Wednesday, 21 November 2018

नजर


नजर :- - -
- - - - -
मुरूडला आल्यावर दवाखान्यात जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं...पण  किना-यावर कुणी फेकलेली बाटलीची काच लागली...बोट चिरलं गेलं चांगलंच...गेलो डॉक्टरकडं....डॉ. लिमये चांगलेच संतापले होते....बहुदा पेशंटने1 काही गाढवपणा केलेला असणार..राकेश अंबुर्ले माझा मुरुडचा मित्र...त्याने सांगितल्यानुसार मी डॉ. लिमयेंकडं आलो होतो....बाजारपेठेत त्यांचं छोटंस क्लिनीक...बाहेर बाकड्यावर भली मोठी पेशंट्सची रांग ....पण पायातून रक्त ठिबकत असल्यानं थेट आतच गेलो...पेशंटस काही बोलले नाही...पण डॉक्टरच जरा कावले....मी लाईन मोडून गेल्याचा राग आला असावा त्यांना... पायाची जखम बघून शांत झाले...हलकेच त्यांनी जखम पुसून ड्रेसिंग केले...कुठले, काय विचारपूस केली...तितक्यात रिसेप्शनिस्टने काहीतरी गडबड केली . . .आणि डॉक्टर पुन्हा ओरडले तिच्या अंगावर...फी देऊन मी निघालो...तसे खुणेने थांबवले त्यांनी....थोडावेळ बसा इथेच...लगेच चाललात तर ब्लडींग होईल म्हणत त्यांनी थांबवले..
मी पाहत होतो डॉक्टरांकडं....त्यांची जरा माहिती घेतली...खरंतर मुंबईचे होते ते...खेड्यात प्रॅक्टीस करायची इच्छा होती त्यांना....तीस वर्षांपूर्वी मुरुड चिमुकलंच होतं...मग आले इथं...राह्यले..आता इथलेच झालेले....गावात खूप मान त्यांना....त्यांचं वैद्यकीय ज्ञानही चांगलंच असावं...गावातली सगळी माणसं चांगली ओळखत होती त्यांना....मान देत होती..सहज त्यांच्या नजरेकडे लक्ष गेलं....काहीतरी वेगळीच भासली...खोल अंत:करणाचा ठाव घेणारी नजर वाटली...काहीतरी...गूढ ..अगम्य वाटलं....पेशंट तपासताना  एकीकडे ते माझ्याशीही बोलत होते...राकेशचा मित्र म्हणून चांगलं ट्रीट केलं त्यांनी....दरम्यान, बावीस-पंचवीशीतला एक तरूण आला...अस्वस्थ वाटतं होतं त्याला...डॉक्टरांनी तपासलं ...बिड्या कमी कर आता...नाहीतर मरशील असं त्याला ओरडले.. माझ्यापेक्षा जास्त सिग्रेटी इतर पोरं ओढत्यात...त्यांना कसा त्रास होत नाही? त्याने आडवा सवाल टाकला ...जरा व्यायाम कर...सकाळी पळत जा जरा...तुम्ही आताची पोरं नाऽऽऽऽ जरा आम्ल पित्त वाढलं की येता डॉक़्टराच्या दारात...आईबापाकडं पैशे जास्त झालेत ना...जरा व्यायाम करायला नको....दिवसभर नुस्तं कॉम्प्युटरच्या समोर बसायचं...काडीचं काम नाय.....म्हाता-यांनी दिवसभर राबायचं...शेतात राबायचं...वाडीत राबायचं...घरादारातही राबायचं....पोरांनी नुस्त्या ढुंग़णाखाली गाड्या घेऊन बोंबलत फिरायचं गावात....कधी चांगलं-चुंगलं खायचं नाही...कधी समुद्रात पोहणं नाही....बीचवर चालणं नाही...संध्याकाळी पोरी बघायला तेवढं बीचवर येऊन बसायचं..जरा चाललं की दम लागणार ...जरा काय वजन उचललं की जीव घाबरा होणार....अंगमेहनत नको यांना...जमतच नाही...डॉक्टरांच्या तोंडाचा पट्टा सुरू होता..तुम्ही कायपन बोल्ता...तो उद्दामपणे म्हणाला...बाप सकाळीच माडी पिऊन पडतो एका बाजूला....सगली कामं मीच करतो....माहिती नाय...काय  नाय अन्‌ उगा तोंडाचा पट्टा चालवताय.....समोर डॉक्टर आहेत याचं त्याला काही सोयरंसुतक नव्हतं...तो दुरुत्तरं करत होता...निर्ढावल्यासारखं बोलत होता....डॉक्टरांचं बोलणं झाल्यावर निघतो मी...असं म्हणून तो निघाला...औषध घे वेळेवर म्हणत डॉक्टरांनी त्याच्याकडं पाहिलं...उभयतांची नजरानजर झाली बहुदा....आता काय करणार? घरी जाऊन?? डॉक्टरांचा स्वर मऊ झाला होता....काही नाही औषधं घेतो...आणि झोपतो...त्याचाही आवाज एकाएकी मवाळ झालेला...हे बघ ..मी तुझ्या चांगल्यासाठी सांगत होतो...तुला पटलं नसलं तर सोडून दे....माझ्यावर राग धरू नकोस...मी कधीच कुणाला मुद्दाम दुखवत नाही....हां कधीमधी तोडून बोलतो...पण....तुला कधी रागवलो पण नाही.....शांतपणानं जा....कुणाला दुखवू नकोस बाबा....आणि ...हो परत येऊ नकोस...छान जा...काही नस्तं रे बाबा..काही नाही आपण झोपेत कसं शांत संयत असतो...तशीच शांतता असते..कायमची.....मी चमकून पाहिलं....त्यांच्याकडं...त्यांचे डोळे त्या तरूणाकडं रोखलेले होते.....अगदी त्याच्या डोळ्यांत खोल रोवलेले होते...तो ही त्याच नजरेनं पाहत होता त्यांच्याकडं...शहारेच आले माझ्या अंगावर.....तो आलाय कशासाठी...आणि त्यांचं बोलणं चाललंय काय? काहीच समजेनासं झालं मला.... त्या तिरमिरीतच बाहेर पडलो.......
संध्याकाळ झाली.... अंधार पडला....मित्रांनी शेकोटी पेटवली...मस्त शेकोटीभोवती गाणी, खाणं-पिणं सुरू होतं...पण  मनच्‌ लागत नव्हतं त्यात...मग राकेशचा..फोन आला.....पाय कसा आहे म्हणून विचारलं....मी बोललो त्याच्याशी .....त्याला दुपारचा प्रसंग सांगितला डॉ. लिमयेंचा.....तो
अवाक झाला....काही नाही रे...डॉक्टर भारी आहे....पण जरा काहीसा चक्रमही आहे...आधी काय बोलतो..मग काय बोलतो...मधूनच तिसरंच संदर्भहीन ...कायंतरी चालतं त्याचं....अशी तरणीताठी पोरं आली की झापत असतो...तू काय मनावर घेऊ नकोस..म्हणून त्याने फोन ठेवला.....रात्री लॉजवर गेलो खरा....पण झोप काय लागत नव्हती....रागानं बोलणा-या डॉक्टरांचा अचानक मऊ झालेला त्यांचा स्वर जसाच्या तसा कानावर पडत होता....त्यांची ती गूढ नजर अस्वस्थ करून टाकत होती....आणि त्या मुलाचा आधीचा निर्विकार चेहरा...आणि नंतर डॉक्टरांशी बोलत असतानाचा मवाळ स्वरही कानावर येत होता...जणुकाही दोघांचा तो संवाद माझ्यासमोर आत्ताच चालू होता.....पहाटे कधीतरी डोळा लागला.....जाग आली तेव्हा उन्हं डोळ्यांवर आली होती...अर्धवट झोपेनं डोळे चुरचुरत होते...पोरांची बीचवर जायची तयारी चालली होती...तुम्ही व्हा पुढं.....मी येतो मागाहून...लोळतो जरा....म्हणून मी रूमवरच पडून राहीलो....पायाचं ड्रेसिंग आज पुन्हा करायचं होतं....म्हटलं फ्रेश होऊन डॉ. लिमयेंकडं जाऊन मग समुद्रावर जाऊ...ताजातवाना होऊन लॉजच्या खाली आलो...दवाखान्याकडं जातानाच मारूती नाक्यावर एका मुलाचा फ्लेक्सवजा फोटो आणि हार दिसला.....मी निरखून पाहिलं आणि उडालोच.....तो बाब्या मयेकरच होता....कालचाच डॉक़्टरांचा पेशंट...दवाखान्यात आलेला..डॉक्टर त्याच्यावर चिडलेले...आणि नंतर त्याच्याशी हळवे होऊन बोललेले....आणि गप्पाही कसल्या? तर जणु काही तो आता मरणाला सामोरंच चालला आहे आणि डॉक्टर त्याला निरोप देत आहेत...असं सामोपचाराचं बोलणं....निरवानिरवीचं बोलणं....खूप धक्का बसला मला... काय प्रकार आहे ...काही समजेचना....डॉक्टरांचा खूप राग आलेला....त्यांनी त्याला का चांगल्या डॉक्टरकडं पाठवलं नाही? अलिबागला, पुण्याला, मुंबईला गेला असता तो तर वाचला असता ना?? मी तिरमिरीतच डॉक्टरांकडं निघालो.....पुन्हा राकेशचा फोन....खरंतर मगाशीच मी आंघोळीला गेल्यावर त्याचा कॉल आलेला... मिसकॉल पाहिला होता आणि त्याला पुन्हा फोन करायचंही विसरलो होतो...या खेपेस पटकन कॉल उचलला त्याचा...त्याला पटकन सांगायचं होतं मला....बाब्या मयेकरसंदर्भात.....मी हॅलो म्हणताच तो म्हणाला....तू म्हणालास ते खरं आहे....डॉक्टर निरवानिरवीचंच बोलत होते रे....तो बाब्या गेला ना....रात्री झोपेतच गेला बहुदा....डॉक्टरांनी त्याचं जाणं ओळखलं असावं . ...तुला सांगू का राकेश....मी पाहत होतो डॉक्टरांकडं नीट...त्यांच्या डोळ्यांत बाब्याचा मृत्यू दिसला होता मला......ज्या नजरेनं ते पाहत होते..त्यावरून बाब्याचा आत्मा बाहेर पडण्यासाठी धडपडताना त्यांना दिसत असावा....त्यामुळंच ते त्याला समजावत असावेत....त्याला शांतवत होते बहुदा.....
हा तुझा गेस्स झाला.....माझं मत उलट आहे....ते डॉक्टर होते...त्यांना काही जाणवलं असावं तपासताना....त्यामुळं ते बाब्याला सांगत असावेत....पण बाब्याचं काय??  बाब्या दिवसरात्र माडी पिऊन तर्राड असायचा...पण एक होतं ....त्याची नियत साफ होती...मन स्वच्छ होतं....या मंडळींना आत्मे पटकन दिसत असावेत....त्यालाच डॉक्टरांचा मृत्यू दिसला असावा....
म्हणजेऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.....मी जवळपास क़िंचाळलोच्‌......
एक्साईट होऊ नकोस.....डॉक्टर लिमये काल रात्रीच गेले.....
काऽऽऽय बोलतोऽऽऽस्स....?
हो....डॉक्टर त्यांच्या क्लिनिकमध्येच गेले रात्री....एक उचकी आली...बस्स....पाणी प्यायच्या आत त्यांचा खेळ संपला होता....रात्रीच्‌ त्यांची बॉडी मुंबईला हलवली....त्यांच्या मुलाकडं....तिथंच पहाटे संस्कार झाले त्यांच्यावर.....बाब्यालाच डॉक्टरांचा मृत्यू दिसला होता.....
मी सुन्न झालो.....दुपारी आम्ही पुण्याकडं निघालो......मारूती नाक्याजवळच्या फ्लेक्समधील बाब्याचे डोळे निस्तेज भासत होते.....बाजारातलं डॉक़्टरांचं क्लिनिक आलं.....तिथं त्यांचा फ्लेक्स....शहारे आले अंगावर ...काल याचं वेळेला मी त्यांना प्रथमच आणि प्रत्यक्ष भेटलो होतो आणि दोघांच्याही नजरेत एकमेकांचे आत्मेही पाहिले होते......डॉक्टरांच्या फोटोला नमस्कार केला  आणि गाडी वेगाने दामटली.


No comments:

Post a Comment