Wednesday, 21 November 2018

आकांत

आकांत
 - - - - -

          निरभ्र आकाशात पौर्णिमेचा चंद्र खुलला होता.... पिठूर चांदण्यांनी आसमंत भरून गेला होता... वा-याच्या शीतल स्पर्शाने तिलोत्तमादेवींचे अंगांग शहारून गेले ....रथाचे पांढरे शुभ्र अबलख अश्व चौखुर उधळले होते....वारा कापित हा रथ वेगाने निबीड अरण्यातून दौडत होता....मुक्कामाचे ठिकाण समिप आले ...तिलोत्तमा देवींना हलकी निद्रा येऊ लागली ... त्यांचा खांद्यावरचा पदर वा-याने हलकेच घसरला... महाराज शौर्यवर्णांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी अलवारपणे शेव सावरला..त्या हलक्याशा स्पर्शानेही तिलोत्तमा देवी दचकल्या...त्यांच्या गालावर लालिमा पसरला....अर्धोन्मिलीत नेत्रांनी त्यांनी महाराजांकडे पाहिले....ते गालातल्या गालात मंद स्मित करीत होते....शाही विवाहाच्या सप्ताहभर चाललेल्या धामधुमीने दोघेही शिणले होते...शाही परंपरेनुसार सायंकाळी झालेल्या वैदीक विधींनंतर अकरा गजराजांची सलामी घेऊन गर्भदान विधीसाठी तिलोत्तमादेवींसह महाराज परनामाळ अरण्यातील राजवाड्याकडे निघाले होते...

        धैर्यवर्धन महाराजांनंतर कुशवाह साम्राज्याचे महाराज म्हणून शौर्यवर्ण महाराजांचा राज्याभिषेक झाला होता...दूरदूरच्या नगरांमधून बड्या साम्राज्यांचे राजे महाराजे कुटुंब कबिल्यासह या भव्यदिव्य समारंभाला आवर्जून आले होते. कुशवाह साम्राज्याच्या शौर्याच्या परंपरेची, बड्या नात्यागोत्यांची आणि अफाट श्रीमंतीची कीर्ती चौफेर पसरली होती. धैर्यवर्धन महाराजांबद्दल सा-यांनाच कमालीचा आदर होता... या साम्राज्याकडून आमंत्रण मिळणे ही  राजघराण्यातील मंडळींना अप्रुपाची गोष्ट होती....या भव्यदिव्य समारंभातच वीरेश्वर साम्राज्याचे महाराज धुरंधरसिंह यांची कन्या तिलोत्तमा शौर्यवर्णांच्या नजरेत भरली....शेलाटा बांधा, पुष्ट गोलाई, सुवर्णसमान तेजस्वी कांती, रेशमी केस, मोत्यासमान दंतपंक्ती, चाफेकळी नाक, आणि मनाचा ठाव घेणारे हरीणीसमान टपोरे डोळे असे कुणाच्याही चटकन नजरेत भरणारेच तिलोत्तमा देवींचे सौंदर्य होते....  भरजरी वस्त्रे परिधान केल्यानंतर तिचे सौंदर्य नक्षत्रासमान भासत होते......महाराज धुरंधर सिंह यांना आपल्या या लाडक्या कन्येचे शुभमंगल करायचे होते....पण, तिलोत्तमाला कोणी पसंतच पडत नव्हते...  तिलोत्तमा देवींच्या जन्मानंतर काही दिवसांतच त्यांची माता राणीसाहेब सुलोचनादेवींचे प्राणोत्क्रमण झाले... माझ्या या देवीसमान मुलीला कधी दु:ख देऊ नका असे वचन घेऊन त्यांनी देह ठेवला ...धुरंधर सिंहानी मातेच्या प्रेमाला पारख्या झालेल्या तिलोत्तमा देवींचे बालपणापासून कोडकौतुकातच संगोपन केले ..विवाहासाठी वरसंशोधन मोहीम आखली होती... पण....तिलोत्तमादेवींना कुणी पसंत पडले नाही.....कित्येक नगरीचे राजकुमार, सरदारपुत्र येऊन गेले...पण या हरीणाक्षीने कुणाला वरले नाही....राजकुमार शौर्यवर्णांच्या धारदार नजरेने मात्र त्यांच्यावर जणु गारूडच केले.......उभय राजघराण्यांच्या परंपरांनुसार मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचा पाणिग्रहण समारंभ पार पडला....राजज्योतिषी पीतांबर नाथांनी व राजवैद्य मंगलदास यांनी राजपुत्र व राजकन्येचे नाडी-ज्योतिष पाहून गर्भदान विधीसाठी मुहुर्त मुक्रर केला. त्यासाठी हे नवविवाहित दांपत्य वायूदूत रथातून प्रणवविवारी राजवाड्याकडे निघाले होते......राजवाडा नजरेच्या टप्प्यात असतानाच एकाएकी आकाशप्रपात झाल्यासमान आवाज झाला आणि विवाहाच्या बालपणीच्या मोरपंखी आठवणीत गढून गेलेल्या  तिलोत्तमादेवी दचकल्या . . .मोठ्या भयाने त्यांनी महाराजांकडे पाहिले.....ते स्वस्थ होते...आकाशाकडे नयन लावून ते विचारांत गढले होते....रथाचे घोडेही स्वस्थपणे दौडत होते.....हा ध्वनी कशाचा? हेच त्यांना कळेना.....मग महाराज स्वस्थ कसे? रथ संयत कसा?  हे सत्य की स्वप्न हेच तिलोत्तमा देवींना कळेना . . रथाचा सारथी जंबुनाथाकडे त्यांनी पाहिले....तो महाराणींकडेच पाहत होता....त्याच्या चर्येवर आगळेच स्मित होते..... नजरभेट होताच त्या चमकल्या....चेह-यावर घर्मबिंदू जमा झाले...कंठ कोरडा पडला....नेत्रातून टपाटप आसवे ओघळू लागली.....

 ...घोड्यांच्या टापांचा आवाज संथ होत स्तब्ध झाला....महाराजांची तंद्री भंग पावली....त्यांनी शेजारी आसनस्थ झालेल्या तिलोत्तमा महाराणींकडे पाहिले...दीर्घ झोपेतून उठल्यासारखी त्यांची चर्या झाली होती...चेहरा कोमेजला होता ....मनावर मणामणाचे ओझेच होते जणु.....राजप्रासादाजवळ् रथ थांबताच चाकर व दासदासी स्वागतासाठी पुढे आल्या....बुंदीकेने  या राजदांपत्याचे औक्षण केले . . .. नजर काढली...ती या प्रासादातील सर्वात वृद्ध दासी....महाराजांनी मोत्याच्या कंठा तिला नजर केला....राजप्रासादातील वैभव पाहून तिलोत्तमा देवी हरखून गेल्या....वीरेश्वर राजघराणेही खूप श्रीमंत होते....पण कुशवाहच्या राजेश्वरांनी देशोदेशीच्या विविध उंची वस्तुंचा जमवलेला संग्रह  डोळे विस्फारणाराच होता. . .नंबुदी राजांना सामोरा गेला...स्नानासाठी हमामखाना  खाना व सेवक सज्ज असल्याचा सांगावा त्याने दिला.....बुंदीकेनेही खास दासींना महाराणींच्या शाही स्नानासाठी नियोजित केले होते....चाकरांनी थंड- गरम पाण्याच्या सहस्त्र धारांनी त्यांना  सचैल स्नान घातले.......सुवर्ण भस्म, रौप्य भस्माने कांती तेजस्वी झाली. गुलाब पुष्पाच्या अर्काने, सुवासिक तैलद्रव्यांनी, उटण्यांनी आणि चंदन भस्माने महाराणींचा थकवा निघून गेला....शरीरांध्रे मुक्त झाली....सुवर्णासमान कांती अधिक झळाळू लागली.... प्रसन्न गंधाने तनामनात तजेला आला.....रेशमी केस मोरपिसाप्रमाणे अधिक मुलायम झाले....सुस्नात शरीरावर रेशमी वस्त्रप्रावरणे चढवली गेली.  सुवर्ण चषकांमधून केशरयुक्त दुध ..त्यासोबत जातीवंत आंब्यांच्या, अंजीरांच्या, डाळींबांच्या फलाहाराने व सुकामेव्याच्या सेवनाने तिलोत्तमा देवींना तजेला वाटू लागला....फलाहार करून महाराज शयनगृहात गेले....बुंदीकाने महाराणींच्या उजव्या दंडातील बाजूबंद काढला....शयनगृहात जाण्याची ती सूचक खूण होती....संथपणे गजचालीने जाऊन तिलोत्तमाने शयनगृहाचे दालन बंद केले.....

           शयन कक्ष हा या भव्य राजप्रासादातील अत्युत्तम महाल होता....उंची, मऊशार गाद्यागिर्द्यांनी सागवानी मयुरपलंग सजला होता....महालाच्या किना-यांमधून सुगंधाच्या हलक्या तुषारांनी वातावरण थंड,सुवासिक झाले होते....चारही बाजूंना लावलेल्या उंची दर्पणांनी, सप्तरंगांची उधळण करणा-या झुंबरांनी महाल सजला होता...केवड्याच्या उन्मादक गंधाने गात्रे मिलनासाठी आतूर झाली...महाराजांनी अलवारपणे तिलोत्तमादेवींना आलिंगन दिले....त्यांच्या भक्कम....उबदार मिठीत देवी विरघळून गेल्या...  आश्वासक स्पर्शाने आश्वस्त झाल्या..... त्यांच्या अर्धोन्मिलित ओष्ठांमध्ये महाराजांचे ओष्ठ मिसळले आणि त्यांच्या तनामनातून जणु वीजेची लहर दौडत गेली...चैतन्याच्या प्रवाहांनी दोन शरीरे तादात्म्य पावली . .तनामनाला तृप्तता मिळत होती. ...उत्तररात्र कधीच उलटून गेली होती .. .उष:कालाची वर्दी देत चंद्रमाची आभा फिकट होत चालली होती....प्रणयाचा उत्सव सुरूच होता.... तनामनावर उत्कट प्रीतीची धुंदी चढली होती.....देवींच्या आरक्त गालांवर अधिक रक्तिमा चढला होता....चैतन्य आणि तृप्तीच्या या सर्वांगसुंदर भावनेने तिलोत्तमा देवी महाराजांच्या कुशीत निद्रीस्त झाल्या....स्वर्गसुख म्हणजे हेच्‌ काय? असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला .अन्‌ एकाएकी त्या मूर्छित पडल्या . ..

              पहाटवारा अंगाला काहीसा झोंबू लागल्याने महाराजांना जाग आली...बाजूला पाहिले तर तिलोत्तमा देवी बिछान्यावर नव्हत्या....आजुबाजूलाही नव्हत्या.....महालातही नव्हत्या....महाराजांना काही उमजेना...ते महालाबाहेर आले...द्वारपालाने त्यांना कुर्निसात केला....तिलोत्तमा देवी कुठे आहेत??? महाराजांच्या धीरगंभीर आवाजाने अन्य सेवक पळत आले....तिलोत्तमा देवींना महालातून बाहेर पडताना कोणी पाहिले नव्हते....बुंदीका डोळे चोळत आली.....इतर दास-दासीही जमले....समस्त चाकरांनी तिचा शोध सुरू केला...प्रासादाच्या परिसरात...उद्यानात....सगळीकडे पाहिले......पण तिलोत्तमा दिसली नाही......उंचच उंच प्रासादातील सर्व महालांमधील दिवे प्रखर करण्यात आले....महाराज प्रासादाच्या पायथ्याशी बसून एकेका महालाकडे विस्मयित  नजरेने पाहत होते.....सर्वात वरच्या मजल्यावरील एका महालातील दिवे विझल्याचे महाराजांच्या निदर्शनास आले....क्षणभर ते थबकले....मग एकाएकी भिंतीवर लावलेल्या म्यानातील समशेर उपसून ते प्रासादाच्या पाय-या चढू लागले.....दुंबूक आणि उत्प्रांत हे खासे अंगरक्षक त्यांच्या पाठोपाठ चालू लागले....महाराज थांबले....दोघांनाही पाठीमागे न येण्याचे  सांगून ते पुढे निघाले.......समशेरीवरील माणके लकाकू लागली होती.......पूर्वेकडे सूर्यनारायणाचे आगमनाची वर्दी देणारी लालिमा पसरली होती....अकरा माळे चढून महाराज त्या महालाजवळ आले... त्यांनी गवाक्षाला कान लावला....हलकी कुजबुज...श्वास-निश्वास....उसासे त्यांच्या कानावर येऊ लागले ....त्यांची चर्या क्रूद्ध झाली...डोळे लालबुंद झाले....तिलोत्तमाऽऽऽऽऽअसा आवाज देत लत्ताप्रहार करून त्यांनी द्वार उघडले......अंधारात गडबड उडाली....शय्येवर अर्धवस्त्रांतील तिलोत्तमादेवी सारथी जंबुनाथाच्या बाहुपाशात होत्या...महाराजांची तळपायाची आग मस्तकात गेली.....त्यांनी समशेरीचा वार केला....तो चुकवून त्यांच्याकडे चमक्तृत नजरेने पाहत जंबुनाथ वस्त्रे  सावरू लागला.....महाराजांनी पुन्हा तरवारीचा वार केला....तोच.....महाराजऽऽऽऽऽऽम्हणत तिलोत्तमाने त्यांचे पाय धरले......त्यांची शुद्ध हरपली...
'' दूर व्हाऽऽऽऽऽऽऽतिलोत्तमादेवीऽऽऽऽऽतुमची पात्रता, शुचिता  पहिल्याच दिवशी...नव्हे ...पहिल्याच रात्री सिद्ध झाली........जा तुम्हीऽऽऽऽऽऽऽऽमाझीच नव्हे......बुंदिकाचीही दासी होण्याचीही तुमची पात्रता नाही.....राजवंशाला काळीमा लावणारं तुमचं रक्त नक्कीच हीन वंशियच असणार......स्त्री वधाचं पातक माझ्या हातून होण्यापूर्वीच निघून जाऽऽऽऽऽऽमहाराज कडाडले....राजवंशाची सारी इभ्रत धुळीला मिळाल्याने ते संतापाने थरथरत होते....त्यांनी तरवारीचा वार थेट शंबुकाच्या मानेवर केला......त्याची मान उडाली...पण रक्ताचा एक थेंबही ओघळला नाही....त्याच्या धडावर दुसरेच मस्तक आले....तो ताम्रवर्णिय चेहरा पाहून महाराज दिग.मूढ झाले.....तिलोत्तमाला शुद्ध आली......'' मी कलंकीत नाही....मी प्रतारणा केली नाही....मी व्यभिचार केला नाही.......वैषयिक वासनेचा मला लवलेशही नाही... .महाराजऽऽऽऽऽ...महाराजऽऽऽऽऽमी फक्त तुमच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी या कलीच्या दुताशी संग केला..... गर्भदान संस्कारासाठी आपण निघालो असताना राजप्रासादाजवळच तुमचे प्राण हरण करण्यासाठी यमराज आले होते.....रथाचे चक्र मोडून तुम्हाला ते नेणार होते....मातेच्या अगाध कृपेमुळे मला यमराजांचे दर्शन झाले....आपले प्राण नेऊ नये यासाठी मी करूणा भाकली.....माझ्या सौंदर्यावर साक्षात यमराजही भाळले.....माझ्याशी एकदा संग केलास...तर महाराजांचे प्राण मी नेणार नाही अशी कठोर अट त्यांनी घातली.....आपल्या जीवापुढे, आयुष्यापुढे, प्राणापुढे मला कोणतीही गोष्ट व्यर्थ आहे.....माझ्या प्राणप्रिय नाथासाठी मी ही अट कबूल केली.....माझा गर्भदान विधी झाल्यानंतरच मी संग करीन......या संगाचा कोणताही संकर होऊ शकणार नाही असे वचन मी यमराजांकडून घेतले....त्यांनी शंबुकाचे प्राण हरण करून त्याचे रूप घेतले.......हे साक्षात यमराज आहेत....त्यांनी आपल्या प्राणांची अनमोल भेट मला दिलीय.....तुमच्या समशेरीने ते मृत्यू पावणार नाहीत.... ज्यानं आपले प्राण वाचवले त्याच्यावर हल्ला करण्याची क्षत्रियांची परंपरा नाही....''....तिलोत्तमा देवींचे बोल ऐकून महाराज हतबद्ध होऊन पाहतच बसले......एकाएकी शक्तीपात होऊन ते कोसळले....बुंदिका...दुंबूक ....उत्प्रांत ...सारे सेवक महाराजांना सावरण्यासाठी धावले....तिलोत्तमाने महाराजांचे मस्तक मांडीवर घेतले...तिच्या टपो-या डोळ्यांतून घळाघळा आसवे ओघळू लागली....राजवैद्य मंगलदास धावले.....त्यांनी नाडी तपासली.......तिलोत्तमा देवींची नजर समोर  गेली......विकट हास्य करीत यमराज निघाले होते......शीलहरण करूनही त्यांनी डाव साधला होता...महाराजांचे प्राण केव्हाच निघून गेले होते.........महाराजऽऽऽऽऽअसा जीवाच्या आकांताने टाहो फोडून तिलोत्तमा कोसळली.........मध्यप्रदेशातील गिवाहारी अरण्यात आजही .....महाराजऽऽऽऽऽ अशी तिलोत्तमा देवींची साद ऐकू येते. . . . .

No comments:

Post a Comment