Wednesday, 21 November 2018

एसपीचं गॅदरिंग

एसपीचं गॅदरींग
- - - - -  - - - -  -
कॉलेज लाईफ हा जीवनातील अविस्मरणीय टप्पा..त्यातही एसपीला असाल तर आयुष्यातील सर्वाधिक संस्मरणीय दिवस ठरतात ते... एसपीचे कट्टे,  बारा पिंपळावर जमणा-या मुंजांप्रमाणे कुठूनकुठून जमणारी पोरं...जीवाला जीव देणारे दोस्त आणि डोळ्यातल्या काळजानं तीट लावणा-या मैत्रिणी इथंच भेटल्या...इथल्या हस-या, हळव्या, मोरपंखी क्षणांच्या, चांदण्यांची बरसात केलेल्या दिवसांची याद येत नाही असं कधी होतच नाही. कॉलेज लाईफ म्हणजे त्या भव्य वर्गातील लेक्चर्स...लेक्चर्स बंक करून कट्यावर केलेला टाईमपास......मैत्रीचे उभे आडवे धागे...नव्याने जुळलेले मैत्र.. ..मैत्रीचे..दोस्तीचे....प्रेमाचे..निरनिराळे अविष्कार... ' मुक्ता ' मधल्या कोल्ड कॉफीचा आस्वाद घेत रंगलेली गप्पांची मैफल...कॉलेजच्या इलेक्शन्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गॅदरींग.....
कॉलेज लाईफमध्ये गॅदरींगची सारेच आतुरतेने वाट पाहत असायचे. अनेक गोष्टी गॅदरींगच्या निमित्ताने होत असत. नव्या कपड्यांची, नव्या शूजची तजवीज केली जायची...कॉलेजमध्ये नेमका काय कल्ला करायचा? याची मनोमन आखणी व्हायची.... नवी 'लाईन'  शोधणे किंवा असलेल्या लाईनला प्रपोझ करणे, एन्टरटेनमेंटला नाचून धिंगाणा करणे, नाचताना जुनी खुन्नस काढणे असे अनेक प्रकार गॅदरींगला होतात. त्यात आमच्या एसपीचे गॅदरींग असले तर विचारायलाच नको... एसपीतील माझ्या पाच वर्षांच्या काळातील दोन गॅदरींग संस्मरणीय आहेत. एक आम्ही बारावीला असताना उधळले गेलेले..आणि एक जे आमचे आणि एकंदरच कॉलेज लाईफमधील डोळ्यांत पाणी तरळलेले अखेरचे गॅदरींग..... न्यायालयाच्या बंदीमुळे एसपीच काय सगळ्याच कॉलेजमध्ये निवडणुका बंद झाल्या आणि गॅदरींगही...त्यामुळं माझ्यासाठी अविस्मरणीय ठरलेलं आमचं अखेरचं गॅदरींग कॉलेजचंही अखेरचंच अधिकृत गॅदरींग ठरलं....

त्याकाळी गॅदरींग हे अधिकृतपणे कॉलेजकडूनच व्हायचे...जीएस अर्थात गॅदरींग सेक्रेटरीसाठी जोरदार निवडणुका व्हायच्या..त्या पार पडल्या की गॅदरींगची धामधुम तीन-चार दिवस असायची...त्यामध्ये एन्टरटेनमेंट हा महत्वाचा कार्यक्रम...आमच्या एन्टरटेनमेंटचा कार्यक्रम लेडी रमाबाई हॉलमध्ये व्हायचा...लेडी रमाबाई हॉल म्हणजे एकदम भारी...अगदी बाल्कनीसकट असलेला मस्त हॉल... स्टेज...वगैरे भव्य....एक आर्केस्ट्रा असायचा....त्यात गाणा-या सीमा शिंदे या सिनीयर मुलीचं नाव लक्षात आहे अजून...गाण्यांवर मुलं नाचायची बिन्धास्त...खूप कल्ला...दिवसातून तीन शो असायचे आर्केस्ट्राचे....फॅकल्टीनुसार....
मी बारावीला असताना झालं काय की सकाळच्या शोसाठी प्युनने हॉल उघडला आणि झाला अवाक....पाहतो तर स्टेजवरची सारी वाद्य फोडलेली.....बोंगो-कोंगो तोडून टाकलेले....सगळेच अवाक् झाले.....गडबडले.....सर आले...सारी मुलं जमली....सारा स्टाफ जमला..काही पोरं संतापली...काहींच्या डोळ्यांत पाणी तरळलं...पण, मुलांनी हिंमत हारली नाही... शो सुरू होईपर्यंत वाद्यांची पर्यायी व्यवस्था केली पोरांनी.....संध्याकाळच्या शो ला सायन्सची मुलं-मुली बसली आणि एकापाठोपाठ एकाला त्रास व्हायला लागला...कुणाचे डोळे चुरचुरताहेत...कुणाच्या नाकातोंडातून पाणी टपकतंय... कुणाचं डोकं गरगरतय..कुणाला चक्करच येतीये....कुणाच्या पोटात कळा येताहेत....काहीच कळेना...घाबरले सगळे....हॉलच्या बाहेर पळाले...अनेकांना हॉस्पिटलमध्ये आडमिट करायला लागलं......मग कळलं.....कुणीतरी मुद्दाम ग़ॅदरींग उधळायला विशिष्ठ केमिकलच्या पुड्या टाकल्या होत्या हॉलमध्ये.....घडल्या प्रकाराने सारेच हादरले....रीतसर पोलीस कंप्लेंटवगैरे झाली.....मग हा प्रकार ज्याने घडवला त्याचंही नाव समजलं.....पोलीस त्याच्या मागे लागले...तो झाला गायब.....दुस-या दिवशी सगळ्या पेपरमधून हे प्रकरण गाजलं.......जीएसच्या इलेक्शनमध्ये पडल्यामुळे रवीच्या ग्रुपने  गॅदरींग उधळून लावायचा प्लान केला होता....आणि अमलातही आणला होता... काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...पण तो काही हाती लागत नव्हता...अखेर महिनाभराने मैत्रिणीसमवेत फर्ग्युसनच्या टेकडीवर गप्पा मारत बसलेल्या रवीला पोलिसांनी हातकड्या घातल्याच...पण एकंदरच प्रकरणाने कॉलेजची खूप बदनामी झाली...पालक अस्वस्थ झाले..गॅदरींग रद्दच झालं...फक्त एसपीतच नव्हे, तर सगळ्याच कॉलेजेसमध्ये आणि अख्ख्या पुण्यात या प्रकरणाची खूप चर्चा झाली. केवळ इलेक्शनमध्ये पराभूत झाल्यामुळे एक विद्यार्थी हा प्रकार घडवू शकतो यावरच कुणाचा विश्वास बसत नव्हता....रव्या चमत्कारीक आणि बेडर असला, तरी तो असं काही घडवून आणेल यावर विश्वासच बसत नव्हता आमचा...आणि जे घडलं ते आजही पटू शकत नाही मनाला...पण ते कटुसत्य होते....पुढे एकदा मित्रांच्या गप्पांमध्ये त्यानेच हा उद्योग कसा घडवून आणला हे सांगून टाकलं...आम्ही हतबद्ध् झालो...असो... दिवस असतात ते...तारुण्यात भावनेच्या भरात काय करतो आपण हे लक्षात येत नाही अनेकदा...आपल्या बुद्धीचा...कल्पकतेचा, प्रतिभेचा, शक्तीचा..आपण गैरवापर करतोय हे गावीही नसतं.....पण त्या घटनांमधून आपण काही धडा घेतला नाही...काही शिकलो नाही तर काहीच उपयोग नसतो जीवनाचा...आणि झालेल्या चुकांमधून धडा घेत आपण पुढे गेलो तर आयुष्यात खूप मोठा माणूस बनू शकतो ...हे रवीच्याच उदाहरणावरून सिद्ध झालं...कॉलेज लाईफ संपलं....रवी अधूनमधून कुठं तरी..कधीतरी भेटायचा....तो नेमका काय करतो हे कधीच कळलं नाही....पण चुकांमधून त्याने बराच धडा घेतला असावा असं वाटतंय...सध्याच्या घडीला माहिती अधिकाराच्या माध्यमातून सत्तेतील आणि सत्तेबाहेरील भल्याभल्या मंडळींची मती गुंग करणारा रवी हा या चळवळीतील महत्वाचा शिलेदार मानावा लागेल...त्याच्याकडून काही गंभीर चुका झाल्या आयुष्यात...पण त्या निस्तरल्यानंतर त्या चुका त्याने पुन्हा केल्या नाहीत.....त्याची प्रतिभा आणि कल्पकता त्याने चांगल्या कामासाठी लावली आणि मी मी म्हणणा-यांची त्याने पळता भुई थोडी केली...
असो.....तर....अकरावीपासून लास्ट इयरपर्यंतचा प्रवास किती फास्ट झाला हे कळलंच नाही. अखेरच्या वर्षी सचिन जाधव यूआर होता....आमचा नेहमीचा ग्रुप होताच...इतर मित्र-मैत्रिणीही होत्या...सर्वांनी फन फेअर, स्पोर्टस, रिफ्रेशमेंटचा आनंद लूटला...योगायोगाने त्यादिवशी एन्टरटेनमेंटचा अखेरचा शो आमच्या बॅचसाठी होता....सगळी मुलं मुली आले होते...शेखर जगताप मिमिक्री करत होता...त्यात आमची नाव गुंफत होता...त्यामुळं मजा वाटत होती...एकामागून एक मस्त गाणी सुरू होती ....सगळीच गाणी दर्दभरी....नवी आणि जुनीही....' महुवा ' मधल्या 'दोनों ने किया था प्यार मगर ' ...' हीररांझा ' मधील ' ये दुनिया ये महफील मेरे कामकी नही..' 'हिमालय की गोदमे' मधील
'चांदसी मेहबूबा हो मेरी....'  ''विश्वास'' मधील ' चांदी की दिवार न तोडी...'  'यादोंकी बारात' मधलं ' चुरा लिया है तुमने जो दिलको..'  पासून ते '' अगर तुम ना होते''मधील 'हमे और जिने की चाहत न होती...' ''कुदरत' मधील ' हमे तुमसे प्यार कितना...'तेजाब' मधलं 'कह दो के तुम हो मेरी वर्ना...' ''आशिकी'' मधलं ' मै दुनिया भुला दुंगाऽऽऽ' सारी एकाहून एक हिट गाणी....सगळी मुलंमुली त्यात हरवून गेलेले....विशिष्ठ गाण्यांच्यावेळी...विशिष्ठ ओळींच्यावेळी अनेक कटाक्ष एकमेकांकडे भिडत होते....माहौलचं काही वेगळा झाला होता...  वेळ कसा गेला समजलंच नाही. ...संध्याकाळचे सात वाजले...वेळ संपला....गॅदरींग संपल्याचं सरांनी जाहीर केलं...आर्केस्ट्रा वाईन्ड अप करायची खूण केली... पण सगळ्या मुलांनी एकच गदारोळ केला...एकच गाणं..शेवटचं गाणंऽऽऽ सगळ्या मुलामुलींनी धोशा लावला. अखेर, कसाबसा सरांनी होकार दिला....आणि  'चांदनी'चे सूर हॉलमध्ये घुमू लागले...सचिन लाडच्या गिटारची तान काळजाला भिडत होती......सीमा आणि अतुल समरसून गात होते.....सगळ्यांनीच गाण्यावर ठेका धरला...मुलं बेभान होऊन नाचू लागली होती. मुकुंद, अव्या, सत्येन, मी .... सगळेच नाचत होते...रंग भरे बादलसे...तेरे नैनोंके काजलसे ....मैने इस दिलपे रख दिया तेरा नाम....चॉंदनीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ओ मेरी चॉंदनीऽऽऽऽऽऽऽऽऽसंगीताचे सूर टीपेला पोचले होते....का कुणास ठावूक..पण...आयुष्यातलं हे अखेरचं गॅदरींग असल्याच्या भावनेने मन हळवं झालं होतं.....गायकांचे आवाज कातर भासू लागले ....गाण्याच्या ठेक्यावर पावलं थिरकत होती ...अन नकळत.डोळे पाझरत होते.......


No comments:

Post a Comment