Wednesday, 21 November 2018

फकिराची कोजागरी

फकिराची कोजागरी
----------------------------
दसरा माझ्या लक्षात राहिला तो 17 वर्षापूर्वी या दिवशी बुलेट दारी आल्यानं आणि कोजागरी आठवते  ती मल्हारपासून विलग झाल्यानं..

 अलीकडच्या काळात एकटेपणा जरा जास्त जाणवत होता. म्हणून एका मैत्रिणीनं डॅश हाऊंडचं पिल्लू  वाढदिवसाला प्रेझेंट दिलं. दिसायला लहानअसलेली ही कुत्र्याची जात किती टेरर,  चळवळी  आणि जिवलग असतात हे त्यांनतर लक्षात आलं. घरात मी एकटाच असल्यानं त्याच्याशी सॉलिड ट्युनिंग जमलं
एकदा लक्षात आलं की त्याचे केस गळताहेत.डॅश हाऊंड सिंगल कोटेड असतो.त्यात मल्हार मूळचा बंगलोरचा.तिथून त्याला देवयानी सुवर्णाच्या घरी डोंबवलीला आणलं होतं.तिथून पुण्याला माझ्याकडे.बहुदा वातावरण बदलल्यानं केस जात असतील असं पहिल्यांदा वाटलं.. मग त्याला घेऊन डॉ.गुप्तांकडे गेलो.त्यांनी त्याला एक शाम्पू दिला 'कोट प्लस' नावाचा..तो लावून त्याला दोन चारवेळा आंघोळ घातली.  त्याला चमकदार काळे केस यायला लागलेत असं वाटत होतं..पण, माझे केस गळायला लागले. उलटया पिसाची कोंबडी असते ना तसे केस झाले. काय प्रकार आहे हेच कळेना. मग मी डॉ.गोजिराकडे गेलो. त्यांनी निझोराल नावाचा शॅम्पू मला दिला. पण, केसगळती काय थांबेना. नंतर पुन्हा त्याचेही केस जायला लागले. चक्रावून गेलो. पुन्हा डॉ. गुप्तांकडे गेलो. त्यांनी शॅम्पूची बाटली बघितली आणि कपाळाला हात लावला.म्हटले 'अहो कुत्र्याचा शाम्पू तुम्ही आणि तुमचा शाम्पू त्याला लावताय.मग हे असंच होणार'.
मी कलर ब्लाइंड आहे. त्यामुळे, निळा आणि जांभळ्या रंगातला फरक कळत नव्हता.त्यामुळं हा घोटाळा झाला होता.

 मग मागे एकदा सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला होता.त्यांच्या भुंकण्याने हा ही जागा होऊन त्रास द्यायला लागला.  एक दोनदा त्याला 'स्मिर्नोफ' चा छोटा पेग पाण्यातून दिला.  रोज तसं करणंही बरं वाटलं नाही. रस्त्यावरची कुत्री पिटाळायचा बराच प्रयत्न केला. खूपच वैताग आणला त्यांनी. पारधी लोक दरोडे घालताना आधी आजूबाजुची कुत्री गपगार करतात हे ऐकून होतो. म्हणून मग दौंडजवळ सणशा पारध्याच्या पालावर गेलो. हा पोलिसांचा  इन्फॉर्मर.आमचा जुना दोस्त. त्यानं त्यांची एक आयडिया सांगितली. एखाद्या कुत्रीच्या गुप्तांगाचा वास असलेलं फडकं दूर टाकून द्यायचं म्हणजे कुत्रे तिथे घोटाळत राहतात असं त्यानं सांगितलं. प्रयोग ऐकायला सोपा अन् करायला कठीण होता. तरीपण सोसायटीतली एक कुत्री पकडून तो उद्योग केला. बुलेटवर लांब जाऊन ते कापड फेकून दिलं.पण, कुत्री काही जाईनात. उलट दुसऱ्या दिवसापासून भलताच प्रकार सुरू झाला. मी बुलेटवरून दिवसा रात्री कधीही निघालो की रस्त्यावरून कुत्री झुंडीने मागं लागायला लागली. काय प्रकार लक्षात येईना.त्याच आठवड्यात कावळा शिटला म्हणून ते साफ करायला कपडा काढायला डिक्की उघडली. बघतोय तर त्यात गाडीचं फडकं नाहीये आणि  वेगळंच कापड होतं.मग लक्षात आलं की त्या दिवशी रात्री गाडी पुसायचा कपडा आपण फेकून दिलाय आणि त्या कुत्रीच्या वासाचं कापड डिक्कीत राहिलंय. एकंदर प्रकाराचा उलगडा झाला.तो कपडा फेकून दिल्यावर कुत्री मागे यायची बंद झाली.

त्याच महिन्यात एकदा असं झालं, की मल्हारला बोंबील खायला देत होतो. उडी मारून बोंबील पकडायचा त्याचा अंदाज चुकला आणि त्यानं माझं बोटं जोरात चावलं. परत डॉक्टरकडे गेलो..त्यांनी मला खांद्यात इंजेक्शन दिलं. मल्हारलाही एक टोचलं. पुन्हा आठवड्याच्या  अंतराने तीन इंजेक्शन घ्यायला सांगितली. तिथूनच ती विकत घेऊन फ्रिजमध्ये ठेवली. आठवडाभराने पुन्हा एकदा दोघे इंजेक्शन घेऊन आलो.त्यांनतर मात्र मला सडकून ताप भरला. बहुदा त्यालाही बरं वाटत नव्हतं. मग जव्हारमधल्या मित्राला मी हे सगळं सांगितलं. अनेक वर्षे निरनिराळ्या प्राण्यांत राहिल्यानं त्याला साधारण अंदाज येतो. माझे आणि मल्हारचे किस्से ऐकून तो सर्द झाला.बहुदा त्याच्या डोळ्यासमोर एकंदर चित्र तरळलं असावं. तो म्हटला, एकतर त्याला इकडे पाठवा किंवा तुम्ही इकडे या किंवा तुम्ही दोघे इथे या. पण फक्त तुम्ही दोघेच एकत्र राहिले तर असाच गोंधळ होत राहील.
मग काळजावर दगड ठेवून त्याला तिकडे ठेवायचं ठरवलं. कोजागरीच्या दिवशीच पुण्यातून त्याला घेऊन निघालो. दुपारच्या सुमाराला तिथे पोचलो. मल्हारला त्यांच्या घरी सोडलं. त्याच्यासोबतचं एक पिल्लू आणि बाकी बरेच कुत्रे, मांजरं  असल्यानं तो लगेच तिथं मिक्स झाला.दुसऱ्या दिवशी पुण्याला परतायचं होतं. पण, अंगात ताप खूप होता. मग तिथं एक डॉ. संजय देशमुख म्हणून मित्र आहेत त्यांच्याकडे गेलो. त्यांनी तपासलं वगैरे.मग म्हटले सध्या काही औषध चालू आहे का ? मी बॅगेतलं इंजेक्शन काढून त्यांना दाखवलं.मल्हार चावल्याचा प्रकार सांगितला. त्यांनी इंजेक्शन पाहिलं. तेच इंजेक्शन मी घेतलंय का हे पुन्हा पुन्हा विचारलं.मी खात्रीने हो म्हटल्यावर ते गडबडले. त्यांनी तातडीनं मला आणि मल्हारला त्यांच्या गाडीत घातलं आणि तिथल्या हॉस्पिटलला नेलं. आमची इंजेक्शन्स पाहून त्या
डॉक्टरने कपाळावर हात मारून घेतला. प्रकार असा झाला होता की त्याला माणसाचं इंजेक्शन टोचलं होतं आणि त्याचं इंजेक्शन मी घेतलं होतं. मग त्याला आणि मला पुन्हा वेगळी इंजेक्शनं दिली. प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांना द्यायचं इंजेक्शन घेतल्यानं काही वावगं घडू नये म्हणून मला अजून एक दुसरं इंजेक्शन दिलं. त्यांनतर मात्र एकाचवेळी शेकडो कुत्री ठिकठिकाणी चावत असल्यासारख्या भयंकर वेदना व्हायला लागल्या.दोन दिवस तिथं उताणा पडून होतो. मग जरा बरा झाल्यावर घरी आलो.

 सख्ख्या माणसाचं सान्निध्य मी सोडून बरीच वर्षं झालीत. प्राण्यासोबत रहायचाही माझा प्रयत्न सफल झाला नाही.. काळजाच्या तुकड्यापासून विलग झाल्यानं  कोजागरीने मनावर अमीट ओरखडा ओढलाय..

 दुनियेला फाट्यावर मारून अवघ्या विशीत संसार उभा केला, ती बहुदा आकाशातल्या बापाची इच्छा होती...
तो पट उधळून एकाकी राहवं लागणं हे कुठल्यातरी जन्माचे भोग असावेत...
माणसं तर सोडून द्या मल्हारसारखे जीवलग प्राणीही या फकिराला धार्जिण नसावेत, असा नियतीचा कौल का असावा ? या विचारानं अनेकदा मनात कालवाकालव होते..जीव कासावीस होतो...आणि मग कोजागरीच्या आटीव दुधाचा घोट कच्च्या रमपेक्षाही जास्त कडवट वाटायला लागतो..

No comments:

Post a Comment