Wednesday, 21 November 2018

स्कायलॅब

स्कायलॅब
..............
जगबुडीसारखी नैसर्गिक आपत्ती येऊन पृथ्वी नष्ट होणार, अशी एक बातमी मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती...नाही म्हणायला काहीजण घाबरले...एका चॅनेलने तर त्या कथित जगबुडीच्या आदल्या दिवशी दिवसभर सर्वधर्मीय प्रार्थनेसारखे कार्यक्रमही सादर केले...खरंतर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या देशाचे कथित संशोधक, बुवा, बाबा, ज्योतिषी अशी भविष्यवाणी करत असतात...चर्चेला खाद्य देत राहतात...2012मध्ये तर हे सारं जगच् नष्ट होणार असं भाकीत व्यक्त केलं होतं...त्यावर एक इंग्रजी चित्रपटही आला ..अलीकडच्या काळात अशा काही भाकीतांनी लोक फारसे काही घाबरत नाहीत...कदाचित वारंवार असं कानावर पडून भावना बोथट झाल्या असाव्यात...आधुनिक विज्ञानावर लोक विश्वास ठेवू लागलेत हा ही एक महत्वाचा भाग आहे..इंटरनेटच्या महाजालातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घटनेबाबत सर्व बाजूंची माहिती मिळत असते...सर्व पैलू लक्षात येतात..टीव्हीवरच्या निरनिराळ्या चॅनेल्समुळं दुनियेच्या कानाकोपऱ्यातली बित्तंबातमी समजते..त्यामुळं कुठल्याही घटनेबाबत वाटणारी  भीती खूपच कमी झालीय.. .पण, पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ खूप निराळा होता..स्कायलॅब कोसळणार.. या बातमीनं तेव्हा भल्याभल्यांची झोप उडाली होती..त्या दिवसांतील थरार, देशभर पसरलेला भयगंड आठवून आजही अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात..

70-80 च्या दशकात कोणतीही माहिती किंवा बातम्या समजण्याचं रेडिओ हे एकमेव माध्यम होते..स्थानिक दैनिकंही तेव्हा मर्यादित होती...अगदी मोजक्या लोकांकडे दूरचित्रवाणी संच असायचे..त्यावर दूरदर्शन हे एकमेव सरकारी चॅनेल होतं..त्यामुळं कोणत्याही माहितीची, बातमीची खातरजमा करायला फारसा काही वाव नव्हता.. स्कायलॅब ही अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा .. अमेरिकेने 1973 मध्ये  यानाच्या स्वरुपात ती
अवकाशात सोडली ..सौरचक्रानुसार सूर्याची सक्रियता नेमकी किती वाढेल, याचा अमेरिकन  संशोधकांचा अंदाज बहुदा चुकला..सूर्याच्या वाढत्या सक्रीयतेमुळं पृथ्वीभोवतीचं वातावरण प्रसरण पावलं..त्याचा परिणाम साडेचारशे किलोमीटर उंचीवरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या स्कायलॅबच्या कक्षेवर झाला..परिणामी, ती  कोसळण्याचा धोका निर्माण झाला..एकंदर खगोलीय गणितं लक्षात घेता स्कायलॅब भारतात पडणार असं चित्र होतं..अमेरिकेने तशी घोषणा केल्याचं वृत्त 1979 च्या जुलै महिन्यात येऊन थडकलं अन् देशात एकच खळबळ उडाली.. देशभरातील जनतेची पाचावर धारण बसली..

स्कायलॅबचं वजन किती ? क्षमता किती ? ती नेमकी कुठं पडू शकेल ? त्यामुळं किती संहार होईल ? अशा निरनिराळ्या मुद्द्यांवर तर्कवितर्क सुरू झाले..उलटसुलट चर्चा झडू लागल्या.. अफवांचं पेव फुटलं..सगळीकडं कमालीचं भीतीचं वातावरण पसरलं.. स्कायलॅबचं संकट टाळण्यासाठी लोक ईश्वराचा धावा करू लागले. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारांमध्ये गर्दी वाढली.. .तीर्थक्षेत्रं भाविकांनी ओसंडून वाहू लागली. .जगायचे थोडेच् दिवस उरलेत या भावनेनं अनेकांनी हाय खाल्ली..कित्येकजण अपुऱ्या इच्छा पूर्ण करायला धडपडू लागले....कापडाचोपडाची खरेदी करू लागले..ऋण काढून मुलाबाळांना खाऊपिऊ घालू लागले..हवी ती चैन करू लागले..काहींनी नातलगांच्या स्नेहभोजनाचे बेत आखले.. ग्रामीण भागात गावजेवणाच्या पंगती उठू लागल्या..भोजनाला जोडून कीर्तन, प्रवचनाला कार्यक्रम असायचा..गावकीत, भावकीत  झालेली भांडणं विसरून लोक एकमेकांच्या घरी मांडीला मांडी लावून जेवू लागले...अर्थात, हे सारं करण्यामागं दुःखाची किनार होती..निराशेची छाया होती..एकप्रकारचं सुतकी वातावरण होतं..मी त्यावेळी शिवाजी मराठा प्रायमरी शाळेत शिकत होतो..आम्हा मुलांना सारं काही समजत नव्हतं..पण आजूबाजूचं वातावरण बदललंय हे नक्की कळत होतं.घरच्या लोकांच्या बोलण्यातून, आजुबाजूच्या चर्चांमधून काहीतरी विपरीत घडणार असं वाटत  होतं....चौधरी नावाचे गुरुजी आम्हाला होते..तेच शाळेचे मुख्याध्यापक होते...खूप कडक .सारे विद्यार्थी त्यांना चळाचळा कापायचे...ते मात्र म्हणायचे स्कायलॅब पडणार वगैरे सारी भंकस आहे...तुम्ही अभ्यासाकडं लक्ष द्या...त्यामुळं, आजूबाजूच्या  जगात सगळं वातावरण वेगळं असलं तरी शाळेत मात्र नेहमीप्रमाणं अभ्यास सुरू होता.. इतर शिक्षकही वातावरण हलकं ठेवायचा प्रयत्न करीत होते..मुलांना धीर देत होते..गावच्या पारापासून शाळेच्या मैदानापर्यंत सगळीकडं स्कायलॅब पडण्याची चर्चा जोरदार चालायची..रोज नवी माहिती कानावर पडायची...रोज थोडी धाकधूक अधिक वाढायची..कॉलेज, बँका, सरकारी कार्यालयं, खासगी ऑफिसेस, पानाच्या टपऱ्या सगळीकडं चर्चेचा हाच एकमेव विषय असायचा...सगळं वातावरण स्कायलॅबमय झालं होतं..आणि त्यातच् 11 जुलैला स्कायलॅब कोसळणार असं वृत्त येऊन थडकलं अन् लोकांच्या काळजाचा ठोका चुकला..

     जसजसा 11 जुलैचा दिवस जवळ येऊ लागला...तसतशी भीतीची छाया गडद व्हायला लागली..वातावरण संवेदनशील झालं..लोक भावूक होत गेले...मनं कातर झाली..अगदी वाघाच्या काळजाच्या माणसांचीही मनं सशासारखी होत गेली..देवाचा धावा सुरू झाला...आदल्या दिवशी अनेकांनी देव पाण्यात घातले..कसाबसा तो दिवस उजाडला....सकाळपासून वातावरण कुंद होतं.. नेमकं काय होणार ? कसं घडणार ? या भावनेनं लोकांचे चेहरे कोमजले..पुण्यातली वाहतूक मंदावली. दुपारनंतर पार शुकशुकाट झाला...शाळा, कॉलेज  सोडून देण्यात आली...सरकारी, खासगी कार्यालयांनाही दुपारनंतर सुट्टी दिली गेली..रस्ते निर्मनुष्य झाले...वातावरण सुतकी झालं..दिवस सरू लागला तशी धाकधूक वाढत गेली...दुपार सरली...तिन्ही सांजा झाल्या तरी काय घडलं नव्हतं..सूर्य मावळतीकडं झुकला..लोकांचा धीर सुटू लागला..स्कायलॅबचं काय झालं ? ती कधी पडणार ? संकट टळलं की लांबलं ? नाना शंका कुशंका मनात येऊ लागल्या.. उत्सुकता वाढली.. उत्कंठा  शिगेला पोचली...संध्याकाळ झाली तसं दिव्याला नमस्कार करून लोकांनी घरादारातल्या बल्ब, ट्युबा लावल्या..सगळ्यांचं लक्ष रेडिओवरच्या संध्याकाळच्या बातम्यांकडं लागलं...घराघरात, गावच्या पारांवर, देवळांमध्ये, दुकानांमध्ये लोक रेडिओ, ट्रान्झिस्टरभोवती जमले..एकदाचे सात वाजले..बातम्यांची घोषणा झाली..
' नमस्कार, आकाशवाणी पुणे.....म्हणून निवेदकाचा आवाज घुमला...कानात प्राण आणून लोक ऐकू लागले
..' स्कायलॅब ही अमेरिकेची बहुचर्चित अंतराळ प्रयोगशाळा आज ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी प्रदेशात कोसळली...कोणतीही जिवीत हानी झाली नाही...भारतावरील मोठे संकट टळले.......' पुढच्या काही बातम्या ऐकण्यापूर्वीच लोकांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना मिठ्या मारल्या...साखर, पेढे भरवले...डोळे भरून आले...अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या.. महिनाभरापासून लक्षावधी लोकांच्या मनावर असलेलं भीतीचं, ताणाचं, तणावाचं ओझं त्यात वाहून गेलं....


No comments:

Post a Comment