Wednesday, 21 November 2018

माया

माया . . .
- - - -
 ' दुनियादारी' तला डीएसपी आता ब-याचजणांना माहित झालाय....ब-याचजणांच्या मनात ठसलाय...आम्ही ' एसपी 'ला असताना असे अनेक डीएसपी आजुबाजुला दिसायचे....पण मनात ठसला तो माया....गोरापान, मध्यमपेक्षाही जरा कमीच उंचीचा...मजबुत शरीरयष्टी..काळेभोर केस, ब्रॉड मिशा आणि त्या मिशातलं त्याचं मधाळ हास्य कुणाचंही मन जिंकायचं....कॉलेजच्या  मुख्य प्रवेशद्वाराशेजारी आणखी दोन छोटी गेट आहेत...एका गेटला लागून फुलांचं दुकान आणि दुस-या गेटजवळ मायाची यझदी उभी असायची...आणि अर्थातच त्याभोवती त्याचं टोळकं....माया मला बराच सिनीयर...स्वभावानं खूप उमदा ...त्याची गॅंगही भारी...आम्हा नवख्या मुलांशीही चांगलं हसूनखेळून असायचा....स्पोर्टसशी भलतीच आवड आणि त्यात गतीही होती त्याला...अगदी नॅशनल लेव्हलला खेळला तो....त्याच्या आयुष्यात अनेक वळणं आली...अगदी अनपेक्षित....पण तो कधी खचला नाही....निराश झाला नाही. उदास झाला नाही....चेह-यावर त्याचं ते मधाळ हास्य कायम असायचं.....

 एसपीमध्ये त्यावेळी लौकीकार्थाने दोन ग्रुप मोठे...एक मास्कोचा आणि एक मायाचा....मास्कोच्या ग्रुपशी आमची जवळीक...एकतर आमच्या एरीयातलाच होता आणि होताही आमच्या स्वभावाशी, कल्चरशी साधर्म्य असणारा....मायाचाही ग्रुप मोठा...दोन्ही ग्रुपमधील काहीजणांचे परस्परांशी काही वैमनस्य असेलही...पण दोन्ही ग्रुपमध्ये थेट कधी पंगा झाला नाही....मायाच्या ग्रुपचं वैशिष्ठ्य म्हणजे त्याच्या ग्रुपमधली मुलं जरा उच्चभ्रू वर्गातील किंवा पॉलीश्ड म्हणता येतील अशी...माया सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा....मस्त दिमाखात रहायचा...पर्सनालिटीही तशीच मस्त होती....अनेक पोरी मरायच्या त्याच्यावर...पण हा उच्छृंखल नव्हता....नाही म्हणायला एकीमध्ये गुंतला होता...पण फार काही प्रदर्शन मांडलं नाही त्यानं कधी प्रेमाचं....मित्रांच्याच ग्रुपमध्ये तो जास्त रमायचा...आणि काहीहीऽऽऽ करायचा हो...स्वभावानं जितका रॉयल...तितकाच बेडर.....एकदा कुठल्या तरी स्पर्धेला त्याची नॅशनल लेव्हलला निवड झाली.....आणि नेमका त्याच वेळेला हा सापडला एका रॉबरीच्या गुन्ह्यात....रॉबरी करणे ही त्याची वृत्ती कधीच नव्हती...पण दोस्ती नडली हो....पुण्यातल्या तत्कालीन काही भाईंशी याचा दोस्ताना नडला...आणि हा थेट जेलमध्ये....मग याच्याऐवजी दुस-याची निवड झाली....एक सुवर्णसंधी हुकली...
 मायाच्या ग्रुपमधले एक-दोघे भलतेच बोलबच्चन...अतरंगी....कुणालाही टोप्या घालणारे....त्याकाळी मोटोक्रॉसच्या स्पर्धेची भलतीच क्रेझ असायची...त्याची तिकीटं देण्यासाठी माझ्या एका मित्राने मायाच्या ग्रुपमधल्या पोराला पैसे दिलेले...तो पार स्पर्धा संपल्यानंतर थेट पंधरा दिवसांनीच उगवला....दोस्ताचं माथं भडकलेलं....तो आला कुठलं तरी टोळकं घेऊन...कॉलेजमध्ये धुव्वा होणारच होता....तितक्यात मायाची एन्ट्री झाली....काय झालं रे दोस्ता...म्हणत सहजपणे खांद्यावर हात ठेवून तो बोलू लागला.....त्याला काय घडलं ते सांगितलं....सगळं ऐकून घेतल्यावर म्हटला...एवढंच ना..... मी देतो पैसे...किती द्यायचेत म्हणत त्यानं पाकीट काढलंही आणि पैसे दिलेही....एक कायम लक्षात ठेवा....पैशांसाठी कधी भांडण करायची नाहीत...पैसे येतात आणि जातात... पैशांसाठी दुष्मनी नाय करायची कधी.. .हां..हे.फसवलेलं मलाही पटलेलं नाही..त्याच्यावतिने मी सॉरी म्हणतो म्हणत त्यानं त्या प्रकरणावर पडदाही टाकला...तेव्हापासून माझी त्याच्याशी जानपहचान झाली....
  कॉलेज संपलं तरी आम्ही कॉलेजच्या कट्ट्यांवर असायचो...मायाही असायचाच...त्याची ती यझदी आता आम्हाला आमची वाटू लागली होती....कॉलेज सरू लागलं की कसं अनेकजण हळवे होऊ लागतात....मागचं सगळं वैर विसरून सगळ्यांशी कसं छान बोलू लागतात....अनेक वर्षे नजरेत असणा-या पण कधी संवाद न साधलेल्यांशी मैत्र जुळलं जातं....हाय- हॅलो व्हायला लागतं...एरवी मारक्या म्हशीसारख्या पाहणा-या मुलीही मुलांनी केलेल्या टिंगलटवाळ्या विसरून दयाद्र भावनेने झलक देऊ लागतात...तसं आमची मायाशी जवळीक काहीशी वाढली...मायाचं एक होतं...त्याला व्यसन कसलंही नव्हतं....पण...तो पक्का गॅम्बलर होता...पत्ते आणि सर्वप्रकारचे जुगार तो खेळायचा आणि त्यात मजबुत जिंकायचाही...विशेषत: डॉट्ट् गेम नावाचा एक जुगार असायचा...त्यात तर हा मास्टरच होता....त्या क्लबमधले लोक येऊच द्यायचे नाहीत याला खेळायला...कारण हा पार त्यांची वाट लावूनच लुटून यायचा....
 मधल्या काळात नोकरीच्या व्यापामुळे सगळ्यांशीच संपर्क जरा कमी झालेला...लोकसत्ताच्या एडिशन लॉंचिंगसाठी 1994 ला मी नगरला गेलो होतो...तिथं एकदा अचानक भेटला माया....रामा इंटरनॅशनलजवळ लक्झरी बसेस थांबलेल्या..त्यात हा निवांत बसला होता....गप्पा झाल्या...मग समजलं हा नेव्हीत जॉईन झाला म्हणून.....तशाही क्रीडा कौशल्यामुळे त्याला पुण्यातही सिक्युरीटी आफीसरच्या चांगल्या नोक-या लागलेल्या....पण काही ना काही कारणानी त्या सुटल्या...काहींनी त्याला सोडले...काही याने सोडल्या....नगरहून वर्षभराने मी पुण्यात परतलो.....हा पुण्यात भेटला....लोणावळ्यात पोस्टींग आहे म्हणाला.... पांढरा शुभ्र पोषाखात हा दिसायचाही छान.....मग त्याने नेव्हीही सोडली...पुढं बडा सरकारी आफीसर झाला.....त्याच्या आवडीचं काम मिळालं त्याला....तिथंही चमकदार कामगिरी केली ...आणि राष्ट्रपती पदकच मिळवलं....खूप अभिमान वाटला आम्हा मित्रांना....कॉळेज सोडून आता 25 वर्ष झाली.....पण मायाची साथ अद्याप तशीच कायम आहे.. एक बारकाईनं पाहिलं तर माया ना कधी स्वभावाने बदलला...ना कधी त्याची वृत्ती बदलली....ना त्याचा लूक बदलला...कितीही कसल्याही नोक-या केल्या तरी गॅम्बलींग काही बंद झालं नाही....उत्तम घरगुती पार्श्वभूमी आणि उत्कृष्ठ प्राप्त परीस्थिती असूनही गॅम्बलींग करणा-या दोन व्यक्ती माझ्या परीचित  आहेत ..एक म्हणजे मॅनी...आणि दुसरा माया....
 सध्या माया पुण्यातच आहे....त्याची दिलदार वृत्ती कायम आहे....खूप प्रेम करतो मित्रांवर....मला प्रेमाने आबिदू म्हणणारा हा एकमेव मित्र....कधीही फोन करा...खूप उत्साहाने बोलणार....सगळ्या चौकशा करणार....त्यात कुठेही तो खूप मोठा आफीसर असल्याचा भाव नाही...त्याचे मित्र अफाट आणि क्लबच्या क्षेत्रातही नेटवर्क मजबूत....कुठलाही क्लब सुरू असला किंवा होणार असला तरी आजही मायाचं नाव आपसुकच जोडलं जातं.....त्याचे हात त्याने खुले केलेत....ते घेण्यासाठी नव्हे...देण्यासाठी...कितीतरी गरजु व्यक्तींना...संस्थांना...विशेषत: क्रीडा संघटनांना तो खुल्या दिलाने मदत करतो...त्यात कधीही दान केल्याच्या वृत्तीचा लवलेशही नसतो....सगळे आपलेच आहेत...आपणच परस्परांना मदत करायची ही त्याची वृत्ती आजही कायम आहे..गॅम्बलींगच्या क्षेत्रातील त्याच्या दबदब्यामुळं त्या क्षेत्रातले लोक त्याला आता मायाशेठ म्हणतात....पण आम्हा कॉलेजच्या मित्रांसाठी तो मायाच आहे...आम्ही मायाच म्हणतो त्याला....आणि त्यालाही तेच आवडतं.....
 मगाशी एकजण आफीसमध्ये कसलं तरी बातमीचं पत्रक घेऊन आलेला....त्याला पाह्यलं आणि कुठंतरी भेट झालीय असं वाटलं....नाव वगैरे विचारलं पण काही लक्षात येईना...निघताना तो मिशीत हसला....त्याची ती ब्रॉड मूछ पाहून मला एकदम माया आठवला आणि मग त्याच्याबाबत लिहिण्याचा मोह काही आवरू शकलो नाही...अखेर कसाही असला तरी आमचा दोस्त आहे हो तो..... एसपीतल्या दोस्तांना मी कुणाला माया म्हणतोय हे नक्कीच समजेल.. :)...                                  ........

No comments:

Post a Comment