Wednesday, 21 November 2018

अव्याची दुनियादारी

अव्याची दुनियादारी.......
- - - - - - - - - - - - - - - -
 अविनाशची आणि माझी नेमकी ओळख कशी आणि कधी झाली हे लक्षात येत नाही....पण माझ्या एसपीतील दुनियादारीचा अव्या अविभाज्य घटक...मस्त सणसणीत उंची..डबलफसली बॉडी....दिसायला देखणा...मनाने  उमदा...घारीसारखे डोळे...आणि दिलकी खुषी मन का राज अशी वृत्ती....एसपीत गेल्यावर कॉमन दोस्तांतून त्याची ओळख झालेली ...आणि पुढची पाच वर्ष सावलीसारखा सतत सोबत राहीला....अव्या म्हणजे तुफान...अव्या म्हणजे हास्याचा धबधबा...अव्या म्हणजे गप्पांची मैफल...अव्या म्हणजे कॅरमचा सोहळा.....हो....मी सोहळाच म्हणतोय..अतिशयोक्ती वाटेलही..पण....कॉलेजसमोरच्या उदय विहारला सलग दोन-दोन दिवस अथक तो कॅरम खेळत बसायचा.....कमालीचा स्वच्छंदी ...बेफिकीर वृत्ती ...पण मन पारदर्शी आणि निर्मळ.....त्याचं एक वैशिष्ठ्य होतं.....काहीही प्राब्लेम झाला तरी कधी टेंशन घ्यायचा नाही.....काही ना काही मार्ग काढायचाच तो......जग्नमित्रच होता....कॉलेजमधल्या सगळ्या ग्रुपचा मेंबरच होता जणु तो......
 आम्ही कॉलेजला असताना बीएमसीसीच्या अविनाश जाधवची भलतीच क्रेझ होती. नामसाधर्म्यामुळे आमच्या अव्याचीही कॉलर ताठ असायची...तो होता अविनाश कृष्णा जाधव आणि आमचा होता अविनाश भास्कर जाधव....पण आमच्या अव्याचीही दोस्ती...दुनियादारी प्रचंड...कु्णाची टोपी कधी कुणाला घालेल याचा पत्ता लागणार नाही...कमी वयात जगाचा खूप अनुभव त्याने घेतलेला....रहायचा वडगाव धायरीला...90 च्या दशकाच्या पूर्वार्धात धायरी म्हणजे पुणेकरांना गावच वाटायचे...तिथून सकाळी पहिल्या लेक्चरसाठी यायचा...अनेकदा मला आवाज द्यायला कॉलनीत यायचा...मग मिळून आम्ही कॉलेजवर....समोरच्या नागनाथमध्ये चहा-समोसा आणि गोल्ड फ्लेकचा 'ब्रेकफास्ट'  करून मगच आम्ही लेक्चरला पळायचो...पहिलंच लेक्चर सायकॉलॉजीचं...आमच्या आवडीचं...त्यानंतरच्या कोणत्याही लेक्चरला बसायचो नाही...बारावीत आमचा छान ग्रुप जमला...मी, अव्या, दोन संगीता, गीता, सुषमा आणि पुढे आम्हाला जॉईन झालेली शैला...आमचा कट्टाही ठरलेला...रमाबाई हॉललगतचा...तिथून सा-या कॉलेजचा नजारा दिसायचा....दिवसभर आमच्या गप्पांची अखंड मैफल सुरू असायची...घरी जाऊन संध्याकाळनंतर पुन्हा आम्ही कॉलेजला यायचो...कट्ट्यावर निवांत बसायचो....अव्या बिंधास सिग्रेट ओढत बसायचा....त्याचं एकत्र कुटुंब होतं....दोन-तीन काका, काकू आणि चुलत भावांसोबत तो रहायचा...त्याचे वडील नाशिकला सरकारी प्रेसमध्ये होते....त्याची आई-छोटा भाऊ वडिलांसमवेत तेथे असायचे..  अवीचा स्वभाव उमदा, दिलदार आणि मोकळा...जे वाटतंय ते स्पष्टपणे...तोंडावर बोलणार...कोणतीही गाडी तो सफाईदारपणे चालवायचा...स्वार्थ, कपट हे शब्द त्याला कधी शिवलेच नाहीत....त्याने कॉलेज करताकरता प्रिंटींगचाही डिप्लोमा केलेला...त्याचे आमच्या कॉलेजचे दोस्त वेगळे, त्या कॉलेजचे वेगळे, कॅरमचे निराळे आणि गावातले भलतेच असायचे....पण आमच्यात मस्त रमला....बेधडक, निर्भिड वृत्तीच्या अव्याने कधी कुणाची दादागीरी सहन केली नाही...अरे ला कारे असाच त्याचा स्वभाव...आमची कॉलनी कॉलेजच्या मागेच...त्यामुळं मी ही जुमानायचो नाही कुणाला....त्यातच अव्याच्या आणि माझ्या घट्ट जोडीमुळे आमच्या ग्रुपमधील कुणा मुलीला छेडायची कधीच कुणाची हिंमत झाली नाही. रोजचं कॉलेज, इलेक्शन, गॅदरींग, पिक्चर्स, मुक्तामधल्या पार्ट्या....यांत पाच वर्षं कशी भुर्रकन उडून गेली हे आम्हाला समजलंही नाही...अव्यासोबत, ग्रुपसोबत घालवलेले कॉलेजमधले दिवस खरंच मोरपंखी... आयुष्यभर त्याचे नाना रंग भुरळ पाडत राहणार...
 ...नको नको वाटत असताना कॉलेजचे दिवस संपले आणि ज्याची त्याची जगण्यासाठीची धावपळ सुरू झाली. मी कॉलेजला असतानाच जर्नालिझमचा डिप्लोमा केलेला...इंटर्नशीप केल्यावर तसाच लोकसत्तामध्ये रुजू झालो....काही मित्र-मैत्रिणी पुढच्या शिक्षणाला लागले...काही कामधंद्याकडे वळाले.....भेटीगाठी कमी होत गेल्या...त्यावेळी मोबाईल फोन्स नव्हते...आमच्या कुणाच्या घरीही फोन नव्हते...प्रत्यक्ष झाली तरच भेट असा मामला....पण आमचा ग्रुप परस्परांच्या संपर्कात होता...अधूनमधून अव्या भेटायचा...दरखेपेला नवीन मित्र...नवीन गाडी...नवीन गप्पा...पण तोच जोम, तोच जोश, तोच उत्साह....कॉलेजमध्येच असतानाच मी शैलाशी लग्न केलेलं...अव्या तिलाही जाम चिडवायचा...त्याची टिंगलटवाळी भयंकरच.... कामाच्या व्यापात हळूहळू आमच्या गाठीभेठी कमी होऊ लागल्या...मला वाटायचं अव्या दगडी मनाचा आहे.....पण तो त्याचा मुखवटा होता...एका प्रेमप्रकरणात चांगलाच पोळून निघाल्यावर त्याचा खरा चेहरा, त्याची भावनाशीलता समजली...मध्यंतरी बरेच दिवस गायबच होता तो...प्रेम प्रकरणातून जरा सावरला गेल्यावर अलिकडं संजासोबत तो हिंडूफिरू लागलेला.....संजाही धायरीचाच...होता दुस-या कॉलेजला...पण अव्यासोबत आमच्याच कट्ट्यावर असायचा...कॉलेज सरलं तरी पुढे अनेक वर्षं आमचा कॉलेजचा कट्टा सुटला नाही. नोकरी आणि संसारातील व्यापारामुळे माझंच जाणं काहीसं तुरळक झालेलं...तरीही अधूनमधून काही ना काही निमित्ताने भेठीगाठी ठरलेल्याच.. ..अधूनमधून मधेच त्याचा विचार मनात यायचा....गाठीभेठी आठवायच्या...कॉलेजमधला धिंगाणा नजरेसमोर यायचा...लोणावळा, बनेश्वरच्या सहली नजरेसमोर पिंगा घालायच्या....धायरीला त्याच्या घरात केलेली धमाल .....त्याच्या इथं प्यालेली ताडी आणि मग केलेला धिंगाणा आठवून मनाशीच हसायचो...मन पुन्हा कॉलेजच्याच दिवसांमध्ये रमून जायचं....माणूस वर्तमानात जगतो...भविष्यकाळात रमतो आणि भूतकाळात मात्र गुंततो ...हे प्रकर्षानं जाणवू लागलं....
 मधल्या काळात ब-याच दिवसांत अविची भेट नव्हती...मग एके दिवशी सत्येन आणि मी गेलो त्याच्या घरी....तो नेहमीप्रमाणेच उत्साहाने सळसळत होता...'त्या' प्रेमप्रकरणाचा लवलेशही त्याच्या चेह-यावर आणि मनावर जाणवत नव्हता...थोड्याफार गप्पा झाल्यावर त्यानं हळूच कपाटातून एक फोटो काढून हातात दिला....गालात हसत म्हणाला  ही तुझी वहिनी........छान होता फोटो...छान होती वहिनी...लग्न ठरल्यामुळं तो भलताच खुशीत...मग एके दिवशी तो पत्रिका घेऊन  घरी आला... स्वारी भलतीच उत्साहात...शैला आजारी असल्यानं झोपली होती....आग्रहाचं निमंत्रण देऊन तिला म्हणाला...ये तू पण...जगली वाचलीस तर...आणि खो खो हसायला लागला...त्याच्या स्वभावात, टिंगलटवाळीत काडीमात्र बदल झाला नव्हता....लग्न नाशिकला होतं...मला शक्य झालं नाही जायला....काही मित्र गेलेले....त्यानंतर त्याची माझी भेटच नव्हती...
 अव्याच्या लग्नानंतर जेमतेम सहा महिन्यांची गोष्ट.....एके दिवशी सकाळ सकाळी मोबाईलची रिंग वाजू लागली...रात्री उशीरा झोपल्यामुळे फोन उचलता आला नाही....फोन पुन:पुन्हा वाजत होता..मग झोपेतून जागा झालो..फोन पाहीला....सत्येनचा मेसेज होता....'' अविनाश.....नो मोअर ''...मुळापासून हादरलोच....काय करावं काहीच समजेना...थेट  धायरीला अव्याच्या घरी निघालो....वाटेत विठ्ठलवाडीजवळच समोरून शववाहिका येताना दिसली.. ती अव्यासाठीचीच असणार हे मनोमन ताडून मी गाडी उलट वळवून थेट वैकुंठ गाठलं....अंदाज बरोबर होता...जेमतेम 22-23 वर्षांचा अव्या किती मोठा होता हे वैकुंठातील गर्दीवरून सहज लक्षात येत होतं...अल्पावधीतील निरोप मिळूनही कुठले कुठले शेकडो मित्र त्याला शेवटचा निरोप द्यायला आले होते..काहींचे डोळे अश्रुंनी डबडबले होते...काहीजण ढसाढसा रडत होते...जो तो एकमेकांना धीर देत होता....मी पार्थिवाजवळ गेलो...अविचा चेहरा ताजातवाना,शांत, तृप्त दिसत होता...जणुकाही तो गाढ झोपलाय असंच वाटत होतं....विश्वासच बसेना ....पण काय करायचं ? आहे ते वास्तव तर स्विकारावंच लागणार ना? खूप खूप रडावसं वाटत होतं... ग्रुपमधल्या मैत्रिणींना हे कसं सांगायचं हे ही समजत नव्हतं...कुणाचाच विश्वास बसला नसता...खूप काहीतरी हरवलंय...काळजाचा तुकडा काढून घेतलाय असंच वाटतं होतं....अंत्यसंस्कार उरकून बाहेर पडलो....अव्या नेमका कशामुळे गेला हे एका मित्रानं सांगितलं....पहिला पाऊस पडला होता....वातावरण मस्त झालं होतं....दोन दिवस तो सतत बीअर पीत   होता..पान परागही खायचा तो खूप... एके दिवशी दुपारी जरा अस्वस्थ वाटू लागलं....मग घरी झोपून राहीला....संध्याकाळी तब्येत आणखी बिघडली.... त्याने संजाला बोलावून घेतलं....त्याच्या कारमधून जवळच्या डॉक्टरकडं नेलं...त्यांनी तपासून तातडीने कृष्णा हॉस्पिटलला हलवायला सांगितलं.....गाडीत अव्या संजाच्या शेजारीच बसला होता..तोच पूर्ण रस्ताभर त्याला रस्ता सांगत होता..डॉक्टरांनी कृष्णा हॉस्पिटलला आधी  इंटिमेशन दिलं होतं...तिथले लोक व्हिल चेअर घेऊन पोर्चमध्ये थांबले होते...अव्या गाडीतून उतरला...व्हिल चेअरवर बसला....तेथून आत नेत असतानाच संजाचा हात हातात घेऊन ''..संजा .....यार संपलं आपलं.....''......असं म्हणत त्यानं मान टाकली......त्याचे प्राण तिथंच गेले......
 अव्या गेला तो बहुदा जुलै महिनाच होता... पावसाचेच दिवस होते..
 पुण्यात या वर्षीचा आज पहिलाच जोरदार पाऊस पडला. मित्राच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी वैकुंठात गेलो होतो...तिथं का कुणास ठावूक पण अचानक अव्याची खूप आठवण आली.....काही कळायच्या आतच डोळ्यांतून टपटप आसवे ओघळू लागली....नजरेपुढं धूसर दिसायला लागलं... अवी गेल्याची नेमकी तारीख मला आठवत नव्हती... एका बाजूला गेलो...सत्येनला फोन लावला...तो आऊट आफ रेंज...मग संजाचा नंबर शोधला...त्याला फोन लावला....आणि एकदम चमकलो...फोन कट केला....संजा दोन वर्षांपूर्वीच अविला साथ द्यायला देवाघरी गेला हे मी विसरूनच गेलो होतो...

No comments:

Post a Comment