Wednesday, 21 November 2018

सकाळमधील रुपाली

'सकाळ'मधली रुपाली
-------------------

          टेलिफोनची एक जुनी डायरी मी बरीच जपून ठेवलीय..अधूनमधून ती चाळली की विस्मरणात गेलेले बरेच लोक आठवतात..अनेक आठवणी जाग्या होतात..जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहतो..माणूस वर्तमानात जगतो पण भूतकाळात रमतो हे जाणवतं.. आजही असंच जरा डायरी पाहत असताना रूपालीचा नंबर दिसला आणि तिच्या मैत्रीचा झरा जिवंत झाला.

         साधारणतः 95 च्या संक्रान्ती ला ' लोकसत्ता' सोडून मी ' सकाळ' मध्ये जॉईन झालो..तिथं आधी काही मित्र होतेच.. हळूहळू ब-याच ओळखी झाल्या. जागा कमी अन स्टाफ भरपूर असल्यानं तिथं बसायच्या जागेची टंचाई होती..मग आम्ही एकाच टेबलला दोन्ही बाजूंनी दोन- दोनजण बसू लागलो. वरूणराज भिडेंच्या टेबलला दुसऱ्या बाजूला मला जागा मिळाली.....वरूणराज पत्रकार आणि माणूस म्हणूनही  ग्रेट होते..महाराष्ट्राच्या राजकारणाचा राजकारणाचा त्यांचा दांडगा व्यासंग . पत्रकारितेतील, राजकारणातील किश्शाचा त्यांच्याकडे खजिना असायचा... क्राईम रिपोर्टींगमध्येही त्यांना रस आणि खूप माहितीही होती. ते नेहमी मला  नवनवे विषय सुचवायचे.....त्यांच्या गप्पा म्हणजे नित्यनवी मेजवानी असायची..आम्ही संध्याकाळी बातम्या लिहीत बसायचो, ते खरंतर आमच्या साप्ताहिकाचं कार्यालय होतं. तिथं त्या साप्ताहिकाच्या संपादकांची केबिन, उपसंपादक आणि त्यांच्या स्टेनोची बैठक व्यवस्था होती..तिथंच् रूपालीशी माझी ओळख झाली. गोरीपान, प्रसन्न चेहऱ्याची रूपाली तिथं काही ना काही कामात सतत गढलेली असायची..तशी ती बऱ्यापैकी मितभाषी.खूप कमीजणांशी अन् मोजकंच बोलायची..पण का कुणास ठाऊक माझ्या तिच्याशी छान गप्पा रंगायच्या...तिची थट्टा करायचो..आमच्या एका ज्येष्ठ सहका-याचा काहीजण खासगी गप्पांमध्ये  'सोनेरी काडी' असा उल्लेख करायचे...तो धागा धरून रूपालीला तिच्या चष्म्याच्या  फ्रेमवरून मी रुपेरी काडी म्हणून चिडवायचो.. ती खूप हसायची आणि मिश्कीलपणे  म्हणायची, बघ हं...मला असं चिडवतोस  हे कुणाला कळलं तर तुझी पंचाईत होईल...माझ्या बातम्या , लेख याबाबत  ती  नेहमी बोलायची...आमच्या दिवाळी अंकात स्थानिक पत्रकारांचे लेख, कविता छापायचा त्याकाळी प्रघात नव्हता..सगळं साहित्य ज्येष्ठ अन् तज्ञ् मंडळींचं असायचं..पण,  एके वर्षी माझी एक कविता  छापून आली..तिला खूप आनंद झाला...खूप कौतुक केलं तिने...  एकदा गप्पाच्या ओघात वरूणराज  म्हणाले, बघ ना..आपल्याकडं क्वालिफिकेशनला काय काडीची किंमत नाही...तू गप्पा मारतोस ना,  ती  तुझी मैत्रीण मराठीची गोल्ड मेडॅलिस्ट आहे  हे तुला तरी माहितेय का ? ती इतकी शिकलीये..आणि आपल्याकडं तिला कारकुनी काम करायला लावतात बघ...
.मला मनोमन वाईट वाटलं... शिक्षणाचा गर्व न बाळगता स्टेनोचं काम करणाऱ्या मैत्रिणीबद्दलचा आदर दुणावला..

त्याचकाळात तिचं लग्न झालं..टिपिकल पुणेरी पद्धतीनं...ऑफीसमध्ये मोजक्याच लोकांना निमंत्रण होतं.. आम्ही दोघे चौघे आवर्जून गेलेलो...पुढं तिला एक मुलगी झाली..नेमकं आठवत नाही पण बहुदा अवनी तिचं नाव...रुपाली खूप कोडकौतुक करायची तिचं.... मग नंतर एकदा ती दीर्घ रजेवर गेली...मी ही त्याच सुमारास 'सकाळ,' ,सोडला.. 'लोकमत' साठी काम करायला लागलो...त्यामुळंसकाळमधल्या मित्रांच्या भेठीगाठी कमी झाल्या.. रूपालीशीही खूप दिवसांत भेट झाली नव्हती. बोलणंही झालं नव्हतं.. ती बरीच आजारी असल्याचं एकाकडून समजलं..पण तिची भेट घेणं काही जमलं नाही...मग एकदा
ऋताचा किंवा वर्षाचा फोन आला..तुला कळलं का...रुपालीला कॅन्सर झालाय...भेट तिला जाऊन...कसंबसं हो म्हणून मी फोन ठेवला..खरंतर काहीच सुचत नव्हतं...सदाहसतमुख, टवटवीत मनाच्या सोनालीला कर्करोगानं का गाठलं असावं ? हा विचार मन अस्वस्थ करत होता...तिला भेटायचा धीर होत नव्हता.. कामाच्या धबडग्यात ते राहूनही गेलं....मग एकदा  तिच्या घरचा फोन मी लावला.. 'हॅलो....' असा तिचा परिचित किणकिणता आवाज कानावर पडला...खूप खूप बरं वाटलं.. म्हटली , अरे आत्ताशा कुठं प्रकाश दिसायला लागलाय....बऱ्याच थेरपी झाल्या बघ...गेले दोन तीन महिने खूप त्रास झाला..आता बरं आहे...आजार निघून गेलाय...काही प्रॉब्लेम उरला नाही...होईन कव्हर आता मी..खूप गप्पा झाल्या आमच्या ..भेटतो लवकरच् असं सांगून फोन ठेवला...अचानक तिच्या घरी जाऊन सरप्राइज द्यायचं  पक्क केलं...पण, आज जाऊ, उद्या  जाऊ अशी चालढकल होत गेली.. काही दिवसांनी सकाळीच वर्षांचा फोन आला...म्हटली...रुपाली गेली...सुन्न झालो...सोनेरी चष्म्यातला तिचा प्रसन्न चेहरा डोळ्यासमोर येत होता..अंतिम विधीला जायचं धैर्य माझ्यात उरलं नाही...

       दोन दिवसांनी पेपरमध्ये रूपालीच्या निधनाची चार ओळी बातमी आली... त्यात ना तिचा परिचय होता, ना तिचा फोटो..अनेक वर्ष वृत्तपत्राच्या दुनियेत काम करूनही तिच्या नावाने बहुदा कधी काही छापून आलं नाही...ती गेल्यावरही तिची उपेक्षाच् झाली. आम्हीही कुणीच काय करू शकत नव्हतो... वृत्तपत्रांचं पेशातून व्यवसायात परिवर्तन होण्याचा तो  काळ होता..साधारण त्याचकाळात वरुणराज भिडे, अण्णा खरात, अनंत पाटणकर, रवी रासकर यांच्यासारखे  आमचे अनेक सहकारी एकापाठोपाठ ही दुनिया सोडून गेले...तेव्हा सोशल मीडिया नव्हता..मोबाईलचं पेव फुटलं नव्हतं..फेसबुकची आभासी दुनिया नव्हती...नाती सच्ची होती...पक्की होती...मतभेद होतेच, पण भावना निर्व्याज होत्या..आपलेपणा, लोभ टिकून होता. नात्यांची , मैत्रीची वीण पक्की होती..आताच्या आभासी दुनियेत तयार होत असलेली, इथंच संपणारी तकलादू नाती पाहताना रुपेरी काडीसारखे ... रुपालीसारखे अनेक जुने मित्र मैत्रिणी हमखास आठवतात.डोळे भरून येतात..त्या सुंगधीत नात्यांच्या आठवणीने मन सुगंधित होतं...


No comments:

Post a Comment