Wednesday, 21 November 2018

आरडीबी: एक सर्जनशील माणूस

आरडीबी : ' सर्जन' शील बापमाणूस
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
           फेसबुकवर पोस्ट लिहिताना मी एक कटाक्ष पाळलाय, तो म्हणजे जे काही लिहायचंय ते आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या व्यक्तीबाबत, प्रसंगाबाबत लिहायचं...क्वचितप्रसंगी काल्पनिक कथा, कल्पना मांडायला तशी काहीच हरकत नाही. .पण आपण आपल्या जीवनात रोज कितीतरी माणसांना भेटतो, कितीतरी निरनिराळ्या क्षेत्रातील मित्र-मैत्रिणी आहेत...कॉलेज लाईफ एन्जॉय केलंय..चाळीतलं चाकरमान्यांचं जीवन अनुभवलं, पत्रकारीमुळे कित्येक क्षेत्रातली कितीतरी माणसं जोडली गेली.क्राईम रिपोर्टींगच्या नात्यानं वाट्टेल ते प्रसंग अनुभवलेत. मग, काल्पनिक व्यक्तिरेखा लिहण्यापेक्षा अस्सल लिहण्यावर भर दिला. त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. खरंतर पत्रकारीतेतील लिखाण निराळं आणि हे ललित लिखाण निराळं. ' कथा एका डॉनची ' या दहा वर्षांपूर्वीच्या पुस्तकानंतर आणि त्याआधी फार काही ललित लेखन केलं नव्हतं.  फेसबुकचं व्यासपीठ मिळाल्यावर मात्र धडाधड लिहित सुटलो. वास्तव लेखन असल्यानं अनेकांना ते प्रसंग भावतात. माझ्या अनेक व्यक्तिरेखा अनेकांच्या काळजात घर करून बसल्या. त्याबाबत खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मध्यंतरी' बुलेटप्रूफ शंकर' ही माझा मित्र शंकर चव्हाणवर लिहिलेली पोस्टही अनेकांच्या पसंतीस पडली. त्यामध्ये एक प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती. ''  ' शंकर' खुपच ओळखीचा वाटला, छान व्यक्तीचित्रण केलेत तुम्ही ! हि मंडळीच फ़ार आगळीवेगळी असतात । माझे " वार्ड ५ केईएम् " आपल्याला भेंट द्यावे अशी इच्छा आहे . कृपया पत्ता एसएमएस करावा...'  मुंबईच्या केइम रूग्णालयाचे बॅकबोन समजल्या जाणारे विख्यात शल्यविशारद डॉ. रवी बापट यांची ही प्रतिक्रिया होती. क्षणभर उडालोच. डॉ. बापट म्हणजे अगदी शरद पवारांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याचा, साहित्यिकांचा, कलाकारांचा आणि गुन्हेगारांमध्येही आपल्या वैद्यकीय ज्ञानाबाबत, शल्यचिकीत्सेच्या कौशल्याबद्दल गाढा विश्वास  केलेला वैद्यक क्षेत्रातील बाप माणूस. ते जेव्हा दाऊदचा ब्रेन असलेल्या सतीश राजेपासून ते अमर नाईकचा ब्रेन रमेश भोगले यांच्यापर्यंत निरनिराळ्या क्षेत्रातील रुग्णांबद्दल खुसखुशीत शब्दांत लिहितात ना तेव्हा हे डॉ. बापट माणूस म्हणून किती मोठे आहेत याची प्रकर्षाने जाणीव होते. त्यांचं 'वॉर्ड नं. 5, केईएम' हे पुस्तक पूर्वी कधीतरी चाळलं होतं..डॉक्टरांची कमेंट आल्यावर त्यांना कॉन्टॅक्ट केला..खूप हळूवारपणे, आपुलकीने आणि छान बोलले...लिखाणाचं कौतुक केलं ..त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांनी एका सहका-यामार्फत 'वॉर्ड नं 5 केईएम' आणि 'पोस्टमार्टेम' ही त्यांची दोन्ही पुस्तकं माझ्यापर्यंत पोचलीसुद्धा...त्यांच्या सुरेख हस्ताक्षरातील नाव आणि स्वाक्षरीसह...खरंच एवढा मोठा माणूस...कोणतीही ओळखपाळख नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीचं कौतुक करतो काय? आणि थेट पुस्तकं पाठवून दिला शब्द पाळतो काय? खरंच सारंच अद्‌भूत..

          पुस्तकं पोचल्यावर लगेच मी झपाट्याने वाचून काढली.. देशविदेशातील वैद्यक क्षेत्रातील निरनिराळ्या मानद संस्थांचे सन्मान प्राप्त केलेले  डॉ. बापट केवळ वैद्यक, ज्येष्ठ शल्यविशारद, केईएमचे प्रमुखच नव्हे, तर तळागाळातील माणसापासून ते सर्व क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांशी सारख्याच सलगीने बोलणारा ग्रेट माणूस आहे याची प्रचिती आली. डॉ. बापट यांनी बॅडमिंटनच्या कोर्टमध्येही एक काळ गाजवलाय. अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत ते खेळलेत. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रूग्ण कुणीही असो त्याची पत, प्रतिष्ठा न पाहता कौशल्य पणाला लावून उपचार करणा-या डॉ. बापट यांनी सर्वोत्तम विद्यार्थ्याचाही पुरस्कार पटकावलाय आणि उत्कृष्ठ शिक्षकाचाही. 'वॉर्ड नं. 5, केईएम' हे त्यांचे आत्मकथन अफलातून आहे. त्यात त्यांनी उपचार केलेल्या निरनिराळ्या क्षेत्रातील बड्या लोकांपासून ते सर्वसामान्या नागरिकांच्या आगळ्यावेगळ्या केसेसची माहिती त्यांनी खुसखुशीत शब्दांत मांडली आहे. खरंतर शल्यकर्म म्हणजे आपरेशन ही आपल्यासाठी किती जिकीरीची, टेंशनची बाब..पण बुटाची लेस बदलून टाकू असं आपण ज्या सहजपणे बोलतो ना तितक्या सहजतेने डॉ. बापट एखाद्या रूग्णाच्या शस्त्रक्रियेची माहिती देतात आणि वाचक अवाक्‌ झाल्याशिवाय राहत नाही. एकतर या क्षेत्रातील चाळीसहून अधिक वर्षांचा अनुभव, त्यात 'केईएम' ची जबाबदारी, तेथे येणारे हरत-हेचे पेशंट आणि त्यांच्याशी त्यांचे निर्माण झालेले स्नेहबंध वाचताना वाचक हरखून जातो. हेवा वाटतो या माणसाचा आणि आभाळाएवढ्या उंचीचा हा माणूस आवर्जून आपल्याशी लिहितो-बोलतो या जाणीवेनं खूप आदर वाटतो..
 डॉ. बापट यांनी त्यांच्या ' पोस्टमार्टेम' या पुस्तकाच्या माध्यमातून वैद्यक क्षेत्रातील सद्यस्थितीची जी चिरफाड केलीये ना ती ते आणि फक्त तेच करू शकतात. त्यांनाच तो अधिकार आहे. त्या लिखाणामागील त्यांची तळमळ लक्षात घेता त्यांच्यातील माणुसकीचा झरा कसा कायम वाहता आहे, हे ही लक्षात येते...एक काळ असा होता की डॉक्टरी किंवा वैद्यक हे व्रत होते. पुढे तो पेशा बनला. नंतर त्याचे व्यवसायात रुपांतर झाले आणि आता या व्यवसायाचा उद्योग कसा बनला आहे, हे डॉ. बापट यांनी खूप तळमळीने, तपशीलवार आणि उदाहरणे देऊन मांडले आहे...त्यातून त्यांची तळमळ, उद्विग्नता दिसत येते. या व्यवसायावरून माणसाचा विश्वास उडू लागला आहे हे सांगताना ते व्यथित होतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यातील दरी रूंद होत चालल्याचे पाहून त्यांना दु:ख होते. वैद्यक व्यवसायाला पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करावा हे सांगताना त्यांच्या मनात अद्याप आशा टिकून असल्याचे दिसून येते. प्रयोगादाखल रुग्णाला 'गिनीपिग' करता कामा नये ही त्यांची विचारधाराच त्यांची या पेशाबाबत असलेली आस्था अधोरेखित करते.

          वैद्यक क्षेत्रातील जवळपास पाच दशकांचा अनुभव असलेल्या डॉ. बापट यांचा मित्रपरिवार अफाट. विद्यार्थ्यांमध्ये आणि वैद्यक क्षेत्रात ' आरडीबी ' या नावाने ते फेमस. त्यांची वैद्यकशाखेसाठीची पुस्तकेही विद्यार्थ्यांमध्ये प्रिय. विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी या पुस्तकांच्या माध्यमातून वैद्यक शाखेची कवाडे उघडून दिली आहेत.  'एमबीबीएस' च्या शेवटच्या वर्षाचे अनेक विद्यार्थी डॉ. बापट यांच्या 'केस प्रेझेंटेशन्स इन सर्जरी  ' पुस्तकावर विसंबून असतात. वर्षभर अभ्यास केला नाही, तरी डॉ. बापट यांचे हे छोटेखानी पुस्तक आपल्याला निश्चितपणे तारून नेईल याची त्यांना खात्री असते आणि ती खरीही ठरते. त्यांच्या शिष्य परिवारामध्येही राज्यातीलच नव्हे, तर देशातील कित्येक नामवंत सर्जन्सचा समावेश आहे.  डॉ. बापट वैद्यक शाखेसंदर्भात उत्तम व्याख्याने देतात. खरी संस्कृती भारतीयच, पाश्चात्यांची केवळ जीवनशैली आहे हे त्यांचे मत. पाश्चात्य वैद्यकीय संशोधने भारतीयांनी प्रमाण मानण्याची गरज काय? हा विचार ते सप्रमाण सिद्ध करतात. आधुनिकतेची कास धरतानाच अस्सल भारतीय परंपरा आणि संस्कृतीची शिदोरी डॉ. बापट यांच्यासोबत असते.
 
             खरंतर डॉ. बापट यांच्याबाबत किंवा त्यांच्या पुस्तकाबाबत टिप्पणी करण्याची माझी पात्रता नाही. पण, ज्या स्नेहाने व प्रेमाने त्यांनी ही पुस्तके पाठवली तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आता हे सारे लिहिण्यापूर्वी मगाशीच त्यांच्याशी फोन झाला.  दिलखुलास भाषेत कधी येतोयस मुंबईत म्हणून त्यांनी पत्ता दिला आणि ' ये भरपूर गप्पा मारायच्यात आपल्याला ' असं अगत्याचं आमंत्रणही दिलं...खरंच कोणत्याही क्षेत्रातील मोठी माणसं ही मोठी बनतात ती त्यांच्या ज्ञानामुळं, गाढ्या व्यासंगामुळं, विद्वत्तेमुळं, कौशल्यामुळं आणि ती बाप माणूस बनतात ती त्यांच्या साध्या वागण्यानं आणि कुणाशीची चटकन संवाद साधण्याच्या सौजन्यानं..खरंच
डॉ Ravi Bapat....  . यू आर सिंप्ली  ग्रेट्ट्.....

No comments:

Post a Comment