्ट्रांमध्ये मादक पदार्थांच्या व्यापाराचे अफाट साम्राज्य निर्माण केलेला हा मिर्चीसेठ  गेल्या वर्षी 12 आगस्टला लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. अब्जावधी रुपयांची माया कमवलेल्या मिर्चीसेठला त्यावेळी सोबत होती आजारी वडिलांची आणि पांढ-या शुभ्र कफनची...माणूस गरीब असो वा श्रीमंत, लक्षाधीश असो वा अब्जाधीश....कफनको कोई जेब नही होती...हे मिर्चीसेठच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रकर्षानं जाणवलं.....
  देश-विदेशातील अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा म्हणजेच  'पावडर सिंडीकेट'चा इक्बाल मिर्ची बादशाह होता...त्याची एकंदर कारकिर्दही मिर्चीसारख़ीच मसालेदार. मुंबईच्या नळबाजारात लाल मिरची व मसाला विकण्याचा त्याच्या कुटुंबियांचा पारंपारिक व्यवसाय. ८० च्या दशकात या सुक्या लाल मिर्चीच्या व मसाल्यांच्या पाकीटांमधूनच तो अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करू लागला. त्यामुळे अंडरवर्ल्डमध्ये इक्बाल मिर्ची असे त्याचे नामकरण झाले. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये त्यावेळी दाऊद व त्याच्या साथीदारांचा करीमलालाच्या पठाणी गँगशी जबरदस्त संघर्ष सुरू होता. चेंबूरचा छोटा राजन, भायखळयाचा रमा नाईक, भांडुपचा खिमबहादूर थापा, कांजूरमार्गचा अशोक
  इक्बाल मिर्चीचे अमली पदार्थांच्या व्यापाराचे साम्राज्य जगभर विस्तारले. त्यातून त्याने अब्जावधी रुपयांची माया जमवली. असं म्हणतात की एक काळ इक्बाल हा आर्थिकदृष्ट्या दाऊदपेक्षा कितीतरी पुढे होता. त्यामुळेच दाऊदने त्याला कधी अंतर दिले नाही. अमली पदार्थांचा व्यापार तो दाऊद टोळीसाठी नव्हे, तर दाऊदच्या भागीदारीत करीत होता. 'मुगले आझम' फेम नामवंत दिग्दर्शक के आसिफ यांची कन्या हिना हिच्याशी इक्बालचा विवाह झाला होता. भारतातून पलायन केलेल्या मिर्चीने प्रथम संयुक्त अरब अमिरातीमध्ये बस्तान बसवले. दुबईत बसून तो आपल्या व्यवसायाचे नियंत्रण करीत होता. त्यानंतर त्याने आफ्रीकेतील देशांमध्ये या व्यापाराचा विस्तार केला. त्या पाठोपाठ युरोपियन देशातील बाजारावर वर्चस्व निर्माण केले. जगभरातील मादक पदार्थांच्या माफीया इक्बालच्या पावडर सिंडीकेटमध्ये एकत्र आले होते.
जोशी असे एकाहून एक सरस मोहरे दाऊदने जमा केले होते. ९० च्या दशकात पठाण टोळीचा ख़ात्मा झाला ख़रा; पण दाऊद व रमा नाईक यांच्यातच संघर्षाची ठिणगी पडली. त्यातून पुढे टोळीयुद्धाची समिकरणे बदलत गेली. त्यामध्ये दाऊदला पहिल्यापासून साथ दिलेल्यांमध्ये इक्बाल मिर्चीचा समावेश होता. प्रारंभी अमली पदार्थाचा त्याचा व्यापार मर्यादीत असल्याने त्याची दाऊद टोळीतील सदस्य अशी गणना होत असे. १९८२ ला दाऊदने मुंबई सोडून दुबईला पलायन केले. त्यावेळीही मिर्ची त्याच्यासमवेत होता. अरब राष्ट्रांमधील वास्तव्यात बेकायदा व्यवसायाचा त्याने  मोठा विस्तार केला. दाऊद टोळीचा तो ख़ास इनरसर्कलमधील सदस्य बनला.
90 च्या दशकात दाऊद आणि छोटा राजन टोळीच्या संघर्षात अनेकांना प्राण गमवावे लागले. पण, मिर्ची सुरक्षित राहीला. राजनच नव्हे तर देश-विदेशातील बहुतेक सर्व माफीयांशी असलेल्या उत्तम संबंधांमुळे तो निर्धास्त होता. लंडनमधील सर्वात मोठी राइस मिल त्याच्या मालकीची होती. त्या मिलमध्ये त्याचा साथीदार अमर सुवर्णाने बरेच पैसे पचवले. मग अंडरवर्ल्डच्या तत्वाला जागत मिर्चीने त्याचा काटा काढला. त्यामुळं तीन वर्षांपूर्वी लंडन पोलिसांनी त्याला अटक केली होती. अनेक गुन्ह्यांसाठी हव्या असलेल्या  मिर्चीला आपल्या  ताब्यात घ्यायची ती चांगली संधी होती...रेड कॉर्नर नोटीस बजावलेल्या मिर्चीचे लंडनमधून प्रत्यार्पण करण्यासाठी सीबीआयने तयारीही केली. पण,पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड आणि पावडर सिंडीकेटची ताकद दिसून आली. सीबीआयचे अधिकारी लंडनला पोचण्यापूर्वीच लंडनच्या पोलिसांनी त्याला सोडूनही दिले. त्याला तेथील हिथ्रो विमानतळावर आपल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले होते. त्याच्या एका निकटवर्तीयाशी मी कॉन्टॅक्ट केला...थोड्यावेळाने मिर्चीचाच फोन आला....'' भाई, मै तो सिधासाधा आदमी हूं....वगैरे त्याची नेहमीची कॅसेट त्याने वाजवली...कुछ सेवाका मौका दो असं अजिजीनं म्हणून त्याच्या एक -दोन कॉन्टॅक्ट्सचे नंबर दिले.....खूप साधेपणाने, मार्दवतेने तो बोलत होता...त्याची मिठ्ठास वाणी ऐकून हा कुठला भाई किंवा बडा स्मगलर असावा असं कधीच कुणाला वाटलं नसतं...जणुकाही खूप जुने संबंध असावेत इतक्या आपलेपणा होता बोलण्यात त्याच्या...
मुंबईतील १९९३ ला झालेल्या बॉंबस्फोटांच्या खटल्यात मिर्ची आरोपी होता. वरळीतील ‘‘फिशरमन‘‘ आणि जुहूतील ‘‘माया‘‘ या आलिशान बारसह एकट्या मुंबईतच त्याची अब्जावधी रुपयांची मालमत्ता आहे. त्याला मुंबईत परतायचं होतं. त्यासाठी वकीलामार्फत त्याने गृहमंत्रालयाशी संपर्क साधला होता. मुंबईत परतायची त्याला आस होती. गुप्तचर यंत्रणांनी जरा अधिक प्रयत्न केले असते, तर कदाचित त्याला फरफटत भारतात आणणे शक्य झाले असते. त्याच्याकडून देशातीलच नव्हे, तर जगातील अमली पदार्थांचा व्यापार, त्यात गुंतलेल्या बड्या व्यक्ती, या पावडर सिंडीकेटचे जगभर असलेले जाळे, दाऊदचे जागतिक लागेबांधे, मिनिटाला कोट्यवधींची उलाढाल असणारे जागतिक हवाला रॅकेट, देशातील राजकीय व्यक्तींचे माफियांशी असलेले लागेबांधे ही आणि कितीतरी मोलाची माहिती  मि़ळू शकली असती. दाऊदबाबत सखोल माहिती मिळण्याचा मिर्ची हा बहुदा अखेरचा दुवा होता. तो मरण पावल्यामुळे अंडरवर्ल्ड, पावडर सिंडीकेटच्या अनेक गोष्टी कायमची गुपिते बनल्या आहेत. मुंबईची दोस्त साझियाचा आज फोन आला....म्हणाली मिर्ची जिंदा हैं...उसनेही मौत की खबर फैलायी हैं....इंटरपोलसे बचने के लिए....मग धावपळ् उडाली माझी...बरीच फोनाफोनी झाली...पण मिर्ची या दुनियेत नाही याची पक्की खात्री झाली....16 सप्टेंबर हा त्याचा जन्मदिन....त्यामुळं त्याच्याच कुणा चेल्यानं तो जिवंत असल्याची अफवा आज उठवली असावी बहुदा. . . .

No comments:

Post a Comment