Wednesday, 21 November 2018

दया अण्णाची रिएंट्री


दया अण्णाची री एन्ट्री....
- - - -- - - - -- - - - --
अण्णा उठला.जवळपास साडेसहावर्षांच्या कालावधीनंतर काल त्याला चांगली बातमी समजली होती. त्यामुळे रात्री झकास झोपलागली.स्वप्नात गतकाळच्या स्मृतींनी फेर धरला होता. कर्नाटकमधील बालपणीच्या कटुस्मृतींपासून ते थेट पोलीस खात्यात जिद्दीने मिळवलेली नोकरी, एकाहून एक सरस अधिकाऱ्यांचे लाभलेले मार्गदर्शन,त्यांचा सहवास,त्यांच्यापासून प्रेरणा घेत जीव धोक्यात घालून बजावलेली कामगिरी,वाढता जनसंपर्क,खतरनाक गुंडांना बसलेला वचक,अफाट लोकप्रियता आणि त्यानंतर...?.....त्यानंतरची दृश्ये पाहून मात्र तो दचकून उठला. झोपेतून टक्क जागा झाला. पुन्हा एकदा त्याने कपाटाच्या खणातून ऑर्डर काढून वाचली.स्वत:ला चिमटा काढून पाहिला. ती ऑर्डर खरीच असल्याचे त्याला जाणवले.इतके दिवस पापण्यांत गोठवलेले अश्रू त्याच्याही नकळत त्या ऑर्डरवर टपकले. मग तो पुन्हा झोपला नाही.गेली साडेसहा वर्षे गंजत पडलेल्या पिस्तुलाला त्याने तेलपाणी केले. खाकी वर्दीवरील पितळी स्टार ब्रासोने घासूनघासून चमकवले. बुटांनाही चमकदार पॉलीश केले. पहाटे स्नानशूचिर्भूत होऊन त्याने देवापुढे दिवा लावला. आईच्या फोटोला वंदन करताना हृदयात कालवाकालव झाली. इच्छा नसतानाही त्याने कसेबसे नाश्त्याचे चार घास पोटात ढकलले.हेडक्वार्टरला जाण्यास तो तयार झाला. कडक खाकी वर्दी त्याने अंगावर चढवली. ब्राऊन कलरचे बूट लावले.होल्स्टरमध्ये पिस्तुल लावले. तोपर्यंत त्याच्या मनात पुन्हा एकदा निराशेचे मळभ पसरले. घोटभर गरम चहा घेतल्यावर त्याला काहीशी हुषारी आली. खिशात चामडी पाकीट ठेवले. त्याच्याही चेनला आता गंज चढला होता. पिस्तुलाच्या नळीच्या थंडगार स्पर्शाने एक निराळीच लहर त्याच्या शरीरातून दौडत गेली आणि त्वेषाने बुलेटला किक मारून तो निघाला. .नव्या जोमाने, नव्या तजेल्याने दयाअण्णा अर्थात सहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा रुजू झाला. दहा वर्षांत तब्बल 83 गुन्हेगारांना यमसदनी पाठवून मुंबईतील अंडरवर्ल्ड चाकणा मोडलेला मुंबईतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात रूजू झाला.ही बातमी समजताच अंडरवर्ल्डमध्ये सन्नाटा पसरला.अनेक ज्येष्ठ पोलीस अधिका-यांनी समाधान व्यक्त केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी,चाहत्यांनी दयाला शुभेच्छा दिल्या.दिवसभर दयाचा फोन खणखणत होता. दया मात्र आगामी काळात कोणते काम करायचे या विचारात गढून गेला होता.दया रुजू झाला खरे;पण त्याला नेमकी कोणती पोस्टींग मिळणार? पुन्हा क्राईम ब्रांचमध्ये की एखाद्या पोलीस स्टेशनला याबाबत पोलीस आणि अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांनासारखेच औत्सुक्य होते. सध्या मुख्यालयात हत्यारी विभागात रुजू झालेल्या दयाची पोस्टींग येत्या दोन-चार दिवसांत निश्चित होईल.त्यानंतरच मग त्याची पुढची दिशाही समजू शकेल.
  ज्याच्या जीवनावर तीन चित्रपट निघाले असा दया आहे तरी कोण? त्याच्याबद्दल सर्वांनाच एवढी उत्सुकता कशी?हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर मात्र तितके सोपे नाही.कारण दयाचा जीवन संघर्ष अतिशय कठीण आहे.1995ला पोलीस दलात रुजू झालेल्या दयावर अनेक आरोप झाले.गुन्हेगारांबरोबर,माफीयांबरोबर घनिष्ट संबंध असल्यापासून ते बेहिशेबी मालमत्तेबद्दलचे कितीतरी आरोप.. . . .2006मध्ये त्याने आईच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्नाटकमध्ये शाळा उभारली.त्याच्या उद्‌घाटनासाठी बिग बी आमिताभ बच्चन व तत्कालीन उपराष्ट्रपतींपासून निरनिराळ्या क्षेत्रातील बड्या हस्ती उपस्थित होत्या.हिच खरी दया अण्णाची श्रीमंती. पण हाच कार्यक्रम अनेकांच्या डोळ्यांत खुपला आणि दयामागे लागला चौकशीचा ससेमीरा. जुलै 2006मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी मालमत्ता जमवल्याबद्दल त्याला अटक केली.खात्यातून त्याला निलंबित केले. त्याला दोन महिने कारागृहातही काढावी लागली. पण आता साडेसहा वर्षांनी त्याच विभागाने पुरावा नसल्याचे कारण देऊन खटला काढून घेतला.त्यामुळे त्याचा पोलीस दलात येण्याचा मार्ग सुकर झाला.अखेर,मुंबई पोलीस दलात रुजू शनिवारी तो रुजूही झाला. पण,दरम्यानच्या काळात त्याने सोसलेल्या मानसिक आघातांचेकाय? त्याच्या कुटुंबाला भोगाव्या लागलेल्या यातनांचे परीमार्जन कोण आणि कसे करणार?यशाच्या शिखरावर असताना त्याच्यावर चिखलफेक करणा-या व्यक्तींना आणि वृत्तींना कोण व कधी सजा करणार?दयाअण्णा त्याच्या शांत,मितभाषी स्वभावाने गप्प बसेल.पण,यापुढे दुसऱ्या कोणा अधिका-याचा "दयाअण्णा' होणार नाही याची खबरदारी शासन घेणार का?दयाअण्णासारख्या अधिकाऱ्यावर बेलगाम आरोप करून पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करणा-या त्या विघातक वृत्तींना कोण चाप लावणार? असे अनेक सवाल या निमित्ताने उभे राहीले आहेत.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        दयाचे आयुष्य खरेच एका चित्रपटप्रमाणे आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील येन्नेहोळ येथील खेड्यात दयाचा जन्म झाला.तो लहान असतानाच त्याचे वडिल निघून गेले. मोठे दोन भाऊ उदरनिर्वाहासाठी मुंबईत होते.वडिलांचा आधार नसल्याने दयाच्या आईने त्याला व त्याच्या बहिणीला घेऊन माहेर गाठले.तेथे एका खोपटात हे तिघे राहू लागले. दरम्यान दयाचा भाऊ लग्नाची तयारी करीत होता. त्यासाठी त्याने सोनेनाणे जमवले होते. आपण गावी येत असल्याचा निरोप त्याने आईला दिला. ब-याच वर्षांनी घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भावाला आणायला सगळे स्टॅन्डवर गेले. पण,नियोजित दिवशी तो आला नाही. तेव्हा नाही आणि कधीही नाही. त्यावेळी जेमतेम दहा वर्षाच्या असलेल्या दयाला वस्तुस्थिती समजली.गावातीलच काहीजणांनी त्याच्या भावाचा खून करून त्याला खाडीत फेकून दिले होते. गावी सातवीपर्यंत शिक्षण झालेला दयापोटाची खळगी भरण्यासाठी दुस-या  भावाबरोबर मुंबापुरीत आला.वर्सोव्यातील एका हॉटेलमध्ये कपबशा विसळण्याचे आणि जवळच्या भागात चहा देण्याचे काम त्याला मिळाले.काही महिन्यांनंतर त्याने भावाच्या मदतीने स्वत:ची चहाची गाडी टाकली. दिवसभर काम करून दया पुढील शिक्षण घेत होता. चहाच्या गाडीवर काम करीतच त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याच्या कष्टाची आणि जिद्दीची अनेकजण तारीफ करीत असत.त्याला त्रास देणारे उपद्रवी लोक जसे भेटले; तसेच त्याला उज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन करणारे हितचिंतकही भेटले. त्याचवेळी त्याला स्पर्धापरीक्षेतून फौजदार होण्याचा मार्ग एका स्नेह्याने दाखवला. मग दयाने टिच्चून अभ्यासाला सुरुवात केली.फौजदार होण्याच्या ध्येयाने तो पछाडला होता.जिद्दीने तो बारा-बारा तास अभ्यास करायचा. त्याचे चांगले फळ त्याला मिळाले.पहिल्याच प्रयत्नात तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. पुढच्या वैद्यकीय परीक्षेसाठीही त्याने जोमदार प्रयत्न केले. शारीरीक पात्रतेच्या परिक्षेच्यावेळी लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेसाठी तो अक्षरश: छाती फुटेपर्यंत धावला व कोसळला.आता आपले सर्व काही संपले असेच त्याला क्षणभर वाटले.पण एका भक्कम हाताने त्याला ममतेने उठवले.तो कोणा किरकोळ व्यक्तीचा हात नव्हता.भल्याभल्या गुंडांना लोळविलेल्या एन्काऊंटर स्पेशालीस्ट
शहिद विजय साळसकर यांचा तो हात होता. दयाने या परीक्षेतही उत्तम गुण मिळवले आणि "त्या' हाताने त्याला कायमची सोबत केली. ते 1995चे वर्ष होते. हलाखीच्या परीस्थितीतच नाशिक येथून प्रशिक्षण अकादमीतून बाहेर पडलेल्या दयाला 1996मध्ये पहिलीच पोस्टींग मिळाली,ती योगायोगाने वर्सोव्याचीच.जेथे चहाच्या गाडीवर त्याने घाम गाळला, काबाडकष्ट केले;त्याच भागात त्याची नेमणूक झाली.कालपर्यंत आपल्याला चहा देणारा पो-या फौजदार झाल्याचा आनंद त्याच्या हितचिंतकांनाही झाला. पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकात काम करताना प्रशिक्षण काळातच त्याने 25 गुंडांना यमसदनी पाठवले. त्यानंतर त्याचा वारू सुसाट सुटला. दाऊद, छोटा राजन, अमर नाईक, अरूण गवळी यांच्या टोळ्यांतील गुंडांबरोबरच अनेक दहशतवादी त्याच्या गोळीची शिकार बनले.आपसुकच सबंध अंडरवर्ल्डमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. त्याचे खब-यांचे जाळे अख्ख्या मुंबईभर पसरले. कोणत्याही कामगिरीत त्याने कधी हार मानलीनाही.निधड्या छातीने तो गुंडांचा मुकाबला करण्यासाठी बाहेर पडत होता. समाजाला डोईजड झालेल्या गुंडांचा खात्मा करीत होता. तरीही त्याच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. विनम्र वृत्तीने तो आपले यश पचवत होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत त्याची मैत्री झाली. दया अण्णाचे एकंदर आयुष्य इतक्या वळणावळणाचे होते, की बॉलीवूडलाही त्याच्यावर चित्रपट निर्माण करण्याचा मोह आवरता आला नाही. त्याच्या जीवनावर बेतलेले "अब तक छपन्न' व "कगार' हे दोन चित्रपट हिट झाले. कन्नड भाषेतील "एन्काऊंटरदयाअण्णा' हा चित्रपटही सुपरहिट झाला. दयाला मिळत असलेल्या अफाट लोकप्रियतेमुळे काहींचा जळफळाट होऊ लागला.त्याच्या हितशत्रुंनी त्याच्या विरोधात कारस्थाने रचण्यास सुरुवात केली. खात्यातील आणि खात्याबाहेरील व्यक्तींच्या आरोपांनी दया व्यथित झाला होता. पण तो करणार तरी काय? त्याच्याकडील पिस्तुल त्याच्या खात्यातील प्रतिस्पर्ध्यांसाठी नव्हे, तर गुंडांना टिपण्यासाठी होते. तो नेहमीच्या स्वभावानुसार शांत राहीला.. पण, त्याच्याविरोधातील आरोप वाढू लागले.त्यातच 2006मध्ये त्याच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शुक्लकाष्ट लागले. त्याला अटकही झाली. पण, आता सर्व आरोपांतून तो मुक्त झाला आहे. तब्बल 76 महिन्यांनी दया पुन्हा एकदा पोलीस खात्यात रुजू झाला. आता पुढील आव्हाने त्याला खुणावू लागली...
                                                                       .

No comments:

Post a Comment