Tuesday, 20 November 2018

तुम को ना भूल पाएंगे..

तुम को ना भूल पाएंगे.....
----------------------
          मानव मर्त्य आहे...राजा माणूस आहे...म्हणून राजा मर्त्य आहे हा तर्क मांडणारं एक संस्कृत सुभाषित आठवतंय...त्यानुसार विनोद खन्ना माणूस होता अन लौकिकार्थाने तो आता हयात नाही हे  वास्तव आहे...त्याला जवळून पाह्यलेल्या, बोललेल्या व्यक्तींच् मत निश्चित निराळं आहे...अलौकिक तेजोवलय असलेल्या निर्लेप मनाने विनोद खन्नाच्या रुपात धारण केलेला अभिजात मर्दानी  देह ज्यांनी जवळून पाह्यलाय, त्या मनाचे नाना आविष्कार अनुभवलेत, त्याची तर्कशुद्ध विचारसरणी समजलीय त्यांना तो हयात आहे की नाही हा प्रश्न कधी पडणार नाही. उद्या सहा ऑकटोबरला त्याचा वाढदिवस साजरा करायचा ?की जयंती ? हा संभ्रमही पडणार नाही...       

                शाळकरी वयात 'मेरे अपने' बघितला अन् तेव्हापासून विनोदचा जबरदस्त फॅन झालो..पुढं पत्रकारितेत आलो..करियरसाठी हे मी जाणीवपूर्वक निवडलेलं क्षेत्र..अन त्या मागं असलेल्या काही उद्देशांपैकी विनोद खन्नाला कधी तरी भेटायला मिळेल हे  ही एक कारण नक्कीच होतं.....तसं पुढं घडलंही .....95 च्या सुमारास त्याला पहिल्यांदा भेटलो...अन् मग पुढे कायम भेटत गेलो..त्याच्या हळुवार, स्निग्ध स्वभावानं प्रभावित होत गेलो.. .त्याच्याबद्दल जमेल तेव्हा लिहीत गेलो...पुण्यात हा एक जबरदस्त चाहता आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं..त्यानंही त्या भावनेचा आदर केला..पुण्यात येणार असला की आवर्जून कळवू लागला..भेटू लागला....फोनवरही दिलखुलास बोलू लागला....आपलं सर्वाधिक आवडतं व्यक्तिमत्व आपली दखल घेतं, आवर्जून फोन करतं, यापेक्षा कुठला मोठा आनंद असतो का !....आणि मला तो भरभरून मिळाला.

              विनोद खन्ना हा खूप निराळ्या  जातकुळीतला  प्रगल्भ अभिनेता . गुलजार, अरुणा राजे यांच्यासारख्या रत्नापारख्यांनीच् त्याचं मोल जाणलं...त्यांच्या समवेत त्याने शक, अचानक, मेरे अपने, इम्तेहान, रिहाई, लेकीन असे नितांतसुंदर चित्रपट केले...बाकी इन्कार,दयावान, कुर्बानीसारखे पिटातल्या प्रेक्षकांना आवडतील असे शेकडो मसालापट केले..अमिताभ ऐन भरात असताना त्याला काट्याची टक्कर देणारा तो एकमेव दिमाखदार अभिनेता होता. चित्रसृष्टीत खलनायकीतून प्रवास करून सुपरस्टार झालेला, तब्बल दहा-बारा वर्षांच्या गॅपनंतर पुनरागमन करून पुन्हा टॉपवर गेलेला तो एकमेव अभिनेता ठरला..वैयक्तिक आयुष्यात पोळलेल्या, एकापाठोपाठ मानसिक धक्के झेलावे लागलेल्या विनोद खन्नाने 80 च्या दशकात ऐन भरात असलेली कारकीर्द सोडून दिली.....ओशोंच्या आश्रमात तो चक्क संन्यासी  बनला...तसं पाहिलं तर उच्च गुणवत्ता असूनही तुलनेत त्याच्या वाट्याला चांगले रोल  खूप कमी आले...पण,त्याची त्याला खंत वाटतेय असंही कधी जाणवलं नाही...बहुदा चित्रपटसृष्टीतल्या करीयरचं नेमकं प्लॅनिंग त्यानं केलं नसावं असं नेहमी जाणवत..त्याला कुणी गॉडफादर नव्हता...जे मिळेल ते रोल तो स्वीकारत राहिला.भूमिका निवडताना तो चोखंदळ राहिला नाही..मिळालेल्या भूमिका मन लावून केल्या, पण मनाजोगते रोल मिळवण्यासाठी त्याने फारशी धडपड केली नाही.. .तडजोडी केल्या नाहीत...तो त्याचा स्वभावच् नव्हता....याचं महत्वाचं कारण म्हणजे बॉलीवूड हे त्याचं  फुल टाईम करियर नसावंच् मुळी....त्याच्या बहुपेडी आयुष्याचा  तो एक भाग होता...तो यशस्वी उद्योजक होता...यशस्वी राजकारणी होता...अध्यात्मात उच्च पातळी गाठलेला योगी होता..प्रियकर, पती, वडील, भाऊ, शिष्य या खऱ्या आयुष्यातल्या भूमिका वठवताना तो कुठं कमी पडला नाही..पण अनेकांत राहूनही तो एकटा होता.अलिप्त असायचा...तो फिल्मी पार्टयांमध्ये फारसा कधी रमला नाही...पुरस्कार मिळवण्यासाठी त्यानं कधी सेटींग केली नाही...फिरोज खान,कबीर बेदी, आणि डॅनीसोबत त्याचा घट्ट दोस्ताना होता...अखेरपर्यंत तो आब राखून जगला

                    .जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात विनोद कर्करोगाच्या विळख्यात सापडला...एकेकाळच्या या राजबिंड्या कलाकारांची खंगलेल्या अवस्थेतील  छायाचित्र प्रसिद्ध झाली अन अनेकांच्या मनात कालवाकालव झाली..त्याचा अंत जवळ आल्याचं दिसत होतं...जाणवत होतं...सहा महिन्यांपूर्वी 27 एप्रिलला त्याने या जगाचा निरोप घेतला... बातमी अनपेक्षित नव्हती... तरीपण काळजात एक कळ उमटलीच्....त्याचा सिंहासारखा रुबाबदार देह निष्प्राण झाल्याचं बघवलं नसतं... म्हणून अंत्यसंस्काराला गेलो नाही..मध्यरात्रीपर्यंत कशीतरी कळ काढली...मग भल्या पहाटे विश्वास खोडसोबत मुंबई गाठली....वरळी स्मशानभूमीत अस्थीपूजन होतं.. साक्षी, राहुल, विनोद खन्नासारखाच् दिसणारा त्याचा भाऊ विकास व अन्य नातलग तिथं जमले होते. त्यांनी आम्हालाही उत्तरकार्यात सहभागी करून घेतलं....विनोदच्या अस्थीं पाहून मनात रोखून धरलेला हुंदका बाहेर पडला...

                                           उद्या सहा ऑकटोबर विनोदचा वाढदिवस..लाखो चाहते तो प्रथम जयंती म्हणून साजरी करतील...माणूस मर्त्य असतो अशी मनाची कितीही समजूत घातली, तरी विनोद या जगात  नाही हे पचवणं कठीण जातं..या उमद्या,दिलदार माणसाशी आता भेटू, बोलू शकणार नाही...गप्पा होणार नाहीत...मेसेजेसची देवाणघेवाणही आता शक्य नाही..हा रुबाबदार अभिनेता नव्याने पडद्यावर दिसणार नाही ही भावना नक्कीच काळीज कुरतडून टाकणारी आहे....अशावेळी आठवणी जागवण्यापलीकडं आपण काहीच् करू शकत नाही एवढंच् खरं....
विनोद साहब....तुम को ना भूल पाएंगे..
.....

No comments:

Post a Comment