Wednesday, 21 November 2018

मै तो तुम संग ..

मै तो तुम संग . . .
 - - - - - - - - - - -- -
 विराजला झोप येत नव्हती. अंथरुणातून उठवतही नव्हतं. कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. अलिकडं असं त्याला वारंवार होऊ लागलं होतं. मनाचीच तब्येत ठिक नाही, तर तनावर उपचार करून काय फायदा? हे ओळखून विरू डॉक्टरांकडे गेला नव्हता. अंथरुणातच तो आळोखेपिळोखे देत पडून राहीला.
 '' बन के पत्थर हम पडे थें सुनी सुनी राह में...जी उठे हम, जब से तेरी बाह आयी बाहमें....'' शेजारच्या मोनाने लावलेल्या रेडिओवर मस्त गाण लागलं होतं. विराज घरात असला की हिच्या रेडिओचा आवाज मोठा. त्यातही एखादं विरह गीत असलं की विचारायचीच सोय नाही. तो ही नकळत गाणं गु्णगुणू लागला आणि आकस्मिक देवयानी दारात उभी राहिली. विराज उडालाच्‌. सत्य की स्वप्न हेच कळेना त्याला. अंगाला चिमटा काढून पाह्यला त्यानं. देवयानी..देवीच की ती. आयला ही कशी काय टपकली? असा विचार करीत असतानाच '' काय राजे ..कुठं पत्ता आहे सध्या? भेटाबिटायचं नाही का? म्हणत ती आतही आली. खुदुखुदु हास्याच्या मंजुळ घंट्या किणकिणल्या. विराजच्या मनातली सारी उदासिनता तिच्या मोहक स्मिताने कुठच्या कुठे पळाली.
 '' अगं पण तू तर जबलपूरला गेलेली ना?''
'' हो''. ''
मग''?
'' मग काय? तिथं कायमची रहायला गेली होते का?''
'' चेष्टा करू नकोसं हां देवी..''
'' अरे चेष्टा कसली? बरेच दिवस आत्या बोलवतं होती. त्या दिवशी भाऊ आला होता. त्याच्याबरोबरच गेले मगं''
'' अगं पणं ..आम्हाला तर...''
'' हो ...समजलं मला सगळं...कुणीतरी गंमत केली रे वेड्या...''
''अगं पण, तू तरी कॉन्टॅक्ट करायचा ना?''
''कसा करणार सांग? जाताना फोनची डायरीच विसरले. टोटली ब्लाईंड झाले होते. पण काय रे? असा काय देवदास होऊन बसलायंस? आणि एवढा रुसलास? कट्टयावरही फिरकला नाही म्हणतात सगळे. कुठं गायब झाला होतास? ''
''नाही गं. जरा बरं वाटतं नव्हतं.''
'' अरे पण् एवढाही विश्वास नाही का रे माझ्यावर? आणि..काय ही अवस्था करून घेतलीएस?''
'' खरं सांग ..देवी..''
'' अरे राजा खरंच सांगतेय. तसं काहीच नाही रे..''
''मग त्या देवस्थळींच्या स्थळाचं वगैरे आम्हाला समजलेलं सगळं खोट्टं?? तुझं लग्न झालं हे खोट?''
'' हो..हो सगळं..सगळं.. खोटं रे.. काळीज तीळतीळ तु्टतं होतं रे माझं..पण काय इलाज?'' '' पण तुला काय झालंय एवढं''
'' काही नाही गं तसं... पण् खरचं वेडं व्हायची वेळ आली होती..काय खातोय, काय पितोय..काहीच कळेनासं झालेलं.. आणि बोलायचं कुणाकडे हे? कोंडमारा, घुसमट,या सगळ्या पलीकडंच काहीतरी होत होतं बघ. नेमक्या त्या अवस्थेला म्हणायचं काय? तोच शब्द शोधत होतो.''
''तलखी.म्हणतात राजा त्याला. आणि तुझ्यापेक्षा माझ्यातर जीवाची किती तलखी झालीयं काय सांगू तुला? आता नाही रे कधी सोडून जाणार तुला कधी म्हणत देवी विराजच्या कुशीत शिरून स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. तिला सावरताना विराजही आतून कोसळला. अवाक्‌ होऊन शिरूकाका-काकी विराजच्या खोलीत पाहत होता. त्याच्या अश्रुंचा बांध पुरता कोसळला होता. त्याने उराशी कवटाळलेली उशी अश्रुंनी चिंब झाली होती.
''सपनेमें जो बाग लगाएं.. नींद खुली तो वीराने थे, हम भी कितने दिवाने थे..मैं तो तुम संग नैन मिलाके हार गयी सजनाऽऽऽऽ...'' मोनाचा रेडिओ किंचाळत होता....

No comments:

Post a Comment