Wednesday, 21 November 2018

गुंतून रहायचं नाही..

गुंतून रहायचं नाही . .. . . . . . !
 = = = = = = = = = = = = = = = =
दोन वर्षांपूर्वीची दिवाळी....बहुदा लक्ष्मीपूजनाचाच दिवस होता....काहीतरी बिनसलं असल्यानं अस्वस्थ होतो....टीव्ही पाहत असताना मधूनच टीपॉयवर ठेवलेल्या मोबाईलचा स्क्रीन झळाळला...चेक केलं तर मेसेज...दोन-चार दिवस दिवस दिवाळी मेसेजेसच्या भडीमाराने अक्षरश: वैतागलो होतो...तरीही पाहिला.....भला लांब मोठा मेसेज होता तो...दिवाळीच्या शुभेच्छा...नव्या वर्षाच्या शुभेच्छा...आगामी दहा वर्षांत दिवाळी कधी आहेत  त्या तारखा आणि त्या दिवाळींच्याही शुभेच्छा...खाली नाव होतं....विनोद कविता आणि खन्ना परिवार....नंबर माहितीचा नव्हता आणि नावावरूनही काही अर्थबोध होईना....नंबर चेक केल्यावर लक्षात आलं तो विनोद खन्नाचा नंबर होता...आणि अक्षरश: आनंद गगनात मावेना....तसं तर दिवाळी आणि एरवीही सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे मेसेजेस पत्रकारांना येतच असतात..त्याची सवय झालीय आता....पण, तुम्ही मेसेज न पाठवताही तुमच्या सर्वाधिक आवडीच्या व्यक्तीचा अनपेक्षितपणे मेसेज आला तर होणारच ना आनंद!.......तसा विनोदचा मेसेज माझ्यासाठी नवा नव्हता...पण यापूर्वीच्या मेसेजेसमध्ये औपचारिकता असायची...माझ्या मेसेजला ते प्रत्युत्तर असायचे..पण हा त्याने स्वत: एका पत्रकाराला नव्हे, तर एका निस्सीम चाहत्याला आठवणीत ठेवून केलेला मेसेज होता.....मग काय त्या मेसेजनेच माझ्या दिवाळीला चार चॉंद लागले हे सांगायलाच नको....
विनोद खन्नाशी माझा परिचय झाला तो साधारणत: 1986-87 च्या सुमारास...परीचय मीन्स तो कलाकार म्हणून तेव्हा चांगला माहिती झाला. नीलायमला मॅटीनीला गुलजारचा 'मेरे अपने' लागला होता...कॉलनीतल्या पोरांसोबत पाहिला आणि हरखून गेलो....मर्दानगी आणि मार्दवतेचा अनोखा मिलाफ असलेले कमालीचे देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या विनोदवर आम्ही जीव ओवाळून टाकला....त्यावेळी विनोद जो आयुष्यात आला तो अद्याप तसाच टिकून आहे...मी आणि माझ्या काही मित्रांच्या आयुष्यात ...हो आमच्या आयुष्यात त्याचे अनन्यसाधारण स्थान आहे....तोपर्यंत मी बच्चनचा खूप फॅन होतो..आजही आहे...त्याच्या महानतेविषयी तीळमात्र शंका नाही....पण 'मेरे अपने' मधला विनोदचा श्याम जो डोक्यात बसला ना तेव्हापासून त्याचा अक्षरश: डाय हार्ट फॅन झालो...तो कायमचाच...मग त्याचे एकाहून एक पिक्चर बघत सुटलो...शक,अचानक,  इम्तेहान,मेरा गाव मेरा देस, इन्कार, खून पसिना, हेरा फेरी, कुर्बानी, हत्यारा, दयावान आणि अगदी अलिकडचा 'रिस्क'...त्याचा माझ्यावरील असर अधिक गहिरा होत गेला...'मुकद्दर का सिकंदर' मधील 'रोते हुवे आते है सब' या बच्चनच्या गाण्यात बसस्टॉपवर रेबनचा गॉगल घालून उभा असलेल्या विनोदची झलक कित्येकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली...आमच्या आधीच्या पिढ्यांमध्ये देवानंद आणि राजेश खन्ना यांच्या केसांची स्टाईल जोरात होती.आमच्यावेळी अनिल कपूर, जॅकी, सनी देओलसारखे केस ठेवण्याची फॅशन होती. पण 'मेरे अपने' मधील डॅशिंग विनोद खन्नाच्या आडव्या भांगाची स्टाईल मनात ठसली होती...त्यामुळे कितीतरी फॅशन आल्या आणि गेल्या पण मी अगदी गेल्या वर्षापर्यंत कटाक्षाने आडवाच भांग पाडायचो...नाना पाटेकरसारखी दाढी ठेवली असली तरी . . .. उगीच जरा विनोद खन्ना झाल्यासारखं मनात वाटायचं...त्याच्या त्या गॉगलमुळे मी ही त्याच टाईपचा गॉगल वापरायचो...एवढंच नव्हे, माझ्या चष्म्याचीही फ्रेम मी अद्यापही तशीच ठेवलीये...एवढा गहरा असर झाल्यावर मग विनोदला भेटणे क्रमप्राप्तच झाले होते...सकाळमध्ये नवीन असताना साधारणत: 1995 च्या सुमारास रेसिडेन्सी क्लबला एका कार्यक्रमाला विनोद येणार असल्याचं समजलं आणि तो कार्यक्रम पदरात पाडून घेतला...कार्यक्रम यथातथाच होता...पण त्यानंतर विनोदच्या चाहत्यांची एकच गर्दी उसळली. त्याच्यासोबत फोटो काढून घ्यायची चढाओढ सुरू झाली...त्यात युवतींचा भरणा साहजिकच अधिक होता...त्यावेळी त्याला भेटल्यावर कमालीचा एक्साईट झालो होतो...आमच्या अण्णा खरातने भारी ब्लॅक-व्हाईट फोटो काढला...आफीसमध्ये बातमी लिहून होईपर्यंत त्याने डेव्हलप-प्रिंट करून फोटो दिला...अक्षरश: रात्रभर झोप लागली नाही...कधी वाटलंच नव्हतं विनोदसोबत कधी मला फोटो काढता येईल ते.....त्यानंतर मला वाटतंय 1997 च्या गणेशोत्सवामध्ये पुणे फेस्टीव्हलचं उद्‌‌घाटन त्याच्या हस्ते होतं ....कार्यक्रम संपला... कुठल्याही परीस्थितीत त्याला उद्या गाठायचंच हे मनोमन ठरवलं....खूप प्रयत्न केल्यावर तो मुक्कामाला असलेल्या घराचा पत्ता मिळाला...मिलींद वाडेकर आमच्याकडे नुकताच फोटोग्राफर म्हणून रुजू झालेला...त्याला रात्रीच निरोप दिला...सकाळी आठच्या सुमारास दोघेही ओशो आश्रमाजवळच्या मॉं नीलमच्या घरी थडकलो... कुणाला काही विचारलं नव्हतं...कसली अपॉइंटमेंट नव्हती...विचार केला होता...काय होईल??फार तर फार हाकलून देतील...पण तसं काही झालं नाही...दरवाजा उघडला स्वामी चैतन्यकिर्तींनी...त्यांना थाप मारली की विनोद साहेबांशी कालच बोललोय. . .त्यांनी बोलावलं म्हणूनच आलो.. काही आढेवेढे न घेता त्यांनी घरात घेतलं...फ्लॅटच्या हॉलला लागूनच गार्डन होतं...कोवळी उन्हे आत येत होती आणि तेथील सोफ्यावर पांढरा शुभ्र झब्बा-कुर्ता घालून नुकतंच स्नान करून फ्रेश झालेला विनोद पेपर वाचत बसला होता..त्याचे तेजस्वी रूप पाहूनच आम्ही हरखलो..त्याला ओळख सांगितली...मुलाखत द्यायची विनंती केली...त्यानेही ती सहजपणे मान्य केली...आणि मग सुरू झाला गप्पांचा ओघ...माझाच माझ्यावर विश्वास नाही...पण सलग तीन तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो...त्याची पत्नी कविता दफ्तरी, स्वामी चैतन्यकिर्ती आणि मधूनच प्रिया ढल्ल हे ही अधूनमधून गप्पांमध्ये सहभागी झाले होते....80 च्या दशकात गीतांजलीपासून, पहिल्या पत्नीपासून विभक्त झालेला विनोद कमालीचा सैरभैर झाला होता..विमनस्क झाला होता. त्यावेळी तो पुण्यात ओशोंकडे तब्बल सात वर्षे होता..त्यांचा परमभक्त बनला...येथे तो सावरला गेला..त्यामुळे पुण्याविषयी त्याच्या मनात आगळे स्थान...ते लक्षात घेऊन मी अखेरचा प्रश्न विचारला...पुण्याविषयी एवढी ओढ आहे, तर येथेच स्थायिक का होत नाही???
''अरे, ती तर गम्मत आहे...एक लक्षात ठेव कायम...कशात गुंतून रहायचं नाही...गुंतलं नाही म्हणजे अपेक्षाभंग होत नाही आणि अपेक्षाभंग झाला नाही तर जीवनात दु:ख येत नाही...''
.. त्याचा निरोप घेऊन निघालो...कधी काळी रुपेरी पडद्यावर बच्चनला काट्याची टक्कर दिलेला....सात वर्षांच्या अज्ञातवासानंतरही रसिकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे स्वागत केलेला, दोनवेळा लोकांमधून निवडून येऊन खासदार झालेला, माजी केंद्रीयमंत्री विनोद खन्ना मला दारापर्यंत सोडवायला आला होता...एका चाहत्यापोटी त्याच्या मनातील ते प्रेम होते...आपुलकी होती . . ..घरी आलो तरी विश्वास बसत नव्हता...मी विनोद खन्नाशी एवढा वेळ गप्पा मारत होतो म्हणून... सप्तरंग पुरवणीत अख्खी दोन पानांची भली मोठी मुलाखत लिहिली...ऋताने 'उमदा माणूस' असं शीर्षक देऊन ती भारी सजवली....मग अधूनमधून माझा फोनवरून संपर्क होऊ लागला...कधी मूड असेल तर तो बोलतो नीट...नाहीतर ...नाही...गौतम राजाध्यक्ष म्हणाले होते एकदा...की विनोद खूप वेगळा आहे...ब-यापैकी अलिप्त आहे...प्रत्येक प्रश्नाचं त्याच्याकडचं उत्तर वेगळं असत..आणि त्याच्यामागे त्याची स्वत:ची एक तर्कसंगत विचारसरणी असते....तासभर तो आपल्याशी गप्पा मारत बसला आणि थोड्यावेळाने आपण पुन्हा त्याच्यासमोर गेलो, तर तो ओळख देईलच याची गॅरंटी नसते एवढा कधीकधी तो अलिप्तपणे वागतो....राजाध्यक्षांच्या या बोलण्याची प्रचिती अनेकदा येते आणि कित्येकदा अनपेक्षितपणे मेसेज पाठवून तो सुखद धक्काही देतो....विनोद खन्ना असाच आहे...आणि तो तसाच राहवा....आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 9 जानेवारीला सुरू होतोय. त्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन विनोद खन्नाचा गौरव केला जाणार आहे...आज पत्रकार दिनी ही गोड माहिती समजणे हा मी सुखद योगायोग मानतो. . . .

No comments:

Post a Comment