बोरीचा घोडा आणि चेटूक
- - - - - - - - - - - - - - - -
बोरीचा घोडा या पाड्यावर काही जनावरं आकस्मिक दगावली...काही दिवसांनी ते सत्र थांबलं..पण, चेटूक थांबल नव्हतं...तो मोर्चा बालकांकडं वळाला..गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ दोन मुलं दगावली..दोघं सिरीयस आहेत...मुलाबाळांसह लोक पाडे सोडून इतरत्र रहायला जात आहेत...एकाकडून या प्रकाराची माहिती समजली आणि जव्हार, मोखाडा, विक्रमगडच्या मुशाफिरीतून त्या पाड्यावर निघालो..
जव्हारपासून सिल्व्हासाकडे जाणा-या रस्त्यावर पंचवीस-तीस किलोमीटरवर बोरीचा घोडा हा पाडा आहे. अंतर कमी आहे..पण रस्ता कमालीचा अरूंद.. खाचखळग्यांचा..नागमोडी वळणांचा.. साध्या मोटारी किंवा जीपचा उपयोगच नाही... दणकट गाड्या हव्यात...चालक कुशल हवा...आमच्याकडे सफारी होती....कांचन पाटीलसारखा उत्तम ड्रायव्हर होता.....जव्हारपासून निघाल्यावर दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाचा जणू शेलाच पसरला होता. गर्द हिरवा, पाचूसारखा हिरवा, पोपटी हिरवा, मखमली हिरवा, बांगड्यांचा हिरवा, हिरवा जर्द, फिकट हिरवा, पिवळसर हिरवा.... हिरवाईच्या इतक्या अद्भूत छटा आपल्याकडं अभावानेच पहायला मिळतात. . . न्याहळे गावात डॉ.अनिता पाटील यांचा हेल्थ कॅम्प होता...त्यांना तिथे सोडून आम्ही पुढे निघालो....सुतारपाडा, कापरपाडा, बोरीचा पाडा, सुळ्याचा पाडा असे कितीतरी छोटे पाडे वाटेत दिसले...मातीची...नुस्त्या विटांची किंवा चित्रात दिसतात तशी कुडाची घरं..पोटं खपाटीला गेलेले उघडेवाघडे आदिवासी..कष्टाची कामं करणा-या स्त्रिया, रानात हुंदडणारी, नदीत डुंबणारी मुलं, गुरं राखणारे लोक वाटेत दिसत होते..इकडं एन्टरटेनमेंट काहीच नाही...पण, इथला निसर्ग कमालीचा सुंदर, लोभस आणि शब्दातीत..त्यामुळं लोकांना ओझोनयुक्त ताजी आणि मोकळी हवा भरपूर मिळते...पण दोनवळा खायला काही मिळेलच याची शाश्वती नसते..मिळेल ती भाजी शक्यतो बटाटा, वांगे, कारली, भोपळा, भेंडी किंवा रानभाज्या...नाहीतर सुकट-बोंबिल...नागलीची भाकरी...इथं कांदा, लसूण, आले वगैरे मसाल्याची चैन नाही...
बोरीचा घोडा अतिशय दुर्गम भागात....बाहुपाडा, शेलकीचा माळ या भागातला....रस्ता नेमका माहित नव्हता...विचारत विचारत पुढे चाललो होतो...वाटेत एक वीस-बावीस वर्षांचा तरूण भेटला...त्याच्या हातात गलोर होती...मस्त...दणकट रबरापासून मन लावून बनवलेली...त्याच्याशी जरा गप्पा मारल्या... योग्य मोबदला देऊन गलोर मला घेऊन टाकली...पुढे वड पाड्यावर एक म्हातारी भेटली...सत्तरीतील पण तरतरीत...कांचनच्या परिचयाची होती...तिला विचारलं बोरीचा घोडा कुठं आहे ?.बरोबर येता का? असं विचारल्यावर ती तयार झाली...मग गाडीत तिला पुढं बसवलं..गप्पा सुरू झाल्या...तिचं नाव ठकी नवशा कोरडा..गावात शेतीवाडी बरी... बाळंतपणात दाईचं काम करते..पंचक्रोशीत त्यासाठी ती सर्वपरीचित...अनेक अडलेल्या बायकांना कसं मोकळं केलं याचे अनेक किस्से तिने सांगितले....डॉक्टर मंडळीही आपल्याला कसं मानतात, शासकीय रुग्णालयात आपण नर्सना कसं प्रशिक्षण देतो, हे ती सांगत होती....आदिवासी पाड्यांवरचं जगणं कसं बिकट आहे? ते सुसह्य होण्यासाठी काय करता येईल? याबाबत ती भरभरून बोलत होती.. तिला बोरीचा घोडा या पाड्यावर होत असलेल्या प्राण्यांच्या, मुलांच्या मृत्यूबद्दल विचारलं...तशी ती सावध झाली...आडून आडून माहिती दिली..पण थेट बोलेना...मला कायच माहिती नाय...असं म्हणायला लागली...
ठकीबाईशी बोलता बोलता बोरीचा घोडा पाड्यावर आलो...ठकीबाई एकदम सावध झाली...गाडी आत घालू नको....इथंच थांबव म्हणाली...मी ऐकलंच नाही...गाडी जशी पुढं नेली तशी तिची धांदल उडाली...मग पाड्याच्या थोडं अलिकडं गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो..ती गाडीतच बसून राहीली...लोक टकामका पाहत होते...कुणाकंडी न पाहता सरळ पाहत चला असं सांगून मी पुढे निघालो...कपिल आणि कांचन मागाहून येत होते...पाडा छोटासाच.... छत्तीस उंब-याच्या या पाड्यावर जेमतेम दोनशे लोक रहातात . . .कशाबशा कुडाच्या उभारलेल्या झोपड्या...शेळ्या-कोंबड्या इकडून तिकडे पळत होत्या...आपापल्या घराजवळ लोक उभे होते....वातावरण शांत होतं...त्या नीरव शांततेवर शोकाची अन त्याहून अधिक भीतीची गडद छाया सहजपणाने जाणवत होती...पहिली आठ-दहा घरे ओलांडली.. ...माजी सोन्याची लेकरी...सोन्याची लेकरी.....असा एका महिलेने फोडलेला हंबरडा आसमंत चिरत गेला...काळजात लककन हललं...त्या घराच्या ओसरीत दोन स्त्रिया रडत होत्या....आजुबाजुचे लोक सुन्न झाले होते...तिथून पुढं निघालो...गावाच्या सीमेवर कारल्याच्या, भोपळ्याच्या वेलांचा मोठा मांडव होता...पक्ष्यांनी ते खाऊ नये म्हणून भलमोठं बुजगावणंही उभ केलेलं...तिथल्या एका ओंडक्यावर विसावलो... एक किशोरवयीन मुलगा समोरून उत्सुकतेनं पाहत होता..त्याला विचारलं काय झाल? का रडताहेत ते? त्यांचं बाळ मेलं काल..तो म्हणाला...त्याचं नाव काय? तो काहीतरी पुटपुटला..मग म्हणाला मला नाय म्हायीत...वडलांना म्हायती...म्हटलं त्यांना पाठव...तो गेला..त्याचे वडील आले...बाबन चिबडे त्यांचं नाव..अंगात लेंगा..वर बनियन..गळ्यात तुळशीची माळ...कळकट चेहरा आणि त्यावर भय होतं...गुजराती हेलातील त्यांची मराठीमिश्रीत गुजराती आता ब-यापैकी परिचयाची झालीय.. ते बोलू लागले...गणपतीचा सातवा दिवस होता...गावातील एक बैल मेला...दुस-या दिवशी दुसरा...तिस-या दिवशी तिसरा...गावकरी हादरलेच...हा प्रकार समजल्यावर प्रशासकीय अधिकारी तिथं दाखल झाले...त्या गुरांना दिला जाणारा चारा तपासला..इतर शेळ्याकोंबड्यांना प्रतिबंधात्मक औषधं दिली..पण गुरं काही मरायची थांबेनात...एकापाठोपाठ पंधरा बैल गेले..बरं रात्री बरा असलेला बैल सकाळी एकाएकी थरथरायला लागायचा...तोंडातून लाळ गळत रहायची आणि एकाएकी त्याचा जीव जायचा..लोक भयभीत झाले...काहीजण नजिकच्या पाड्यांवर रहायला गेले...डॉक्टरी उपायांनी काही होईना म्हणून लोक भगताला शरण गेले...बाहेरची काही बाधा आहे का? या संशयानं पछाडले गेले...धामणीनजिकच्या पाड्यावरनं भगत बोलावला..त्यानं तांत्रिक विधी केले...मुलांना घेऊन सगळ्या बायकांना पाड्याबाहेर् जायला सांगितलं...तीन दिवस सारे व्यवहार बंद ठेवले होते..बाहेरच्या माणसांना पाडा बंद केला...पाड्याच्या सीमा त्यांनं मंत्र मारून बंद केल्या...देवाला आवाहन केलं....दानवाला शरण गेला..हिरव्या देवाला साकडं घातलं..दोन बोकडांचा बळी दिला...काही पथ्यं सांगितली....पाड्यातली पशुबळी बंद झाले...लोक आश्वस्त झाले...
आठ-दहा दिवस बरे गेले...आणि एकाएकी पाड्यातली मुलं आजारी पडू लागली.. फारशी काही लक्षणं नाही...जरा ताप..थंडी आणि मुख्य म्हणजे निपचित पडायची...वृषिला नवसू माडी ..ही जेमतेम तीन वर्षाची मुलगी एकाएकी मरण पावली...लोक हादरले...दोन दिवसांनंतर अक्षय भास्कर चिबाडे हा दोन वर्षाचा चिमुरडा देवाघरी गेला...लक्षण तेच...नितीन तुळशीराम वाझे हा चिमुरडा सिरीयस झाला...योगायोगाने जवळच्या पाड्यावर हेल्थ कॅम्प चालू होता...डॉ. अनिता पाटील यांनी प्राथमिक उपाचार करून त्यांनी त्याला तातडीने नाशिकच्या रुग्णालयात हलवलं...त्यापाठोपाठ अजय विष्णू वाझे हे दिड वर्षाचं बाळ आजारी पडलं...त्याला जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं...हे दोघे वाचले....पण पाड्यावर आलेलं हे संकट नेमकं कसलं या विचारानं लोक भयभीत झालेत...भगताच्या उता-याचा काही परीणाम होत नाहीये म्हणून ते हवालदिल झालेत...अलिकडं तिथल्या स्वयंसेवी संस्थांनी या मंडळींमध्ये विश्वास निर्माण केलाय..अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य अधिकारी त्यांच्या टीमसह तेथे पोहोचले...सर्वांना प्रतिबंधक औषधं दिलीत..पाड्यावर कायमची एक नर्स ठेवलीये..त्यामुळं वातावरण शांत आहे....पण भयभीत आहे..कुणीतरी चेटूक केलंय ही त्यांच्या मनावरील भावना काही जाता जाईना..
भगतानं गेल्या खेपेला पाड्यावरच्या एका व्यक्तीनं चेटूक केलं असल्याचं गाववाल्यांना सांगितलं होतं...तो एका अंगणवाडी मदतनिसचा पती...त्याला पाड्यावरच्या लोकांनी बोरीच्या झाडाला बांधून मारहाण केलीय...ते दांपत्य गाव सोडून अन्यत्र रहायला गेलेत...आजारी असलेलं एक बाळ आधीच आईसह दुस-या पाड्यावर स्थलांतरीत झालं होतं..पण, तिथंही ते गंभीर आजारी पडलं..त्यमुळं या पाड्यावरच्या लोकांना राहू द्यायला इतर पाड्यावरचे लोक तयार नाहीत...या लोकांचं संकट आपल्यावर येईल अशी भीती त्यांना वाटते....ही दशा त्याच माणसानं केली असावी, असा गाववाल्यांचा वहिम आहे...नेमकं कारण शोधायला दुसरा चांगला भगत कुठे आहे का? याचाही ते शोध घेताहेत....जिल्हा प्रशासन आरोग्यसेवा देण्याबरोबरच अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही आटोकाट प्रयत्न करताहेत...बाबन चिबडेंचा मी निरोप घेतला...सर्व काही ठिक होईल...काही घाबरू नका म्हणालो...गाडीत बसलो...त्या भागात फोनला रेंजच नाही...मेंढ्याचा पाडा पार करून पुढे आलो आणि एका वळणावर थोडी रेंज आली...फोनवर मेसेज झळकला...'' भारताने सोडलेल्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलाय..इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे यश...देशभर जल्लोष...'' डोळ्यांसमोर सोन्यासारखी लेकरीऽऽऽऽ म्हणत शोक करणारी बयाम्मा उभी राहीली...पाड्यावरचं चेटूक काढण्यासाठी दिलेल्या बोकडांचे निष्प्राण डोळेही उभे राहीले....गार गार वारं सुटलं होतं...डोळ्यात गेलेलं कुसळ काढतानाच कढत अश्रू कधी बाहेर पडले हे समजलंच नाही...

No comments:
Post a Comment