Wednesday, 21 November 2018

स्टेनगन

गँगवॉरमध्ये स्टेनगन
- - - - - - - - - - -

 कोळखे.......पुणे-मुंबई रस्त्यावरील पनवेलजवळचे छोटेसे गाव. उमलत्या पिढीच्या गावीही नसेल की आपल्या गावाजवळ वीस वर्षांपूर्वी महाभयंकर नरसंहार घडला आहे. चाळीशी उलटलेल्या माणसांना 'ती' घटना आठवत असेल आणि त्यापेक्षा प्रौढ मंडळी तर ती घटना कधीच विसरू शकणार नाहीत. अगदीच कोणाला आठवण नसली, तर या गावाच्या रस्त्याखालची जमीन उकरा. अशोक जोशी आणि त्याच्या साथीदारांच्या रक्ताने माखलेली माती आजही तेथे सहजपणे सापडेल. मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात भीषण हत्याकांड असा उल्लेख केल्या जाणा-या अशोक जोशीच्या हत्येच्या निमित्ताने अंडरवर्ल्डमध्ये पहिल्या प्रथम स्टेनगनचा वापर केला गेला. या घटनेला नुकतीच चोवीस वर्षे झाली; पण, ना पोलीस ही घटना विसरलेत, ना अंडरवर्ल्डमधील शूटर्स. अंडरवर्ल्डची ताकद, दहशत, क्रौर्य आणि दगाबाजी याचे हे उत्तम उदाहरण आहे.
 अशोक जोशी म्हणजे मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक जबरदस्त ताकद. कांजूरमार्ग परिसरात लहानाचा मोठा झालेला अशोक थोडक्या अवधीत नावारुपाला आला होता. ते त्याच्या कमालीच्या धाडसी स्वभावामुळे आणि जिगरबाज वृत्तीमुळे. कॉंग्रेसचे तत्कालीन नेते नानजीभाई शाह आणि त्यांचा भाऊ छोटुभाई शाह यांचे खून त्याने केले होते. अर्थात अंडरवर्ल्डमध्ये अशोकचे नाव होण्यामागे तत्कालीन परिस्थितीही तितकीच कारणीभूत होती. दाऊद आणि त्याच्या मित्रांपासून फुटून मध्य मुंबईत बलाढ्य ताकद उभी केलेला रमा नाईक 21 जुलै 1988ला पोलीस निरीक्षक राजन काटदरेंच्या गोळीची शिकार बनला. त्यामुळे भायखळा कंपनी काहीशी अधू झाली. दगडी चाळीतील अरूण गवळीने या टोळीची सूत्रे हाती घेतली. कांजूरमार्गचा अशोक जोशी त्याला येऊन मिळाला. अशोकचे त्याचभागातील शिवसेनेचा नगरसेवक खिमबहादूर थापाशी कट्टर वैर होते. थापा दाऊदच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्यामुळे अशोक भायखळा कंपनीला जाऊन मिळाला. अशोकमुळे भायखळा कंपनी अधिक तगडी झाली. अंडरवर्ल्डमध्ये एक सूत्र आहे; ते म्हणजे स्वत:चा जीव वाचवायचा असेल, तर प्रतिस्पर्ध्याला शक्य तितक्या लवकर उडवायचे. त्यामुळेच 90 च्या दशकामध्ये मुंबईवर वर्चस्व ठेवण्यासाठी दाऊद, गवळी आणि अमर नाईक यांच्या टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष उडाला होता. थापाला शह देण्यासाठी भायखळा कंपनीला साथ देणारा अशोक जोशी प्रर्तिस्पर्ध्यांच्या नजरेत सलू लागला होता. मृत्यू त्याच्या डोक्याभोवती घिरट्या घालू लागला होता.
 तो नऊ ऑक्टोबर 1988चा दिवस होता. कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात हजेरी लावून अशोक साथीदारांसमवेत बाहेर पडला. रेल्वे येणार असल्याने समोरील रेल्वे फाटक बंद होते. मारुती मोटारीतून अशोक व त्याचे साथीदार उतरले. अचानक तेथे उभ्या असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अशोकचे तिघे मित्र तेथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अशोक त्या हल्ल्यातून बचावला. छोटा राजनच्या इशा-यावरून साधू शेट्टीने हा हल्ला घडवून आणला होता. अशोकवर हल्ला ही भायखळा कंपनीला धोक्याची घंटा होती. त्यामुळे प्रतिहल्ल्याची तयारी सुरू झाली. अरूण गवळीचे जल्लाद तयार होते. दगडी चाळीत शस्त्रांना धार काढली गेली. कारस्थाने शिजू लागली. शिकारी सावजाच्या मागावर गेले आणि अशोकवरील हल्ल्याचा बदला घेण्याचा दिवस उजाडला तो सतीश राजेचे डेथ वॉरंट घेऊनच. राजे हा दाऊदचा जिवश्चकंठश्चच मित्र आणि डी कंपनीचा ब्रेन. अब्जाधीश असलेला राजे त्या दिवशी विदेशी बनावटीच्या कारमधून निघाला. 21 नोव्हेंबर 1988 चा तो दिवस दाऊद कंपनीला हादरा देणारा ठरला. सिग्नलजवळ कार थांबताच गवळी टोळीच्या शूटर्सनी डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच राजेच्या कारच्या बुलेटप्रूफ काचा भल्यामोठ्या हातोड्याने फोडल्या. शूटर्सनी त्याच्या देहाची चाळणी केली. विदेशात बसलेला दाऊद चरफडला.त्यावेळी त्याचा सर्वाधिक विश्वासू असलेल्या छोटा राजनने प्रतिहल्ल्याची तयारी केली. त्यांच्या निशाण्यावर होता अर्थातच अशोक जोशी. मुंबईतील परिस्थिती धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने दडी मारायचा निर्णय अशोकने घेतला होता. त्यासाठी तो चॉकलेटी रंगाच्या मारुतीमधून चार मित्रांसमवेत मुंबईहून पुण्याकडे निघाला. 
4 डिसेंबर 1988 चा तो दिवस. मुंबईहून भरधाव वेगाने निघालेली अशोक जोशीची कार भल्यापहाटे साडेचारच्या सुमारास पनवेलजवळच्या कोळखे गावाजवळ थांबली. ड्रायव्हर श्यामसुंदर नायर लघुशंकेसाठी खाली उतरू लागला आणि अशोकच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती खरी ठरली. मागून भरधाव गाडीतून आलेले दाऊदचे शूटर्स उतरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. सुनिल सावंत व अनिल परब उर्फ वांग्या यांच्याकडे चक्क स्टेनगन्स होत्या. त्यांच्याबरोबरच साधू शेट्टी, दिवाकर चुरी, डॅनी नेपाळी, संजय रग्गड यांच्याकडेही अत्याधुनिक शस्त्रे होती. त्यांनी तब्बल 180 राऊंड फायर केले होते. जवळपास अर्धा तास फायरींग सुरू होते. साहजिकच कारबरोबरच अशोक आणि त्याच्या चौघा साथीदारांच्या देहाची अक्षरश: चाळण झाली होती. पलीकडे श्यामसुंदर नायरचा मृतदेह पडला होता. त्याच्या डोक्यात एकच गोळी घुसली होती. ती अशोकच्या पिस्तुलातून निघालेली गोळी होती. दगलबाजी केलेल्या नायरला अशोकने नेमके टिपले होते. नायरनेच अशोकची टिप साधू शेट्टीला दिली होती. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर दाऊद टोळीच्या शूटर्सनी ठिकठिकाणी सापळे रचले होते. पण, पहिल्याच सापळ्यात अशोकचा खात्मा झाला. मुंबईची पोलीस पथके एव्हाना तेथे पाहोचली होती. सर्वत्र रक्तमांसाचा अक्षरश: चिखल झाला होता. रक्ताचे पाट वाहून तेथील जमिनीत रक्त अक्षरश: झिरपू लागले होते. भल्या पहाटे गावाजवळ झालेल्या या भयानक प्रकाराने गावकरी भयभीत झाले. दाऊद टोळीचे ते क्रौर्य पाहून पोलिसही अचंबित झाले. टोळीयुद्धात स्टेनगन वापरली गेल्याची नोंद झालेली ही पहिलीच घटना.
 अशोक जोशी आणि त्याच्या चौघा साथीदारांच्या या हत्येने भायखळा कंपनी हादरली. अंडरवर्ल्डने दाऊदच्या क्रौर्यापुढे लोळण घेतली. अशोकच्या हत्याकांडापूर्वी दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या. डी कंपनीचे स्टेनगनधारी शूटर्स दगडी चाळीत घुसले होते आणि अशोकची 'गेम' होण्याच्या चार दिवस आधी छोटा राजन दुबईतून गुप्तपणे मुंबईला येऊन गेला होता. त्यानेच या गेमच्या प्लॅनवर अखेरचा हात फिरवला असे बोलले जाते. गेल्या चार डिसेंबरला अशोक जोशी हत्याकांडाला 25 वर्षे पूर्ण झाली. कोळखे गावातील जुन्या ग्रामस्थांपासून मुंबई पोलिसांपर्यंत, तळोजा कारागृहातील अरूण गवळीपासून ते कराचीतील दाऊद इब्राहिमपर्यंत आणि ऑर्थर रोड कारागृहातील अनिल परबपासून ते मलेशियात दडलेल्या छोटा राजनपर्यंत सर्वांनाच अशोक जोशीच्या हत्याकांडाची आठवण ताजी झाली नसेल तरच नवल..!

No comments:

Post a Comment