Wednesday, 21 November 2018

फलटण मेरी जान

फलटण... मेरी जान
-----------------

फलटण...

तीस, चाळीस वर्षांपूर्वी असंच होतं...

दहा वीस वर्षांपूर्वीही असंच होतं...

अजूनही तसंच आहे....

साखर कारखान्याच्या मळीचा उग्र वास

नाकात घुसल्याशिवाय

फलटणमध्ये शिरल्यासारखं वाटत नाही....

गटाराचा दर्प आल्याशिवाय

गावात फिरल्यासारखं वाटत नाही.....

मलठणचं राम मंदीर, झेडपी ची शाळा,

तिथला लालबुंद फुललेला गुलमोहोर,

त्याच्या फुलांचा कोंबडा कोंबडीचा खेळ

निंबाळकरांचा राजवाडा, शंकर मार्केट,

पोलादी भिंतींचा तुरुंग, नामवैभव थिएटर.....

या खुणा पुढल्या शंभर वर्षात

पुसल्या जातील असं वाटत नाही.....

फलटणमध्ये तसे बरेच नातलग

आप्त आहेत

मित्र आहेत

काळजी घेणारे भाऊ

अन

ठेप ठेवणारे भाचे आहेत....

इथल्या घरात बालपण सरलं....

दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्टयात हुंदडलो

त्या घरात आता कुणी उरलं नाही..

बोट धरून फलटणमध्ये रुबाबात फिरवणारे

मामलेदार आजोबा गेले

दिवाळीच्या थंडीत बंबाच्या कडकडीत पाण्यानं

आंघोळ घालणारी आजी गेली....

मायेची सय लावलेले मामा मामी

एकापाठोपाठ गेले....

खूप खूप लाड करणारा

दुसरा मामाही गेला....

गोतावळा संपून गेला

नदी आटत गेली

आमचं मातीचं घरही ढासळलं...

दाराचं कुलूप तेव्हढं घट्ट आहे....

तरीपण

फलटणवरून जाताना

गावात गेल्याशिवाय राहवत नाही

आठवणींचे थवे उडल्याशिवाय राहत नाही...

पाचबत्ती चौकात गाडी जणु आपसूक थांबते

पाय आपोआप घराकडं ओढले जातात....

फलटण माझं प्रेम आहे...

त्या मातीची ओढ अनामिक आहे....

कारण,

त्या मातीत माझी नाळ पुरलेली आहे....

माझा जन्मच फलटणचा आहे....

No comments:

Post a Comment