Wednesday, 21 November 2018

गुडलकमधील बाळ

'गुडलक'मधलं बाळ
- - - - - - - - - -
 कॅफे गुडलक हे डेक्कनवरचं एक मस्त हॉटेल. तिथं मिळणारे पदार्थच अनोखे...तिथल्यासारखा बन मस्का जगात कुठं मिळत नसावा... आईस्क्रीम जेली असो वा पट्टी समोसे...गुडलकची मजाच काही और....याशिवाय सामिष पदार्थ त्यातही विशेषत: अंडी, चिकन आणि मटणाच्या कित्येक डिशेस लाजवाब...आणि त्या फक्त येथेच मिळतात...त्यामुळंच कॉलेजमधल्या तरुणाईबरोबरच सच्च्या पुणेरी माणसाची पावलंही आपसुक गुडलककडे वळतात...इथं कोणत्याही वेळेला या...लोक काहीही खात असतात...संध्याकाळी पाच वाजता आपण चहा- बनमस्का खायला जावं तर कित्येकजण बिर्याणी, खिमा वगैरे निवांत चापत असतात...यांचं हे सकाळचं जेवण की संध्याकाळचं असा प्रश्न मला पडायचा...पण आता हे नित्याचंच झालंय....इथं कधी आलोय आणि कुणी ओळखीचं भेटलं नाही, असंही कधी होत नाही.......अस्सल पुणेकरांचा हा ठिय्याच आहे...कधी ना कधी.....वेळ मिळेल तेव्हा....किमान इथला इराणी चहा प्यायला का होईना गुडलककडे पावलं वळल्याशिवाय राहत नाहीत.
 परवा संध्याकाळच्या सुमारास मी आणि विनीत चहा-बनमस्काचा आस्वाद घेत बसलो होतो...हॉटेल नेहमीप्रमाणे फुल्ल होते..बाहेर पावसाची भुरभुर सुरू होती..त्यामुळे गर्दी जरा जास्तच वाटत होती..वेटींगलाही बरेच लोक `होते..चहा पित पित आमच्या निवांत गप्पा चालल्या होत्या..समोरून दोन माणसं एका स्त्रीसमवेत आली..तिघेही मध्यमवयीन.पुरुषांच्या डोक्यावर जाळीच्या गोल टोप्या...खुरट्या दाढ्या...अन टापटिप पेहराव होता. महिला बहुदा अगदी गोरीपान असावी.तिने अंगभर बुरखा घेतला होता. तिचे नाजूक पाय दिसले.गुलाबीसर गोरे. डायरेक्ट पाकीजामधलाच डायलॉग आठवला...आपके पॉंव देखे...बहुत हसिन है....वगैरे वगैरे.....पायांवरून तिच्या वर्णाचा अंदाज आला...तिच्या कडेवर बाळ होतं.... बाळानं गोंडस असावं तरी किती?? याचं ते मस्त उदाहरण ...गोरंगोरं पान....गुटगुटीत....भुर्री केसं.....टुकूटुकू पाहणारे पिंगट डोळे...काजळ घातल्यामुळं ते जास्तच टपोरे दिसत होते...गालावर लावलेली टिक्की खुलून दिसत होती....जेमतेम आठ-नऊ महिन्याचा असावा तो....गावाकडं कशी बाळाला लांब कुंची घालतात ना....तसंच टोपडं घातलं होतं त्याला....

 विनीतच्या आणि माझ्या गप्पा सुरू असताना एकदोघे मित्र भेटले..त्यांच्याशी  बोलण्याच्या नादात मी त्या छकुल्याला विसरूनच गेलो होतो...त्याचा काही आवाजही येत नव्हता....सहज मागे पाहिलं....तो बच्चू टक्क जागा होता....आई, वडिल आणि बहुदा त्याचे ते मामा किंवा काका निवांत जेवत होते....मग लक्षात आलं की त्यांचा काहीच आवाज येत नाहीये ...पुन्हा पाहिलं तर त्या तिघांच्या गप्पा चालल्या होत्या....पण हावभावानेच....एकमेकांकडे पाहत ...विशिष्ठ हावभाव करीत त्यांचा संवाद सुरू होता...नीट पाहिल्यावर लक्षात आलं की....ते तिघेही मुके आहेत.....नजर आपसुक त्या बाळाकडं गेली....गुलाम मस्त खेळत होता.... काळजाचा ठोकाच्‌ चुकला...इश्वराने एवढी सुंदर कलाकृती निर्माण केली...अन अशी न बोलण्याची शिक्षा का??...खूप वाईट वाटलं.जरा वेळानं पाहिलं...तर त्याच्या आईच्या हातात खुळखुळा दिसला...ती तो हलवत होती....त्याकडे पाहत तो आनंदानं डुलत होता.....
 एक ऐकून होतो की मुका माणूस ऐकू शकत नाही..आणि ऐकता न आल्यानं तो बोलू शकत नाही. पती आणि पत्नी दोघंही मुके असले तर त्यांचं अपत्य कसं होतं? याची पूर्वी उत्सुकता होती...काही वर्षांपूर्वी आमच्याच क़ॉलनीतलं एक  मूक जोडपं  जवळून पाहिलं....त्यांचं मूल पहिले काही महिने गप्प होतं...आम्हा सा-यांनाच तो बोलेल का? अशी शंका वाटायची...त्याच्या आईचं तर डोळ्यांत तेल घालून लक्ष असायचं....मामा, आजी -आजोबांचे, चाळीतल्या शेजा-यापाजा-यांचे बोल त्याच्या कानावर पडू लागले आणि तो बोलायचा प्रयत्न करू लागला...असंच एके दिवशी शब्द उच्चारताना आईऽऽऽ असं बोबडेपणानं तो बोलून गेला...त्याच्या आईला ते ऐकू आलंच नसावं...पण बहुदा ओठांच्या हालचालींवरून तिनं ते ओळखलं आणि लेकराला कुशीत घेऊन ती माय कितीतरी वेळ रडत होती....ते आनंदाचे अश्रू होते....आपलं अवघं आयुष्य मुकेपणात गेलं..पण आपला मुलगा बोलायचा प्रयत्न करतोय...तो निश्चितपणे बोलेल...तो मुका राहणार नाही ..हे तिनं ओळखलं असावं...मुलाच्या बोलाचं तिला खूप अप्रूप वाटायचं तिला ..पुढं तो मुलगा व्यवस्थित बोलू लागला...आता कॉलेजमध्ये शिकतोय तो हिरो.......या गोंडस बाळाला पाहून चाळीतला तो प्रसंग माझ्या नजरेसमोर तरळला....वेटरनं बिल दिलं....मी बाहेर निघत असताना मागून अं.. अं..आवाज आला....पाहिलं तर आईच्या कडेवर बसून निघालेल्या त्या छकुल्याचा गाल एका कॉलेजकुमारीने कौतुकाने ओढला होता...आणि तो आपुलकीचा, स्नेहाचा स्पर्श आवडल्याने तिला दाद देण्यासाठी तो आं..आं म्हणत होता...आई कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती....आपला बाळ बोलेल याची खात्रीच जणु तिच्या नजरेतून जाणवत होती.. माझ्याही अंतर्मनाला तो विश्वास जाणवला...मनोमन त्या बाळासाठी 'गुडलक' चिंतून त्याचा गालगुच्चा घेत मी हॉटेलबाहेर पडलो.......

No comments:

Post a Comment