Wednesday, 21 November 2018

पप्पू कलानीची सुप्रीम पॉवर

पप्पू कलानी आणि सुप्रीम पॉवर
- - - -- - - -- - - - - -- - - -
#आबिद_शेख_पुणे#
 अगदी नेमकी तारीख सांगायची तर 30 मार्च 1990...दहावीची परीक्षा द्यायला रिंकू पाटील शाळेत गेली होती...परिक्षा सुरू झाल्यावर थोड्याच वेळात नंग्या तलवारी घेऊन काही तरूण वर्गात शिरले...थंडपणे त्यांनी रॉकेलचा कॅन तिच्यावर ओतला आणि काडी लावली...अवघ्या दहा मिनिटांत रिंकू पाटील कापरासारखी जळू लागली...तिच्या मदतीसाठी धावणा-या मुलींना आणि शिक्षिकांना त्या नराधमांनी तलवारीच्या धाकाने पिटाळून लावले...दोघांनी चक्क व्हिडीओ कॅमे-याने या घटनेचे चित्रिकरण केले...मन विषण्ण करणारी ही घटना घडली उल्हासनगरमध्ये...त्याच उल्हासनगरमध्ये, जिथं कोणत्याही उत्पादनाची बेमालूम नक्कल होते..त्याच उल्हासनगरमध्ये जिथे बेकायदा उद्योगांचं साम्राज्य आहे...त्याच उल्हासनगरमध्ये जिथून बनावट दारूचा पुरवठा केवळ राज्यालाच नव्हे, तर गुजरातमध्येही होतो...हो.. पप्पू कलानीच या उल्हासनगचा अनधिकृत सम्राट आहे...पप्पू म्हणजे दाऊद इब्राहिमचा हस्तक....आमदार..नगराध्यक्ष...अब्जाधीश स्मगलर आणि बरंच काही. सर्वपक्षिय बड्या नेत्यांमध्ये उठबस असलेल्या पप्पूला इंदर भतिजा खून खटल्यात दोषी ठरवले आहे. सत्र न्यायालयाने त्याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने काल कायम केलीय. आता तो सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेविरूद्ध दाद मागेल...माहित नाही...तिथे तरी त्याची ''सुप्रीम पॉवर'' त्याला साथ देइल का? ..पप्पूची ही सुप्रीम पॉवर काय आहे? त्याचे साम्राज्य कसे आहे? हे समजण्यासाठी उल्हासनगरची सैर करावी लागेल. ..

 80-90 च्या दशकात उल्हासनगरमध्ये स्मगलींग बोकाळले होते.., बनावट दारूचे मोठे व्यवसाय होते.. व्हिडीओ पार्लर्स जोरात होती..रिंकू पाटीलच्या हत्येच्याही कॅसेट इथूनच ब्लॅकने विकल्या गेल्या. .उल्हासनगर म्हणजे काळ्या धंद्यांचे आगारच जणु.. अफाट पैसा आणि मनगटाच्या बळावर राजकीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी इथं झगडा सुरू झाला तो 80 च्या दशकात. पप्पू कलानी, गोप बेहरानी, गोपाल राजवानी, गोविंद वाच्छानी, दुनिचंद कलानी, लालू हेमदेव आणि चिमणदादा हे तेथील प्रमुख मोहरे समोरासमोर उभे ठाकले होते...चौघांकडेही पैशांचा महापूर...मसल पॉवर जबरदस्त .. .त्यामुळे हार मानायला कुणीच तयार नव्हतं...1984 मध्ये ब्लिट्झ् या साप्ताहिकाचे पत्रकार व सहकार संदेश या हिंदी दैनिकाचे मालक नारायण यांच्या हत्येने उल्हासनगर चर्चेत आले..या घटनेनेच तेथील गॅंगवॉरलाही सुरूवात झाली... सहकार संदेशला एका मद्य सम्राटाने आर्थिक मदत केली होती...त्या पेपरच्या माध्यमातून दुनिचंद कलानीने गोपाल राजवानीविरोधात बातम्या पेरायला सुरूवात केली...काळ्या धंद्यांच्या बळावर गबर झालेल्या कलानी आणि राजवानी दोघांनाही राजकीय प्रतिष्ठा हवी होती..पेपरमध्ये आलेल्या बातम्यांनी वैतागलेल्या गोपालने  दिवसाढवळ्या  नारायण यांना उडवले...90 च्या एप्रिल महिन्यात त्याने दुनिचंदल कलानीलाही संपवले... गोपालबरोबरच गोप आणि लालू हे ही या कटात सामील होते.. त्यावेळी इंदिरा कॉंग़्रेसचा शहराध्यक्ष असलेला दुनिचंद हाच पप्पू कलानीचा ब्रेन...या घटनेचे पडसाद लगेच उमटले...मुंबईच्या सन अन्ड सॅन्ड होटेलमध्ये लालू हेमदेवचा गेम करून पप्पूने या खुनाचा बदला घेतला आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डने पप्पूला दाद दिली...कारण त्याआधीच हाजी मस्तान आणि दाऊद इब्राहिम यांनी लालू आणि पप्पूमध्ये समझोता घदवून आणला होता. तो झुगारून देऊन पप्पूने हा खून घडवला...लालू जबरदस्त माणूस होता...मुंबईतील बहुतेक सर्व गुन्हेगारी टोळ्यांचा तो फायनान्सर होता...खून झाला त्यावेळी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या लालूच्या गाडीत एक कोटीची रोकड होती..म्हणजे बघा.....पप्पूने दाऊदच्या डी कंपनीची मदत घेताच लालूने दुबईत दाऊदचा प्रतिस्पर्धी भही याच्याशी संधान बांधून थेट दाऊदलाच आवाज द्यायची तयारी केली...त्यावेळी हाजी मस्तान आणि दाऊदने संभाव्य खूनखराबा टाळण्यासाठी पप्पू आणि लालूमध्ये मांडवली केली...पण एका निर्णायक क्षणी पप्पूने हा समझोता धुडकावून लालूला यमसदनी पाठवले... 90 साली लालूच्या हत्येला 25 लाखाची सुपारी होती...विचार करा...आजचे किती रुपये???....

 लालूच्या हत्येने उल्हासनगरमधील सूडचक्र गतिमान झाले...त्यात अनेक चढ उतार आले...निरनिराळी समिकरणे बदलली...कालचे दोस्त आजचे वैरी बनले...विधानसभा आणि उल्हासनगरच्या पालिकेवरील वर्चस्वावरून गोप बेहरानी विरूद्ध पप्पू असा उभा संघर्ष उभा राहीला...त्याआधी पप्पूशी झगडा केलेला गोपाल राजवानीला पोलिसांनी तडीपार केले. तो मुंबईला हाजी मस्तानकडे आश्रयाला गेला...दाऊदने त्याच्यात व पप्पूमध्ये मध्यस्थी केल्यावर तो पुन्हा उल्हासनगरमध्ये परतला.. हा समझोताही फार काळ टिकला नाही...पप्पू आणि गोप एकमेकांना संपवण्याची भाषा करू लागले..गोपाल राजवानीवर पप्पूने तीनवेळा हल्ले केले. एकदा तर पोलीस बंदोबस्तात त्याला उडवायचा प्रयत्न झाला..पण, तिन्हीवेळा तो वाचला...पण धुमसत असलेल्या तेथील गॅंगवॉरने अनेक बळी घेतले...27 फेब्रुवारी 90 ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या...त्याच दिवशी गोपचा भाचा घनश्याम भतिजाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली...त्यापाठोपाठ 6 मार्चला श्याम कुकरेजाची विकेट निघाली....2 मे ला गोपचाच भाचा म्हणजेच घनश्यामचा भाऊ इंदर भतिजा याची पोलीस संरक्षणात हत्या झाली.. या सगळ्या खूनसत्रांचा सूत्रधार पप्पूला न्यायालयाने वीस वर्षांनंतर जन्मठेपेची सजा सुनावली.  उच्च न्यायालयानेही त्यावर मोहोर उमटवली..आता कायहोणार??? पप्पूला त्याची ''सुप्रीम पॉवर'' तारणार का??

 पप्पूच्या या सुप्रीम पॉवरबाबत थोडं सांगतो... त्याच्या या सुप्रीम पॉवरबबाबत मी अनेकदा संभ्रमित होतो. बारा-पंधरा वर्षांपूर्वी टाडाच्या केससाठी पप्पूला ठाणे जेलमधून पुण्यात हेलपाटे मारायला लागायचे. त्याकाळात मी क्राईम आणि कोर्टाचंही रिपोर्टींग करायचो. पप्पू, वसईचा हितेंद्र् ठाकूर, मुंबईचा अरूण गवळी अशा काही मंडळींशी माझा त्याच काळात थेट परिचय झालेला. पप्पूची कारकिर्द काळीकुट्ट होती...तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी नाईक यांनीच त्याला 'टाडा' खाली अटक केली होती. त्याला तुरूंगात डांबले होते. त्याचं नवी मुंबईतलं सीमा रिसॉर्ट बुलडोझर लावून भुईसपाट केलं होतं..अब्जावधी रूपये खर्चून उभारलेल्या या पंचतारांकीत रिसॉर्टमध्ये राज्यातल्याच नव्हे, तर देशविदेशातील व्हीआयपी, सेलिब्रिटी, नंबरी लोकांचा राबता असायचा...बरेच उद्योग चालायचे तिथं...हे रिसॉर्ट पप्पूच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सीमा रिसॉर्ट भुईसपाट झाल्याचं समजताच पप्पू तुरुंगात ढसाढसा रडला होता..मनाने खचला होता..पण अलिकडे जरा त्याची मनस्थिती बरी झाली होती..त्याच्या शारीरिक व मानसिक स्थितीत आश्चर्यकारक सकारात्मक बदल झाले होते...त्याच्याशी गप्पा मारायच्या ठरवलं

 ..एकदा तो पुण्यातून खटल्याचे कामकाज आटोपून ठाणे जेलला परतत होता. त्याच्यासोबत पोलिसांच्या गाडीतून पुण्याहून निघालो.... पप्पू तुरुंगात असल्याने तिकडे उल्हासनगरमध्ये त्याच्या विरोधकांनी उचल खाल्ली होती. तरीही अलिकडे तो आश्चर्यकारकरीत्या सावरला होता. तुरुंगातूनच आमदार म्हणून निवडून आला. उल्हासनगर पालिकेमध्ये त्याचे दोन-चारच सदस्य निवडून आले होते. तरी त्याची पत्नी ज्योती नगराध्यक्ष झाली. तुरुंगात आरामात राहण्याची 'सेटींग' झाल्याने तो रिलॅक्स होता. चेह-यावर तेज होते. एकही सुरकुती नसलेला कडक इस्त्रीचा पांढरा शुभ्र् सफारी, उंची परफ्युम फवारलेला, तेल लावून मागे वळवलेले केस, गुळगुळीत दाढी, सोनेरी काडीचा चष्मा आणि चेह-यावर विलसत असलेले मंद हास्य अशा व्यक्तिमत्वाचा पप्पू कमावलेल्या मृदू भाषेत बोलत होता. त्याचं ते राहणीमान, बोलणं,चालणं, चेह-यावर असलेला कमालीचा आत्मविश्वास पाहून तर क्षणभर आरोपी तो आहे? की मी? असा प्रश्न् मला पडला होता. वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात खूप काही भोगल्यानंतरही त्याचा तो आत्मविश्वास चकीत करणाराच होता. कारागृहात राहून एक स्मगलर आमदार होतो, पुन्हा नव्याने आपल्या साम्राज्याची बांधणी करतो हे म्हटलं तर अविश्वसनीयच असलं तरी वास्तव होतं. खूप निरनिराळ्या विषयांवर पप्पुच्या निवांत गप्पा सुरू होत्या. त्या ओघात तुरुंगात निरनिराळ्या देवीदेवतांचे नेमाने पूजापाठ करतो असं तो म्हणाला. .....मी विचारलं,``एवढा सेटबॅक बसूनही तू पुन्हा नव्या जोमाने, पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने कसा उभा राहीलास?
आकाशाकडे पाहत मनोमन नमस्कार करीत तो म्हणाला `ये सब वो सुप्रीम पॉवर का कमाल है'.
`` म्हणजे?''
देखो, उपर वो जो कोई बैठा है ना उसे अभितक किसीने देखा नही. उसके अच्छे बुरे खेल देखे है. लेकीन मेरा यकीन है वो जो कोई है, उसका मुझे टोटल सपोर्ट है. वर्ना मेरी जगह कोई और होता तो उसका हाल कितना बुरा होता. मैं तो मस्त् हूं. सब उस सुप्रीम पॉवर का कमाल है.
पण सुप्रीम पॉवर म्हणजे काय? माझा भाबडा सवाल.
देख उपर जो कोई है ना उसे हर एक इन्सान अलग नाम से पुकारता है. लेकीन है तो वो एकही. मै उसे सुप्रीम पॉवर कहता हू. बस्स.

 देहुरोड जवळ आलं होतं. तिथे गाडी चेक व्हायच्या आत मला निघणं भाग होतं. पप्पूचा निरोप घेऊन मी उतरलो. मधाळ हास्य करीत पप्पूने `सुप्रीम पॉवर को मत भुलना' म्हणून बजावलं. पुढे त्याच्या आयुष्यात खूप उलाढाली झाल्या. मध्यंतरी तो सुरतला होता. तडीपारीसाठी. कधीतरी, फोनवरून सहज गप्पा होतात... प्रत्येकवेळी न चुकता तो सुप्रीम पॉवरची कमाल सांगत असतो. उल्हासनगरमधील गोप बेहरानी, गोपाल राजवानी, चिमणदादा, घनश्याम भतिजा असे पप्पूचे सर्वार्थाने त्याच्या एवढेच तगडे प्रतिस्पर्धी एक-एक करीत काळाच्या पडद्याआड गेले. बहुतेकजणांचे मुडदेच पडले. पप्पू अधिकाधिक सामर्थ्यवान बनत गेला. उल्हासनगरचे राजकारण अद्यापही त्याच्याच इशा-यावर चालते. त्याचं दोन नंबरचं साम्राज्य अधिकच विस्तारलयं.
 पप्पू म्हणतो तसं जर सुप्रीम पॉवरची ही कमाल असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात. दिल्लीतील सामुहिक बलात्कारासारख्या या घटनांच्यावेळी ही सुप्रीम पॉवर कुठे असते? जात-धर्म-प्रांत-भाषेच्या नावावर दंगली भडकतात, त्यात निरपराध लोक मारले जातात, तेव्हा ही सुप्रीम पॉवर कुठे जाते? पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी बॉंबस्फोट घडवले जातात् तेव्हा ही सुप्रीम पॉवर कुठे जाते? देशाच्या सीमेवर शत्रुराष्ट्रे हल्ला करतात तेव्हा तो केवळ नियतीचा भाग मानायचा का? तेव्हा ही सुप्रीम पॉवर कुठे जाते? बारा-पंधरा चिमुरड्यांना हाल हाल करून ठार केलेली अंजनाबाई गावित ही बाई तुरुंगात चक्क ह्र्दयविकाराच्या झटक्याने आरामात कशी काय मरते? वृद्धश्रमातील मंडळी मरणाची याचना करत असतात. त्यांना मरण येत नाही अन्‌ कितीतरी कोवळी मुले, बाळे अपघातांमध्ये जातात, तेव्हा ही सुप्रीम पॉवर काय करत असते? ही सुप्रीम पॉवर काय फक्त पप्पू आणि त्याच्यासारख्या दोन नंबरच्या माणसांसाठीच राखीव आहे का? दाऊद इब्राहिम आपल्याला का सापडत नाही? आपला किंवा पाकीस्तानचा मुद्दा सोडा.. लादेन आणि सद्दाम हुसेनचा खात्मा करणा-या अमेरिकेलाही दाऊद सापडत नाही..नव्हे दिसतही नाही? बरं दिसणेही सोडा.. गेल्या 25 वर्षांत त्याचा खरा फोटोही अख्ख्या जगात कोणाला मिळत नाही? खरंच सुप्रीम पॉवरचीच ही कमाल आहे का? बरेच दिवस हा विषय मला छळतोय. काय असेल हे सुप्रीम पॉवरचं प्रकरण??????? आता बघु ना आपण ...घोडा मैदान जवळच आहे...लवकरच समजेल पप्पूचा काय फैसला होतोय ते...सुप्रीम कोर्टात दाद मागत टाईमपास करून पप्पू सुखासीन आयुष्य जगतो? की आयुष्यभर विलासी आयुष्य जगलेला पप्पू तुरुंगात खितपत मरतो....हे आगामी काळात कळेलच्‌. . . ..

No comments:

Post a Comment