Wednesday, 21 November 2018

जादूगाराची दुनिया

जादुगाराची दुनिया
-  -  -  -  -  -  -  -  -
                जादुची.... हिप्नॉटिझमची ...मला  पूर्वीपासून आवड..हिप्नॉटिझम शिकलो...पारंगत झालो...जादु कधी जमली नाही...जादुचं साहित्य,हातचलाखी  आणि कमालीचं टायमिंग यातून जादू घडते...त्यात कोणताही चमत्कार नाही....जादुगार आनंद यांची मैत्री झाल्यावर जवळून पाहता आली ही दुनिया...आणखी आश्चर्य वाटलं...आणखी कुतूहूल वाढलं.....

             आपल्याकडे जादुगारांचीही घराणी आहेत...पी. सी. सरकार, के. लाल वगैरे....पण आनंद भाईंचं वैशिष्ठ्य म्हणजे अशा कोणत्याही परंपरेतून न येताही त्यांनी या क्षेत्रात सरकार , लाल यांच्याच तोडीचं किंवा त्यांच्यापेक्षाही चांगलं नाव कमावलं....प्रतिष्ठा मिळवली....देशविदेशातील कित्येक सन्मान मिळवले...देशातील पहिल्या तीन जादुगारांमध्ये त्याचा समावेश होतो...जादुचे प्रयोग सादर करण्यासाठी जगभरातील बहुतेक सगळे देश त्यांनी पालथे घातलेत .....देशातील सर्व राज्यांमध्ये, सर्व प्रमुख गावांमध्ये शहरांमध्ये ते खूप फिरलेत....देशाचा नकाशा त्यांना तोंडपाठ आहे.....देशविदेशात प्रचंड कॉन्टॅक्टस......सॉलीड्ड नेटवर्क.....कमालीचा निगर्वी असलेला हा मित्र गवसला 1996-97 मध्ये.....त्यावेळी आनंद भाईंचा पुण्यात दौरा होता.... या क्षेत्राची आवड असल्याने मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो ....तसं काही या मंडळींना प्रसिद्धीचा हव्यास नसतो....पण मुलाखतीमधील काही प्रश्न त्यांना अगदी वेगळे वाटले....मला जादु विद्येबाबत खूप कुतूहूल असल्याचं त्याच्या लक्षात आलं....मग खूप भरभरून गप्पा मारल्या त्यांनी......

          .....आनंद भाईं मूळचे जबलपूरचे....आनंद अवस्थी हे पूर्ण नाव....ओशोंशी त्यांचे खूप घनिष्ट संबंध होते .... तेव्हा ओशो  चंद्रमोहन जैन या नावानेच परीचित होते....त्यांनी स्वत:चा काही संप्रदाय काढला नव्हता.... सायकलवरून आनंद भाईं आणि ते नेहमी दूरदूर भटकायला जात असत.... आवड असल्यामुळं रस्त्यावरील गारूड्यांकडून आनंद भाईंनी काही जादू शिकल्या होत्या....त्यातून स्वत: ही काही छोटे प्रयोग ते करू लागले होते.....ओशोंना नेहमी नवनव्या गोष्टी शिकायची आवड.  . . ते आनंद भाईंकडून जादूची क्लुप्ती शिकले. त्या बदल्यात हिप्नॉटीझमची अनोखी पद्धत त्यांना शिकवली....आनंद भाईंनी पुढे जादुगार व्हायचा निर्णयच घेऊन टाकला...आणि तो अंमलातही आणला....खूप मेहनतीने, कष्टाने त्याने जादुचे प्रयोग सुरू केले...हातापायाला बेड्या घालून स्वत:ला एका पेटा-यात कुलूपबंद करून घ्यायचे व हा पेटारा समुद्रात टाकल्यावर क्षणार्धात स्वत:ची सुटका करवून घ्यायची हा ' हुदीनी बॉक्स' चा प्रयोग प्रसिद्ध आहे....त्यामध्ये सर्वात कमी वेळेत सुटका करवून घेण्याचा विक्रम आनंद भाईंच्या नावावर आहे....मला वाटतंय भारतीय जादूमध्ये इल्युझन त्यांनीच आणलं सर्वप्रथम...पिंज-यात ठेवलेला हत्ती प्रेक्षकांसमोर काही सेकंदात गायब करण्याच्या त्यांच्या जादुने प्रेक्षक थक्क होऊन जातात...खूप भन्नाट असतात त्यांच्या एकेक जादू.....चकचकीत सेटस, अत्याधुनिक साहित्य, उंची कपडे आणि जगातील सर्व नव्या जुन्या  प्रयोगांचा मेळ असल्याने त्यांच्या जादुचे प्रयोग खूप रंगतात... मध्यप्रदेशातील असल्याने ते अस्खल्लीत हिंदी बोलतात...इंग्रजीवरही उत्तम प्रभुत्व....शिवाय बहुतेक भाषांची प्राथमिक माहिती आहे.....जादुचे प्रयोग करताना शारीरिक व मानसिक खूप मेहनत होते...स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते व्यायाम करतात आणि योगसाधनाही.....मागे मला अनेक वर्षे निद्रानाशाचा खूप त्रास झाला होता....खूप उपाय केले मी....त्यावेळी आनंद भाईंनी एक विशिष्ठ मंत्र देऊन निराळ्या पद्धतीने ध्यानधारणा करायला शिकवलं....

             ओशो यांनी स्वत:चा संप्रदाय काढल्यावर त्यांच्या पहिल्या दहा संस्थापक सदस्यांमध्ये आनंद भाईही होते....आपण फोनची डायरी नावानुसार तयार करतो...जगभर भ्रमंती करणा-या आनंद भाईंची डायरी गावांच्या नावांनिहाय आहे.....खूप मोठा पसारा असतो जादुच्या प्रयोगांचा....इथं एका कुटुंबातील तिघांची तोंडं तीन दिशांना असतात...आनंद भाईंकडं सर्वप्रकारचे मिळून शंभर एक लोक नोकरीला आहेत...अस्वल, माकड, पोपट, कबूतर, ससे, कुत्री असे पन्नास एक प्राणी पक्षी आहेत...बाराही महिने या सर्व माणसांचं आणि प्राण्यांचं पोट भरण्याची जबाबदारी आनंद भाईंची असते...बरं आज महाराष्ट्र...उद्या कर्नाटक...मग तामिळनाडू....आंध्र प्रदेश...कुठंही त्यांची भटकंती सुरू असते.....साधारणत: वर्षातील आठ महिने काम आणि चार महिने आराम अशी त्यांच्या कामाची पद्धत असते....सुटीच्या चार महिन्यातही कामगारांना पूर्ण पगार द्यावा लागतो...
प्रयोगासाठी गावे बदलताना प्रयोगाचे अवाढव्य सामान हलवणे जिकीरीचे असते...नित्य नवा प्रांत...नवी भाषा...नवी माणसे....हेच आनंद भाईंचं आयुष्य बनलंय....ते पुण्यात आले की हमखास भेट होतेच....फोन तर नेहमीच होतो....अक्षरश: लहान भावासारखं प्रेम करतात ते माझ्यावर...त्यांची पत्नी म्हणजे माझी भाभी. . .  आरोही, आकांक्षा व अंकीता या तिन्ही मुली पुण्यातच सेटल झाल्यात....मुलगा आकाश ब-यापैकी द्वाड होता....मध्यंतरी तो ही आनंद भाईंना जॉईन झाला....दुसरी पिढी या व्यवसायात आल्याने जादुच्या दुनियेत आनंदच्या घराण्याची नोंद झाली....आनंदभाई अनेकदा माझ्या घरी आलेत... कितीही टेंशनमध्ये असलो, तर आनंद भाईंचा   'भाई कैसे हो ?' असा फोनवरून नुस्ता आवाज कानावर पडला तरी खूप रिलॅक्स वाटतं...खूप आपुलकीने बोलतात ते.....'' नीलम को प्यार देना....भाभी को याद देना असं म्ह्टल्याशिवाय कधी फोन ठेवत नाहीत ते....मागे माझी डायरीच हरवली एकदा.....आणि त्यांचाही फोन नाही आला...आणि त्यांच्याशी तातडीने बोलावसं वाटत होतं....खूप अस्वस्थ झालो....त्यांना कसं गाठावं हेच समजेना...त्यांच्या तोंडून ऐकलेलं शलभ भटोडिया हे नाव त्यावेळी आठवलं...शलभ... जबलपूरचेच....आनंद भाईंचे  जवळचे मित्र...मग  मध्यप्रदेशातील मित्रांच्या माध्यमातून जबलपूरच्या प्रेस क्लबचा फोन नंबर मिळवला...तेथे संध्याकाळी शलभ येणार असल्याचं समजलं....संध्याकाळी..शलभशी बोललो....त्यांच्याकडून आनंदभाईचा नंबर घेतला....आणि तो फोन ठेवायच्या आतच खिशातील माझ्या मोबाईलचा स्क्रीन झळाळला...तो आनंद भाईंचाच फोन होता....कसला योगायोग म्हणावा हा....विश्वासच बसेना...त्यांनाही समजलं असावं मला त्यांच्याशी बोलायचंय ते...खूप घट्ट बॉंडींग आहे आमचं....

            उच्च शिक्षित असलेले आनंदभाई कमालीचे श्रद्धाळू ..गणपती आणि हनुमानाची उपासना करतात...पण ते आजिबात अंधश्रद्ध नाहीत...चमत्कारांवर काडीचाही विश्वास नाही......याउलट तो त्या विरोधात आहेत....सत्य साईबाबांना आजवर  अनेक जादुगारांनी आव्हान दिलंय....पण, सर्वात आधी आव्हान देणारे आनंद भाईच....तुम्ही जे काही कथित चमत्कार करताय ना...ते आमच्या जादुविद्येमधील अतिप्राथमिक स्तरावरील हातचलाखी आहे....तुम्ही करताय ते मी करून दाखवेन....मी करतो..ते तुम्ही करून दाखवा असं जाहीर आव्हान आनंद भाईंनी दिलं होतं....अर्थातच सत्यसाईबाबांनी ते स्विकारले नाही...पण या घटनेने खूप गदारोळ उठला....आनंदभाईंवर निरनिराळे दबाव आले...पण सच्ची नियत आणि दुनियाभरच्या मित्रांच्या बळावर ते निवांत राहीले......आनंदभाई  खूप दिलदार माणूस...दुनियाभरातून कितीतरी वेगवेगळ्या वस्तू आणतात ते माझ्यासाठी...मागे एक फ्लॅश लाईटचा टॉर्च, रेडिओ असलेलं एक वेगळीच वस्तू आणली होती...सोलर लाईटवरची...कुठ आफ्रिकेत गेले होते...तिथून आणलेली....पंधरा वर्षांपूर्वी ही वस्तू अप्रूप होती माझ्यासाठी....त्यांना पत्रकारीता क्षेत्रातील अनियमतता चांगली माहिती झालीय...माझ्या करीयरमधील चढउतार जवळून पाहिलेत.....नेहमीच त्यांनी धीर दिलाय....नेहमीच मदतीचा हात दिलाय.........मला एक कायमचं सांगून ठेवलंय त्यांनी....नोकरी-धंद्याचा कधीच ताण घेऊ नकोस...कधीही वाटेल तेव्हा माझ्याकडे ये... माझ्यासोबत काम कर...तुला जगभर फिरवतो......गेल्या काही दिवसांत खरंच खूप कंटाळा आलाय....काहीतरी वेगळं करावं असा विचार करत बसलो होतो...मोबाईलची रींग वाजली....कैसे हो भाई...? आनंदभाईंचा खळाळता आवाज कानी पडला....मी आश्वस्त झालो....

No comments:

Post a Comment