आदिवासींची 'बोलकी' मुलं :
- - - - - - - - - - - - - - - -
कुत्रे, मांजर, गाई, म्हशी, घोडा असे कितीतरी प्राणी लोक पाळतात. त्यांना जीव लावला की ते घरचेच होऊन जातात. आपल्याशी खेळतात, बागडतात. आपल्या जिंदगीचाच एक हिस्सा होऊन बसतात. कित्येकदा हे प्राणी आपली छोटी मोठी कामंही करतात. पेपर आणणं वगैरे..आपल्या भावना त्यांना चटकन समजतात.
आपल्या दु:खात ते ही दु:खी होतात. आपल्या आनंदात ते ही उड्या मारतात. त्यांचं दु:खही ते व्यक्त करतात. त्यांच्या वेदना अश्रूंमुळे समजतात. विशिष्ठ हालचालींमुळे त्यांचा आनंद लक्षात येतो. पण, कितीही ते आपल्याशी एकरूप झाले, तरी निसर्गानेच एक मूलभूत फरक आपल्यात निर्माण करून ठेवलाय. मानवाप्रमाणे त्यांना सर्व काही भावना असतात. त्या ते व्यक्तही करत असतात. पण, जगात बोलण्याची देणगी मिळालेला मनुष्य हा एकमात्र प्राणी आहे. अन्य प्राण्यांमध्ये, जनावरांमध्ये आणि माणसात फक्त हाच एक पण खूप महत्वाचा फरक आहे.
माणसाला बोलण्याची देणगी दिली असली, तरी सर्वचजण ती योग्यरीत्या वापरतात अशातला भाग अजिबात नाही. काहीतरी बोलायचं म्हणून वायफळ शब्द चालवणारे, उठता बसता शिवीगाळ करणारे, द्वेषमत्सर भावनेने शब्द वापरणारे, जरा बरं वाचन असलं की वाग्बाणाचे प्रयोग करणारे महाभाग कमी नाहीत. माणसा-माणसांतील संवाद वाढीस लागावा, संबंध स्नेहाचे, आपुलकीचे व्हावेत, सुख़;दु:ख जाणून घ्यावीत यासाठी माणसाला बोलण्याची देणगी मिळाली आहे. त्यामुळं आपलं जीवन किती सुखासीन झालं आहे, याची कल्पना माणूस असूनही बोलता-ऐकता न येणारे जीव पाहिले की लक्षात येतं. जव्हारला नुकत्याच मारलेल्या फेरफटक्यामध्ये तिथल्या नीलेश मुर्डेश्वर विद्यालयाला भेट दिली. शाळा पाहिली. मुलांशी संवाद साधला. आणि आपण किती सुखी आहोत हे लक्षात आलं.
जव्हारच्या दुर्गम भागात गेल्या 25 वर्षांपासून सुनंदाताई पटवर्धन यांनी प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शाळा चालवली आहे. या आदिवासी भागात शाळेचीच व्यवस्था कितीतरी वर्षं नव्हती. अलिकडच्या काळात शिक्षणाची गंगोत्री पोचू लागली आहे. पण मुक्या-बहि-या मुलांसाठी काहीच व्यवस्था नव्हती. सुनंदाताईंनी अक्षरश: दोन-चार मुलांना घेऊन निवासी शाळा सुरू केली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड अशा भागांतील दुर्गम पाड्यांवर जाऊन मुले गोळा करून, त्यांच्या नातलगांची कशीबशी समजूत घालून शाळा चालवली. आपली मुले मुकी-बहिरी कशीही असली तरी चालतील..पण ती आपल्याच नजरेमोर हवीत असा इथल्या लोकांचा हट्ट. मुलांना नजरेआड करायला ते तयार नसत. शिक्षणाचे फायदे त्यांच्या डोक्यात घुसत नव्हते.. पण सुनंदाताईंनी आणि त्यांच्या सहका-यांनी जिद्दीने हे काम हाती घेतलं. शाळेच्या रोपट्याचा वृक्ष बनलाय आणि चांगलाच बहरलाय..इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची पासष्ठ मुलं-मुली इथं शिकतात. इथंच राहतात. जगाचं आणि व्यवहाराचं शिक्षण घेतात.
आम्ही गेलो तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते..गावाबाहेरच्या एका कोप-यात पंधरा-वीस गुंठ्यांमध्ये शाळेचा परिसर आहे. लाल दगडात शाळेची इमारत..दर्शनी भागात सुरेख वारली चित्रं चितारलेली...मुख्य दारातून आत गेल्यावर मध्यभागी जवळपास चरशे चौरस फुटांचा लाल मातीचा हौदा .बाजूच्या दोन कट्ट्यांवरून शाळेत जायला रस्ता..पहिले ते चौथीचे वर्ग भरलेले..काही वर्गात बाकडी..छोट्या वर्गासाठी सतरंज्या. सर्वसाधारण मुलांना शिकवण्यात आणि या मुलांना धडे देण्यात खूप फरक. या मुलांना ऐकताही येत नाही आणि बोलताही येत नाही. त्यामुळं केवळ नजरेनं आणि हावभावांनीच शिकवायचं..त्यांना काही समजलंय का नाही? हे ही त्यांच्याकडून हावभावांनीच जाणून घ्यायचं..महाकठीण काम...डॉ. अनिता पाटील यांच्यासोबत कपिल आणि मी शाळेत गेलो होतो.
दुसरीचा वर्ग होता बहुदा तो..आम्ही आत गेलो..शिक्षकांनी स्वागत केलं...मुलं उभी राहीली...सर्वांनी नमस्कारासाठी हात जोडले...तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटले..मग लक्षात आलं...''एकसाथ नमस्ते'' होतं ते...बाई कविता शिकवत होत्या..सर्वकाही हावभावांनीच. मुलं लक्ष देऊन त्यांच्याकडं पाहत् होती..आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होती..काळी-सावळीच पोरं होती सारी..पण डोळे विलक्षण बोलक़े आणि तेजस्वी... तेल लावून व्यवस्थित विंचरलेले केस. स्वच्छ गणवेश..ताजी टवटवीत दिसत होती मुलं..उत्साहानं, अभ्यास करत होती. दुस-या वर्गात गेलो..तो खूपच लहान मुलांचा वर्ग. पिटुकली मुलं-मुली मस्त मजेत शिकत होती. दंगा करीत होती. खोड्या करत होती. पण, त्यांचा आवाजच येत नव्हता.. कर्णबधिरतेवर मात करत ही मुलं शिकताहेत..शिशू गटाच्या एका वर्गात गेलो..मुलं गोल करून बसली होती. शिक्षक कविता शिकवत होते..
एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ.....
मुलं छान हावभाव करून कविता म्हणत होती..म्हणजे पुटपुटत होती...पण बडबड गीत म्हणतानाचा आनंद त्यांच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. सर्वसाधारण मुलांसारखं आपणही शाळेत जातोय...शिकतोय याचं अप्रूप त्यांच्या चेह-यावर सहजपणे जाणवत होतं..वर्षा सखाराम भुसारा ही चिमुरडी भेटली या वर्गात..ती पूर्णपणे बहिरी आणि मुकी आहे. आहे छोटीशीच पण नजरेत चमक आहे.. डॉ. पाटील यांनी दत्तक घेतलंय तिला..म्हणजे वर्षभराच्या तिच्या गणवेषाचा, श्रवणयंत्राचा, साहित्याचा, जेवणाचा खर्च त्यांनी उचललाय...मी कडेवर उचलून घेतलं तिला..तिला जरा भारी वाटलं...वर्गातल्या इतर मुलांपेक्षा आपण काहीतरी स्पेशल आहोत असं वाटलं बहुदा तिला...मी बसलो त्या वर्गात...मुलं एक-दोन-तीन-चार अशा संख्या आणि मुळाक्षरं म्हणून दाखवू लागली..म्हणायचं म्हणजे फक्त पुटपुटायची...आणि ती संख्या अथवा अक्षर ठराविक सांकेतिक खुणेने दाखवायची...सर्व मुलं अचूक खुणा होती..वर्षा माझ्या मागच्या बाजूला बसली होती... हलकेच शेजारच्या मुलीला ढुशी मारून माझ्याकडं पाहत काहीतरी म्हणाली.. माझं लक्ष गेल्यावर जरा दचकली...बहुदा माझे पालक आहेत किंवा असंच काहीतरी सांगत असावी..आपल्याला काहीच समजत नाही ती भाषा...वर्षाला उचलून घेतलं तेव्हा माझ्या छातीत काहीतरी टोचलं होतं..तिला जवळ बोलवलं...तिच्या गळ्यात पाहिलं तर एका दोरीत एक चावी गुंफली होती. शिक्षक म्हणाले, सर्व मुलांच्या गळ्यात त्यांच्या पेटीची चावी असते. एवढीशी ही मुलं त्यांचे कपडे, दप्तर आणि इतर साहित्य आपापल्या पेटीत ठेवत असतात. स्वत:च्या हातांनी जेवत असतात. त्यांना मायेने दोन घास भरवायला पालक सोबत नसतात. ही मुलं स्वत: ची स्वत: आंघोळ वगैरे करून वर्गात येतात. शाळा सुटल्यावर पुन्हा अभ्यास करतात.. सुरुवातीला मुलं इथं रहायला तयार होत नाहीत..पालकांचाही जीव तीळतीळ तुटतो.. हळूहळू रुळतात मुलं इथं...पालकांनाही सवय होते...अधूनमधून ते येतात शाळेत मुलांना भेटायला...आपण नाही शिकलो...पण आपली मुलं मुकी-बहिरी असूनही शाळा शिकताहेत याचं त्यांना समाधान असतं...मुलंही या शाळेत रमून जातात..आपल्यात काही शारीरिक वैगुण्य आहेत हे विसरून जिद्दीने परीस्थितीशी दोन हात करायला शिकतात. इथल्या निसर्गानं त्यांना शरीरानं कणखर बनवलंय आणि परीस्थितीनं मनाला...त्यामुळे व्यंगावर मात करून ही मुलं पुढंही चांगली शिकतात. आयटीआयला जातात. काही ना काही शिकून स्वत:च्या पायावर उभं रहायचा प्रयत्न करतात..बहुतेकांना त्याय यश येतंही....
मुर्डेश्वर विद्यालयात या मुलांना शब्द उच्चारण्यासाठी काही अद्ययावत उपकरणे आणली आहेत. या मुलांना ओष्ठ्य् अथवा दंतव्य शब्द शिकवता येतात. पण 'न' सारख्या अनुनासिक अक्षरांचा उच्चार शिकवणे अथवा अक्षर शिकवणे खूप कठीण जाते. या उपकरणांचा वापर करून त्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे शिक्षण देणारी मंडळी पोटार्थी असून चालत नाही. व्रत म्हणून कामं करणा-यांचच हे क्षेत्र..सुनंदाताई स्वत: व्रतस्थ आहेतच..पण त्यांना त्याच वृत्तीचे अनेक सहकारी मिळालेत. त्यांच्या बळावर मुर्डेश्वर विद्यालयाचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू आहे..आदिवासी पाड्यांवरची मुकी-बहिरी मुलं शिकू लागली आहेत...समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करू लागली आहेत. नव्या जगाचं ज्ञान आत्मसात करू लागली आहेत..नव्या जगाशी नाळ जोडू पाहत आहेत. हस्तीदंती मनो-यात बसलेल्या मस्तवाल माणसांशी दूर आदिवासी पाड्यावर वाढत असलेली ही मुलं दोन हात करायला सज्ज झाली आहेत..वर्षानुवर्षे उपेक्षित ठेवल्याबद्दल ही पिढी त्यांना जेव्हा जाब विचारेल ना तेव्हा त्यांच्या तेजाने भल्याभल्यांची गाळण उडेल...बुरखे फाटतील...विकासाची गंगा ठराविक क्षेत्रापुरती मर्यादीत ठेवणा-यांविरुद्ध ही मुलं एल्गार पुकारतील ना तेव्हा त्यांना रोखायची ताकद कुणामध्येच असणार नाही हे नक्की...

No comments:
Post a Comment