नियती कलावंताची
.............................
पत्रकारितेच्या निमित्तानं पूर्वी अनेकदा येरवडा जेलमध्ये जायचो.. साधारणतः 1995 च्या सुमारास महादेव गोविंद नरवणे पुण्याच्या कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक होते...तुरुंगात विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते आयोजित करायचे...त्यानिमित्तानं पत्रकारांना बोलवायचे...तिथंच अरुण गवळी पहिल्यांदा भेटला..किरण वालावलकर, तान्या कोळी, सदामामा पावले, अशोक चौधरी, दिलीप कुलकर्णी असे त्याच्या टोळीतले आणि इतरही अनेक खतरनाक गुंड तिथंच् पाहिले.....पैशाच्या बळावर तुरुंगातही ऐश करणारे गुन्हेगार जसे दिसले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही केवळ क्षणिक रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगणारे शेकडो कैदीही नजरेस पडले....जेलच्या पोलादी भिंतीआड घुसमटणारी मनं निरखता आली.. तुरुंगाच्या दगडी भिंतींनाही पाझर फुटावा अशा तिथल्या काही कहाण्याही समजल्या...प्रत्येक कैदी वेगळा.त्याचा गुन्हा निराळा अन त्यामागची कारणंही खूप आगळीवेगळी...त्यामुळं तिथले काहीजण अधूनमधून आठवतात..जयेंद्र मात्र कायमचा मनात घर करून बसला.. नियती एखाद्याच्या उमद्या आयुष्याची कशी फरफट करते अन् एखादा हाडाचा कलावंत तिच्यावर मात करून कसं कलासक्त आयुष्य जगतो याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे जय....
अनेक कैदी कारागृहातल्या पोलादी भिंतीआड होणारी घुसमट कविता, गाणी नाचाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कटतेने व्यक्त करायचे. त्यांच्या कविता इतक्या आशयघन अन् भावस्पर्शी असायच्या की डोळ्याच्या पापण्या कधी ओलावायच्या हे समजायचं नाही..दरवेळी नवनव्या कैद्यांचे कलाविष्कार पाहिले...त्या कार्यक्रमांमध्ये समान धागा होता तो सूत्रसंचालनाचा..एक गोरापान, उंच तरुण उत्तम मराठीत सूत्रसंचालन करायचा...फर्ड्या इंग्रजीत,खणखणीत आवाजात समारोपाचं भाषण करायचा..हा तिथला अधिकारी आहे, जेलच्या लोकल स्टाफपैकी आहे की कैदी हे काही मला आधी कळलं नव्हतं...मग जेलर रामराव चौधरी यांनी त्याची माहिती दिली...तो तरुण होता ..जयेंद्र उर्फ जय विश्वासराव....तो उत्तम चित्रकार होता..मराठी, इंग्रजी साहित्याचा त्याचा व्यासंग होता..येरवडा जेलच्या आवारातलं के.के.भवन म्हणून जे सांस्कृतिक केंद्र आहे ना तिथल्या भिंतीवर त्यानं मोठं मोठी चित्रे चितारलीत....तो जन्मठेपेचा कैदी होता...अर्थात तसं असलं तरी त्यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता अन त्याची पार्श्वभूमीही गुन्हेगारीची नव्हती....क्षणिक क्रोधाने त्याच्या हातून गुन्हा घडला अन् त्याचं तारुण्य तुरूंगाच्या चार भिंतीआड करपलं...
कारागृहात माझी जयशी अनेकदा भेट झाली...त्याला बऱ्याच गोष्टी विचारायच्या मनात होत्या...कागदावर असलेल्या गोष्टींखेरीज 'त्या' घटनेला इतर काय कंगोरे आहेत हे जाणून घ्यायचं होतं..पण, संकोचही वाटत होता.. एकदा त्यानेच मनमोकळेपणानं सारं सांगून टाकलं.. तो मूळचा विदर्भातला ..1984 च्या सुमाराला तिथल्या कला महाविद्यालयात शिकत होता...काही मागण्यांसाठी तिथं विद्यार्थ्यांचा संप झाला..तो बरेच दिवस चालला..प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाशी झालेली चर्चा विफल ठरली..सारे प्राध्यापक चिडले होते..एके दिवशी जय मैत्रिणीसोबत कॉलेजच्या स्टाफरूममध्ये गप्पा मारत बसला होता....अचानक एक प्राध्यापक तिथं आले...या दोघांना तिथं पाहून त्यांच्या रागाचा पारा चढला....त्यांनी जयला बरेच बोल सुनावले.. ..मैत्रिणीसमोर झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला. संतापाच्या भरात त्याने त्यांच्यावर चाकूचा वार केला....घाव वर्मी बसल्याने प्राध्यापक मरण पावले....मग जयविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला..त्याला अटक झाली.... न्यायालयात वर्षभर खटल्याची सुनावणी झाली अन कोर्टाने त्याला दोषी ठरवून चौदा वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली...चंद्रपूरहून त्याची येरवडा कारागृहात रवानगी झाली...
सुरुवातीचे कित्येक दिवस तुरुंगातल्या जीवनक्रमाशी जुळवून घेणं जयला भयंकर कठीण गेलं... त्याला इतकी वर्ष आईच्या हाताचं सुग्रास जेवण खायची सवय होती. तुरुंगातली पातळ डाळ, जाड्याभरड्या रोट्या अन बावन्न पत्तीची भाजी पचवताना त्याला ब्रम्हांड आठवायचं.क्षणभराचा राग आयुष्य कसं उध्वस्त करू शकतो? या विचाराने रात्र रात्र त्याला झोप लागायची नाही.....हळूहळू तो तिथं रुळला..त्याच्यातला कलावंत दुप्पट उर्मिने, अधिक प्रतिभेनं उसळी मारू लागला......खडूने चित्र काढून त्याने तुरुंगाच्या पोलादी भिंती सजीव केल्या...हाती जे मिळेल ते वाचू लागला..लिहू लागला...त्याची कला तुरुंगातल्या अधिका-यांनी हेरली... त्याला सांस्कृतिक भवनात चित्र काढायची संधी मिळाली. अप्रतिम पेंटींग्ज चितारून त्याने सर्वांची वाहवा मिळवली...
मधल्या काळात मी पुणं सोडून नगरला स्थायिक झालो होतो..त्यामुळं जयशी संपर्क तुटला...दोन वर्षांनी पुन्हा पुण्यात आलो..ऑफीसमध्ये एके दिवशी टपालात माझ्यानावे आलेली लग्नपत्रिका मिळाली..आधी पट्कन कुणाची ते लक्षात आलं नाही...नंतर कळलं की ही तर जयची लग्नपत्रिका... एका डॉक्टरशी तो विवाहबद्ध होणार होता..तो तुरुंगातून सुटला कधी ? या डॉक्टर कोण ? हे काही समजलं नाही..मग जेलर चौधरींना फोन केला..जयच्या लग्नाची आगळी कथा त्यांनी सांगितली.. एका स्वयंसेवी संस्थेने देशभरातल्या कारागृहांमधील कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केरळमध्ये स्पर्धा ठेवली होती. त्यासाठी जयने येरवडा जेलमधून एक पेंटींग पाठवले होते...त्याला देशपातळीवरचे प्रथम पारितोषिक मिळाले...या चित्रांचे प्रदर्शन केरळमध्ये भरवले गेले..तेथील एक डेंटिस्ट डॉ. विद्या यांना ते चित्र बेहद्द आवडले.. त्यांनी सर्वाधिक बोली लावून ते विकत घेतले..मग या चित्राच्या चित्रकाराचा शोध घेत त्या केरळहून पुण्याच्या येरवडा कारागृहात आल्या...प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन त्या जयला भेटल्या..चित्राच्या तर त्या प्रेमात पडल्याच् होत्या.. प्रत्यक्ष भेटीत उभयतांच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या....पुढे त्यांच्यात नियमित पत्रव्यवहार सुरू झाला....आणि दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला..
एकंदर समाजाची मानसिकता लक्षात घेता जय आणि डॉ.विद्या यांचा विवाहाचा हा निर्णय प्रत्यक्षात येणं इतकं सोपं ही नव्हतं. एका प्रतिथयश डॉकटरने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याशी लग्न करणं कुणाच्याही सहज पचनी पडणार नव्हतं..पण डॉ विद्या निर्णयावर ठाम होत्या..जगाची त्यांनी पर्वा केली नाही...जयच्या कलागुणांची महती पटवून देऊन घरच्या मंडळींची समजूत घातली....तुरुंगातल्या काही अधिकाऱ्यानीही त्याबाबत शिष्टाई केली..कसेबसे त्या मंडळींनी होकार दिला...जन्मठेपेची शिक्षा भोगून 1999 ला जय मुक्त झाला..नव्या जगात ताजा श्वास घेतला... डॉ. विद्या यांच्याशी विवाहबद्ध होऊन तो केरळमध्ये स्थायिक झाला... तिथं आता त्याचा मोठा स्टुडिओ आहे.तिथं तो कलेची आराधना करतो...आयुष्यातल्या कटू अनुभवांनी तो खचला नाही..उलट त्याची प्रतिभा बहरत गेली....देशभर त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरतं...गेल्याच महिन्यात मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत त्याच्या चित्रांचं प्रदर्शन झालं...त्यावेळी त्याची भेट हुकली..मधे एकदा तो पुण्यातही येऊन गेला...पण भेट झाली नाही...मधली अनेक वर्षे तो संपर्कात नव्हता... फेसबुकच्या माध्यमातून तो गवसला...मग त्याला थेट फोन केला....माझा आवाज ऐकून अक्षरश: गहिवरला....सगळे जुने दिवस त्याला लक्ख आठवतात...त्या कटू दिवसांच्या स्मृतींनी त्याच्या मनावर ओरखडे ओढलेत... त्याबद्दल त्याच्या मनात आजिबात कटुता नाही. .नियतीनं दिलेले कौल स्वीकारत पण तिच्यापुढं न झुकता तो पुढे चालला आहे...तो त्या दिवसांबद्दल भरभरून बोलतो..जुने दिवस आठवून गहिवरतो...ज्या नियतीनं आयुष्य बिघडवलं तिनंच नव्या आयुष्याची संधी दिल्याचं तो बोलून दाखवतो...त्याची मुलंही आता मोठी झालीत...या साऱ्यानाच् एकदा भेटायचंय... डॉ विद्या यांच्याशीही बोलणं होतं...केरळला यायचं त्यांनी खूपदा आमंत्रण दिलंय..मधल्या काळात माझी इथं बऱ्यापैकी अडचण झाली होती...ते समजल्यावर तर जयने मला केरळलाच् स्थायिक व्हायचा आग्रह केला..अनेकदा आमची हुकलेली भेट बहुदा पुढच्या आठवड्यात होईल....नियतीला हरवणाऱ्या या कलाकाराला भेटायची उत्सुकता मलाही लागून राहिली आहे...

No comments:
Post a Comment