Wednesday, 21 November 2018

डॅडीची दुनियादारी

डॅडीची दुनियादारी...
 - - - - - - - - -- - - - --
                   डॅडीला ओळखता? नाही का? मग गेल्या तीस-चाळीस वर्षांत पुण्याच्या एसपी कॉलेजला शिकलेल्या, एसपीच्या दुनियादारीत रममाण झालेल्या कोणत्याही विद्यार्थी-विद्यार्थिनीला विचारा... मग सुरू होतील डॅडीचे एकेक किस्से. एकेक सुरस कहाण्या.. गमती जमतीचे क्षण.."एसपी'त शिकतानाच्या तीन-पाच वर्षांच्या काळानं कित्येकांचं आयुष्य विविधांगांनी समृद्ध झालं. डॅडीच्या सुगंधीत आठवणींचा त्यामध्ये मोठा वाटा आहे.

                एक-दोन वर्षे नव्हे, तर तब्बल चार दशके डॅडीचा विद्यार्थ्यांशी संवाद आहे. या चाळीस वर्षांत त्याने या कॉलेजच्या कितीतरी बॅचेस पाहिल्या. हजारो विद्यार्थ्यांचा तो डॅडी बनला. त्यांचा आधार झाला. पुण्याच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी दोस्ताना असलेल्या डॅडीची दुनियादारी जबरदस्त होती....होती, असे म्हणायचे कारण सुहास शिरवळकरांच्या "दुनियादारीचा'' सर्वांना अनुभव देणा-या डॅडीने वर्षभरापूर्वी या दुनियेचा निरोप घेतला.

          जस्साच्या तसा आठवतोय तो दिवस मला . .. .टिळक रोडला गेलो आणि डॅडीला भेटलो नाही असं कधीच होत नाही. त्या दिवशी रात्रीचे पुरते अकराही वाजले नव्हते  आणि डॅडीची रिगल बेकरी बंद दिसली. ऐन कर्फ्यूमध्येही ' रिगल ' कधी साडे अकरापूर्वी बंद झाली नव्हती. तिथल्या पानवाल्याकडे सहज चौकशी केली आणि आपला डॅडी गेला रे....म्हणत तो हमसाहमशी रडू लागला. काळजात चरर्र झालं. तसंतर या दिलदार  डॅडीने काही वर्षांपूर्वी दुर्धर कर्करोगावरही सहज मात केली होती.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        शंकर  शेट्टी हे डॅडीचं खरं नाव. मेंगलोरहून पुण्यात हे कुटुंब येऊन स्थायिक झालेलं. सव्वापाच फूट उंची, बलदंड शरीरयष्टी आणि घनदाट कुरळे केस अशा व्यक्तिमत्वाचा डॅडी चटकन लक्षात राहत असे ते त्याच्या बोलक्या आणि मिष्कील स्वभावामुळे. मुलगा असो वा मुलगी; कुणीही त्याच्या  बेकरीत गेलंय आणि न हसता परत आलं असं कधीच घडलं नाही. त्याचं बोलणंच तसं निर्मळ, विनोदी असायचं. रजनीकांतसारख्या त्याच्या लकबीही आगळ्याच होत्या. मग ते सुटे पैसे परत देणे असो की अंडी पिशवीत भरायची असोत. त्याची शरीरयष्टी इतकी बलदंड की वयाच्या पासष्ठीतही त्याच्या दंडाचे स्नायू तो गरागरा हलवायचा. नेहमीच्या मित्राबरोबर एखादा नवा कोणी आला की तो त्याला आलिंगन द्यायचा. त्यावेळी त्या नवोदीताच्या चेह-यावरील भयचकीत भाव बघण्याजोगे असायचे. कारण, डॅडी स्वत:च्या पोटाचे स्नायू आतून सहजपणे एवढ्या जोरात हलवायचा की ज्याला मिठी मारलीय त्याचे पोट गदागदा थरथरायचे. त्याला कळायचेच नाही की नेमके काय होतेय. त्याच्या त्या अवस्थेने सगळेच हसू लागत आणि हा नवोदीत डॅडीच्या कळपात, दुनियादारीत सामील व्हायचा तो कायमचाच. मागे एकदा कलमाडी लोकसभेच्या प्रचारासाठी तेथून चाललेले होते आणि डॅडीने त्यांना असं आलिंगन दिलं...तेव्हा त्यांच्या चेह-यावरील विस्मयकारक भाव पाहून कार्यकर्त्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळाल्या होत्या....

           डॅडीची ही दुनियादारी आयुष्यभर अशीच विस्तारत गेली. टिळक रस्त्यावरून जाताना डॅडीला दररोज किमान पाच-पन्नासजण डॅडीऽऽऽ अशी हाक दिल्याशिवाय पुढं जात नसत. तो ही बादशाह भिर्रर्र.. म्हणत त्यांना प्रतिसाद द्यायचा. कोणीही कधीही त्याच्या बेकरीत गेलं की "गच्च ना..?' म्हणजे छान आहेस ना??हा त्याचा प्रश्न ठरलेला असायचा. डॅडीची नियत साफ होती. नजर स्वच्छ होती. त्याच्या बलदंड शरीरयष्टीचं सगळ्यांनाच आकर्षण असायचं. त्याबाबत एकदा तो म्हणाला, मी आईचंही दूध प्यालोय आणि आज्जीचंही. आज्जी तब्येतीविषयी कमालीची जागरूक होती. छातीकडे बघितलं की थेट त्याखाली पायाची बोटंच दिसली पाहिजेत, ढेरी नाही हा मंत्र तिने दिला होता. त्यामुळे खूप मेहनत करून डॅडीने भरदार छाती कमावली होती. ढेरी सुटणे दूरच अखेरपर्यंत त्याचे पोटाचे स्नायू कडक होते. त्याच्यासोबतचे अनेक मित्र कमरेत वाकून काठी टेकत बेकरीत येत तेव्हा हा त्यांची मस्करी करत त्यांची आमच्याशी ओळख करून द्यायचा.

          एसपीचे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या क्षेत्रात चमकले. कोणी पोलीस इन्स्पेक्टर, कोणी कस्टम ऑफीसर, कोणी राजकारणी,तर कोणी पत्रकार बनले. सगळ्यांचा भेटायचा कॉमन कट्टा म्हणजे डॅडीची बेकरी. ग्रुपमध्यल्या मित्रांना हमखास निरोप देण्याचे ते खात्रीशीर ठिकाण होते. माझे मोबाईल नंबर मी कायम बदलत असायचो...मित्र डॅडीला नंबर विचारून भंडावून सोडायचे...मग मी केव्हाही भेटलो, की माझे नवे व्हिजिटींग कार्ड तो बेकरीत वरच्याबाजूला इमानेइतबारे लावून टाकायचा. .. जगन्मित्र डॅडीचे सगळ्यांशीच सौहार्दाचे संबंध. कॉलेजमधील कोणालाही, कसलीही अडचण असली तरी डॅडीच्या दुनियादारीत तिचे निराकरण व्हायचे. वसतीगृहातील एखाद्याला पैशाची चणचण असली की मेसचे पैसे डॅडी भरायचा. एखाद्या मुलीला कोणी छेडत असेल, तर गोडीगुलाबीत त्याचा बंदोबस्त करायचा. त्याच्यासमोर कॉलेजमधील हजारो विद्यार्थ्यांचे विवाह झाले. शेकडो प्रेमविवाहांचा तो साक्षीदार आहे. विद्यार्थी दशेपासून परीचित असलेल्या मुला-मुलींच्या पुढच्या पिढीतील चिमुरड्यांचीही मने डॅडीने जिंकली. त्यामुळे आमच्या नीलमसारखी कित्येक छोटी मुलेही टिळकरोडवरून जाताना डॅडीला बिनदिक्कत आवाज देत आणि डॅडीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा.
        'एसपी'च्या विद्यार्थ्यांबरोबरच बहुतेक सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी डॅडीचे घनिष्ट संबंध होते. अनेक प्रसिद्ध मंडळी रिगलजवळ आवर्जून थांबून डॅडीशी गप्पा करून मगच पुढे जात. वसतीगृहात राहणारी परगावची मुले-मुली पुढे केव्हाही पुण्यात आली की त्यांच्या दौ-यात डॅडीची भेट ठरलेली असायचीच. टिळक रोडला जायचं आणि डॅडीला भेटायचं नाही, असं यापूर्वी कधी घडलं नाही. पण, यापुढे डॅडी कधीच दिसणार नाही. बेकरीच्या काऊंटर पलिकडून खळखळून हास्यविनोद करणारा डॅडी आकस्मिक फोटोच्या चौकटीत जाऊन बसला यावर अद्यापही विश्वास नाही. नेहमीप्रमाणे आज रविवारची सकाळ टिळकरोडला, एसपीच्या कट्ट्यावर गेलो....पावले आपोआप 'रिगल'कडे वळाली....ताज्या फुलांचा हार डॅडीच्या मोठ्या तसबिरीला घातला होता...उदबत्तीचा सुगंध दरवळत होता....डॅडीच्या पनामा सिगारेट्सचा ढिग आठवला..तो अद्यापही एका कोप-यात ठेवलाय त्याच्या स्मृती मनात रुंजी घालू लागल्या...पापण्यांत अश्रू दाटून आले........सहज नजर डॅडीच्या तसबिरीकडे गेली.....मिश्कीलपणे त्याचे डोळे लकाकत होते....बादशाह भिरर्र...अशा डॅडीच्या आवाजाचा भास झाला आणि मनाशीच हसत बुलेटला किक मारून मी पुढे निघालो.....

No comments:

Post a Comment