Wednesday, 21 November 2018

माणदेशी बाजार

माणदेशी बाजार :
- - - - - - -  - - - -
  मॉलमध्ये जाणं मला आजिबात आवडत नाही..तिथला चकचकाट, दिव्यांचा लखलखाट, भलीमोठी पॉश दुकानं, आसमंतात फवारलेले  फ्रेशनर्स, उंची कपड्यातले, आंग़्ल वळणाचे लोक .....असल्या त्या वातावरणात अक्षरश: गुदमरल्यासारखं होतं..मला सवय मंडईची, बोहरी आळीची..लक्ष्मीरोडची आणि टिळक रोडची.....पूर्वी शूज-जीन्स-जर्कीन्स कॅम्पात घ्यायचो...आता पुण्यात सगळी दुकानं झालीत..अर्थात, कॅम्पातली मजा काही औरच..पण तात्पुरती..एरवी टिळकरोड,  डेक्कन हाच एरीया मस्त वाटतो..खायला,प्यायला आणि खरेदीलाही...तिथं कसं प्रसन्न वाटतं..आपल्या लोकांच्या गर्दीत जीव रमतो..दुकानदारांशी भाव करताना मजा येते..एका शर्ट पॅंटची खरेदी करताना सतराशेसाठ कपडे घालून पहायला आजिबात वावगं वाटत नाही..मंडईतल्या ताज्या भाजीपाल्याचा वास मन  प्रसन्न करतो... पुण्या-मुंबईत गेल्या दहा वर्षांत मॉल संस्कृती आली... रुजलीही...पण मी कधी त्यात रमलो नाही.....या मॉलसंस्कृतीपुढं हळूहळू आपले नेहमीचे दुकानदार आणि व्यापारी नांगी टाकू लागलेत. हळूहळू ते नामशेषही होतील. खेड्यांचं वेगानं नागरीकरण होतयं. गावोगावचे आठवडी बाजार कमी होऊ लागलेत. मला आजही खूप आकर्षण आहे, ते आठवडी बाजाराचंच् ... लहानपणी गोंदवल्याच्या बाजाराच्या लुटलेल्या मौजमजेत त्याचं गुपीत दडलं असावं.आजही नुस्ता बाजार असा शब्द उच्चारला तरी क्षणात डोळ्यांसमोर आमच्या गोंदवल्याच्या बाजाराचं चित्र डोळ्यांसमोर तरळतं....

 गोंदवले बुद्रुक हे साता-यातल्या माण तालुक्यातलं छोटसं गाव...ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेलं...महाराजांचं गोंदवलंही म्हणतात त्याला.....या गावात माझी आत्या, मावशी आणि बरेच नातलग.. लहानपणी दरवर्षी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत दिड-दोन महिने मी गोंदवल्यात असायचो...गावात रहायची, माणगंगेत डुंबायची अनावर ओढ असायची...तसंच दर गुरुवारी भरणा-या आठवडी बाजाराचंही अतोनात आकर्षण होतं....गावाला गेल्यावर कधी एकदा गुरुवार येतोय.. बाजारात हुंदडतोय असं व्हायचं....खूप मजा असायची त्या दिवशी.. आत्या आणि मावशीची राम मंदीराला लागूनच दुकानं...त्यामागंच घरं... या दुकानांत काम करायला,तागडीत वस्तुची वजनं करून गि-हाईकांना द्यायला खूप् आवडायचं....दोन्ही दुकानात बाजाराच्या दिवशी मोठी धांदल उडायची....गुरुवारच्या बाजारासाठी बुधवारी दुपारपासूनच धावपळ सुरू व्हायची..घरची मंडळी तांदुळ, साखर, शेंगदाणे, चहा, डाळींचे अर्धापाव, पावशेर, अर्ध्या किलोचे, किलोचे पुडे वजन करून ठेवायची....तंबाखूची पानं, आलं, लिंबू, खोबरं ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवली जायची...बाजाराच्या दिवशी गि-हाईकांना द्यायला माल कमी पडणार नाही याची तजवीज व्हायची..गावात हमाली काम करणारा लाल्या एकटाच..त्याला दुस-या दिवशी सकाळी वेळेत यायचा तगादा संध्याकाळपासूनच लावला जायचा... .गुरुवारची सकाळ गडबडीत उजाडायची.. साडेआठ-नऊच्या सुमाराला पंचक्रोशीतील दुकानदार ट्रक-टेम्पोमधून यायला सुरूवात व्हायची.. सामान ठेवायच्या एका जुन्या खोलीत दोन्ही दुकानांच्या ताडपत्र्या ठेवलेल्या असायच्या..लाला सकाळी आला की चुलीवरच्या गरमगरम भाक-या, मटकीचं कालवण, पांढरा भात, दही, हिरव्या मिर्चीचा खर्डा अशी मजबुत न्याहरी करून कामाला तयार व्हायचा... डोक्यावर जड ताडपत्र्या आणायचा...पहारीनं दुकानांसमोरच्या जागेत खड्डे करून तट्ट्याचं दुकान थाटून द्यायचा..दुकानातली धान्याची पोती बाहेर आणून ठेवायचा...तेलाचे डबे, साबण, जनावरांची पेंड, नवसागर, गुळ, गोळ्या, बिस्कीटं, मुरमुरे, फुटाणे असा सगळा माल निगुतीने लावून दुकान थाटलं जायचं... त्यामागे पलंग..त्यावर जाड गादी आणि पैशाचा गल्ला ठेवला की दुकान तयार व्हायचं...

 आमची दोन्ही दुकाने लागेपर्यंत गावोगावच्या दुकानदारांचीही लगबग सुरू झालेली असायची....घरासमोर जेमतेम दहा-वीस फुटांवर मारुतीचं देऊळ..तिथं बाजारातलं पहिलं भजीवाल्याचं दुकान लागायचं..हा दत्तुभाऊ दहिवडीचा.. वडलांपासनं त्यांचा भजी बनवायचा व्यवसाय..सकाळी लवकर येऊन तो देवळाजवळ खड्डा करायचा..त्यात जाळ पेटवून त्यावर भल्यामोठ्या लोखंडी कढयांत तेल तापत ठेवायचा.. ..भज्यांसाठी सरासरा कांदा चिरायचा..ढिगभर कोथिंबीर बारीक कापून ठेवायचा...बटाटे सोलून ठेवायचा...त्याच्या चकत्या करायचा....बेसनमध्ये कांदा, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा,मीठ,कांदा घालून कालवून ठेवायचा..  पाण्याचा हळूच शिपटारा मारून तेल कितपत उकळलंय याचा अदमास घ्यायचा..तापल्या तेलाचा चरर्र् असा आवाज आला की लांबलचक झारीने भज्यांचा घाणा तळून काढायचा..वडे तळून ठेवायचा...बटाटा भज्याचा घाणा काढायचा... हिरव्यागार मिरच्या तळून मिठात मुरवत ठेवायचा... भज्यांचा खमंग वास आसमंतात पसरला की बाजार सुरू झाल्याची जाणीव व्हायची.....दत्तुभाऊकडं ताजी गुडदाणी, गोडी शेवही मिळायची...गोड भजी म्हणजेच गुलगुले ही तर त्याची खासियतच.
 साधारणत: दहा-साडेदहानंतर बाजारात गर्दी उसळायची... खालचं गोंदवलं म्हणजेच गोंदवले खुर्द, किरकसाल, दहिवडी, वाघमोडेवाडी, पळशी, वडूज, लोदवडे, पिंगळी, राणंद, निढळ अशा पंचक्रोशितले ग्रामस्थ, शेतकरी बाजाराला यायचे. कुणाची वाणसामानाची खरेदी असायची..कुणाला कापडचोपड घ्यायचं असायचं....कुणाला शेतीची अवजारं तर कुणाला गुरंढोरं घ्यायची असायची...म्हसवड, पळशी, दहिवडी, वडुज इथले दुकानदार हरत-हेच्या  धनधान्याची, वस्तुंची, कापडचोपडाची दुकाने थाटत..सुकं खोबरं,जिरं, मोहरी,धने, लवंग, मिरे, वेलची, हळद,दगडफूल, जायपत्री, मायपत्री अशा मसाल्याच्या पदार्थांची दुकानं असायची... लोक गरजेनुसार..ऐपतीनुसार सौदा म्हणजे पाच-पंचवीस रुपयांना मसाल्याचे जिन्नस एकत्रित घेत... त्या मसाल्याचा खुमासदार गंध बाजारात पसरायचा... एक व्यापारी सुक्या लाल मिरच्या विकत बसायचा..मिरच्यांचेही निरनिराळे प्रकार...तिखटजाळ लवंगी मिरची, तिखट पण आगळ्या स्वादाची ब्याडगी, कमी तिखट पण लाल भडक, चकचकीत दिसणारी रेशीमपट्टा...घरचा मसाला करायला लोक लवंगी किंवा ब्याडगी मिरची घेत..त्यात चांगला रंग यायला रेशीमपट्टा घ्यायचे...या दुकानदाराजवळून जाताना मिरचीच्या खकाण्याने हमखास शिंका यायच्या.... आश्चर्य वाटायचं ते त्या व्यापा-याचं....तो मिरच्यांच्या पोत्यांच्या गराड्यात निवांत बसलेला असायचा...मुरम्-याची पोती घेऊन म्हसवडचे एक-दोघे येत..रुपया-दोन रुपयाला चिपटाभर मुरमुरे मिळत..एकाकडं पाळणे,उखाणे, हुमणं म्हणजे कोडी, स्त्रोत्र-श्लोकाची पुस्तकं असायची..
 झाडावर झरा...उत्तर द्या...नारळ...
 कालीकपाली गाय, तिचे लोखंडाचे पाय, राजा बोंबलत जाय पण थांबतच नाय.....सांगा      उत्तर...आगिनगाडी...अशी मजेदार कोडी घालत...
 सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर गं ..
 मधोमध विसावला माझा चित्तचोर गं..
 तुज जोजविते माय जिजाई बाळा ।
 नीज रे नीज लडिवाळा .......असे सुरेल आवाजात पाळणे गात, खड्या आवाजात श्लोक म्हणत तो पुस्तकं विकायचा..काहीजण शेतातल्या मोहरेदार ज्वारीचे, काळपट बाजरीचे हारे लावत..या गावरान ज्वारी-बाजरीच्या भाक-यांची चव फार मस्त लागते..एक-दोघे गावरान हरभरे, वाटाणे, तूर अशी सुक्या कडधान्यांचे ढिग लावत...आमच्या भागात निरनिराळ्या प्रकारचे ताजे फुटाणेही फर्मास मिळतात. छोट्या-मोठ्या आकाराचे, खारवलेले चणे छान लागतात. हळदीतले खमंग फुटाणे ही इथली खासियत. तसे फुटाणे मी अद्याप कुठं खाल्लेले नाहीत. बाजारात एकजण फक्त गुळ विकायचा.गुळाच्या ढेपा तो बाजाराला घेऊन यायचा. पिवळाधमक, मध्यम रंगाचा,काळपट रंगाचा असे गुळाचे प्रकार असायचे. काळा गुळ हातभट्टी दारुसाठी वापरतात. गुळाच्या दुकानाजवळ गांधीलमाशा घोंघावत असायच्या. एकजण छोट्या पोत्यांतून गोटा खोबरं, हळकुंडं विकायचा. हळदी, कुंकू आणि सौभाग्य लेण्यांचं, मुंडावळ्यांचंही दुकान असायचं. किराणा मालाचीही काही दुकाने असायची. शहरात कधी आजिबात न पाहिलेले साबण, नामांकीत साबण कंपन्यांच्या नकला, साबण चुरा, बनावट निरमाचे छोटे पॅक तिथं बिनदिक्कत विकायला असत. कपडे धुवायचे काळपट साबण स्वस्तात मिळत. दहिवडीचा म्हादू तेली बाजारात फक्त तेल घेऊन यायचा. गोड्या तेलाचे, खोबरेल तेलाचे बुधले तो बैलगाडीतून आणायचा. सदरा-धोतर,  डोईला मुंडासं आणि भरघोस मिशावाला म्हादू अद्याप जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. बाजाराला येणारे लोक त्याच्याकडूनच तेल घेत. त्याचे सारे कपडे अन्‌‌  शरीर तेलानं माखलेलं असायचं. त्याच्यासोबत त्याची बायकोही बाजाराला यायची. तेल विकायला मदत करायची. दहिवडीहूनच काही घेवारी मंडळीही यायची..हे लोक बाजारातून ठोक दरात किराणा सामान विकत घेत..आणि बाजारातच दुकान थाटून त्याची किरकोळ विक्री करून पैसे कमवत..एकजण छत्र्या-स्टो दुरुस्त करायचा...बाजाराला येताना लोक नादुरुस्त झालेले स्टो घेऊन यायचे...त्यांचा बाजार होईपर्यंत तो ते दुरुस्त करून ठेवायचा..शक्यतो बर्नर बदलण्यावर त्याचा भर असायचा...त्याच्याकडं पिवळेधमक बर्नर समोर मांडलेले असत..छत्रीच्या तुटलेल्या काड्या तो बदलून द्यायचा..

 बाजारात कपड्यांमध्येही नाना प्रकार असायचे... लहान बाळांच्या अंगड्या टोपड्यांपासून पांढरा शर्ट-खाकी चड्डी हे मुलांचे आणि मुलींचे निळे तयार गणवेश..नागमोडी महिरप असलेल्या गोंडेदार कुंच्या, तयार कपडे, कापडांचे तागे, नऊवारी, सहावारी पातळं,खण,रिबिना, टोप्या, धोतरं,पागोटी आणि अगदी लग्नाच्या बस्त्याचे कपडेही...बाजारी कपड्यांना एकप्रकारचा ग्रामीण बाज असायचा... नामवंत ब्रॅन्डशी साधर्म्य असलेल्या बनावट कंपन्यांची कापडं असायची...मुलांच्या, महिलांचे कपडे नक्षीदार,फुलाफुलांच्या डिझाईनचे आणि काहीसे भडक असत..बाजारात एक-दोन कासारही असत..तिथं बांगड्या भरायला बायकांची गर्दी व्हायची...एखादा कासार नाक किंवा कानही टोचून द्यायचा..शेजारीच एकजण फण्या, कंगवे, आरसे, गंध, पावडर, काजळ, टिकल्या विकायचा..शेतकामासाठी लागणारी नांगर, खुरपी, विळे, कोयते,कुदळ, फावडी, खोरे अशी लोखंडी अवजारे...  कु-हाडीची, भाल्याची पाती बाजारात मिळत...कुदळ, फवड्याचे, कु-हाडीचे दांडे, भाल्यासाठीच्या काठ्याही मिळायच्या...धनगर मंडळी लोकरीच्या उबदार घोंगड्या, जेन विकत...शाळूच्या लोकरीच्या म्हणजे मेंढराच्या लहान कोकराच्या घोंगड्यांना जास्त भाव मिळतो..ही घोंगडी मऊसूत, उबदार आणि न टोचणारी असतात...पावसात घोंगडं पांघरल्यावर माणूस आजिबात भिजला नाही पाहिजे ही उत्तम घोंगड्याची खूण....या मंडळींकडं लोकरीची जाजमं आणि जेनही चांगली मिळत..जेन म्हणजे पूर्णपणे लोकरीपासून बनवलेली अर्धा-पाऊण इंच जाडीची गादी....माणदेशातील सलगर जातीचे लोक खूप मेहनतीने ही जेनं बनवतात...काळ्या आणि पांढ-या रंगात ती मिळतात...त्यावर खास ग्रामीण टच असलेली नक्षी...ही जेन झोपायला खूप आरामदायक...सवय नसलेल्यांना ते टोचतं...त्यावर चादर टाकली की उबदार बिछाना तयार होतो..जेनवर झोपलं की पाठ कधी धरत नाही.. कधी पाठदुखी जडत नाही..मला तर लहानपणापासून अद्यापही जेनवरच झोपायची सवय......काही धनगर मंडळी मेंढरं घेऊनच बाजाराला येत...तिथंच ते त्याची लोकर कातरून विकत..तिथंच एकजण चामड्याच्या जाडजुड वहाणा घेऊन बसायचा...आजिबात फॅशनेबल नसलेल्या, काहीशा कमी सफाईदार या जाडजुड वहाणा टिकायला मात्र  भक्कम असत....या चांभाराकडं टायरपासून बनवलेल्या निकृष्ट दर्जाच्याही चपला एकदम स्वस्तात मिळत..गरीब मजूर वर्ग त्या विकत घेत असत..

 आमच्या घरापलीकडंच नाथाचं देऊळ..तिथं भाजी मंडई भरायची. . मेथी, शेपू, चाकवत, करडई, माठ...अशा हिरव्यागार पालेभाल्या.. अन..कारली,गावरान गवार, तोंडली, मुळ्यावरच्या शेंगा, घेवडा, फरसबी, पावटा, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, लालबुंद टोमॅटो, कांदे, बटाटे, मातीचा वास असलेल्या भुईमुगाच्या शेंगा असा सारा मळ्यातील ताजा गावरान मेवा स्वस्तात मिळायचा...तिथंच लालचुटुक गाभा असलेल्या हिरव्याकंच चिंचा, गाभुळी चिंचा, आवळे, कै-या, लाल तिखटात मुरवलेल्या कै-याच्या, आवळ्याच्या फोडी, आवळे, बोरं असा सारा आंबटचिंबट साज घेऊन एकजण बसायचा..त्याच्याकडं विशेषत: मुलींची, महिलांची आणि पोराटोरांची गर्दी असायची...बाजारात सीताफळं, चिक्कू, संत्री-मोसंबी तत्सम फळ मिळत..आंधळीच्या धरणक्षेत्रातली काळ्या ठिपक्यांची अत्यंत गोड अशी चिटी केळी मिळायची...मलवडीची डाळींबही एकजण घेऊन यायचा..ही गावरान वाणाची डाळींब..चवीला जरा कडवट असत..त्याचे दाणे टणक तर बिया कडक असायच्या..या मंडईतच एक-दोन बायका सुकट, बोंबील, अंबाडी, सोडे अशी सुकी मासळी विकायच्या..

 मारूती मंदीरालगत गावची चावडी...त्याच्या पाठिमागं नदीकडं जाणा-या रस्त्याला अप्पा न्हावी बसायचा..त्याचे कटींगचे दर एकदम स्वस्त.. उघड्यावरच त्याचा दाढी-कटींगचा धंदा चालायचा..उन्हातान्हात शेतात राबल्यानं बळीराजाच्या पायाची नखं कमालीची कडक आणि चिवट झालेली असायची..अप्पाकडं नखाली नावाचं एक हत्यार असायचं...त्यानं तो अलवार ही नखं कापून द्यायचा..त्याच्याकडं बाटलीतल्या पाण्यानं फवारा उडवून घ्यायला बच्चेमंडळींना मजा वाटायची. त्याच्याशेजारी एकजण मटण विकायचा. तिथंच दहिवडी आणि महिमानगडहून दोन अंडीवाले बसायचे....आमच्याकडं अंड्यांना कवटं म्हणतात..अंडीवाल्यांकडं विलायती आणि गावरान अंडीही मिळायची...विलायती अंड्यांपेक्षा गावठी अंडी आकाराने लहान..पण चवीला मस्त अन तब्येतीला पोषक..अनेक ठिकाणी पाहुणे मंडळींना या कवटांची पिवळसर पोळी आणि गरम ज्वारीची भाकरी हा पाहुणचार असतो...आठवड्याचा बाजार करून परतताना अनेकजण मांसाहारी जेवणाचा बेत आखायचे...अंडी- मटण, सुकी मासळी घेऊन घरी परतायचे...हा सारा आठवडी बाजार रस्त्यावरच...किंवा तरटाच्या, ताडपत्रीच्या  दुकानात....ग्रामीण लोक आणि या दुकानदारांमध्ये भावाची मजेदार घासाघीस  चालायची...काही व्यवहार उधारीने व्हायचे...काही हप्त्यांमध्ये..सारे व्यवहार विश्वासावर ...आमच्या माणदेशातली माणसं साधी....भोळी भाबडी..एखाद- दुसरा बेरकी असतोही...पण नमुन्यापुरता...बाकी सारी परीस्थितीनं...त्याहीपेक्षा कायमच्या दुष्काळानं पोळलेली...

 बाजारासाठी काहीजण कुटुंबकबिल्यासह येत..मुलांना फुगे, पिपाण्या, लिमलेटच्या गोळ्या, गुलगुले मिळत..काहींना कापडं...बाकी घरचं वाणसामान... मारुतीच्या मंदिरामागून नदीपर्यंत खूप झाडं होती.. तिथं गुरांचा बाजार भरायचा...जनावरं बांधण्यासाठी तिथं दगडी खुट्ट्या ठोकलेल्या ...अस्सल खिल्लारी बैल, दुभत्या गाई, पंढरपुरी म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची विक्री बाजारात व्हायची...निरनिराळ्या रंगांची, आकाराची जनावरं असायची..काळ्या-पांढ-या, भु-या रंगांच्या बक-या, त्यांची सुरू असलेली बें-बें..गोंडस करडं अन कोकरं, पांढरेशुभ्र, वळणदार शिंगांचे देखणे बैल, काळ्या-पांढ-या, तांबूस रंगाच्या गाई, अवखळ खोंड आणि कालवडी, रेकणा-या म्हशी आणि रेडकं यामुळं या बाजारात आगळीच गंमत असायची.. जिल्ह्यात मलवडी आणि म्हसवडलाही गुरांचा बाजार असायचा...पण आमच्या बाजारात चांगली गर्दी व्हायची...गुरांच्या कासेत हात घालून त्यांच्या दुधाच्या क्षमतेचा अंदाज शेतकरी किंवा हेडे म्हणजे दलाल घ्यायचे...जनावरांच्या दातांवरून वयाची अटकळ बांधायचे... खरेदीचा व्यवहार कधी थेट, कधी हेड्यांमार्फत व्हायचा...काहीजण शेतीसाठी गुरं घेत...आपलं जनावर किती चांगलं आहे, याची शेतकरी तोंडभरून स्तुती करायचा...तर विकत घेणारा त्यात खोट काढून भाव पाडून मागायचा... व्यवहारासाठी खूप घासाघीस चालायची.. विकलेली जनावरं नव्या कास-याला बांधून नव्या मालकाच्या हवाली करताना बळीराजाच्या डोळ्यांतली आसवं लपायची नाहीत....इथला शेतकरी गरीब...दावणीला असलेलं भाकड जनावर पोसायची त्यांची ताकद नसायची...भाकड शेळ्या-मेंढ्या बाजारात कसाबाच्या, खाटकाच्या हवाली करायचे...तिथं कासरे विकणारी मंडळीही असायची...बैलांच्या गळ्यातले पट्टे, घंटा, छोट्या घुंगरांच्या माळाही मिळत..घायपाताच्या वाखापासून कासरे आणि पांढरेशुभ्र दणकट दोरखंड विणण्याचं काम तालात सुरू असायचं.जनावरांचा चारा, वैरण, कडबाही तिथं मिळायचा..

 बाजारात थाटलेल्या तरटाच्या दुकानात हौस भागवून मी दुपारी  बाजारातून चक्कर मारायचो...खूप जिवंत, रसरशीत असं वातावरण असायचं....सगळ्या बाजारात हळद, भजी, फुटाणे, भाजीपाला, मसाले, गुळ, लोकर, भाजीपाला, फळं अन जनावरांच्या शेणाचा मिश्र गंध पसरलेला असायचा...बाजाराला आलेले लोक इतर गावच्या पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत..झाडाखाली पानतंबाखुच्या चंच्या सोडून  निवांत गप्पा करीत बसत..काहीजण तिथं घरून आणलेली शिदोरी सोडून जेवण करीत .. पंचक्रोशीत माहेर असलेल्या एखाद्या सासुरवाशिणीची नजर माहेरच्या गावचं बाजारात कुणी आलंय का? हे पहायला भिरभिरत असायची... कुणी  भेटलं की तिचे डोळे आनंदानं लकाकायचे...आपली ख्यालीखुशाली ती घरी कळवायची...मी बाजारातून स्टीलचा चाकू,अन तसंलंच काहीबाही विकत घ्यायचो...भजी खायचो...रव्याची बर्फी खायचो...गुरांच्या बाजारात रेंगाळायचो....नदीवर भटकून फिरत फिरत घरी जायचो....जेवण करून झोपायचो..
पंचक्रोशीतील गावांतील शाळकरी मुलंही बाजाराला येत असत.. बाजारातून त्यांना काहीबाही घ्यायचं असायचं..त्यासाठी पैशांची तजवीज ते आठवडाभर आधीपासूनच करत असत...रानातल्या एरंडाच्या, करंजीच्या  झाडांच्या बिया ते साठवून ठेवायचे...या बिया औषधी..पोरं डोईवरच्या टोपीतून या बिया आणत..बाजारातल्या कुणाही दुकानदाराला ते विकत असत..पोरांच्या हाती चार पैसे पडत..

 सूर्य मावळतीकडे निघाल्यावर बाजार उतरणीला लागायचा... गर्दी ओसरू लागायची... विकली न गेलेली जनावरं घेऊन शेतकरी गावाकडं निघायचे...मैलोंनमैल वाट तुडवत त्यांना रात्रीच्या आधी गाव गाठायचा असायचा...गुरांचे व्यवहार न झाल्याची निराशा त्यांच्या एका डोळ्यांत दिसायची..अन पशुधन आपल्याच घरात राहिल्याचं समाधान दुस-या डोळ्यांत चमकायचं..धनधान्याचे, कपड्यांचे व्यापारी दिवसभराच्या कमाईचा हिशेब चोपडीत नोंदवायचे....सामानाची बांधाबांध करायचे...ताडपत्र्या, तरटं काढून दुकान उतरवयाचे....पुढच्या बाजाराला भेटण्याबाबत त्यांची बोलणी व्हायची..गावाला कुणाला काय निरोप द्यायचे, त्याची देवाणघेवाण व्हायची...सामान वाहून नेणारे टेम्पो, ट्रक चावडीजवळ यायचे...त्यात सामान टाकून गोंदवल्याच्या ग्रामस्थांचा, दुकानदारांचा निरोप घेऊन व्यापारी गावाकडं निघत...गावचा मुख्य रस्ता म्हणजेच एसटीचा स्टॅंड.. .गावचे लोक या रस्त्याला सडक म्हणतात...सडकेवर संध्याकाळी गावोगावच्या दुकानदारांची गर्दी व्हायची...गावचीही बरीच मंडळी असायची...एसट्यांची ये-जा सुरू असायची...सडकेवरून हाकेच्या अंतरावरच ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा मठ ...त्यांचं स्मरण करत लोक गावी परतायचे.. दिवसभर गर्दीने फुललेला गाव सुना सुना व्हायचा...वातावरणातलं चैतन्य हरवायचं...बाजार उठल्यामुळं भाजीपाल्याचा, कागदांचा केर गावात व्हायचा...तरटांच्या दुकानांना टेकूला लावलेले दगड, फळांची सालं इततस्त: पडलेली असायची..गुरांच्या बाजारात शेणा- लेंड्यांचा खच पडायचा...चारा पसरलेला असायचा...बघताबघता दिवेलागण व्हायची...रेडिओवर संध्याकाळच्या बातम्या ऐकत लोक दिवसभरात काय काय घडलंय याचा अदमास घ्यायचे...बायका स्वयंपाकाला जुपायच्या...जेवणखाण उरकून मंडळी चावडीत, सडकेवर गप्पा करत बसायची..का कुणास ठावूक; पण बाजार संपल्यानंतर एकप्रकारची अनामिक शांतता गावात जाणवायची..एरवीपेक्षा हा दिवस खूप धावपळीत..लवकर संपायचा...मी ही रात्री लवकर भुईवर पाठ टेकून झोपून जायचो... पापणीत पुढच्या बाजाराची वाट पाहत . . ..

 बालपण सरलं...मोठा झालो...फारसा काही शिकलो-सवरलो नाही...कॉलेजमध्ये असतानाच लग्न झालं...नोकरीलाही लागलो...वयाच्या वीसाव्या वर्षापासून मागे लागलेला प्रपंचाचा गाडा कधी सुटला नाही...नोकरी-प्रपंचाच्या व्यापामुळे आताशा गावी जाणं जाणं फारच कमी झालंय...बाजाराच्या दिवशी तर गेल्या दहा वर्षांत जमलंच नाही...पण बाजार अजून तसाच भरतोय...फरक झालाय तो स्वरुपात...थोडा व्यवहारात...ताडपत्र्या, तरटं जाऊन प्लास्टीकची आच्छादनं आलीत..पूर्वी कपड्याच्या थैल्यांतून,कागदी पुड्यांतून, गाठोड्यांतून बाजारहाट करणा-या शेतक-यांच्या हाती प्लास्टीकच्या पिशव्या आल्यात..दुकानांची संख्या कमी होत चाललीय....बाजारात भजी तळणा-या दत्तुभाऊनं जगाचा निरोप घेतलाय. 'जेमिनी'च्या या जमान्यात म्हादू तेल्यानं घाण्यावर काढलेल्या अस्सल तेलाला कुणी विचारेनासं झालं. नव्या जमान्याला शरण जाऊन आस्ते आस्ते त्यानं बाजारात येणं बंद केलं. काही वर्षांपूर्वी तो देवाघरी गेला. इतरही काही दुकानदार काळाच्या पडद्याआड गेले. काहींची पुढची पिढी गावोगावचे आठवडी बाजार करत गोंदवल्याला येते... पूर्वी बाजारात मिळणारे गुलगुले, रव्याची बर्फी, गव्हाच्या पिठाची बर्फी असे पदार्थ आता नामशेष झालेत..या खाऊची जागा नव्या पदार्थांनी घेतलीय..गाणी गात...कोडी घालत पुस्तकं विकणारा रामनाना काळाच्या पडद्याआड गेला...राजू गाईड प्लास्टीक जॉईंटच्या जमान्यात स्वस्तात वहाणा देणारा चांभार लोप पावला..घेवारी यायचे बंद झाले..कुणी पोरंसोरं आता एरंडीच्या, करंजीच्या बिया घेऊन येणारी पोरं दिसत नाही..

 आठवडी बाजारातून कपडे घ्यायचं प्रमाण खूप कमी झालंय... गावच्या लोकांचंही जीवनमान आता उंचावलंय....कपड्यांची रुची बदललीय...आठवडी बाजारातून कपडे घेण्यापेक्षा दहिवडी, म्हसवड, वडूजसारख्या मोठ्या गावातल्या दुकानातून कपडे घ्यायचा कल वाढलाय... पूर्वी बाजारात गरीब शेतक-याला लुबाडणारे चक्री मटका, लाल-पिला असले जुगार बंद झालेत..पूर्वी बाजारातल्या दत्तू भजीवाल्याचा दिवसभर चांगला धंदा व्हायचा..पण जेमतेम दोनशे-तिनशे रुपये प्राप्ती व्हायची...तेव्हा भावच खूप कमी होते... त्याच्याजागी आलेला पळशीचा भजीवाला आता बेसनचं पोतंच घेऊन बाजाराला येतो...दिवसभरातला त्याचा धंदा कित्येक पटींनी वाढलाय...

 भाजी मंडई पूर्वी फार मोठी नसायची...तेव्हा शेतक-यांच्या घरी स्वत:च्याच मळ्यातली भाजी असायची..अगदीच आपल्या शेतात नसली, तर शेजारच्या वावरातनं भाजी घेतली जायची...आता असा प्रकार नाही...एकंदरच पारंपारीक शेती कमी होत चाललीये... माण-खटाव तर कायम दुष्काळी तालुके..इथली शेती आता संपत आलीय...शेतक-यावरच भाज्या विकत घेऊन खायची वेळ आलीय...पूर्वी भाज्या विकणारे शेतकरी स्वत:च्या मळ्यातली भाजी विकायचे...या शेतक-यांची जागा आता भाजी विक्रेत्यांनी घेतलीय..हे विक्रेते गावोगावच्या शेतक-यांचा भाजीपाला घेऊन पंचक्रोशीतील आठवडी बाजारात दुकानं लावतात...

 गुरांचा बाजार दहा वर्षांपूर्वीच गावाबाहेरच्या माळावर हलला..तिथली गर्दी खूपच कमी झालीय..पूर्वीच्या तुलनेत जेमतेम पाचच टक्के हा बाजार उरलाय..पंचक्रोशीतल्या काही सार्वजनिक मंडळांनी इथं येणा-या शेतक-यांकडून, कसाबाकडून जयंत्यामयंत्याच्या नावाखाली झुंडशाहीनं भरभक्कम वर्गण्या उकळायला सुरवात केली..या दंडेलशाहीमुळं शेतकरीही इथं यायचे बंद झाले अन खाटीकही...पुसेगाव, औंध, म्हसवड या गावच्या जत्रा - यात्रांच्यावेळी गुरांचे मोठे बाजार भरतात..बळीराजा  शेतीसाठीची गुरं तिथनं खरेदी करतो..खाटकांनी गावोगावी एजंट नेमलेत...त्यांच्यामार्फत ते भाकड जनावरं खरेदी करतात..त्यामुळं गोंदवल्याचा गुरांचा बाजार जवळपास उठलायच..बाजार गुरांचा आणि जत्रा माणसांची असा प्रकार तिथं झालाय....गावाचं वेगानं शहरीकरण होत असल्याच्या या जमान्यात आठवडी बाजारांचं महत्व कमी होत चाललंय...दळणवळणाची साधनं वाढलीत..लोक तालुक्याच्या... जिल्ह्याच्या गावी खरेदीला जाऊ लागलेत..नव्या पिढीला आठवडी बाजारात रस उरलेला नाही...काळाच्या ओघात हळूहळू आठवडी बाजार नामशेष होत जातील..त्यात आमच्या गोंदवल्याचा बाजारही कदाचित बंद होईल...पण त्याच्या सुगंधी आठवणी माझ्या ह्रदयाच्या कुपीत कायम बंदिस्त राहतील...


1 comment:

  1. फारच छान आठवणी... मलाही असा बाजारात फिरायला आवडते.... पुण्यातील दासार येथे दार गुरुवारी आणि तोच रविवारी दुपारी बाणेर ला बाजार भरतो..पण मजा आली नाही... डिसेंबर महिन्यात पुणे येथे युनिव्हर्सिटी जवळील मैदानावर बाजार भरतो...निरनिराळ्या बचत गटाच्या माध्यमातून वस्तू विक्री साठी येतात...खूप महाग....आणि तुम्ही वर्णन केलेली मजा नाही...ब्लॉग वाचून गोंदवले ला जावं असं वाटू लागलंय।।।छान वर्णन केले आहे... धन्यवाद

    ReplyDelete