Wednesday, 21 November 2018

हरवलेली ओळख

हरवलेली ओळख
---------------------

साधारणतः ९० च्या दशकात आणि त्यापूर्वी  पुण्यात जे पूर्वी क्राईम रिपोर्टर होते, त्यांना डी.पी जगताप हे नाव चांगलं माहित आहे ..जगताप गुप्तचर विभागाचे कर्मचारी होते...पन्नाशीकडे झुकलेले ..काळ्या सावळ्या वर्णाचे ..कुठे..कुठे  भेटायचे..चहा पाणी, गप्पा टप्पा झाल्या की हळूच पोलीटिकल प्रेस कॉन्फरन्स  मध्ये काय, काय झालं? ...कोण  काय म्हणालं ? हे विचारून घ्यायचे.... ....कित्येकदा ते ही पत्रकारांमध्ये  घुसून बसायचे ..पण एक दोनदा संयोजकांनी आक्षेप घेतल्यावर पुढे त्यांनी थेट शिरकाव करायचं  टाळलं ..पण मस्त माणूस..एक होतं...मोबाईल, पेजर वगैरे काही साधनं  नसतानाही त्यांना सा-या  खबरा अचूक लागायच्या...त्यांमुळ मला त्यांची खूपदा मदतच व्हायची...तसा  एक  प्रसंग कायम स्मरणात आहे..साधारणतः १९९२-९३ च्या सुमारास माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेक-यांना म्हणजे जिंदा आणि सुखा या अतिरेक्यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात येणार होती...आम्ही सारे कामे आटोपून रात्रीच तुरुंगाकडे रवाना झालो...पोलिसांनी सॉलिड नाकाबंदी केलेली...तुरुंगाकडे जाणारे सर्व बाजूंचे रस्ते रात्रीपासून बंद केले होते...पत्रकारांना गोल्फ क्लब चौकातच रोखून धरले होते..मी तेव्हा नवखा होतो...धनेश गुजराथी आणि मारुती जोशी या पत्रकार मित्रांसमवेत पुढे कसे जाता येईल? याचा अंदाज घेत  होतो...फाशी मध्यरात्री किंवा पहाटे  दिली जाणार होती...आम्हाला फक्त नेमकी वेळ आणि कन्फर्मेशन हवे होते...कारण जिंदा खूप  आक्रमक होता...तुरुंगातले  टीव्ही आणि इतर गोष्टींची अनेकदा त्याने तोडफोड केली होती....मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांच्या नातलागांना पोलीस अखेरच्या भेटीसाठी व्हॅनमधून घेऊन गेले...ते आम्ही पाहिले ..अन  आता जरा घाई करायला हवी हे लक्षात आलं...पण कुठूनही पुढे जाता येईना..सगळीकडे कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता...आम्ही सायकली गोल्फ क्लब चौकातच ठेवल्या..खूप पायपीट  झाल्यावर धन्याने बराच लांबचा, पोलीस बंदोबस्त नसलेला एक रस्ता शोधून काढला...नेमकं आठवत नाही...पण बहुदा हाउसिंग बोर्डमधून वळसे घेत आम्ही चाललो होतो...मध्यरात्र उलटून गेलेली होती...त्यावेळी तिथं फारशी  वस्तीही  नव्हती ...बरंच  अंतर चालल्यावर नागपूर चाळीवरून आम्ही पुढे एअरपोर्ट रोडला लागलो.. एका चिंचोळ्या गल्लीतून धन्याने नेमकं  आम्हाला जेलरोड पोलीस चौकीतच नेलं.. गुलाबराव पाटील फौजदार होते तेव्हा तिथं...आमच्या परिचयाचे होते...एक दोन हवालदारही चौकीत बसले होते...आम्ही तिथवर पोचल्याच  त्यांना आश्चर्य वाटलं ..आम्ही विचारलं ...झाली का..? ते म्हणाले अजून काही समजलं  नाही..सहज चौकीतल्या फोनकडे लक्ष गेल...डी.पी. जगताप आमच्याकड पाहून गालातल्या गालात हसत होते...ते तिथं कसे याचं आश्चर्यही वाटलं...त्यांना खुणेनेच विचारलं...दोन्ही डोळे मिटत त्यांनी जरा थांबा अशी खूण केली...मग वातावरणातील ताण कमी करण्यासाठी आम्ही जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो...पहाट व्हायला आली होती..एकप्रकारची अनामिक गूढ शांतता जाणवत  होती...थोड्या वेळाने चौकीतला फोन खणखणला...जगतापांनी झटकन  तो घेतला..आणि सेकंदातच खालीही ठेवला अन आम्हाला इशारा करून ते बाहेर पडले...चौकीबाहेर येताच त्यांनी सांगितले की आत्ताच काही वेळापूर्वी जिंदा आणि सुखा दोघांनाही फाशी दिलीय....सुखाच्या शरीरातलं त्राण जवळपास संपलं  होतं.. जिंदा मात्र अखेरपर्यंत खलिस्तान झिन्दाबादच्या घोषणा देत होता.....सर्व  परिस्थिती आलबेल आहे.. आमचं काम झालं  होत.. पटकन तिथून बाहेर पडलो...येरवडा पोलीस स्टेशनला गेलो...तिथून ऑफिसला माहिती कळवली...तोपर्यंत अंक छपाईला गेला होता..अखेरच्या काही अंकात लेट एडिशन मध्ये त्या बातम्या गेल्या...जगताप जे तेव्हा लक्षात राहिले ते आजही तितकेच लक्षात आहेत...



       जगताप त्यांच्याकडची माहिती पटकन देत नसत..पण नेमका प्रश्न विचारला अन त्याचे उत्तर होय असेल तर तिरपा कटाक्ष टाकून गालातल्या गालात हसायचे...सगळ्याच पत्रकारांशी त्यांची मैत्री नव्हती...पण सर्वांची नावे त्यांना माहिती होती...पेपर माहित होते...कोण, कोणत्या बीटला काम करतोय याची पूर्ण माहिती त्यांना असायची... एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाला किंवा प्रेस कॉन्फरन्सला कोणत्या पेपरचा कोण वार्ताहर असेल याचा त्यांना अचूक अंदाज असायचा...त्यादृष्टीने ते सेटिंग लावत...त्यांचं ऑफीस कुठे आहे हे आम्हाला माहित नव्हत..ते कुणाला रिपोर्ट करतात हे ही ठावूक नव्हत..ते राहतात कुठं याचीही माहिती नव्हती...नाही म्हणायला त्यांचा एक कॉंटॅक्ट नंबर मोजक्या पत्रकारांकडे होता.....त्यांचा पेहराव साधा असायचा अगदी..टेरीकॉटचे शर्ट  पॅंट, पायात साध्या वहाणा... या जगतापांचं आणखी एक वैशिष्ठ्य होतं ..ते म्हणजे कधीतरी आजिबातच ओळख न देण्याचा त्यांचा स्वभाव...काही ठिकाणी विशेषतः राजकीय नेत्यांच्या कोंडाळ्यात ते असले तर आम्हाला कधी ओळख द्यायचेचं नाहीत...पुढे कधी भेटल्यावर त्याबाबत छेडल की तो मी नव्हतोच असं बोलून  ते मोकळे व्हायचे...बर हे एकाच नव्हे अनेक पत्रकार मित्रांबाबत खूप वेळा घडलय..ते खरंच नसायचे की आमची दिशाभूल करायचे, अन तसं असेल, तर ते तसं का वागायचे ?  हे कोडं कधी सुटलं नाही...

      कोणताही गंभीर  गुन्हा घडला की जगताप स्पॉटवर  हमखास भेटायचेच..कोणत्याही पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभांत, कार्यक्रमांत त्यांचा वावर असायचा ..निवडणुकांच्या काळात तर त्यांचा सर्वत्र संचार असायचा..त्यांच्यामुळ कित्येक एक्सल्युसिव्ह बातम्या मला मिळायच्या...पण, त्यांचं मधूनच आजिबातच ओळख न देण्याचं वागण खटकायचं.. एकदा तर तेच  म्हणाले...मी ही त्याच  व्यक्तीच्या शोधात आहे..मला अनेकजण सांगतात तुम्ही इथं दिसला, तुम्ही तिथं दिसला...अरे एकावेळी चार ठिकाणी  जायला मला काय सिद्धीबिद्धी मिळालीय का? पण आहे कुणीतरी सेम माझ्यासारखा दिसणारा ...मलाही पाह्याचय त्याला...देवान जगात एकसारखी दिसणारी सात माणसं बनवलेली असतात...त्यातला तो माझा हमशकल असणार बहुदा...असं म्हणायचे आणि वर हसायाचेही ...मला तर नेमकं काय ते कधी समजलचं नाही हे प्रकरण...



   मध्यंतरी बरेच दिवस झाले...जगताप भेटले नाहीत...दिसले नाहीत...फोनही झाला नाही...त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला तर एक पानवाला तो फोन घ्यायचा...पण आधी त्या नंबरवर कधीही फोन केला, तर जगतापच उचलायचे...मग नरपतगिरी चौकातल्या त्या पानावाल्याला भेटलो...तो म्हणाला साहेब नाहीत आता इथे...बाकी काहीच माहिती नाही...बर त्यांची माहिती इतर कुणाकडेही मिळेना...मग विषयच सोडून दिला...मग एकदा कधीतरी त्यांचा फोन आलेला ऑफिसला..अरे जरा बाहेरगावी आहे..भेटतो लवकरच ...बस एवढंच बोलून फोन ठेवला..त्यांची बदली झालीय? की त्यांच्या काही खास कामानिमित्ताने ते दौ-यावर आहेत? काहीच समजल नाही...दरम्यानच्या काळात, काही कामासाठी नगरला गेलो होतो....एकदा तिथं विखे पाटलांकडे बसलो होतो...चहा पाणी झाले...गप्पा झाल्या...तेव्हा नगर बॅंकेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती...मी विचारलं...काय होणार इलेक्शनमध्ये? तितक्यात एकजण आत आला ..पाटलांच्या कानात काही कुजबुजला...ते जगताप होते...लगेच ते बाहेरही गेले...मग विखे पाटील म्हणाले...मंडेलाच जिंकणार...हे काय आत्ताच समजलं..थोडावेळ मला काही अन्वयार्थ लागला नाही..मग लक्षात आलं...मी नगरच्या निवडणुकीचं विचारत होतो.... ते दक्षिण आफ्रिकेच्या निवडणुकांचा अंदाज सांगत होते...अन बहुदा आत्ताच आलेला मेसेज म्हणजे जगतापने कानात केलेली कुजबूज असणार....मी गप्पा उरकत्या घेतल्या...बाहेर जगताप कुठे भेटताहेत का ते पाहू लागलो...जवळच्या हॉटेलमध्ये गेलो...जगताप तिथं निवांत चहा पीत बसले होते.. तुम्ही इथ कसे? मी विचारलं...तुझ्यासारखाच मी ही कामानिमित्त आलोय...जरा गडबडीत आहे...भेटू लवकरच..म्हणत निघूनही गेले...या माणसाबाबत फार काही विचार करायचा नाही हे मी केव्हाच ठरवलं होतं...त्यामुळे फार काही विशेषही वाटलं नाही...

   साधारणतः १९९७-९८ ला पाकिस्तानातील हिंदू भारत भेटीवर आले होते...ते पिंपरी भागात एका मंदिरात उतरले आहेत..अशी जुजबी माहिती समजली...त्यांना भेटून एक मस्त स्टोरी होईल असं मनात आलं...मग पिंपरी चिंचवड भागातील काही मित्रांना  फोन लावले..राजकीय कार्यकर्त्यांकडे चौकशी केली...पण काही हाती लागेना...अजित किशोर हे सिंधी समाजातील नेते कामी आले.. त्यांनी ब-यापैकी माहिती मिळवून दिली...पण त्यांनी सांगितलेला पत्ताही नेमका लक्षात येईना ...संध्याकाळ उलटून गेली होती अन मला तिथं लवकर पोचण महत्वाच होत...सहज मी जगतापांना फोन लावला...फोन पानावाल्याने घेतला..बहुदा त्याने निरोप दिला असावा...लगेच मला त्यांचा फोन आला.मी त्यांच्याकडे याविषयी काही माहिती आहे का? याची चाचपणी केली..त्यांनी अचूक पत्ता सांगितला...मी फोटोग्राफरला घेउन तिथं पोचलो...जवळपास ६०-७० महिला पुरुष तिथं गप्पा मारता बसले होते...भारतातील महत्वाची मंदिरे त्यांना पहायची होती.. या दौ-यात ते पुण्याला भेट द्यायला आले होते...मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या...ब-याच गप्पा झाल्या...पण मुखिया म्हणजे त्यांच्या ग्रुपचा प्रमुख भेटला नाही...स्टोरी साठी आवश्यक माहिती मिळाली होती...त्यांचा निरोप घेउन बाहेर पडलो...दारातच जगताप भेटले...त्यांच्या सोबत एकजण होता...जगतापने त्यांच्या खास हिंदीत माझी ओळख करून दिली..त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती म्हणजेच तो मुखिया होता..हे जगताप म्हणजे नेमकं काय रसायन आहे? हे आकलनाच्या अन कल्पनेच्याही  पलीकडचं  होतं... गेल्या काही वर्षांत त्यांची भेट काही झाली नाही..मागे ते रिटायर झाल्याच समजलं....पण कुठे असतात? काय करतात? काही कळलं नाही... फार काही जाणून घ्यायचाही प्रयत्न केला नाही....



  मागे पाच वर्षांपूर्वी मॉरीशसला गेलो होतो...अनिश रामा, नितीन बापू , आन्जेषा अर्जुन, निशिता परसुराम, जेनिषा बाबा, आन्जेषा दासू, वर्षा दाजी....असे कित्येक मित्र मैत्रिणी आहेत तिथं... खूप भटकलो तिथं ..तिथल्या  शंखनीळ समुद्राकाठी मौजमस्ती  केली.....निघायच्या आदल्या दिवशी तिथल्या मोका भागात मुशाफिरी  सुरू होती.. तिथल्या एका हॉटेलमध्ये श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनथ जयसूर्या उतरला असल्याचं  समजलं.. माझी मैत्रीण समिंथा राजजीचा भाऊ त्या हॉटेलचा  मेनेजर..मी जयसूर्याचा जबरी फॅन...समिंथाने माझ्यासाठी त्याला गळ घातली..आम्हाला भेटून द्यायचा प्रयत्न करतो असा शब्द त्याने दिला. हॉटेलमध्ये पोचलो..स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त होता...जयसूर्याची वैयक्तिक सुरक्षा यंत्रणाही जबरदस्त होती...भेट होण्याची चिन्ह धूसर वाटू लागली होती...तो बाहेर पडताना फक्त त्याला पाहता येईल...भेटायची परवानगी कुणालाच नाही असं समजलं .आम्ही जरा हिरमुसलो...ब-याच वेळ खटपट केल्यावर  मॅनेजरची शिष्टाई कामी आली..कडक तपासणीचे सोपस्कार झाल्यावर आम्ही कसेबसे  जयसूर्याच्या खोलीत गेलो...उंची सूटमध्ये तो कॉफी पीत बसला होतं..त्याचा मित्र कोचवर  पेपर चाळत बसलेला...जयसूर्याशी हस्तांदोलन केलं...लगेच बाहेर पडायचा इशारा त्याच्या सुरक्षा रक्षकांनी केला..बाहेर पडताना सहज त्याच्या मित्राकडं लक्ष गेल....थक्क व्हायची वेळ माझ्यावर आली होती...ते जगताप होते.....काय जगताप? म्हणून मी हाक मारली...तितक्यात सुरक्षा रक्षक पुढे आले...आम्हाला बाहेर नेऊ लागले...त्यांना मी सांगायचा प्रयत्न केला की ते जगताप माझे मित्र आहेत....देअर इज नो एनी जगताप हिअर म्हणत त्यांनी आम्हाला जवळपास बाहेरच काढले...जयसूर्याला भेटल्याचा खूप आनंद झाला होता...त्यापेक्षा हे जगताप तिथं कसे?? आणि का?  याचं राहून राहून नवल वाटत होतं..समिंथाच्या भावाकडं चौकशी केली.... तो म्हणाला...हे गृहस्थ जयसूर्याचे खास दोस्त आहेत...त्याच्यासोबतच बाहेर जाणार आहेत...आमचं बोलण सुरू असतानाच कमान्डोजच्या सुरक्षेत जयसूर्या बाहेर पडला...सोबत (बहुदा ) जगताप होते...त्यांच माझ्याकड लक्ष गेलं ...पुन्हा तेच गालातल हसण अन तसाच तिरपा कटाक्ष .....काहीच समजेना...पुढे जगताप कधी भेटले नाहीत...त्यांचा ठावठिकाणा कधी समजला नाही...



   गेल्या आठवड्यात निवांत पेपर वाचत पडलो होतो...बातम्यांबरोबरच पीएचडीचे मानकरी अन निधन वार्ता मी आवर्जून वाचतो...पीएचडी च्या फोटोमधील व्यक्तींच्या डोळ्यांत आगळी चमक दिसते...अन देहावसान झालेल्या व्यक्तींचे डोळे निस्तेज भासतात असं माझ एक निरीक्षण आहे...निधन वार्तामधील  हरीश्चंद्र धायगुडे या व्यक्तीच्या फोटोनं लक्ष वेधून घेतले...त्यांची नजर चमकदार दिसत होती..गाल हसरे दिसत होते...मी खूप निरखून पाहिला तो फोटो..वारंवार पाहिला... पुनःपुन्हा निरखला.. माझा अंदाज खरा होता...तो जगतापांचाच फोटो होता...किमान  माझी तरी तशी खात्री आहे..आणखी एकदोघाना मी दाखवला...ते जगतापच् आहेत याची आम्हा मित्रांना खात्री आहे...उरवंडे गावी घरातच  ह्र्दयाक्रिया बंद पडून मृत्यू  पावल्याचा तपशील त्या बातमीत होता...त्या बातमीवरून आता त्यांचा मागोवा घेणे सहज आहे...पण, उपयोग काय? आयुष्यभर ओळख लपवलेले ...किंवा माझ्यासाठी ओळख हरवलेले  .. कुठेही, कधीही भेटणारे, मधूनच ओळख नाकारणारे जगताप आता प्रत्यक्ष भेटणारच नाहीत ....मग काय करायचं त्यांची माहिती मिळवून ..??..काही गोष्टी न समजलेल्याच ब-या असतात....कारण आयुष्यात सारीच कोडी कधी सुटत नसतात...जगताप किंवा धायगुडे हे माझ्यासाठी असंच एक कोडं बनून राहीलं आहेत..

No comments:

Post a Comment