Wednesday, 21 November 2018

नाती


नाती  
- - - - -
बारमध्ये फारशी गर्दी नव्हती. थोड्यावेळाने दोघेजण आले. हॉलच्या कोप-यातल्या टेबलला बसले. आमचं खाणपिणं तब्येतीत सुरु होतं ..थोड्यावेळाने मैत्रीणीचा फोन आला. शिट्टीवर एक गाण ऐकव म्हटली. खरंतर मी कुठे आहे? काय करतोय? विमान कितपत उडलयं याचा अदमास घ्यायचा तिचा प्रयत्न होता.. मी कोप-यात गेलो. 'लग जा गले.. 'च्या सुरेल धूनवर शीळ वाजवली. कोप-यातले दोघे माझ्याकडे पाहत होते. दोघेही पन्नाशीच्या उंबरठ्यावरचे. एक शिडशिडीत, काळसर वर्णाचा, करड्या दाढीमिशांचा. त्याच्याबरोबरची स्त्री चुणचुणीत, भडक मेकअप केलेली.  मी बसतोय तोच त्यांची गाणी सुरू झाली.' 'ओह रे ताल मिले नदी के जलसे...पासून इक प्यार नगमा है.. निरनिराळ्या गाण्यांचे मुखडे ते गुणगुणत होते. त्यांच्या भेण्डयांचा खेळ भलताच रंगला..अंगचटीला येऊन ते गाणी म्हणत होते.  त्यांच्यात  काय नातं असावं हे नेमकं काही कळत नव्हतं. त्यांना यापूर्वी कुठंतरी पाह्यलय हे लक्षात आलं..पण कुठे हे आठवत नव्हतं. बल्बच्या उजेडात त्या महिलेच्या गळ्यातली बटबटीत माळ चमकली. अन एकाएकी माझ्या नजरेसमोर गुलाबरावांचा चेहरा तरळला. पत्रकारितेत नवोदित असताना बिबवेवाडीतील दिलेली एक बातमी आणि नंतर त्यामागील वास्तव लक्षात आल्यावर चकीत झालेली माझी मनस्थिती मला अवचित आठवली.
              साधारणत: ९० च्या दशकात बिबवेवाडी परिसर छोटा होता. स्वारगेटच्या पुढे बंगल्यांची वसाहत, तुरळक वस्ती आणि थेट बिबवेवाडी गावठाण होतं. संध्याकाळी सातनंतर रस्ता ओस पडायचा. वाटमा-या व्हायच्या. एकदा त्या भागात राहणारं एक तरूण जोडपं ऑफिसमध्ये आलं. दोघे साधारणता: पंचावीशितले असावेत. तरूण  उंच, दाढीवाला होता. त्याच्यासोबाताची तरुणी सावळी, भडक मेकअप केलेली होती. तिच्या गळ्यातल्या माळा लक्ष वेधून घेत होत्या. दोघे परस्परांचे सख्खे भाऊ बहिण. त्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. सामान बाहेर फेकून दिलं होतं. बराच मारही लागला होता. पोलिसांकडे कम्प्लेंट केलेली.पण, कुणी लक्ष घालत नव्हतं. त्यामुळं तिथं रहायची भीती वाटत होती. ते साहजिकही होतं म्हणा. त्यांनी मारहाण  झाल्याचे, बंगल्यातील सामान इतस्तत: फेकल्याचे, बंगल्याच्या बाहेर फेकून दिलेल्या वस्तूंचे बरेच फोटो आणले होते. पोलिसांकडे केलेल्या अर्जाची कॉपी आणली होती. मी ती वाचून पाहिली. त्याची झेरॉक्स काढून घेतली. इतर माहिती टिपून घेतली. अशोक चांदगुडे साहेब तेव्हा क्राईम ब्रांचला होते. ते बिबवेवाडीतच रहायचे. त्यांना फोन केला. पोलीस स्टेशनला काहीजणांशी बोललो. मग, निर्धास्त रहा असं सांगून त्या दोघांना निरोप दिला. सगळी माहिती देऊन झाली, फोनाफोनी झाली, तरी ते दोघे जाईनात. घुटमळायला लागले. मग जरा संशय आला. त्यांना पुन्हा खुर्चीवर बसायला सांगून विचारपूस केली. नेमका तपशील सांगताना ते काहीतरी लपवताहेत, असं वाटू लागलं. मला ते लक्षात आलंय हे त्यांनाही समजलं. मग इकडचं तिकडचं सांगत ते म्हणाले, अहो खर सांगू का..हे सर्व आमच्या वडिलांनी म्हणजेच गुलाबारावांनी केलंय. मांजरीत त्यांचं मोठं प्रस्थ आहे. संपत्तीची भारी हौस. सारखे पैसे पैसे करत असतात. इतकी माया कमावलीय,पण एक रुपया कधी कुणाला देत नाहीत. आम्ही मोठे झालो तरी आमच्या नावावर काही केलेलं नाही. सारी इस्टेट त्यांनाच हवी आहे. ते मांजरीला रहातात. उसाचा गडगंज पैसा आहे. पण आम्हाला काही देत नाहीत. घरावर हक्क सांगितला म्हणून त्यांनी आम्हाला घरातून काढलं. गावापासून लांब असलेला हा बंगला तरी आमच्या नावावर असावा अशी इछा आहे. वडलांच्या त्रासाला कंटाळून आम्ही इथे रहायला आलो. ते ही त्यांना बघवत नाही. बंगला सोडावा म्हणून सारखे शिवीगाळ करतात. खलास करून टाकीन अशा धमक्या देतात. आम्ही कसेबसे जीवाला घाबरून राहतोय. त्यांना काही उलट बोलत नाही. दुरुत्तरे करत नाही. पण,  गेल्या आठवड्यात त्यांनी कहर केला. आठ-दहा गुंड घेऊन ते आले. बंगल्यातून आम्हाला हाकलून दिलं. आमचं सामान फेकून दिलं. टीव्ही फोडला. लाईट  फोडले. बेडला आग लावली. आम्हाला मारहाण केली. आम्ही पोलिसांना बोलावलं. पोलीस आले आणि पाच मिनिटात निघूनही गेले. वडलांनी भरपूर पैसे दाबून गप्प बसवलंय. आता तुम्ही सांगा आम्ही कुठं जायचं ? त्या  सुशिक्षित भावाबहिणीची व्यथा ऐकून मी चक्रावलो. पैशासाठी एक पिता कोणत्या थराला जाऊ शकतो या विचाराने संताप आला. हे प्रकरण धसाला लावायचं मी ठरवलं. ऑफिसमध्ये वरिष्ठांना कल्पना दिली. फोटो दाखवले. दुस-या दिवशी पेपरमध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झालेली जोरदार बातमी वाचून पोलिसांची चक्रे फिरली. हे दोघे पुन्हा दुस-या दिवशी आभार मानायला ऑफिसमध्ये येऊन गेले. जरा समाधान वाटलं. आपण बातमी दिल्यांनं काहीतरी हालचाल होतेय हे पाहून बरं वाटलं.
   दोन दिवसांनी नेहमीप्रमाणे सीपी ऑफिसला गेलो.  भेटून जा, असा चांदगुडे साहेबांनी प्रेसरूममध्ये मला निरोप ठेवला होता. नेहमीचा राऊंड झाल्यावर त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, मी चौकशी करतोय त्या सा-या प्रकरणाची. लोक  माहितीतले आहेत. प्रकरण जरा वेगळ वाटतंय. संध्याकाळी काय ते उलगडा होईल. मी कळवतो तसं. रात्री काम उरकून घरी निघालो. साहेबांचा फोन आला. म्हणाले, गुलाबराव उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येतील. त्यांचं  ऐकून घ्या. मग बोलू आपण सविस्तर. मला काही कळेना. हे गुलाबराव माझ्याकडे का येणार ते. उगा उत्सुकता लागून राहिली.
   दुस-या दिवशी जरा लवकरच ऑफिसला गेलो. राऊंड घेतला. इतर फोनाफोनी सुरू होती. प्यून आला. म्हणाला गुलाबराव म्हणून कोणी भेटायला आलेत. मी हातातली कामं  उरकली. व्हिजिटर्स रूममध्ये गेलो. पांढरा  झब्बा, धोतर, गांधीटोपी घातलेले गुलाबराव उभे राहिले. गृहस्थ साठीचा. पण, हाडपेर मजबूत होतं. कपाळाला टिळा लावला होता. मुद्रा अस्वस्थ होती. त्यांचं नाव बातमीत आल्याने ते वैतागले होते. दु:खी झाले होते. संथ, सावकाशपणे ते बोलत होते. म्हटले, मी साधा शेतकरी माणूस. वडिलोपार्जित शेतीवाडी  आहे. शेजारीच कॅनॉल आहे. भरपूर ऊस होतो. पैसाअडका, सोनंनाणं बक्कळ आहे. भावकीत मान अन गावात पत आहे.  मी सांगेल तोच गावचा सरपंच होतो. उरसाचा मानही आमच्याकडेच. आजूबाजूला नातलग भरपूर. पंचक्रोशीत वट आहे. कुठलाही पुढारी गावात आला तरी आपल्या घरात चहापाणी झाल्याशिवाय पुढ जात नाही. मी राजकारणात नाही. पण तालुक्याच्या, जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या शब्दाला किंमत आहे. बायका, पोरं, घर, संसार सगळं छान चालं होतं. पण आमच्या दिवटयांनी पार अब्रू घालवून टाकली . गुलाबरावांचे डोळे पाझरू लागले होते. त्यांना हुंदका फुटला. मी त्यांना पाणी दिलं. चहा मागवला. घुटके घुटके चहा पीत ते काहीसे शांत झाले.
   तुमच्या बातमीनं खूप बदनामी झाली हो. मला मान्य आहे, मी गुन्हा केलाय. मी मारहाण केली. आमच वारक-याचं घर. आम्ही कधी शिवीगाळ, मारामारी करत नाही. पण आता काय झालंय..सहनशक्ती संपली हो..एक मुलगा आणि एक मुलगी कशी नक्षत्रासारखी..लहानपणी खूप कोडकौतुक केले. शाळा शिकवली. कॉलेज शिकवलं. ते ही चांगले शिकले. लग्नाचा टाईम आला. पण हे दोघेही ऐकेनातच. कॉलेजसाठी, कामासाठी हे पुण्यात असायचे. मग ते दोघेही कुठल्यातरी बाईच्या भजनी लागले. तिला गुरू केलं. घरात मोठ्ठा फोटो लावला. त्या अम्मा की माता कोण आहेत त्यांचा. त्यांच्या आरत्या सकाळ संध्याकाळ होऊ लागल्या. तिथवरही ठीक होतं. पण, हे दोघे कायम जोडीने एकत्र फिरू लागले. बाहेरगावी जाऊ लागले. जवान भाऊ बहिण असे एकत्र फिरू लागल्यावर लोक काहीबाही बोलू लागली. पण, यांना कसली फिकीर नाही. त्यांना खूप समजावून सांगितलं ..पण नाही..त्यांच्या माता म्हणतात जगात नाती दोनच. नर आणि मादी. बाकी आई, वडिल, भाऊ, बहीण, वगैरे सारं झूट असतं.. या दोघांनी सारी लाज गुंडाळून ठेवली. लोकांसमोर अंगचटीला काय येतात, मुके काय घेतात...काही काही विचारू नका. गावात वाईट चर्चा सुरू झाली. आमच्या तोंडात शेण घालायचच् फक्त बाकी ठेवलंय. मी त्यांना घरातून हाकलून दिलं. सहा महिने बिबवेवाडीतल्या बंगल्यात त्यांनी संसार मांडलय. तिथं ते नवराबायकोसारखे राहतात. सा-या गावभर, नातेवाईकाना हे समजलं. आम्हाला कुठं तोंड दाखवायला जागा उरली नाही. कुणी आम्हाला लग्न कार्यात बोलवत नाही. मयताचा निरोप देत नाही. कसल्या कार्यक्रमाच निमंत्रण देत नाही. नको नको झालंय सारं. मरून जावं वाटतंय. यांची आई तर पार खचून गेलिय. अंथरून धरलंय. कुणी तिला बघायला येत नाही. कुणी हालहवाल विचारात नाही. वाळीतच टाकलंय आम्हाला जवळपास. तुम्ही बघा एकवार त्या माउलीची दशा. इकडं आमची अशी अवस्था झालीय..अन हे दोघे फिरताहेत गळ्यात गळे घालून..त्यादिवशी काही नातलग घरी आले. आमची पार छी थू केली. इतकी वर्षे जे डोळ्याला डोळा भिडवत नव्हते, असे लोकपण काहीही बोलायला लागलेत. मग त्या दिवशी डोकं फिरलं. आम्ही गेलो बिबवेवाडीत.  दोघांना बांबूनं बडवून काढलं... त्या घरातूनही हाकलून दिलं आणि टाळा ठोकून टाकला ..आपलीच औलाद अशी निघाल्यावर मी तरी काय करू ? गुलाबराव हमसाहमशी रडू लागले.त्यांच्या सवालाला माझ्याकडं उत्तर नव्हतं..
   गुलाबराव गेल्यानंतर चांदगुडे साहेबांना फोन लावला. ते म्हणाले, बरेच दिवस चाललाय हा प्रकार. गुलाबराव सच्चा माणूस आहे. ते सांगताहेत ते शंभर टक्के खरं आहे. आम्ही सगळी माहिती क्रॉसचेक केलीये. त्यांची पोरं विचित्र आहेत. विकृत आहेत. त्यामुळं समाजात त्याचं नाक कापलं गेलंय.  तुम्ही ही बाजू लक्षात घ्या..मगच या प्रकरणाच्या पुढच्या बातम्या द्या. हडपसर- मांजरी भागातल्या सोर्सेसकडून मी गुलाबरावांची माहिती घेतली. एकंदर ते म्हणत होते तो प्रकार खरा होता. नात्यांची अशीही गुंतागुंत असू शकेल असं तेव्हा कधी डोक्यातच आलं नव्हतं. मी त्या बातम्या थांबवल्या. ती जोडीही बरेच दिवस विचारायला आली नाही. मग एक-दोन सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते दोघे गळ्यांत  गळे घालून फिरताना दिसले.एकदा तर आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाताही असेच जोडीने आलेले पाहिले. अक्षरश: शिसारी आली..आताही कुणी तसल्या बटबटीत माळा घालून मिरवताना दिसलं की नजरेसमोर गुलाबरावांचा चेहरा येतो...


No comments:

Post a Comment