Wednesday, 21 November 2018

दोन पाटील

दोन पाटील
..................

तसं तर गोंदवले, आणि फलटणमधलं सुट्टयांमधलं वास्तव्य सोडलं तर गावकीशी कधी माझा संबंध आला नाही..तीन पिढयांपासून पुण्यातच् आहोत..आमच्याकडं कुणाची शेती नाही..आम्ही पाटील नाही आणि पटेलही नाही..पण पाटील आडनावाच्या मंडळींशी लहानपणापासून ऋणानुबंध  जमलेत..श्रीकांत पाटील शाळेपासूनचा मित्र..चाळीत जय,विजय पाटील वीस वर्षे शेजारी रहायचे..'एसपी'च्या दुनियादारीत सचिन पाटीलसारखा जिवाभावाचा मित्र लाभायला  तर माझ्यासारखं नशीब लागतं.. पत्रकारीतेत आल्यावर राजकारण, समाजकारण, पोलीस खात्यातले अन निरनिराळ्या क्षेत्रातले अनेक पाटील परिचयाचे झाले..दोन पाटील मात्र कायमचं आयुष्य व्यापून राहिले..एक माळशिरसचे शिवाजीराव पाटील अन दुसरे मुंबईचे सोमनाथ पाटील..

या दोन्ही पाटलांशी  खूप जवळून संबंध आला आणि दोघांनीही माझ्यावर खूप माया केली..शिवाजीराव भवानराव पाटील म्हणजे शिवाजीभाऊ हे माझे सासरे...सोलापूरच्या अकलूज, माळशिरस भागातले  धुरंधर राजकारणी..समाजवादी विचारांची चळवळ  या भागात रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा.. चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य या नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध..माझं लग्न झाल्यानंतर भाऊंशी माझा संबंध आला..खरंतर 90 च्या दशकातही मिश्रधर्मीय विवाह म्हणजे कठीणच होतं.. हिंदू-मुस्लिम लग्न म्हणजे आणखीनच नाजूक गोष्ट..त्यात भाऊंसारखी जबरदस्त असामी माझे सासरे म्हटल्यावर अनेकजण हादरले होते..पण लग्नानंतर भाई वैद्यांनी जातीनं लक्ष घालून शिष्टाई केल्यामुळं काही बाका प्रसंग उद्भवला नाही..मित्रांनीही खंबीर साथ दिल्यानं ते दिवस निभावले गेले . भाऊ ग्रामीण भागातले असले तरी उच्च शिक्षित ..60 च्या दशकात ते पुण्याच्या एसपी कॉलेजला शिकले..त्यांचा मित्र परिवार मोठा..कार्यकर्त्यांचं जाळं अफाट..माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि वाळव्याचे राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांची खास मैत्री..मनाने सच्चे. वृत्ती साधी भोळी.. धूर्तपणा कधी त्यांना जमला नाही..बहुदा त्यामुळं त्यांना राजकारणात अपेक्षित यश कधी लाभलं नाही.. राजकीय संबंधांचा त्यांनी कधी फायदा घेतला नाही.. साफ मनाची मंडळी राजकारणात असण्याचा तो काळ होता.. शरद पवार त्यांना खूपच ज्युनियर..पण, पश्चिम महाराष्ट्रातल्या कित्येक बड्या नेत्यांना दूर सारून त्यांनी राजकारणात घेतलेल्या गतीचं भाऊंना आश्चर्य वाटायचं....त्यांच्या अंगात राजकारण भिनलेलं होतं... मी पुण्यात अन् पत्रकारीतेत आहे म्हणजे बहुदा पवारांच्या नेहमीच्याच संपर्कात असेन असं त्यांना वाटायचं बहुदा..फोनवर बोलताना घरची ख्यालीखुशाली विचारून झाली की त्यांचा पहिला प्रश्न असायचा , काय म्हणतोय शरद ? त्यांचे पवारांशी संबंध बहुदा असे एकेरी असावेत...मी आपलं काहीबाही बोलून वेळ मारून न्यायचो...पण राजकारण या विषयावर भाऊंची गाडी एकदा आली की मग ते भरभरून बोलत रहायचे..पवारांनी फक्त एका समाजाला धरून राजकारण केलं, त्यांनी राजकारणात किंवा समाजकारणात फक्त एकाच समाजाच्या लोकांना पाठबळ दिलं .त्यामुळं अन्य समाजाच्या कित्येक चांगल्या नेत्यांची गणितं बिघडली असं ते  बोलून दाखवत..त्याबद्दल त्यांच्या मनात खंत असायची..भाऊ राजकारणात जेवढे माहीर, तितकेच प्रसंग निभावून नेण्यातही.. दहा वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतोय..मोठ्या आई निवर्तल्यानं मी घरच्या मंडळींना घेऊन माळशिरसला गेलेलो...तेव्हा नाथाच्या मळ्यातल्या शेतात ते रहात...तिथं पोचलो तर नातलगांची, गाववाल्यांची मोठी गर्दी झालेली..त्यातल्या काहींना माझं लग्न पसंत नव्हतं..आम्हाला पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या.....तिथं आता नेमकं काय करायचं हे लक्षात न आल्यानं मी काहीसा अवघडलो होतो..भाऊ एका बाजेवर बसले होते..बाजूला सारे जमिनीवर कोंडाळं करून बसलेले..बऱ्याच नजरा आमच्याकडं होत्या..माझ्या चेहऱ्यावरचे भाव भाऊंनी ओळखले..ते उठून आले व हात धरून मला बाजेवर त्यांच्या शेजारी बसवलं...क्षणात सारा तणाव निवळला...मी आश्वस्त झालो...

भाऊंनी गावात पहिली शाळा काढली..माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई एकदा या शाळेला भेट देऊन गेलेत..घरच्या अन् गावातल्या पुढच्या पिढ्या उत्तम शिक्षण घेतील याची भाऊंनी सदा काळजी घेतली..त्यांना राजकीय वारस काही निर्माण करता आला नाही. राजकारण हाच् अखेरपर्यंत भाऊंचा  ध्यास राहिला..अगदी तसा पत्रकारितेचा वसा सोमनाथसरांनी शेवटपर्यंत जपला..राजकारणातल्या जमातवादाचा मुद्दा भाऊंना पुरून उरला.. पत्रकारितेतल्या जमातवादाची झळ सोमनाथ सरांना बसली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सोमनाथ सरांशी माझे संबंध जुने..ते मला खूपच् सिनियर .70..80 च्या दशकात ध्येयवादी पत्रकारांची एक सॉलिड फळी मराठी पत्रकारितेत होती..सर त्या परंपरेचे पाईक...कुठलाही प्रश्न अभ्यासू वृत्तीनं मुळातून मांडण्याची त्यांची पद्धत आमच्या पिढीतल्या पत्रकारांना मार्गदर्शक ठरली..एकदा ईदच्या दिवशी ते किशोर कुलकर्णी सरांसोबत माझ्या चाळीतल्या घरी शुभेच्छा द्यायला आलेले..तेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा ओळख झाली..तेव्हा ते मुंबई सकाळमध्ये वृत्त संपादक होते...त्यांचा पत्रकारितेतला आवाका व्यापक होता...मुळात ते खूप बुद्धीमान .. मराठी, इंग्रजी साहित्याचा त्यांचा दांडगा व्यासंग...ते सरकारचे राजपत्रित अधिकारी होते..पत्रकारितेची आवड म्हणून नोकरी सोडून ते या व्यवसायात रमले ..पुणे, कोल्हापूरमधल्या नोकरीनंतर त्यांची बदली मुंबईला झाली..तिथं त्यांचे व्यवस्थापनाशी काही मतभेद झाले...मग तडकाफडकी राजीनामा देऊन ते बाहेर पडले..पुढे लातूरच्या 'एकमत' चे संपादक झाले..त्या काळात पत्रकारितेत आमूलाग्र बदल होत होते.. या पेशाचे व्यवसायात अन पुढे धंद्यात झालेलं स्विकारणं त्यांना रुचलंही नाही अन पचलंही नाही..या क्षेत्रातली नवी पिढीही वेगाने पुढे जात गेली...कंपूशाही, जमातवाद वाढत गेला..सर या क्षेत्राच्या मूळ प्रवाहापासून दूर होत गेले...कधी मनाने बाजूला झाले...कधी दूर सारले गेले..पण सरांचा जनसंपर्क कायम राहिला..राजकारणातल्या दोन पिढ्या त्यांनी जवळून पाहिलेल्या...कित्येक नवे जुने राजकारणी अन अनेक नामवंत पत्रकार त्यांच्या नित्य संपर्कात होते.
तसे ते मूळचे धुळ्याचे.. पब्लिक स्कूलमध्ये शिकलेले..त्या शाळेशी जुळलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही..तिथल्या माजी विद्यार्थ्याना एकत्र करून त्यांनी माजी विद्यार्थी संघटना सुरू केली...निरनिराळे उपक्रम राबवले..अलीकडच्या काळात ते थेट पत्रकारीतेत सक्रिय नव्हते..पण, लिखाणाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.. निरनिराळ्या वृत्तपत्रांसाठी नियमित लिहायचे..मुंबईवरची दोन अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहून त्यांनी पूर्ण केली..नव्या जमान्यातले लॅपटॉप, टॅब त्यांनी स्वीकारले..सर्व क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींविषयी ते सजग होते..फेसबुकसारख्या सोशल मीडियावर ते मार्मिकपणे व्यक्त व्हायचे.. त्यांच्यातला हाडाचा पत्रकार एखाद्या छोट्या टिपणीतूनही दिसून यायचा..जव्हारच्या आदिवासी भागात कार्यरत असलेल्या डॉ. अनिता पाटील या सरांच्या कन्या..जव्हारच्या भेटीत त्यांच्याशी परिचय झाल्यानंतर सरांशी असलेलं नातं अधिक गहिरं झालं..मी जव्हार आणि लगतच्या भागात अनेकदा भटकायला जातो याचं त्यांना कौतुक होतं.. त्यांच्याशी नेहमीच बोलणं व्हायचं...मुंबईला गेलो की त्यांच्याकडं आवर्जून जायचो..खूप उमदा आणि दिलदार माणूस..त्यांचे अभ्यासाचे विषय निराळे होते..त्यांच्या गप्पांमधून निरनिराळ्या विषयांवर मस्त गप्पा व्हायच्या...

शिवाजीभाऊ आणि सोमनाथ सर दोघेही कमालीचे सभ्य ..सरळमार्गी ..राजकारणाच्या दलदलीत राहून भाऊ कधी बरबटले गेले नाहीत अन् पत्रकारितेच्या मोहमयी दुनियेत राहून सोमनाथसरांनी कुठे पाय घसरू दिला नाही..दोघेही आपापल्या क्षेत्रातल्या थोर आसामी..पण उभयतांच्या पदरात नियतीनं त्यांच्या क्षमतेइतकं माप  कधीच टाकलं नाही...आता वयाची चाळीशी उलटून पन्नाशीकडे प्रवास सुरु असताना सध्याच्या एकंदरच् साऱ्या  गढूळ वातावरणामुळं मी अनेकदा अस्वस्थ असतो..मन खिन्न होत राहतं.. अंधारछाया वाकुल्या दाखवत असतात..मग,उगवत्या पिढीतल्या मुलांचा उत्साह नवी उमेद जागवतो हे खरं...पण अधिक  अनुभव असलेल्या थोरामोठयांचा संवादही मनाला तजेला देत राहतो... त्यांच्या जिव्हाळ्याच्या दोन शब्दांचा जगायला आधार वाटतो..गेल्या काही वर्षांत एकापाठोपाठ असे आधारवड कोसळायला लागलेत..यंदाच्या वर्षी  10 जानेवारीला शिवाजीभाऊ अन् 16 नोव्हेंबरला सोमनाथसर इहलोकी गेले..माझ्यावर मुलासारखं प्रेम करणारे दोन पाटील या एकाच वर्षात  गमावले...यापेक्षा आणखी हानी काय असू शकते ?

No comments:

Post a Comment