Thursday, 22 November 2018

मेंटल हॉस्पिटल


मेंटल हॉस्पिटल
.........................
             ..बातमीदारीच्या निमित्तानं येरवड्याच्या  जेलमध्ये अनेक वाऱ्या झाल्या...पण तिथं समोरच् असलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचा प्रसंग सुरुवातीला बरीच वर्षं आला नव्हता..कथा,कादंबऱ्या अन काही चित्रपटांमुळं, वाचलेल्या  मेंटल हॉस्पिटलची  निराळीच प्रतिमा मनात होती.. .बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट... 1995 च्या सप्टेंबर महिन्यात तिथं एक गैरप्रकार घडल्याचं कानावर आलं.तेव्हा पत्रकारितेत तसा नवखाच् होतो..त्या हॉस्पिटलमध्ये सहज आत जाणं अन माहिती घेणं तेव्हाही शक्य नव्हतं...मग त्या भागातले मित्र शोधले...विक्रमला घेऊन छुप्या रस्त्यानं हॉस्पिटलमध्ये शिरलो.. रक्षकांना गुंगारा देत अख्खा दिवस तिथं घालवला...तिथलं वातावरण अनुभवलं..  स्वतःची ओळख हरवून बसलेले , भलत्याच मनोविश्वात वावरणारे रुग्ण पाहिले..शॉक ट्रीटमेंटच्यावेळी असह्य वेदनांमुळं त्यांनी मारलेल्या  किंकाळ्या ऐकून मुळासकट हादरलो..त्यांचं निकृष्ट अन्न,  मळके कपडे, असह्य दुर्गंधी अन एकंदरीतच् कोंडवाड्यातल्या जनावरापेक्षाही भयाण अशी त्यांची त्यांची  अवस्था आठवली की आजही अंगावर सरर्कन काटा उभा राहतो. तिथल्या चांगल्या वाईट घटनांच्या बातम्या देऊ लागल्यावर सयाजीसारखे  तिथले अनेक कर्मचारी  मित्र झाले..जुने रुग्णही ओळखायला लागले.. तिथं जाणं, सयाजीला, तिथल्या कर्मचा-यांना भेटणं नित्त्याचं झालं होतं...अलीकडच्या काही वर्षांत मात्र त्यात काहीसा खंड पडलाय
            गेल्या आठवड्यात सयाजी भेटला..चहा प्यालो.नाश्ता केला..खूप दिवसांनी भेट झाल्यानं खूप गप्पा झाल्या....मेंटल हॉस्पीटलमधल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या..  मनोविकाराने पछाडलेल्या, नरकयातना भोगत असलेल्या रुग्णांचे चेहरे नजरेसमोर आले..निष्प्राण डोळ्यांनी रुग्णालयाच्या आवारात फिरत असलेले अन
कर्मचा-यांच्या मारहाणीला भेदरून झाडांमागं, झाडावर लपून बसलेले कित्येक चेहरे लक्खपणे आठवले.ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्या बंधुंशी तिथं झालेली भेट ताजी झाली..

         घनदाट जंगलानं वेढलेल्या दीडशे एकरच्या विस्तीर्ण परिसरात असलेलं येरवड्याचं मेंटल हॉस्पिटल  आशिया खंडातलं सर्वात मोठं मानसोपचार रुग्णालय..पण होतंय काय की एकतर ते शहराच्या बाहेरच्या बाजूला आहे अन कारणाशिवाय सामान्य लोकांना तिथं जायला प्रवेश नाही...त्यामुळ आत काय चाललंय हे काही कळू शकत नाही..वीस वर्षांपूर्वी  मोबाईल, इंटरनेट नसण्याच्या जमान्यात तर तिथलं काहीच बाहेर यायचं नाही...अधिकृत तुटपुंजी माहिती मिळवायला 6692543 हा तिथला फोन होता.. संध्याकाळनंतर तो ही बंद असायचा...त्या काळात सयाजीनं मला खूप मदत केली..तो तिथं वोर्ड बॉय होता.. काळ्याभिन्न रंगाच्या, धिप्पाड सयाजीचं मन कोमल अन संवेदनशील...स्वभाव बोलघेवडा..वडिलांच्या जागेवर तो त्या नोकरीत चिकटला अन त्या रुग्णालयाच्या अनोख्या विश्वाचा एक भाग बनून राहिला. ..तिथल्या रुग्णांच्या अनेक करूण कहाण्या त्यानं सांगितल्या..कित्येक धोकादायक, हिंसक रुग्ण मला जवळ नेऊन दाखवले...तिथं असलेल्या जवळपास निम्म्या रुग्णांचे नातलग त्यांना एकदा तिथं सोडून गेले की पुन्हा परततही नाहीत... .कित्येक लोक खोटा नाव पत्ता द्यायचे...रुग्ण बरा झाल्यानंतरही केवळ नेमकं नाव गाव याचा पत्ता नसल्यानंसैरभैर व्हायचा....पळून जायचा.एकतर स्वतःच्या घरी किंवा त्यांनी पुन्हा इथे आणून ऍडमिट करू नये म्हणून लांब कुठल्या तरी गावी मजुरीची कामं करू लागायचा..नातलगांचा खरा पत्ता नसल्याने वाऱ्यावर आलेल्या रुग्णांची वाताहात रोखणारी व्यवस्था किमान तेव्हा तरी अस्तित्वात नव्हती..

                    रुग्णालयात या रुग्णांना दिली जाणारी पशुवत वागणूक दिसली.. मानवतेचे गोडवे गाणाऱ्या या समाजातील नाती किती कोरडी आहेत याचं प्रत्यंतर देणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची अमानुषताही नजरेस पडली...वेड्या मायेनं रुग्णांना कुरवाळणारे तिथले कर्मचारी पाहिले अन खोटा नाव पत्ता देऊन एकदा दाखल केलेल्या रुग्णाकडे आयुष्यभर पाठ फिरवणारे काहींचे अमानुष अनुभवही समजले.. भोपळ्याचे तोंडात मावणार नाही एवढया मोठया आकाराचे तुकडे  चुलीवर शिजत असलेलं कालवण पाहिलं...जनावरंही तोंड लावणार नाहीत अशा त्यांना दिल्या जात असलेल्या जाड्याभरड्या कोंड्याच्या चपात्या पाहिल्या..त्यांच्या अंगावर ना  धड कपडे ...ना धड अंथरुण,  ना धड पांघरूण... कित्येक रुग्ण ऐन हिवाळ्यात तिथल्या थंडगार फरशीवर कुडकुडताना पाहिले....कित्येकजण वेदनांमुळं विव्हळायचे...रात्र रात्र जागायचे.. आठपंधरा दिवसातून एकदा कधीतरी सर्कसमधल्या प्राण्यांना घालतात तशी पाण्याच्या फवाऱ्यानं  रुग्णांना सामूहिक आंघोळ... साहजिकच् अस्वच्छतेमुळं अनेकांना खरूज, नायट्यासारखे त्वचारोग जडतातच्....काहींना काबूत आणण्यासाठी होत असलेली अमानुष मारहाणही केली जाते असं समजलं अन् एकंदर सारा प्रकार पाहून माणूसकीवर, व्यवस्थेवर विश्वास तरी का ? आणि कसा ठेवायचा असा मला प्रश्न पडला.. .बरं याबद्दल दाद मागायची कुणी ? कशी ? आणि कुणाकडं ? इथल्या रुग्णांना काही कळत नाही..ज्यांना कळतं त्यांना बोलायची बंदी...कुठं वाच्यता केली तर आणखी मार बसायचीही भीती...निम्म्याहून अधिक रुग्णांचे नातलग भेटायलाच येत नाही..अन जे येतात ते लक्ष देत नाही...सारा असा गुंतागुंतीचा मामला.......एकंदर परिस्थितीमुळं शरीरानं अन् मनानं हतबल झालेल्या  इथल्या रुग्णांच्या निष्प्राण डोळ्यांतून टपकणारे अश्रू आठवले की आजही मनात कालवाकालव होते. महिलांच्या वोर्डमधली स्थिती तर अतिशय केविलवाणी. संवेदनांची,देहाची जाणीव नसलेल्या, शून्यात नजर लावून बसलेल्या कित्येक महिलांचे निस्तेज चेहरे आजही डोळ्यांसमोर उभे राहतात...तिथल्या एकंदरच साऱ्या रुग्णांच् पुढं काय होतं ? हा मला कायम अस्वस्थ करणारा प्रश्न आहे...वर्षनुवर्षे या हॉस्पिटलमधल्या साधारणतः अडीच हजार मानसिक रुग्णांच्या सान्निध्यात राहिल्यानं तिथल्या अनेक कर्मचा-यांचंही मानसिक संतुलन ढळत जातं हे ही एक तिथलं कटुवास्तव...

          रुग्णालयाच्या या साऱ्या प्रवासात सयाजी माझ्यासोबत असायचा..तो अगदी कोवळ्या वयापासून या रुग्णालयात फिरलाय..तिथली इंच न इंच त्याला माहिती...सुट्टीच्या दिवशीही तो रुग्णालयातच फिरत असतो...तिथल्या रुग्णांशी हवापण्याच्या गप्पा करतो...कोण नवीन आलंय,कुणाला कसला त्रास आहे, कुणाला काय आवडतं,   कोण बरं झाल्याचं सोंग आणतयं,  कोण खरंच बरं झालंय याची त्याला इत्यंभूत माहिती..खरंतर मेंटल हॉस्पिटल म्हणजे सर्वसामान्यांना फारशी माहिती नसलेली, त्याबद्दल औत्सुक्य असलेली काहीशी भीतीप्रद जागा..अन ते खरंही आहे...पण सयाजी तिथं एवढा रूळलाय की मनोरुग्णांच्या शरीरातून सुटणारा विशिष्ट उग्र दर्प आता त्याच्याही अंगाला येत असतो...त्यानंच् रुग्णालयातला एक जरा सुस्थितीत असलेला वोर्ड दाखवला....तिथं मधू लिमये यांचे धाकटे बंधू भालचंद्र लिमये पेपर वाचत पहुडले होते..ते बऱ्याच वर्षांपासून तिथं ऍडमिट होते..ते पेपरमधल्या काही ओळी ते बॉलपेनाने खोडून काढत होते.. त्यांच्याशी मी संवाद साधला...थोडं नीट काही असंबद्ध ते बोलले.... मधू लिमये निवर्तल्याचं ठाऊक आहे का ? असं मी त्यांना विचारलं.... त्यावर, पेपरवाले काहीपण छापतात असं म्हणून ते हसले व पुन्हा पेपर वाचनात गढले.... तिथल्या अनुभवांबाबत   मनोरुग्णांच्या नरकयातना ' ही माझी वृत्तमालिका 'सकाळ' ने ' चार भागात प्रसिद्ध केली अन एकच गदारोळ उठला...सेना-भाजपचे सरकार नुकतेच सत्तेत आलं होतं..पुण्याच्या मंत्र्यासंत्र्यानी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली...माझे मित्र आमदार दीपक पायगुडे तेव्हा पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले होते...त्यांनी या रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबाबत आवाज उठवला...शासन दरबारी या वृत्त मालिकेची दखल घेतली गेली...रुग्णालयावर नवी समिती नेमली गेली...निधी मंजूर झाला..काही इमारतींची कामं सुरू झाली..रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा जरा  सुधारला..पूर्वीपेक्षा आता परिस्थिती बरी आहे..आताही निरनिराळी कामं, उपक्रम तिथं सुरू झाल्याचं समजतं.. नुसती व्यवस्था बदलून उपयोग नाही...सयाजीसारख्या कनवाळू मनाच्या लोकांची तिथं गरज आहे.....

             खरंतर तुरुंग अन् मेंटल हॉस्पिटल ही दोन्ही ठिकाणं एकापरीनं वाईटच्... म्हणजे कैदी किंवा मनोरुग्ण होऊन तिथं जाणं अत्यंत वेदनादायी......विस्कळीत  मनोव्यापार सुरळीत करण्यासाठी या  व्यवस्था निर्माण केल्या गेल्यात...... सामाजिक तत्त्वामुल्यांशी विसंगत, विघातक वृत्तीचं तिथं नियमन होणं अभिप्रेत असतं..त्यासाठी कैद्यांना अन रुग्णांना  विलक्षण यातना सोसाव्या लागतात... वेदनांचे अनंत कल्लोळ तिथं नित्यनवे उमटत असतात.. जितेपणीच् कितीतरीजण रोज तिथं मरत अनुभवत असतात.. .समाजात त्याविषयी नेमकी माहिती अन् पुरतं गांभिर्य नसावं बहुधा..त्यामुळंच कित्येकदा सहज संवादातही जेल अन मेंटल हॉस्पिटलबद्दल सवंग विनोद केले जातात; तेव्हा मनोरुग्णांचे चेहरे डोळ्यासमोर  येतात....त्या मूक वेदना काळीज कुरतडायला लागतात अन् तिथं पुन्हा जायला मी नव्याने सज्ज होतो...





अश्विन नाईक - एक माणूस

अश्विन नाईक - - एक माणूस. . . .
-  -  -  -  -  -  -  -  -  - -  -  -  -

                               15 वर्ष उलटली या घटनेला . .. पण अजून स्पष्ट आठवतंय...सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास फोन वाजला...नीलम लहान होती तेव्हा...पटकन पळत जाऊन फोन उचलायची....तिनेच फोन उचलला...पलिकडून कोणतरी बोलत होतं आणि ही छानपैकी गप्पा मारत होती...काय चाललंय..कसं चाललंय...कुठल्या शाळेत जाते...कोणत्या इयत्तेत आहे....कोणता विषय आवडतो...मॅडम कोणत्या आहेत?....वगैरे वगैरे....ऐकत होतो सारं......नीलूला खुणेनेच कोण आहे हे विचारले? तिने आकाशाकडे बोट दाखवले...मला काही उलगडा होईना....मी फोन घेत हॅलो म्हणालो....आकाश बोलतोय...पलिकडून आवाज आला... ......किती भारी वाटतं रेऽऽऽ ....छोट्‌या मुलांशी बोलून....माझीही मुलगी साधारण एवढीच आहे....मी बोलतो तिच्याशी..पण भेटू शकत नाही रेऽऽऽ......तो म्हणाला.....
काळजात हललं माझ्या...तो अश्विन होता...अश्विन मारूती नाईक . .. मुंबई अंडरवर्ल्डमधील तत्कालीन प्रमुख सूत्रधार ....एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनात स्थित्यंतरं तरी   किती येऊ शकतात?? आणि इरेला पेटून त्यावर मात करत....संघर्षाशी सामना करीत माणूस स्थिरसावर व्हायचा किती आटोकाट प्रयत्न करतो...याचं अश्विन एक उत्तम उदाहरण ठरेल...

        मुंबई अंडरवर्ल्डमधील अश्विन नाईक या नावाला काय वजन आहे किंवा होते हे बहुतेकांना ठावूक आहे...रंगनाथ पठारेंनी  '' हारण'' मध्ये एका स्त्रीच्या आयुष्यात किती उलथापालथी होऊ शकतात हे दाखवलंय..त्यास्वरूपाची आणि त्यापेक्षाही भयंकर स्थित्यंतरं अश्विनच्या आयुष्यात घडलीत....त्या बदलांचा...घटनांचा...मी दूरून का होईना पण एक साक्षीदार आहे... दादरमध्ये भाजी विक्रेत्याच्या घरात जन्मलेला अश्विन कुशाग्र बुद्धीचा...क्रिकेट उत्तम खेळायचा...रमाकांत आचरेकरांचा लाडका शिष्य....बलविंदर संधू, लालचंद राजपूत, सुलक्षण कुलकर्णी हे त्याचे तत्कालीन सहाध्यायी...काही दिवस वय कमी पडलं म्हणून अश्विनचा  महाराष्ट्राच्या रणजी संघातील प्रवेश हुकला.... पुढे बरीच समिकरणं बदलत गेली...त्याच्या आयुष्याचा पटही बदलत गेला.....तो कितीही साधाभोळा असला, तरी त्याचा मोठा भाऊ अमर म्हणजे अमर नाईक हा मुंबईतील बडा गॅंगस्टर होता...80-90 च्या दशकात मुंबईवरील वर्चस्व राखण्यावरून दाऊद, अमर नाईक आणि अरूण गवळी यांच्या टोळ्यांमधील संघर्ष टीपेला पोचला होता...त्यामध्ये दाऊदने त्याचा भाऊ शाबीर व गवळीने त्याचा भाऊ पापा गवळी गमावले.....खबरदारीचा उपाय म्हणून अमरने अश्विनला आक्सफर्डला शिकायला पाठवले...तेथे  त्याने इंजिनीयरींगची पदवी घेतली...तेथून मुंबईला परतल्यावर त्याच्यावर दाऊद टोळीनने प्राणघातक हल्ला केला...त्यानंतर काही दिवस त्याने निरनिराळे नोकरी, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला...पण, मुंबईत राहणं दिवसेंदिवस कमालीचे जोखमीचे झाले होते...लागोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे त्याला प्राण वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने पळाला....आणि पळतच राहीला . . ..

                         जगायचं असलं तर शिका-याची शिकार करावी लागते....पारध व्हायचं का शिकारी हे ठरवावं लागतं.....पारध होऊ द्यायची नसेल, तर शिका-याची शिकार करावी लागते हा अंडरवर्ल्डचा नियम....अश्विन कसा अपवाद ठरणार? पण पारध टाळण्यासाठी त्याला जी दिव्य पार पाडावी लागली त्याला अंतच नाही....जगभर तो फिरला....देशोदेशींचे मित्र जोडले...पावडर सिंडीकेट म्हणजेच मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय माफीयांशी त्याची दोस्ती असल्याचं बोललं जाऊ लागलं....एलटीटीई च्या लोकांशी त्याचे लागेबांधे असल्याची चर्चा होती.....त्यातच एकदा मुंबईत भर कोर्टात गवळी गॅंगच्या रवींद्र सावंतने पिस्तुलातून त्याच्या मस्तकाचा वेध घेतला.. डोक्यातून गोळी आरपार जाऊनही अश्विन बचावला खरा...पण, कमरेखालचा भाग लुळा झाला...कायमचाच....एकेकाळचा उत्तम क्रिकेटपटू कायमचा अपंग झाला...अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडाली....अश्विनच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला....सारं काही संपलंच जणू असं वाटू लागलं होतं....त्यानंतर, वैद्यकीय जामिन मिळालेल्या अश्विनला घेऊन अमर विदेशात रवाना झाला...निरनिराळ्या देशांमध्ये त्याच्यावर इलाज केले...पण काही उपयोग झाला नाही...त्यानंतर, अमर भारतात परतला व काही दिवसांतच पोलिसांच्या चकमकीत ठार झाला . .. अश्विनवर आभाळ कोसळलं....त्याचा सर्वात मोठा आधारच संपला...त्या ही संकटातून तो मनाने उभा राहीला.. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ लागला....जगातील बहुतेक देशांमध्ये तो राहीला......विदेशात असतानाच तो माझ्याशी जोडला गेला...त्याच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडल्यानं तो ख-या अर्थाने मला मित्र मानू लागला...आकाश या नावाने त्याच्याशी बोलायचो... काहीजण त्याला डॉक्टर म्हणतात . . .. विदेशातून तो दिल्लीत वास्तव्याला होता काही वर्षं....तिथून पुन्हा विदेशात जाताना बांगलादेशाची सीमा ओलांडत असताना 2000 साली तो पकडला गेला...मग तिहार जेलमध्ये रवानगी....त्याच्याविरूद्धच्या सर्व केसेसची सुनावणी सुरू झाली...दिली, मुंबई आणि पुणे अशा निरनिराळ्या ठिकाणी त्याला खेटे सुरू झाले....मुंबईत कोर्टातच झालेल्य गोळीबाराच्या अनुभवामुळे त्याची प्रत्येक खेप चिंता करायला लावणारी ठरली...त्यातच त्याच्या लाडक्या पत्नीचा नीताचा गोळ्या झाडून खून करण्यात आला...त्याचाही आरोप त्याच्यावरच ठेवण्यात आला...आई गेली...वडील गेले....अमर गेला... जीवाभावाचे कितीतरी दोस्त एकापाठोपाठ गेले....कायमचे अपंगत्व आले . . .पत्नी नीताही गेली.....एकापाठोपाठ एका धक्क्यांतून सावरत असलेल्या अश्विनची सारी जवानी प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यात आणि नंतर खटले लढण्यात गेली . . ..दोन वर्षांपूर्वी सर्वच्या सर्व खटल्यांतून त्याची निर्दोष सुटका झाली....

                             कधीकाळी नाइलाजाने का होईना पण चुकीच्या मार्गाला लागलेला अश्विन पुन्हा एकदा सन्मार्गाच्या वाटेवर आहे....एक कन्स्ट्रक्शन फर्म त्याने सुरू केलीय......दादरमधीलच आफीसमधून त्याचा कारभार चालतो....अंडरवर्ल्डला त्याने रामराम ठोकलाय....वाट चुकलेल्या सहका-यांना निरनिराळे व्यवसाय देऊन मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलाय....मागचे कसलेही हिशेब आता उरलेले नाहीत आणि करायचेही नाहीत....दॅट वॉज माय पास्ट.....मला सन्मानाने जगायचंय...असं तो नेहमी म्हणतो आणि तसं जगायचा बहुदा प्रामाणिक प्रयत्नही करतोय...गेल्या आठवड्यातील ठाणे-मुंबईच्या धावत्या दौ-यात त्याची भेट हुकली......खरंतर एरवीही  संपर्क अथवा संवाद क्वचितच होतात. . .. काही गरजच पडत नाही ना....पण एक कायम लक्षात असतं...आहे आपला हा मित्र.....ठिक आहे....होता निराळ्या वळणावर...पण सध्यातर चांगल्या मार्गावर आहे ना! ....मी कधीच हिंसेचं अथवा गुन्हेगारीचं समर्थन करीत नाही आणि कुणाचचं उदात्तीकरण करत नाही....फक्त जे काही अनुभवलं...जे काही जगतो...ते आडपडदा न ठेवता लिहितो एवढंच.....आश्विनचा आज वाढदिवस....अश्विन खूप खूप शुभेच्छा....सन्मार्गावर चालताना अनेक काटे तुला बोचतीलही....पण, त्यानंतर दूरवर हिरवळच हिरवळ पसरलीये.....आणि ही हिरवळ हवी असेल, तर काट्यांकडं दुर्लक्ष कर....सन्मार्गावर चालतोयस ना!...कधीच हा मार्ग सोडू नकोस.....दाखवून देऊ जगाला.....वाल्मिकी या युगातही पैदा होऊ शकतात. . .


Wednesday, 21 November 2018

बोरीचा घोडा आणि चेटूक

बोरीचा घोडा आणि चेटूक
 -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -
      बोरीचा घोडा या पाड्यावर काही जनावरं आकस्मिक दगावली...काही दिवसांनी ते सत्र थांबलं..पण, चेटूक थांबल नव्हतं...तो मोर्चा बालकांकडं वळाला..गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ दोन मुलं दगावली..दोघं सिरीयस आहेत...मुलाबाळांसह लोक पाडे सोडून इतरत्र रहायला जात आहेत...एकाकडून या प्रकाराची माहिती समजली आणि जव्हार, मोखाडा, विक्रमगडच्या मुशाफिरीतून त्या पाड्यावर निघालो..

      जव्हारपासून सिल्व्हासाकडे जाणा-या रस्त्यावर पंचवीस-तीस किलोमीटरवर बोरीचा घोडा हा पाडा आहे. अंतर कमी आहे..पण रस्ता कमालीचा  अरूंद.. खाचखळग्यांचा..नागमोडी वळणांचा.. साध्या मोटारी किंवा जीपचा उपयोगच नाही... दणकट गाड्या हव्यात...चालक कुशल हवा...आमच्याकडे सफारी होती....कांचन पाटीलसारखा उत्तम ड्रायव्हर होता.....जव्हारपासून निघाल्यावर दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाचा जणू शेलाच पसरला होता. गर्द हिरवा, पाचूसारखा हिरवा, पोपटी हिरवा, मखमली हिरवा, बांगड्यांचा हिरवा, हिरवा जर्द, फिकट हिरवा, पिवळसर हिरवा.... हिरवाईच्या इतक्या अद्‌भूत छटा आपल्याकडं अभावानेच पहायला मिळतात. . . न्याहळे गावात डॉ.अनिता पाटील यांचा हेल्थ कॅम्प होता...त्यांना तिथे सोडून आम्ही पुढे निघालो....सुतारपाडा, कापरपाडा, बोरीचा पाडा, सुळ्याचा पाडा असे कितीतरी छोटे पाडे वाटेत दिसले...मातीची...नुस्त्या विटांची किंवा चित्रात दिसतात तशी कुडाची घरं..पोटं खपाटीला गेलेले उघडेवाघडे आदिवासी..कष्टाची कामं करणा-या स्त्रिया, रानात हुंदडणारी, नदीत डुंबणारी मुलं, गुरं राखणारे लोक वाटेत दिसत होते..इकडं एन्टरटेनमेंट काहीच नाही...पण, इथला निसर्ग कमालीचा सुंदर, लोभस आणि शब्दातीत..त्यामुळं लोकांना ओझोनयुक्त ताजी आणि मोकळी हवा भरपूर मिळते...पण दोनवळा खायला काही मिळेलच याची शाश्वती नसते..मिळेल ती भाजी शक्यतो बटाटा, वांगे, कारली, भोपळा, भेंडी किंवा रानभाज्या...नाहीतर सुकट-बोंबिल...नागलीची भाकरी...इथं कांदा, लसूण, आले वगैरे मसाल्याची चैन नाही...

             बोरीचा घोडा अतिशय दुर्गम भागात....बाहुपाडा, शेलकीचा माळ या भागातला....रस्ता नेमका माहित नव्हता...विचारत विचारत पुढे चाललो होतो...वाटेत एक वीस-बावीस वर्षांचा तरूण भेटला...त्याच्या हातात गलोर होती...मस्त...दणकट रबरापासून मन लावून बनवलेली...त्याच्याशी जरा गप्पा मारल्या... योग्य मोबदला देऊन गलोर मला घेऊन टाकली...पुढे वड पाड्यावर एक म्हातारी भेटली...सत्तरीतील पण तरतरीत...कांचनच्या परिचयाची होती...तिला विचारलं बोरीचा घोडा कुठं आहे ?.बरोबर येता का? असं विचारल्यावर ती तयार झाली...मग गाडीत तिला पुढं बसवलं..गप्पा सुरू झाल्या...तिचं नाव ठकी नवशा कोरडा..गावात शेतीवाडी बरी... बाळंतपणात दाईचं काम करते..पंचक्रोशीत त्यासाठी ती सर्वपरीचित...अनेक अडलेल्या बायकांना कसं मोकळं केलं याचे अनेक किस्से तिने सांगितले....डॉक्टर मंडळीही आपल्याला कसं मानतात, शासकीय रुग्णालयात आपण नर्सना कसं प्रशिक्षण देतो, हे ती सांगत होती....आदिवासी पाड्यांवरचं जगणं कसं बिकट आहे? ते सुसह्य होण्यासाठी काय करता येईल? याबाबत ती भरभरून बोलत होती.. तिला बोरीचा घोडा या पाड्यावर होत असलेल्या प्राण्यांच्या, मुलांच्या मृत्यूबद्दल विचारलं...तशी ती सावध झाली...आडून आडून माहिती दिली..पण थेट बोलेना...मला कायच माहिती नाय...असं म्हणायला लागली...

          ठकीबाईशी बोलता बोलता बोरीचा घोडा पाड्यावर आलो...ठकीबाई एकदम सावध झाली...गाडी आत घालू नको....इथंच थांबव म्हणाली...मी ऐकलंच नाही...गाडी जशी पुढं नेली तशी तिची धांदल उडाली...मग पाड्याच्या थोडं अलिकडं गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो..ती गाडीतच बसून राहीली...लोक टकामका पाहत होते...कुणाकंडी न पाहता सरळ पाहत चला असं सांगून मी पुढे निघालो...कपिल आणि कांचन मागाहून येत होते...पाडा छोटासाच.... छत्तीस उंब-याच्या या पाड्यावर जेमतेम दोनशे लोक रहातात . . .कशाबशा कुडाच्या उभारलेल्या झोपड्या...शेळ्या-कोंबड्या इकडून तिकडे पळत होत्या...आपापल्या घराजवळ लोक उभे होते....वातावरण शांत होतं...त्या नीरव शांततेवर शोकाची अन त्याहून अधिक भीतीची गडद छाया  सहजपणाने जाणवत होती...पहिली आठ-दहा घरे ओलांडली.. ...माजी सोन्याची लेकरी...सोन्याची लेकरी.....असा  एका महिलेने फोडलेला हंबरडा आसमंत चिरत गेला...काळजात लककन हललं...त्या घराच्या ओसरीत दोन स्त्रिया  रडत होत्या....आजुबाजुचे लोक सुन्न झाले होते...तिथून पुढं निघालो...गावाच्या सीमेवर कारल्याच्या, भोपळ्याच्या वेलांचा मोठा मांडव होता...पक्ष्यांनी ते खाऊ नये म्हणून भलमोठं बुजगावणंही उभ केलेलं...तिथल्या एका ओंडक्यावर विसावलो... एक किशोरवयीन मुलगा समोरून उत्सुकतेनं पाहत होता..त्याला विचारलं काय झाल? का रडताहेत ते? त्यांचं बाळ मेलं काल..तो म्हणाला...त्याचं नाव काय? तो काहीतरी पुटपुटला..मग म्हणाला मला नाय म्हायीत...वडलांना म्हायती...म्हटलं त्यांना पाठव...तो गेला..त्याचे वडील आले...बाबन चिबडे त्यांचं नाव..अंगात लेंगा..वर बनियन..गळ्यात तुळशीची माळ...कळकट चेहरा आणि त्यावर भय होतं...गुजराती हेलातील त्यांची मराठीमिश्रीत गुजराती आता ब-यापैकी परिचयाची झालीय.. ते बोलू लागले...गणपतीचा सातवा दिवस होता...गावातील एक बैल मेला...दुस-या दिवशी दुसरा...तिस-या दिवशी तिसरा...गावकरी हादरलेच...हा प्रकार समजल्यावर प्रशासकीय अधिकारी तिथं दाखल झाले...त्या गुरांना दिला जाणारा चारा तपासला..इतर शेळ्याकोंबड्यांना प्रतिबंधात्मक औषधं दिली..पण गुरं काही मरायची थांबेनात...एकापाठोपाठ पंधरा बैल गेले..बरं रात्री बरा असलेला बैल सकाळी एकाएकी थरथरायला लागायचा...तोंडातून लाळ गळत रहायची आणि एकाएकी त्याचा जीव जायचा..लोक भयभीत झाले...काहीजण नजिकच्या पाड्यांवर रहायला गेले...डॉक्टरी उपायांनी काही होईना म्हणून लोक भगताला शरण गेले...बाहेरची काही बाधा आहे का? या संशयानं पछाडले गेले...धामणीनजिकच्या पाड्यावरनं भगत बोलावला..त्यानं तांत्रिक विधी केले...मुलांना घेऊन सगळ्या बायकांना पाड्याबाहेर् जायला सांगितलं...तीन दिवस सारे व्यवहार बंद ठेवले होते..बाहेरच्या माणसांना पाडा बंद केला...पाड्याच्या सीमा त्यांनं मंत्र मारून बंद केल्या...देवाला आवाहन केलं....दानवाला शरण गेला..हिरव्या देवाला साकडं घातलं..दोन बोकडांचा बळी दिला...काही पथ्यं सांगितली....पाड्यातली पशुबळी बंद झाले...लोक आश्वस्त झाले...

          आठ-दहा दिवस बरे गेले...आणि एकाएकी पाड्यातली मुलं आजारी पडू लागली.. फारशी काही लक्षणं नाही...जरा ताप..थंडी आणि मुख्य म्हणजे निपचित पडायची...वृषिला नवसू माडी ..ही जेमतेम तीन वर्षाची मुलगी एकाएकी मरण पावली...लोक हादरले...दोन दिवसांनंतर अक्षय भास्कर चिबाडे हा दोन वर्षाचा चिमुरडा देवाघरी गेला...लक्षण तेच...नितीन तुळशीराम वाझे हा चिमुरडा सिरीयस झाला...योगायोगाने जवळच्या पाड्यावर हेल्थ कॅम्प चालू होता...डॉ. अनिता पाटील यांनी प्राथमिक उपाचार करून त्यांनी त्याला तातडीने नाशिकच्या रुग्णालयात हलवलं...त्यापाठोपाठ अजय विष्णू वाझे हे दिड वर्षाचं बाळ आजारी पडलं...त्याला जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं...हे दोघे वाचले....पण पाड्यावर आलेलं हे संकट नेमकं कसलं या विचारानं लोक भयभीत झालेत...भगताच्या उता-याचा काही परीणाम होत नाहीये म्हणून ते हवालदिल झालेत...अलिकडं तिथल्या स्वयंसेवी संस्थांनी या मंडळींमध्ये विश्वास निर्माण केलाय..अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न  सुरू आहेत. आरोग्य अधिकारी त्यांच्या टीमसह तेथे पोहोचले...सर्वांना प्रतिबंधक औषधं दिलीत..पाड्यावर कायमची एक नर्स ठेवलीये..त्यामुळं वातावरण शांत आहे....पण भयभीत आहे..कुणीतरी चेटूक केलंय ही त्यांच्या मनावरील भावना काही जाता जाईना..

                      भगतानं गेल्या खेपेला पाड्यावरच्या एका व्यक्तीनं चेटूक केलं असल्याचं गाववाल्यांना सांगितलं होतं...तो एका अंगणवाडी मदतनिसचा पती...त्याला पाड्यावरच्या लोकांनी बोरीच्या झाडाला बांधून मारहाण केलीय...ते दांपत्य गाव सोडून अन्यत्र रहायला गेलेत...आजारी असलेलं एक बाळ आधीच आईसह दुस-या पाड्यावर स्थलांतरीत झालं होतं..पण, तिथंही ते गंभीर आजारी पडलं..त्यमुळं या पाड्यावरच्या लोकांना राहू द्यायला इतर पाड्यावरचे लोक तयार नाहीत...या लोकांचं संकट आपल्यावर येईल अशी भीती त्यांना वाटते....ही दशा त्याच माणसानं केली असावी, असा गाववाल्यांचा वहिम आहे...नेमकं कारण शोधायला दुसरा चांगला भगत कुठे आहे का? याचाही ते शोध घेताहेत....जिल्हा प्रशासन  आरोग्यसेवा देण्याबरोबरच अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही आटोकाट प्रयत्न करताहेत...बाबन चिबडेंचा मी निरोप घेतला...सर्व काही ठिक होईल...काही घाबरू नका म्हणालो...गाडीत बसलो...त्या भागात फोनला रेंजच नाही...मेंढ्याचा पाडा पार करून पुढे आलो आणि एका वळणावर थोडी रेंज आली...फोनवर मेसेज झळकला...'' भारताने सोडलेल्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलाय..इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे यश...देशभर जल्लोष...'' डोळ्यांसमोर सोन्यासारखी लेकरीऽऽऽऽ म्हणत शोक करणारी बयाम्मा उभी राहीली...पाड्यावरचं चेटूक काढण्यासाठी दिलेल्या बोकडांचे निष्प्राण डोळेही उभे राहीले....गार गार वारं सुटलं होतं...डोळ्यात गेलेलं कुसळ काढतानाच कढत अश्रू कधी बाहेर पडले हे समजलंच नाही...

कोवळे दिवस

कोवळे दिवस
........................
लहानपणापासून कॉलनीत रहायचो...अकरा चाळींची होती आमची कॉलनी...प्रत्येक चाळीत चाळीस..पन्नास कुटुंब...फक्त चाळच नव्हे तर आख्खी कॉलनी एक कुटुंब होती...प्रत्येक व्यक्ती निराळी असं गृहीत धरलं तर दीड -दोन हजार जणांच्या तो कुटुंब कबिला होता...त्यामुळं नाना प्रकारच्या मानवी स्वभावांचे कंगोरे जवळून बघता आले...माझ्या पिढीतल्या कित्येकांचं बालपण, पौगंडावस्था, तारुण्य या कॉलनीनं अनुभवलं...इथंच शाळेतले धडे मिळाले अन किशोर वयातली कोवळीक ही इथंच अनुभवली...एरवी जेव्हा कामजीवनाबद्दल कुठं काही वाचनात आलं की कॉलनीतल्या कामजीवनावरही कधीतरी लिहावं असं कायम मनात येतं... कारण इथं खूप निराळे अनुभव मिळाले..पौगंडावस्थेतली मनाची घुसमट, कोवळ्या वयातलं प्रेम अन् लैंगिक भावनांचं दमनही इथं जवळून पाहता आलं .. विकृतीच्या पल्याड असलेल्या इथल्या काही व्यक्ती, घटना मनात कायमच्या रुतल्यात...

चाळीत संडास, बाथरूम, नळ  कॉमन..चौघांनमध्ये एकेक..बाथरूममध्ये तेव्हा पाणी नसायचं...त्यामुळं तिथं काहींनी स्टोअर रूम केलेली.....पण, बहुतेक बाथरूम धूळ खात पडलेली असायची...चाळीतल्या काही नवथर पोरापोरींची ती शृंगाराची ठिकाणं बनली....चाळीतल्या या बाथरुमांनी अनेक पिढ्याचे रोमान्स बघितलेत..तेव्हा कळत नव्हतं किंवा जाणवलं नव्हतं पण आता वाटतं की चाळीतले नळ हे सुद्धा आकर्षणाचं केंद्र असायचं...तिथं पाणी भरायला येणाऱ्या मुली,  महिला, नवविवाहित स्त्रिया यांच्याशी साधला जाणारा संवाद, त्याचे पैलू, विषय याच्या तऱ्हा निरनिराळ्या असायच्या...

                    चाळीत आम्ही लहानाचे मोठे झालो.. सोबतच्या मुलीही मोठया होत होत्या.... वयात येताना मिसरूड फुटणं, आवाज घोगरा होणं, अंगावर कोवळी लव फुटणं हा बदल होत गेला...तसा मुलींच्या अवयवांना गोलाई येत असल्याचं लक्षात येत होतं.. .या वयातले उष्ण श्वास, कुणाकुणाला पाहून होणारी अनामिक हुरहूर कळत होती..नजरेतली प्रतीक्षा उमगायला लागली..छायागीत बघण्याच्या निमित्ताने एकत्र येण्यातही मौज होती..अन्  खेळांच्या, पर्वतीला एकत्र फिरायला जाण्याच्या निमित्तानं एकत्र येण्याला आगळा आयाम प्राप्त झाला होता...'कावळा शिवणं' म्हणजे नेमकं काय हे समजत नव्हतं.. पण ती संज्ञा तेव्हा माहीत झाली..अवयवांबद्दल उत्सुकता दाटण्याचं हेच् वय ..अन अन बाहेर वाळत घातलेल्या अंतर्रवस्त्रांबद्दल कुतूहुल वाटण्याचंही हाच काळ...याच काळात मुलांची भाषा बदलली...शिव्यांमधली झ ची बाराखडी उमगायला लागली..खरंतर त्यावेळी लैंगिक माहिती पुरवणारी व्यवस्था असायला हवी होती..चौकातल्या दुकानात मिळणारी पिवळी पुस्तकं हे अनेकांचं याबाबतचं कुतूहुल शमवण्याचं साधन होतं... गप्पाटप्पांमध्ये मोठी मुलं या माहितीत काहीबाही भर घालायचे..अर्थातच त्याला काही शास्त्रीय गाभा नसायचा..त्यामुळं याबाबतीत नेमकी अधिकृत माहिती पुढं बहुदा अनुभवातनंच् मिळाली..

कॉलनीत तीन तृतीयपंथी होते.खरंतर अडीच..म्हणजे दोघे पूर्ण अन एक अर्धा..त्याला निमगांडु म्हणतात हे कॉलनीतच् समजलं..पुढं हा शब्द अन संज्ञा फार कुठं कानावर आली नाही....म्हणजे असं होतं की तो स्त्रीशी संग करू शकत होता; पण त्याआधी अन्य पुरुषाने त्याच्याशी संबंध ठेवणं ही त्याची गरज होती..ती शारीरिक की मानसिक हे कळायचं ते वय नव्हतं...तर, या अडीचजणांनी कॉलनीतली बरीच पोरं नादाला लावलेली...पूर्ण सज्ञान व्हायच्या आतच् त्यांना वासनेची चटक लावली...अनेक मुलांचं कौमार्य हे कुठल्या स्त्री शी नव्हे,तर या अडीच तृतीयपंथीयांशी संग करण्यात भंग झालं हे एक कटू वास्तव आहे..कॉलनीतल्या एकीला मदनवायू होता...म्हणजे तिच्यात सर्वसाधारण प्रमाणापेक्षा वासनेची तीव्रता खूपच्  जास्त होती..त्याबाबतचे अनेक रसभरीत किस्से अगदी अलीकडपर्यंत  चवीनं चघळले जायचे..खरंतर मदनवायू हा शब्द कुठून आला ? त्याची उत्पत्ती काय ? हे कधी समजलं नाही...पुढेही कधी हा शब्द कानावर आला नाही...खरंतर हे सारे विकृत प्रकार..पण उमलत्या वयात आम्ही ते जवळून पाहिलेत..तसल्या उद्योगांमुळं काहींना गुप्त विकारांचीही बाधा व्हायची..त्याचाही पोरांमध्ये बभ्रा व्हायचा...तसल्या आजारांना व्हेरी डेंजर या अर्थानं व्हीडी असा कोडवर्ड ठरलेला असायचा..स्वारगेटजवळ कुलकर्णी म्हणून एक डॉकटर या उपचारांसाठी ठरलेले  होते....ते त्यासाठी 'डॉक्सी' हे औषध देतात ही माहितीही पोरांकडं असायची...कित्येकदा परस्पर केमिस्टकडं जाऊन ही गोळी घ्यायचे..तो अर्थपूर्ण हसून गोळी द्यायचा..नान्या म्हणून कॉलनीत एकजण रहायचा..चेहऱ्यावरूनच् विकृत भासायचा..त्याची लैंगिक भूक विचित्र होती..प्राण्यांशी संग करण्याची घाणेरडी सवय त्याला होती...समलैंगिक संबंधांचेचं ही बरेच प्रकार तिथं पाहिले..योग्य त्या वयात नेमकी माहिती नसल्यानं करपत असलेली जवानी आजूबाजूला दिसायची...

कॉलनीत काहींना दहा बाय बाराची खोली.... भिंतीला लागूनच शेजारशेजारी घरं....एकंदरच् प्रायव्हसी नावालाही नव्हती..नव्या नवरीची त्यामुळं कुचंबणा व्हायची...पण, तशाच परिस्थितीत तिथं कित्येक पिढयांनी संसार केलेत...एखाद्याकडं नवीन लग्न झालं की पोरांसाठी ती पर्वणी ठरायची... घरांची शटर्स अनेकांचे रोमान्स उघड करायची..अशावेळी भिंतींचे कान अधिक तिखट व्हायचे ...पण, या कॉलनीत फक्त  विकृत चाळेच् पाहिलेत असं आजिबात नाही..कोवळ्या वयात फुललेल्या, काही आयुष्यभर अव्यक्त राहिलेल्या  प्रेमकहाण्या तिथं पाहिल्या...देहात बदल होत असताना शरीरभर फुलणारी पालवी अनुभवली...नवथर प्रेमातले तिरपे, चोरटे कटाक्ष दिले अन झेललेही..प्रेमपत्र लिहिणं म्हणजे काय माहित नसताना इथंच ती लिहिली, छुपे खलिते पाठवले, नजरेची भाषा कळू लागली अन कुठल्याही चित्रपटात नसतील असे प्रेमाचे निसर्गसुंदर आविष्कार अनुभवले..त्यावेळी एकमेकांसाठी मन लावून लिहिलेल्या पत्रामुळंच् अक्षर सुधारत गेलं असावं.. अन् आताच्या लिखाणाचं बीजही बहुदा त्याच लेखनात दडलं असावं असं वाटतं..तिथले काही मित्र आता कथा, कविता लिहितात..त्यामागं ही कॉलनीत पाहिलेल्या,अनुभवलेल्या काही यशस्वी अन बऱ्याच अधुऱ्या कहाण्या असाव्यात असंही जाणवतं.... कॉलनी सोडून वीस वर्षं उलटली...पण, तिथली नाळ काही तुटत नाही..कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तिथल्या घटना आठवत राहतात...मोरपंखी दिवसांच्या स्मृती मन तजेलदार करतात.कोवळ्या वयातले कित्येक क्षण मन हळवं करतात.अन् काही तप्त अनुभव लिहायला उद्युक्त करतात.....

पन्नो

पन्नो
--------

कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीत टोकाचा संघर्ष करणं एवढंच् आपल्या हातात असतं..आणि खरंतर एका विशिष्ठ प्रयत्नांनंतर आपण फारसं काय करू शकत नसतो..या संघर्षात कधी आर्थिक फटका बसतो..कधी पत, प्रतिष्ठा धोक्यात येते..कधी नात्यांत दुरावा निर्माण होतो.. या साऱ्या गोष्टींची पुन्हा भरपाई होत असेलही कदाचित, पण गमावलेली नाती तशीच हाती लागतात असंही नाही.. पण, मन दुरावली गेली तरी काहींच्या आठवणी आयुष्यभर व्यापून राहतात...या जखमांवर खपली चढत नसते.. ...जखमा अधुनमधून  ओलावत असतात..कधी ना कधी स्मृतींची कुपी रिती होत असते..मन सुगंधित करत राहते..आठवडाभरापूर्वी श्रीदेवी गेली..तिच्यामुळं अशीच एक जखम ताजी झाली..होळी, धुळवडीच्या सणांनी हळवी होत गेली ..ती तशी  झाली नाही, तर डोळ्यातल्या काजळानं  तीट लावलेल्या पन्नोच्या सुगंधी स्मृतींशी तो कृतघ्नपणा ठरेल..त्या अत्तराच्या दिवसांशी ती प्रतारणा ठरेल..

पन्नो खूप लहानपणापासूनची मैत्रीण.. माझ्यापेक्षा वयानं थोडी  मोठी..शाळा, कॉलेज सोबतच शिकलो..बालसुलभ मैत्री बहरत गेली..कोवळ्या वयात तनामनात झालेले बदल आम्ही जवळून पाहिले...
अगदी किशोर वयातच परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झालं..  नात्याला निराळा आयाम मिळाला.. निखळ मैत्रीपासूनचा नात्याचा लंबक काळजातल्या सखींपर्यंत झुकत गेला. .नजरेत संकोच दाटला..स्पर्शातली जादू समजली.. देहाची वीज झाली. .. नितळ भावना उत्कट झाल्या. तिची जगण्याची समज, परिपपक्वता जबरदस्त.. कसं काय पण ती डिट्टो श्रीदेवीसारखी दिसायची..तिच् तिची ओळखही होती. सौंदर्याचा अन बुद्धिमत्तेचा सर्वांगसुंदर मिलाफ तिच्या व्यक्तिमत्वात साधला गेला होता.. .आम्ही कॉलेजला असताना बॉलिवूडमध्ये श्रीदेवी टॉपवर होती..त्या नवथर वयात ही श्रीदेवी माझं आयुष्य बनली ..बालपणापासूनची मैत्री असल्यानं पुढंही आमची दंगामस्ती, रुसवेफुगवे कायम राहिले. त्याची परिभाषा बदलली होती. तिनं भरभरून प्रेम केलं.. मला वळणही  लावलं...व्यक्तिमत्वाला चमक द्यायला खूप धडपडली....नजरेनं आव्हान देणारी पन्नो नजरेतली आस ओळखायची..उमलताना चटका लावायची...कातरवेळेत मिठीत घ्यायची..निसर्गाची साद तिनं स्वीकारली ...पण तोल ढळू दिला नाही.. खूप मायेनं जपलं ..दुखऱ्या मनावर फुंकर मारताना माझी वेदना तिच्या डोळ्यांत उमटायची. सारे हट्ट पुरवले तिनं..मैत्री,प्रेम, वात्सल्य,जिव्हाळा, प्रीती, दोस्ती, माया, ममता सारे भावनाविष्कार त्या दिवसांत अनुभवता आले..साऱ्या भावना तिनं अलवार जपल्या....चांदण्यांची बरसात अनुभवली.. इतके एकजीव झालो की त्या दिवसांत परस्परांची  कुठलीच गोष्ट परकी राहिली नाही...तिचं एकंदरच वागणं, बोलणं अधिक प्रगल्भ होत गेलं.. ओढ वाढवत गेलं..कधी खटके उडाले की ही माझी सखी पत्र लिहायची..भावना व्यक्त करायची.पत्राखाली तिची टिपिकल सही असायची...तुझी श्रीदेवी...

पन्नोचा जन्म पौर्णिमेचा...त्यामुळं साऱ्या पौर्णिमा आमच्यासाठी खास असायच्या.. सण, उत्सवात आम्ही धमाल करायचो.. होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत तर खूप कल्ला.. तेव्हा परस्परांना रंग लावून पाण्यानं भिजवून काढण्यातली मजा काही और असायची..आमच्या या उत्कट नात्याची माहिती नातलगांना, मित्रांना सर्वांना होती.. मी ते कधीच् कुणापासून दडवलं नाही..लाज वाटेल असं  वागलो नाही..केलेल्या गोष्टीची लज्जा बाळगली नाही..पुढं कसं, काय ते नेमकं लक्षात येत नाही.. पण दुरावा होत झाला.तसे रुसवेफुगवे आधीही व्हायचे..अबोला व्हायचा...एकदा तो जास्त टिकला.. ..नात्याची वीण ढिली पडत गेली..पुढे पूर्ण सैलावली..मार्ग भिन्न झाले.. मित्र मैत्रिणींनी बरेच प्रयत्न केले..अहंकार..वयातला बालिशपणा  आड आला ..हे नातं कायमचं संपलं.. कायमचं. .

 तसं तर कुणाचंच आयुष्य कुणामुळं अडत नाही ..पण, बऱ्याच गोष्टी बदलत जातात.. तुलना होत राहते हे नक्की....थबकलो मी ही थोडाकाळ....परिस्थितीशी कडवा संघर्ष केल..नंतर मग जे होतंय ते स्वीकारत मी पुढं चालत राहिलो....नजर स्वच्छ झालेली अन नियत साफ. पुढं ही बरेच मित्र मैत्रिणी भेटत गेले..त्यात काही नाती कचकड्यासारखी तकलादू निघाली..काही तराजूत तोलणारे अन काहींना फक्त देहाच्या उत्सवात स्वारस्य ..पण निःस्वार्थीपणानं मनापासून जीव लावणारे, भरभरुन प्रेम करणारेही भेटले,  हे ही खरं..पन्नोशी नातं तुटलं त्याला आता दोन दशकं उलटून गेलीत..एक नक्की की,त्यानंतर कुठल्या सौंदर्याची  फारशी भुरळ पडली नाही....कुठल्या डोळ्यांचं आकर्षण वाटलं नाही..कुठल्या स्पर्शाची फारशी ओढ वाटली नाही...कुठला देह वासना चाळवू शकला नाही..कुठला खांदा तितका आश्वासक वाटला नाही...प्रतारणा तर मी तेव्हाही केली नव्हती, नंतरही कुणाशी केली नाही.. तेव्हाच्या काही सवयी मोडल्या..काही कायम राहिल्या.. तळ्यातल्या गणपतीला आणि बड्या दर्ग्यावर मात्र पुन्हा कधी आवर्जून गेलो नाही....नातं तुटल्यावर, रोजच्या आठ आठ तास सोबतीची सवय मोडताना खूप वेदना झाल्या...तितक्या पुढं आयुष्यात कधी झाल्या नाहीत..तितकं नैराश्य पुन्हा कधी आलं नाही..मन कणखर बनत गेलं.....गेल्या अनेक वर्षांत तिची भेट तर दूर, कुठल्याही माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संवादही नाही..वाढत्या वयात, बदलत्या नात्यात जगण्याचे प्राधान्यक्रम बदलतत राहतात..नवनवे भलेबुरे अनुभव येत जातात..अलिप्तपणा, तटस्थवृत्ती वाढत जाते..जुन्या घटनांची ओळख पुसट होत जाते.. अर्थातच् आयुष्य सुगंधित केलेली माणसं या ना त्या निमित्तानं  आठवत  राहतात.. परवा असंच झालं..जव्हारजवळ  शेरकीच्या पाड्यावर भटकत होतो.. होळीच्या, रंगांच्या उत्सवामुळं वातावरण चैतन्यमय झालेलं..तारप्याच्या तालावर आदिवासी पोरं पोरी  नाचत होते.. गाणी सुरू होती...एकमेकांना रंग फासला जात होता..मुखीयांनं मला शकुनाचा गुलाल लावला..मग अनेकांनी रंग  लावला..मोहाचं मद्य डोक्यात भिनायला लागलं होतं..गाण्याच्या तालावर पाय थिरकायला लागले होते..  होळीच्या केशरी ज्वाला  भडकल्या होत्या..आकाशात झेपावत होत्या..त्या प्रकाशात एकीचा  चेहरा सोन्यासारखा  लकाकला. श्रीदेवीसारखा भासला...काजळानं माखलेले तिचे डोळे काळजाचा ठाव घेत होते.अनिमिष नेत्रांनी तिनं पाह्यलं...मग डौलदार चालींनं येऊन नाजूक हातांनी अलगद माझ्या चेहऱ्याला रंग फासला. स्पर्श परिचित असल्यासारखा वाटला... .मन भूतकाळात गेलं. थंडगार वाऱ्यातही  त्या स्पर्शाची ऊब तयार झाली..मन कापरासारखं पेटून उठलं .ती धग
शरीर जाळत गेली..अन उभ्या देहाचीच् होळी झाली....

समीरा

समीरा -
-   -   -  -   -   -   -
..दाऊद आणि कंपनी 1985 ला भारतातून पळाली आणि दुबई प्रकाशझोतात आली...90 च्या दशकात मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे पडसाद दुबईत उमटू लागले होते...त्याकाळात पत्रकारीतेत नवोदीत असल्यानं तिकडची माहिती मिळताना खूप अडचणी यायच्या..फारसं कोण परिचयाचं नव्हतं..संपर्काची साधनं मर्यादीत होती...पण एकदा समीराशी ओळख झाली अन माझा तिथला प्रश्न कायमचा सुटला...
...समीरा ही दुबईतली बुद्धीमान वकील...कायद्याचा अक्षरश: किस काढून तिने कित्येक कठीण केसेस मोठ्या कौशल्याने जिंकल्यात..दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अनिल परब, छोटा शकील, अबु सालेम यांच्याबरोबरच देशविदेशातील माफीया तिचे अशील..परस्परांशी वैर असलेल्या या सा-या मंडळींनी तिलाच वकीलपत्र देण्याचा निकष एकच... तो म्हणजे तिचा कायद्याचा खोल अभ्यास, प्रभावी युक्तीवाद आणि पारदर्शी व्यवहार..अरब राष्ट्रांमध्ये वशिलेबाजी आणि तसल्या गोष्टींना थाराच नाही. कायदेही खूप कडक आहेत....त्यामुळं तेथे केसेस लढायला समीरासारख्याच हुशार वकील हव्यात.. तिचं काम सरळ..एका केसचा दुस-याशी संबंध नाही..एका व्यक्तीचा दुस-या व्यक्तीशी संबंध नाही...प्रत्येक केस निराळी...गुन्हेगारींची यारी-दुष्मनी तिच्याकडं नाही चालत..अतिशय करारी आहे ती..आणि कामाला चोख...त्यामुळंच कित्येक बड्या लोकांना एकाचवेळी ती सहजपणे हॅंडल करू शकते..एकाचवेळी ती वकीलीही करते..तिचा कसलातरी रिसर्चही चालू असतो...विदेशांत भ्रमंतीसाठी ती जाते...मनात येईल ते करत राहते...दिल की खुषी मन का राज..असा सगळा कारभार...

      समीरा खातून हे तिचं खरं नाव. जन्म लंडनचा. आई इराणी वडील अफगाणी. वडील मोठे उद्योगपती. आई जैवविज्ञान शास्त्रातील संशोधक...अत्यंत देखणी...मी भेटलोय त्यांना...आई वडिलांच्या  विद्वत्तेचा आणि सौंदर्याचा मिलाफ समीरामध्ये झालाय..साडेपाच फुटांहून अधिक उंची.. अरबी स्त्रियांप्रमाणे सोनेरीसर गोरा वर्ण..भुरकट डोळे...बदामी चेहरा, नाजूक जिवणी.. .अस्सल अरबी सौंदर्याचा उत्कृष्ठ् अविष्कारच जणु...करीना कपूरची एक जाहीरात आहे शॅंपूची...ती लागली की मला नेहमीच समीरा आठवते...तिच्यासारखीच पण तिच्यापेक्षा काकणभर सरस व्यक्तिमत्व आहे समीराचं .. .पंधरा वर्षांपूर्वी एका मित्राने तिची ओळख करून दिली...तेव्हा कामाच्या निमित्तानं ती मुंबईत आली होती...दिवसभर आम्ही बरोबरच होतो....अगदी सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत...खूप माहिती गोळा करायची होती तिला..खूप सफाईने आणि कौशल्याने ती कामे मार्गी लावत होती...समीरा मनमोकळी आहे....प्रत्येक शब्द तोलूनमापूनच बोलणार... नियत स्वच्छ आणि नजर साफ ...त्यामुळं तिच्याकडं वाईट नजरेनं पाहण्याची कुणाची शामत नाही होत..अबुधाबी, दुबई, मस्कत, जेद्दा, शारजा, अजमान, या संयुक्त अरब अमिरातीमधील राज्यांमध्ये तिची कामं चालतातच.. तसे तिचे क्लाएंट जगभर पसरलेत..निरनिराळ्या देशांमध्ये ती त्यासाठी फिरत असते.. निरनिराळ्या देशांच्या कायद्यांचा तिचा चांगला अभ्यास झालायं..मागे गुलशनकुमार खून प्रकरणाचा खटला लंडनच्या न्यायालयात चालला होता..आरोपी असलेल्या संगीतकार नदीमचे भारतात प्रत्यार्पण करण्याबाबत जोरदार युक्तीबाद सुरू होते..नदीमचे वकील होते पॉल गार्लीक... भारत सरकारच्यावतिने स्थानिक वकीलांच्या मदतीसाठी उज्वल निकम तिथं गेले होते...त्याचं रोजच्या रोज वार्तांकन मी करायचो...म्हणजे तिकडून दोघांचे फोन आले की...मी क्रॉसचेक करून इथं बातमी लिहायचो....एके दिवशी साहेबांनी विचारलं, अरे तू एवढं देतोयस इतके दिवस...पण काही निष्पन्न होईल का त्यातून??  मलाही तो प्रश्न पडला...संध्याकाळी समीराला फोन केला...तिला त्या केसचं विचारलं...म्हणाली मला मूळ केसच माहित नाही...युक्तिवाद आणि बचाव काय चाललंय ते ही माहिती नाही...मग कसं सांगू??? मी थोडक्यात तिला केसची माहिती दिली....मग म्हणाली ब्रिटीश कायदे पाहून मगच सांगता येईल.....माझी प्रतिक्रिया एक्स्पर्टस कमेंट म्हणून छापणार का?? म्हणत दिलखुलास हसली.. दुस-या दिवशी तिचाच फोन आला...कुछ दम नही हैं केस मे बॉस्स... कुछ नही होगा .....एक्स्ट्राडिशन नही हो सकता....म्हटलं का??  अरे वहां के कानून ही ऐसें है..ज्यादा ह्युमिनीयर....हमारे यहां होता तो एक दिनमें भेज देते...(तेव्हा बहुदा आपला प्रत्यार्पण करार झाला होता युएई शी)..मी खरंच तिच्या नावाने बातमी दिली होती..फोटोसह....महिन्याभरानं केसचा निकाल लागला...नदीमचं प्रत्यार्पण करण्यास लंडन न्यायालयाने नकार तर दिलाच; पण भारत सरकारने त्याला सहा कोटी रुपये भरपाई द्यावी असाही आदेश दिला....समीराचं म्हणणं खरं ठरलं...
                 मागे आपल्याइथे अधूनमधून अफवा उठायच्या..दाऊदला दुबईत पकडलयं...त्याच्या भावाला अनिसला दुबईत पकडलयं..छोटा राजनला विमानतळावर अटक झालीय...असं काहीही....स्थानिक यंत्रणांकडून काही समजलं नाही तर समीराशी फोन ठरलेलाच असतो...ती ही बोलते दिलखुलास....तिचा संबंध नसलेल्या व्यक्तीबाबत अथवा केसबाबत विचारलं तर मधूनच उखडतेही...वो क्लाएंट है क्या मेरा? मेरेपास कोई ऐसा केस आया नही...असं म्हणून उडवून लावते...मग ओळखायचं तिचा मूड बिघडलाय... तासाभरात परत तिचाच फोन येतो... आपण आधी फोनवर तुसडेपणानं बोललो आहोत याचा मागमूसही नसतो...ती ते विसरलेली असते की ते कमावलेलं सरावलेपण आहे हे कळत नाही... खूप आपुलकीच्या, स्नेहाच्या पहिल्या दोन-तीन शब्दांतच ती आपला राग विरघळून टाकते...काय हवं- नको याची चौकशी करते....माहिती देते.. अरब राष्ट्रांमधील मऊसूत, मधाळ खजूर मला आवडतात...समीराने एकदा अक्षरश: करंडाभरून निरनिराळ्या प्रकारचे खजूर तिकडून पाठवले होते..सोबत खजुराच्या वाईनची भलीमोठी बाटली....खरंच प्रॉडक्ट जबरी...मोहाच्या दारूपासून ते  द्राक्षाच्या वाईनपर्यंत खूप चाखल्यात, पण खजुराचं हे पेय वेगळंच ...नुस्तं आठवलं तरी त्या वाईनची चव जिव्हेवर येते....मध्यंतरी एकदा मी गेलो होतो तिकडं...घरची मंडळीही होती बरोबर...तिकडं बरेचजण परीचित आहेत...मराठी मंडळी तर कितीतरी आहेत...समीरालाही सांगितलं होतं येतोय म्हणून... निघायच्या आदल्यादिवशी तिनं माझा सविस्तर दौरा जाणून घेतला....मी तिकडे गेलो तर ही गायब...कुठे तर म्हणे नैरोबीला कामासाठी गेलीये...पण एक केलं होतं...पाच-सहा दिवसांची तिथल्या सा-या वास्तव्याची, खाण्यापिण्याची आमची चोख व्यवस्था केली होती तिनं... खूप माणसं जोडून ठेवलीत तिनं...तिच्या अम्मीला भेटलो...विश्वासच बसेना...समीराची मोठी बहिण वाटाव्या अशा सुंंदर व शालीन दिसत होत्या...त्यांनी आपुलकीनं आदरातिथ्य केलं...तिचे अब्बा तर कबीर बेदीसारखे दिमाखदार पर्सनालिटीचे...खूप मार्दवतेनं विचारपूस केली...मग म्हणाले, समीरा अशीच आहे मनस्वी...स्वच्छंदी....कधीही जाते..कुठेही जाते..तिनं आम्हाला सांगून ठेवलं होतं मेहमाननवाझी करायला...तुम्ही फक्त तिचे नाही..आमचेही पाहुणे आहात....दुबई आणि लगतच्या भागात मुशाफीरी करण्याचीही सारी व्यवस्था समिरानं केली होती.. तिची लायब्ररी पाहिली मी.. कायदा शास्त्रावरील पुस्तके, बहुतेक सारे धर्मग्रंथ..आणि जे कृष्णमूर्तींपासून खलील जिब्रानपर्यंत सर्व काही तिथं होतं...आणि ती पुस्तकं वाचली जात असावीत हे त्या पुस्तकांवरूनही कळत होतं.....केवळ संदर्भासाठी नव्हे, तर आवडीसाठी  समीरानं ही लायब्ररी बनवलेली ..तिच्या शाही पॅलेसमध्ये दिवसा किंवा रात्रीही तासोनतास डुंबणे हा तर तिचा छंदच...टेनीस-बॅडमिंटनचीही आवड..मार्टीना नावरातिलोव्हा आवडीची आणि बोरीस बेकरची ती डायहार्ट फॅन..इराणी चित्रपटांची आवड आणि उत्तम जाण....आणि असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व असूनही पाय जमिनीवर...कुठेही गर्व नाही...माज नाही अन मस्तीही नाही...मनसोक्त आयुष्य जगायची जणुकाही सवयच लागून गेलेली....आश्चर्य वाटलं...एक व्यक्ती, एक स्त्री किती बहुआयामी असते ते पाहून...
             आमची पहिली  काही वर्षं बोलण्यात, परस्परांना ओळखण्यात गेली..मग नात्यांत विश्वास निर्माण झाला..औपचारिकता गळून पडली..नात्याचं पावित्र्य कायम राहीलं..विश्वास कायम राहीला..दोस्तीची शान कायम राहीली....क्रिमीनल प्रॅक्टीस सोडून ती गव्हर्मेंट लॉयर म्हणून काम करू लागली..पोलीस गुन्हेगारांना पकडतात, आणि आपण त्यांना सोडवतो या जाणीवेनं ती अस्वस्थ झाली होती...तिला म्हणालो ...अखेर हा ही एक व्यवसायच आहे...तू काय कोर्टात पैसे दाबून वगैरे नाही सोडवत कुणाला...तुझं बौद्धीक सामर्थ्य पणाला लावतेस.. सुरेख युक्तीवाद करतेस...आणि ते पटलं तर कोर्ट गुन्हेगाराला सोडून देतं...अखेर निर्णय करणारं कोर्ट आहे.. तू किंवा सरकारी वकील नाही....पण..तिला पटलच नाही....ती सरकारी वकील बनली...मग म्हणालो..तुझ्यामुळे कुणाला अकारण शिक्षा झाली तर तुला पटेल का? असं होणारच नाही..आणि असं असेल तर मी ती केस लढणारच नाही....पण मुळात आरोपी दोषी आहे कि निर्दोष हे ठरवणारी तू कोण? आणि ते तुला ठरवायचं असेल, तर सरळ आणखी शिकून जज्ज हो ना....खरं कामाचं समाधान मिळेल तुला...आमच्यात असं काही वाक्‌युद्ध झालं की मग ती संभ्रमित व्हायची..चिडायची....मग म्हणायची...तुम फोन मत करना हां आऽऽबिद..तिचं ते आऽऽऽबिद म्हणणं मला बेहद्द आवडायचं....समीरा तू इतकी सुंदर आहेस...हुषार आहेस...घरचं सगळं छान आहे....तू लग्न का करत नाहीस??  माझ्या मनात असूनही न विचारलेला पण तिच्या अम्मीने विचारायला लावलेला प्रश्न मी विचारला...तसा तिचा काही धोका नव्हता...पूर्वी खूप फिस्कारायची..आता परीस्थिती उलट होती...मीचं माझ्या अस्वस्थता तिच्यावर व्यक्त करायचो...ती शांतपण कडकड ऐकून घ्यायची..आणि म्हणायची...हुवा ना....ठिक हैं...आ जाओ इधर...इधर करो तुम जर्नालिझम...मै रोज एक न्यूज दुंगी आपको...तिच्या बोलण्याचा लहेजा आपलासा करणारा.... एक दिवस तिनं सांगितलं...क्या होगा रे शादी नही की तो? ना मैं सोचती हू लोग क्या कहेंगे..ना अम्मी-अब्बा सोचते हैं वैसा.....किसलीए करने की शादी? मुझे बच्चेवगैरेसे लगाव नही हैं...खूप नाव कमवायचंयं...खूप मोठं व्हायचंय....करीयर करायचंय...जगभरातल्या न्यायालयांमधील मोठ्या वकीलांनी मला मानायला हवं....लग्न करून फारसं काय साध्य होणार? झाला तर तोटाच होणार ना ?  ती ते तसं का म्हणाली हे अजूनही कळलं नाही...बहुदा काहीतरी मन दुखलं असावं ऐन तारुण्यात तिचं...मी विषय तिथंच संपवला...
           जुन्या बातम्या वह्यांत चिकटवण्याची पूर्वीपासून सवय आहे मला..जुन्या बातम्या वाचताना मजा येते..आपल्या लिखाणात काही सुधारणा होतेय की नाही हे ही लक्षात येतं...एका वहीत गुलशनकुमार खून खटल्याचे कात्रण होते...त्या बातमीत चौकट केलेली समीराचीही बातमी आणि फोटो....क्षणभर समीराच्‌ डोळ्यांसमोर असल्याचा भास झाला...मग जुनी डायरी शोधली...त्यातली नावं आणि फोन नंबर्स पाहू लागलो...त्यात अॅड. समीराचं नाव आणि नंबर दिसला..पुढे छोटी फुली मारलेली..नेहमीची खूण...दुबई किंवा एकंदरच अरब राष्ट्रांमध्ये तसे अपघातांचे, दुर्घटनांचे प्रमाण अल्प आहे म्हणतात...तिथल्या सिला रेसॉर्टमध्ये मैत्रिणींसमवेत मौजमजा करण्यासाठी गेलेली समीरा स्विमींग टॅंकमध्ये बुडून अल्लाला प्यारी झाली...सात-आठ वर्षं उलटली या घटनेला...विश्वास तेव्हाही बसला नव्हता त्या घटनेवर आणि आजही ते खरं वाटत नाही... आणि आजही तिकडचं काहीही काम असलं तरी चटकन नजरेसमोर येते ती समीराच्‌...खजुराच्या मधाळ वाईनसारख्याच तिच्या स्मृती हृदयाच्या कुपीत कायमच्या बंदिस्त झाल्यात....


नियती कलावंताची

नियती कलावंताची
.............................
        पत्रकारितेच्या निमित्तानं पूर्वी अनेकदा येरवडा जेलमध्ये जायचो.. साधारणतः 1995 च्या सुमारास महादेव गोविंद नरवणे पुण्याच्या कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक होते...तुरुंगात  विविध सांस्कृतिक कार्यक्रम  ते आयोजित करायचे...त्यानिमित्तानं पत्रकारांना  बोलवायचे...तिथंच अरुण गवळी पहिल्यांदा भेटला..किरण वालावलकर, तान्या कोळी, सदामामा पावले, अशोक चौधरी, दिलीप कुलकर्णी  असे त्याच्या टोळीतले आणि इतरही अनेक खतरनाक गुंड तिथंच् पाहिले.....पैशाच्या बळावर तुरुंगातही ऐश करणारे गुन्हेगार जसे दिसले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही केवळ क्षणिक रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगणारे शेकडो कैदीही नजरेस पडले....जेलच्या पोलादी भिंतीआड घुसमटणारी मनं निरखता आली.. तुरुंगाच्या दगडी भिंतींनाही पाझर फुटावा अशा तिथल्या काही कहाण्याही समजल्या...प्रत्येक कैदी वेगळा.त्याचा गुन्हा निराळा अन त्यामागची कारणंही खूप आगळीवेगळी...त्यामुळं तिथले काहीजण अधूनमधून आठवतात..जयेंद्र मात्र कायमचा मनात घर करून बसला.. नियती एखाद्याच्या उमद्या आयुष्याची कशी फरफट करते अन् एखादा हाडाचा कलावंत तिच्यावर मात करून कसं कलासक्त आयुष्य जगतो याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे जय....

                    अनेक कैदी कारागृहातल्या पोलादी भिंतीआड होणारी घुसमट  कविता, गाणी  नाचाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कटतेने व्यक्त करायचे. त्यांच्या कविता इतक्या आशयघन अन् भावस्पर्शी असायच्या की डोळ्याच्या पापण्या कधी ओलावायच्या हे समजायचं नाही..दरवेळी नवनव्या कैद्यांचे कलाविष्कार पाहिले...त्या कार्यक्रमांमध्ये समान धागा होता तो सूत्रसंचालनाचा..एक गोरापान, उंच  तरुण उत्तम मराठीत सूत्रसंचालन करायचा...फर्ड्या इंग्रजीत,खणखणीत आवाजात समारोपाचं भाषण करायचा..हा तिथला अधिकारी आहे, जेलच्या लोकल स्टाफपैकी आहे की कैदी हे काही मला आधी कळलं नव्हतं...मग जेलर रामराव चौधरी यांनी त्याची माहिती दिली...तो तरुण होता ..जयेंद्र  उर्फ जय विश्वासराव....तो उत्तम चित्रकार होता..मराठी, इंग्रजी साहित्याचा त्याचा व्यासंग होता..येरवडा जेलच्या आवारातलं के.के.भवन म्हणून जे सांस्कृतिक केंद्र आहे ना तिथल्या भिंतीवर त्यानं मोठं मोठी चित्रे चितारलीत....तो  जन्मठेपेचा कैदी होता...अर्थात तसं असलं तरी त्यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता अन त्याची पार्श्वभूमीही गुन्हेगारीची नव्हती....क्षणिक क्रोधाने त्याच्या हातून गुन्हा घडला अन् त्याचं तारुण्य तुरूंगाच्या चार भिंतीआड करपलं...

                     कारागृहात माझी जयशी  अनेकदा भेट झाली...त्याला बऱ्याच गोष्टी विचारायच्या मनात होत्या...कागदावर असलेल्या गोष्टींखेरीज 'त्या' घटनेला इतर काय कंगोरे आहेत हे जाणून घ्यायचं होतं..पण, संकोचही वाटत होता.. एकदा त्यानेच  मनमोकळेपणानं सारं सांगून टाकलं.. तो मूळचा विदर्भातला ..1984 च्या सुमाराला तिथल्या कला महाविद्यालयात शिकत होता...काही मागण्यांसाठी तिथं विद्यार्थ्यांचा संप झाला..तो बरेच दिवस चालला..प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाशी झालेली चर्चा विफल ठरली..सारे प्राध्यापक चिडले होते..एके दिवशी जय मैत्रिणीसोबत कॉलेजच्या स्टाफरूममध्ये गप्पा मारत बसला होता....अचानक एक प्राध्यापक तिथं आले...या दोघांना तिथं पाहून त्यांच्या रागाचा पारा चढला....त्यांनी जयला बरेच बोल सुनावले.. ..मैत्रिणीसमोर झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला. संतापाच्या भरात त्याने त्यांच्यावर चाकूचा वार केला....घाव वर्मी बसल्याने प्राध्यापक मरण पावले....मग जयविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला..त्याला अटक झाली.... न्यायालयात वर्षभर खटल्याची सुनावणी झाली अन कोर्टाने त्याला दोषी ठरवून चौदा वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली...चंद्रपूरहून त्याची  येरवडा कारागृहात रवानगी झाली...

          सुरुवातीचे कित्येक दिवस  तुरुंगातल्या जीवनक्रमाशी जुळवून घेणं जयला भयंकर  कठीण गेलं... त्याला इतकी वर्ष आईच्या हाताचं सुग्रास जेवण खायची सवय होती. तुरुंगातली पातळ डाळ, जाड्याभरड्या रोट्या अन बावन्न पत्तीची भाजी पचवताना त्याला ब्रम्हांड आठवायचं.क्षणभराचा राग आयुष्य कसं उध्वस्त करू शकतो? या विचाराने रात्र रात्र त्याला झोप लागायची नाही.....हळूहळू तो तिथं रुळला..त्याच्यातला कलावंत दुप्पट उर्मिने, अधिक प्रतिभेनं उसळी मारू लागला......खडूने चित्र काढून त्याने तुरुंगाच्या पोलादी भिंती सजीव केल्या...हाती जे मिळेल ते वाचू लागला..लिहू लागला...त्याची कला तुरुंगातल्या अधिका-यांनी हेरली... त्याला सांस्कृतिक भवनात चित्र काढायची संधी मिळाली. अप्रतिम पेंटींग्ज चितारून त्याने सर्वांची वाहवा मिळवली...

                        मधल्या काळात मी पुणं सोडून नगरला स्थायिक झालो होतो..त्यामुळं  जयशी संपर्क तुटला...दोन वर्षांनी पुन्हा पुण्यात आलो..ऑफीसमध्ये एके दिवशी टपालात माझ्यानावे आलेली लग्नपत्रिका मिळाली..आधी पट्कन कुणाची ते लक्षात आलं नाही...नंतर कळलं की ही तर जयची लग्नपत्रिका... एका डॉक्टरशी तो विवाहबद्ध होणार होता..तो तुरुंगातून सुटला कधी ? या डॉक्टर कोण ? हे काही समजलं नाही..मग जेलर चौधरींना फोन केला..जयच्या लग्नाची आगळी कथा त्यांनी सांगितली.. एका स्वयंसेवी संस्थेने देशभरातल्या कारागृहांमधील कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केरळमध्ये स्पर्धा ठेवली होती. त्यासाठी जयने येरवडा जेलमधून एक पेंटींग पाठवले होते...त्याला देशपातळीवरचे प्रथम पारितोषिक मिळाले...या चित्रांचे प्रदर्शन केरळमध्ये भरवले गेले..तेथील एक डेंटिस्ट डॉ. विद्या यांना ते चित्र बेहद्द आवडले.. त्यांनी सर्वाधिक बोली लावून ते विकत घेतले..मग या चित्राच्या चित्रकाराचा शोध घेत त्या केरळहून पुण्याच्या येरवडा कारागृहात आल्या...प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन त्या जयला भेटल्या..चित्राच्या तर त्या प्रेमात पडल्याच् होत्या.. प्रत्यक्ष भेटीत उभयतांच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या....पुढे त्यांच्यात नियमित पत्रव्यवहार सुरू झाला....आणि दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला..

     एकंदर समाजाची मानसिकता लक्षात घेता जय आणि डॉ.विद्या यांचा विवाहाचा हा निर्णय प्रत्यक्षात येणं इतकं सोपं ही नव्हतं. एका प्रतिथयश डॉकटरने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याशी लग्न करणं कुणाच्याही सहज पचनी पडणार नव्हतं..पण डॉ विद्या निर्णयावर ठाम होत्या..जगाची त्यांनी पर्वा केली नाही...जयच्या  कलागुणांची महती पटवून देऊन घरच्या मंडळींची समजूत घातली....तुरुंगातल्या काही अधिकाऱ्यानीही त्याबाबत शिष्टाई केली..कसेबसे त्या मंडळींनी होकार दिला...जन्मठेपेची शिक्षा भोगून 1999 ला जय मुक्त झाला..नव्या जगात ताजा श्वास घेतला... डॉ. विद्या यांच्याशी विवाहबद्ध होऊन तो केरळमध्ये स्थायिक झाला... तिथं आता त्याचा मोठा स्टुडिओ आहे.तिथं तो कलेची आराधना करतो...आयुष्यातल्या कटू अनुभवांनी तो खचला नाही..उलट त्याची प्रतिभा बहरत गेली....देशभर त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरतं...गेल्याच महिन्यात मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत त्याच्या चित्रांचं प्रदर्शन झालं...त्यावेळी त्याची भेट हुकली..मधे एकदा तो पुण्यातही येऊन गेला...पण भेट झाली नाही...मधली अनेक वर्षे तो संपर्कात नव्हता... फेसबुकच्या माध्यमातून तो गवसला...मग त्याला थेट फोन केला....माझा आवाज ऐकून अक्षरश: गहिवरला....सगळे जुने दिवस त्याला लक्ख आठवतात...त्या कटू दिवसांच्या स्मृतींनी त्याच्या मनावर ओरखडे ओढलेत... त्याबद्दल  त्याच्या मनात आजिबात कटुता नाही. .नियतीनं दिलेले कौल स्वीकारत पण तिच्यापुढं न झुकता  तो पुढे चालला आहे...तो त्या दिवसांबद्दल भरभरून बोलतो..जुने दिवस आठवून गहिवरतो...ज्या नियतीनं आयुष्य बिघडवलं तिनंच नव्या आयुष्याची संधी दिल्याचं तो बोलून दाखवतो...त्याची मुलंही आता मोठी झालीत...या साऱ्यानाच् एकदा भेटायचंय... डॉ विद्या यांच्याशीही बोलणं होतं...केरळला यायचं त्यांनी खूपदा आमंत्रण दिलंय..मधल्या काळात माझी इथं बऱ्यापैकी अडचण झाली होती...ते समजल्यावर तर जयने मला केरळलाच् स्थायिक व्हायचा आग्रह केला..अनेकदा आमची हुकलेली भेट बहुदा पुढच्या आठवड्यात होईल....नियतीला हरवणाऱ्या या कलाकाराला भेटायची उत्सुकता मलाही लागून राहिली आहे...

दोन पाटील

दोन पाटील
..................

तसं तर गोंदवले, आणि फलटणमधलं सुट्टयांमधलं वास्तव्य सोडलं तर गावकीशी कधी माझा संबंध आला नाही..तीन पिढयांपासून पुण्यातच् आहोत..आमच्याकडं कुणाची शेती नाही..आम्ही पाटील नाही आणि पटेलही नाही..पण पाटील आडनावाच्या मंडळींशी लहानपणापासून ऋणानुबंध  जमलेत..श्रीकांत पाटील शाळेपासूनचा मित्र..चाळीत जय,विजय पाटील वीस वर्षे शेजारी रहायचे..'एसपी'च्या दुनियादारीत सचिन पाटीलसारखा जिवाभावाचा मित्र लाभायला  तर माझ्यासारखं नशीब लागतं.. पत्रकारीतेत आल्यावर राजकारण, समाजकारण, पोलीस खात्यातले अन निरनिराळ्या क्षेत्रातले अनेक पाटील परिचयाचे झाले..दोन पाटील मात्र कायमचं आयुष्य व्यापून राहिले..एक माळशिरसचे शिवाजीराव पाटील अन दुसरे मुंबईचे सोमनाथ पाटील..

या दोन्ही पाटलांशी  खूप जवळून संबंध आला आणि दोघांनीही माझ्यावर खूप माया केली..शिवाजीराव भवानराव पाटील म्हणजे शिवाजीभाऊ हे माझे सासरे...सोलापूरच्या अकलूज, माळशिरस भागातले  धुरंधर राजकारणी..समाजवादी विचारांची चळवळ  या भागात रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा.. चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य या नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध..माझं लग्न झाल्यानंतर भाऊंशी माझा संबंध आला..खरंतर 90 च्या दशकातही मिश्रधर्मीय विवाह म्हणजे कठीणच होतं.. हिंदू-मुस्लिम लग्न म्हणजे आणखीनच नाजूक गोष्ट..त्यात भाऊंसारखी जबरदस्त असामी माझे सासरे म्हटल्यावर अनेकजण हादरले होते..पण लग्नानंतर भाई वैद्यांनी जातीनं लक्ष घालून शिष्टाई केल्यामुळं काही बाका प्रसंग उद्भवला नाही..मित्रांनीही खंबीर साथ दिल्यानं ते दिवस निभावले गेले . भाऊ ग्रामीण भागातले असले तरी उच्च शिक्षित ..60 च्या दशकात ते पुण्याच्या एसपी कॉलेजला शिकले..त्यांचा मित्र परिवार मोठा..कार्यकर्त्यांचं जाळं अफाट..माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि वाळव्याचे राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांची खास मैत्री..मनाने सच्चे. वृत्ती साधी भोळी.. धूर्तपणा कधी त्यांना जमला नाही..बहुदा त्यामुळं त्यांना राजकारणात अपेक्षित यश कधी लाभलं नाही.. राजकीय संबंधांचा त्यांनी कधी फायदा घेतला नाही.. साफ मनाची मंडळी राजकारणात असण्याचा तो काळ होता.. शरद पवार त्यांना खूपच ज्युनियर..पण, पश्चिम महाराष्ट्रातल्या कित्येक बड्या नेत्यांना दूर सारून त्यांनी राजकारणात घेतलेल्या गतीचं भाऊंना आश्चर्य वाटायचं....त्यांच्या अंगात राजकारण भिनलेलं होतं... मी पुण्यात अन् पत्रकारीतेत आहे म्हणजे बहुदा पवारांच्या नेहमीच्याच संपर्कात असेन असं त्यांना वाटायचं बहुदा..फोनवर बोलताना घरची ख्यालीखुशाली विचारून झाली की त्यांचा पहिला प्रश्न असायचा , काय म्हणतोय शरद ? त्यांचे पवारांशी संबंध बहुदा असे एकेरी असावेत...मी आपलं काहीबाही बोलून वेळ मारून न्यायचो...पण राजकारण या विषयावर भाऊंची गाडी एकदा आली की मग ते भरभरून बोलत रहायचे..पवारांनी फक्त एका समाजाला धरून राजकारण केलं, त्यांनी राजकारणात किंवा समाजकारणात फक्त एकाच समाजाच्या लोकांना पाठबळ दिलं .त्यामुळं अन्य समाजाच्या कित्येक चांगल्या नेत्यांची गणितं बिघडली असं ते  बोलून दाखवत..त्याबद्दल त्यांच्या मनात खंत असायची..भाऊ राजकारणात जेवढे माहीर, तितकेच प्रसंग निभावून नेण्यातही.. दहा वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतोय..मोठ्या आई निवर्तल्यानं मी घरच्या मंडळींना घेऊन माळशिरसला गेलेलो...तेव्हा नाथाच्या मळ्यातल्या शेतात ते रहात...तिथं पोचलो तर नातलगांची, गाववाल्यांची मोठी गर्दी झालेली..त्यातल्या काहींना माझं लग्न पसंत नव्हतं..आम्हाला पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या.....तिथं आता नेमकं काय करायचं हे लक्षात न आल्यानं मी काहीसा अवघडलो होतो..भाऊ एका बाजेवर बसले होते..बाजूला सारे जमिनीवर कोंडाळं करून बसलेले..बऱ्याच नजरा आमच्याकडं होत्या..माझ्या चेहऱ्यावरचे भाव भाऊंनी ओळखले..ते उठून आले व हात धरून मला बाजेवर त्यांच्या शेजारी बसवलं...क्षणात सारा तणाव निवळला...मी आश्वस्त झालो...

भाऊंनी गावात पहिली शाळा काढली..माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई एकदा या शाळेला भेट देऊन गेलेत..घरच्या अन् गावातल्या पुढच्या पिढ्या उत्तम शिक्षण घेतील याची भाऊंनी सदा काळजी घेतली..त्यांना राजकीय वारस काही निर्माण करता आला नाही. राजकारण हाच् अखेरपर्यंत भाऊंचा  ध्यास राहिला..अगदी तसा पत्रकारितेचा वसा सोमनाथसरांनी शेवटपर्यंत जपला..राजकारणातल्या जमातवादाचा मुद्दा भाऊंना पुरून उरला.. पत्रकारितेतल्या जमातवादाची झळ सोमनाथ सरांना बसली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सोमनाथ सरांशी माझे संबंध जुने..ते मला खूपच् सिनियर .70..80 च्या दशकात ध्येयवादी पत्रकारांची एक सॉलिड फळी मराठी पत्रकारितेत होती..सर त्या परंपरेचे पाईक...कुठलाही प्रश्न अभ्यासू वृत्तीनं मुळातून मांडण्याची त्यांची पद्धत आमच्या पिढीतल्या पत्रकारांना मार्गदर्शक ठरली..एकदा ईदच्या दिवशी ते किशोर कुलकर्णी सरांसोबत माझ्या चाळीतल्या घरी शुभेच्छा द्यायला आलेले..तेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा ओळख झाली..तेव्हा ते मुंबई सकाळमध्ये वृत्त संपादक होते...त्यांचा पत्रकारितेतला आवाका व्यापक होता...मुळात ते खूप बुद्धीमान .. मराठी, इंग्रजी साहित्याचा त्यांचा दांडगा व्यासंग...ते सरकारचे राजपत्रित अधिकारी होते..पत्रकारितेची आवड म्हणून नोकरी सोडून ते या व्यवसायात रमले ..पुणे, कोल्हापूरमधल्या नोकरीनंतर त्यांची बदली मुंबईला झाली..तिथं त्यांचे व्यवस्थापनाशी काही मतभेद झाले...मग तडकाफडकी राजीनामा देऊन ते बाहेर पडले..पुढे लातूरच्या 'एकमत' चे संपादक झाले..त्या काळात पत्रकारितेत आमूलाग्र बदल होत होते.. या पेशाचे व्यवसायात अन पुढे धंद्यात झालेलं स्विकारणं त्यांना रुचलंही नाही अन पचलंही नाही..या क्षेत्रातली नवी पिढीही वेगाने पुढे जात गेली...कंपूशाही, जमातवाद वाढत गेला..सर या क्षेत्राच्या मूळ प्रवाहापासून दूर होत गेले...कधी मनाने बाजूला झाले...कधी दूर सारले गेले..पण सरांचा जनसंपर्क कायम राहिला..राजकारणातल्या दोन पिढ्या त्यांनी जवळून पाहिलेल्या...कित्येक नवे जुने राजकारणी अन अनेक नामवंत पत्रकार त्यांच्या नित्य संपर्कात होते.
तसे ते मूळचे धुळ्याचे.. पब्लिक स्कूलमध्ये शिकलेले..त्या शाळेशी जुळलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही..तिथल्या माजी विद्यार्थ्याना एकत्र करून त्यांनी माजी विद्यार्थी संघटना सुरू केली...निरनिराळे उपक्रम राबवले..अलीकडच्या काळात ते थेट पत्रकारीतेत सक्रिय नव्हते..पण, लिखाणाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.. निरनिराळ्या वृत्तपत्रांसाठी नियमित लिहायचे..मुंबईवरची दोन अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहून त्यांनी पूर्ण केली..नव्या जमान्यातले लॅपटॉप, टॅब त्यांनी स्वीकारले..सर्व क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींविषयी ते सजग होते..फेसबुकसारख्या सोशल मीडियावर ते मार्मिकपणे व्यक्त व्हायचे.. त्यांच्यातला हाडाचा पत्रकार एखाद्या छोट्या टिपणीतूनही दिसून यायचा..जव्हारच्या आदिवासी भागात कार्यरत असलेल्या डॉ. अनिता पाटील या सरांच्या कन्या..जव्हारच्या भेटीत त्यांच्याशी परिचय झाल्यानंतर सरांशी असलेलं नातं अधिक गहिरं झालं..मी जव्हार आणि लगतच्या भागात अनेकदा भटकायला जातो याचं त्यांना कौतुक होतं.. त्यांच्याशी नेहमीच बोलणं व्हायचं...मुंबईला गेलो की त्यांच्याकडं आवर्जून जायचो..खूप उमदा आणि दिलदार माणूस..त्यांचे अभ्यासाचे विषय निराळे होते..त्यांच्या गप्पांमधून निरनिराळ्या विषयांवर मस्त गप्पा व्हायच्या...

शिवाजीभाऊ आणि सोमनाथ सर दोघेही कमालीचे सभ्य ..सरळमार्गी ..राजकारणाच्या दलदलीत राहून भाऊ कधी बरबटले गेले नाहीत अन् पत्रकारितेच्या मोहमयी दुनियेत राहून सोमनाथसरांनी कुठे पाय घसरू दिला नाही..दोघेही आपापल्या क्षेत्रातल्या थोर आसामी..पण उभयतांच्या पदरात नियतीनं त्यांच्या क्षमतेइतकं माप  कधीच टाकलं नाही...आता वयाची चाळीशी उलटून पन्नाशीकडे प्रवास सुरु असताना सध्याच्या एकंदरच् साऱ्या  गढूळ वातावरणामुळं मी अनेकदा अस्वस्थ असतो..मन खिन्न होत राहतं.. अंधारछाया वाकुल्या दाखवत असतात..मग,उगवत्या पिढीतल्या मुलांचा उत्साह नवी उमेद जागवतो हे खरं...पण अधिक  अनुभव असलेल्या थोरामोठयांचा संवादही मनाला तजेला देत राहतो... त्यांच्या जिव्हाळ्याच्या दोन शब्दांचा जगायला आधार वाटतो..गेल्या काही वर्षांत एकापाठोपाठ असे आधारवड कोसळायला लागलेत..यंदाच्या वर्षी  10 जानेवारीला शिवाजीभाऊ अन् 16 नोव्हेंबरला सोमनाथसर इहलोकी गेले..माझ्यावर मुलासारखं प्रेम करणारे दोन पाटील या एकाच वर्षात  गमावले...यापेक्षा आणखी हानी काय असू शकते ?

जव्हारचा उरूस

जव्हारचा उरूस
.........................
जव्हारला जाणं मला आता नवलाईची गोष्ट राहिली नाही; पण अप्रूपही अजून संपलेलं नाही. दर भेटीत नवा, निखळ निसर्ग भेटतो. हिरवेगार डोंगर अन् शंखनीळ पाण्याचे झरे डोळ्यांचं पारणं फेडतात. कसलंही प्रदुषण नसलेली, स्वच्छ, मोकळी हवा तन मन तजेलदार करते ..गेली पाच वर्ष या आदिवासीबहुल भागात भटकतोय.कधी काही कारणानं, कधी उगाच पाड्यांवर मुशाफिरी..दरखेपेस नवी माणसं भेटतात. नवे अनुभव मिळतात..बोहाडा, दसरा, दिवाळी, होळी अशा इथे जोमानं साजऱ्या केल्या जाणाऱ्या पारंपारिक सणांना उपस्थित राहिलो..मोहाचे घुटके घेत तारप्याच्या तालावर थिरकलो...हळदीच्या समारंभाची धूम अनुभवली ..बघायचा राहिला होता तोराहिला होता सदरुद्दीन बाबांचा उरूस....यंदा या उरुसाला जायचा, आदिवासी जत्रा बघण्याचा योग् गाठता आला.

जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा, डहाणू आणि पंचक्रोशीतल्या दोन-तीनशे पाड्यांत सदारुद्दीनबाबांना महत्वाचं स्थान......पंधराव्या शतकातील हा योगीपुरुष..हे सदरुद्दीन बाबा की सदानंद महाराज असेही  पूर्वापार मतभेद आहेत..पंधरा वर्षापूर्वी दर्गा असलेली इमारत कोसळली...ती बाजूने पत्रे लावून तशीच ठेवलीय...भाद्रपद महिन्याच्या षष्ठी आणि सप्तमीला बाबांचा उरूस साजरा करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून पाळली जाते. यंदाही
मस्त जत्रा भरली होती..गणपतीत पुण्यात गर्दी होते, तशी लोकांची तुडुंब गर्दी झालेली..या भागातल्या गरीब, आदिवासी लोकांना मुळात मनोरंजनाची साधनेच् नाहीत..आता मोबाईल, इंटरनेट आलंय, पण त्याचं फॅड कमीच्.. विजेअभावी रोजचे किमान बारा- चौदा तास अंधारात राहणाऱ्या इथल्या लोकांना सण, उत्सव हिच आनंदाची बेटं... त्यामुळं आजुबाजूच्या पाड्यांवरचे हजारो आदिवासी  एसटी,टेम्पो,रिक्षा, दुचाकी अशा मिळेल त्या वाहनांनी जव्हारला सदरुद्दीन बाबांच्या मजारवर माथा टेकवण्यासाठी आले होते..एकंदर माहोल पाहून पुण्याच्या चतुशृंगीची, वीरच्या म्हस्कोबाची,  विरारच्या जीवदानी देवीची, बांद्र्याच्या मोतमाऊलीची, पालच्या खंडोबाची, खरसुंडीच्या सिध्दनाथाची यात्रा डोळ्यांसमोर तरळून गेली...तसंच चैतन्यमय अन श्रद्धेनं भारलेलं वातावरण..नाही म्हणायला माणसांमधला विशेषतः त्यांच्या स्तरातील फरक मात्र प्रकर्षानं लक्षात येतो..इथल्या निसर्गाप्रमाणेच इथली माणसंही निर्लेप, नितळ मनाची....झोळी फाटकी असली तरी उमद्या मनाची..

        गेली तीन वर्षे ऐन उरुसाच्या काळात वरुणराजा कोपला होता..त्यामुळं यात्रा भरूनही भाविकांचा हिरमोड झाला...गेले महिनाभरही इथे जोरदार पाऊस पडतोय.. जव्हारचा सारा परिसर हिरवागार झालाय... यंदा उरुसाच्या आदल्या दिवसापासून  पाऊस उघडला...त्यामुळं भाविकांचा उत्साह दुणावला. उरुसाला तुफान गर्दी उसळली...नजर जाईल तिथवर हिरव्यागार पाचूसारखी पसरलेली हिरवळ, धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या डोंगर दऱ्या, चारही बाजूने वेढलेले घनदाट जंगलाच्यामध्ये जणु बेटासारख्या असलेल्या जव्हारच्या उरसाला लांबलांबच्या  पाड्यातून आदिवासी एकवटले होते...गावभर माणसांचं मोहोळ फुटलं होतं. गर्दीमुळे अगदी एसटीसह सर्वच गाड्यांना गावात यायला रस्ता उरला नव्हता...रस्त्याच्या दुतर्फा फुगे, खेळणी, कपड्यांची दुकाने थाटलेली होती. गरागरा फिरणारे पाळणे, मौत का कुवा, छोटी आगगाडी याचं आकर्षण अद्याप तिथं टिकून आहे.....बांगड्या, गळ्यातल्या माळा, खड्यांची  ब्रेसलेट्स यांचं तिथल्या लोकांमध्ये अपार आकर्षण आहे.. रंगीबेरंगी कपड्यांनी, पादत्राणांनी दुकानं सजली होती.. आपल्याकडे सहसा न वापरल्या जाणाऱ्या पिवळयाधमक, राणी, गडद पोपटी अशा रंगांचे कपडे, सोनेरी, रुपेरी, चंदेरी बांगड्या हातोहात खपत होत्या...लोबान, धूप, उदबत्तीच्या आणि निशिगंधाच्या हार,शे-यांच्या अनोख्या गंधाने वातावरण भारले गेले होते...गुडदाणी  जिलेबी, हलवा, रेवड्या, गोडीशेव, नारळाच्या बर्फीची जोरदार  विक्री  सुरू होती. लाल भडक गुलाब पेरलेला केशरी हलवा, दालचा चावल, खिचडा, फिरनी असे खाद्यपदार्थ  मस्त सजवून ठेवले होते. जत्रेत सोरटचा जुगारही होता..तिथं पाच दहा रुपये लावून दसपट पैसे मिळवण्यासाठी अनेकजण नशीब अजमावत होते. गावच्या स्टॅंडपासून ते दर्ग्यापर्यंत आणि संबंध गावात तुफान गर्दी उसळली होती..मजारचं दर्शन घेऊन, तिथं फूल , शेरा अर्पण करून लोक जत्रेचा आनंद घेत होते..कपड्यालत्त्याची खरेदी करत होते..मुलाबाळांना खाऊ घेत होते..

        उरुसाच्या पहिल्या दिवशी संदलची मिरवणूक झाली..गावातले सगळ्या जातीधर्माचे, पंथाचे लोक उत्साहाने त्यात सहभागी झाले..स्पीकरवर हिंदी, उर्दू धार्मिक गाणी लावली होती. दर्ग्याजवळ स्थानिक मान्यवर मंडळी बसली होती...महिलांचीही संख्या लक्षणीय होती.. संपूर्ण गावभर फिरून संदल दर्ग्यावर नेऊन वाहण्यात आला..दर्ग्याच्या परिसरात कव्वाली सुरू होती.. लोक डोलत होते, भक्तीभावाने झुलत होते..आनंदाने नाचत होते...आगळं चैतन्य आसमंतात निर्माण झालं होतं...उरुसाला रंग चढला होता..

..जत्रा रात्रभर सुरू होती...मध्यरात्रीनंतर कधीतरी दमलेले लोक आपापल्या टेम्पो, रिक्षात जाऊन नातलगांची, सहप्रवाशांची वाट बघू लागली...तांबडं फुटलं तसं ड्रायव्हर लोक गरम गरम चहा पिऊन ताजीतवानी झाली...जव्हारमधून चारहीबाजूच्या पाड्यांकडं वाहनं पळू लागली... लोक शेतीच्या कामासाठी घराकडं निघाले...थोडाच् वेळ गेला अन् मराठी, कोळी, हिंदी, भोजपुरी गाण्यांचा कल्लोळ स्पीकरवर सुरू झाला.. पाळणे पुन्हा गरागरा फिरायला लागले..आगिनगाडी धावू लागली..'मौत का कुवा'मधल्या मोटारसायकलींचे सायलेन्सर्स आसमंतात गुरगुरू लागले..जत्रेत फिरून दमल्याने मी घराकडे निघालो होतो अन् आदल्या दिवशी उरुसाला यायला न जमलेले शेकडो दूरदूरच्या पाड्यांवरचे बायाबापडे मुलाबाळांसकट ट्रक, रिक्षा, टेंम्पोमधून जव्हारमध्ये यायला सुरुवात झाली...दिवसभर आदिवासी बांधवांची एकच गर्दी दाटली...संस्थानच्या परंपरेनुसार जव्हारचे राजे महेंद्रसिंह मुकणे उरुसाला आले..संस्थानतर्फे दर्ग्यावर त्यांनी चादर अर्पण केली... बाबांच्या नावाचा एकच जयघोष झाला. कव्वालीची जुगलबंदी सुरू झाली..सलग तीन दिवस उरुसाचा जल्लोष सुरू होता..तिथून पुण्याला परतलो...मनात अजूनही जत्रा सुरू आहे....

किरवंत

च्याऊ...एक किरवंत
-  -  -  -  -  -  -  -  -  -
                नितीन कुलकर्णी हे त्याचं नाव... पाच फूट उंची....सावळा वर्ण...सरळ नाक....त्याला च्याऊ हे नाव नेमकं कधी आणि का पडलं हे लक्षात नाही आता.....पण तो आमचा खास दोस्त....आमच्याच चाळीतला....माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठा.........त्यामुळं त्याचं सर्कल मोठ्या पोरांचं......दर शुक्रवारी फर्स्ट् डे फर्स्ट शो पिक्चर बघायचा त्याला भारी नाद....कुठल्याही पिक्चरचा रेफ्ररन्स विचारा.... मिनिटांत डिटेल सांगणार ....दर शुक्रवारी मस्त आंघोळ बिंघोळ करून कडक इस्त्रीचे कपडे घालून हा कुठल्यातरी थिएटरला जायचा...एकटाच......फर्स्ट डे फर्स्ट शोवाल्या एकेकट्या मंडळींचा एक ग्रुपच झाला होता त्यांचा....पिक्चर सुटला की लगेच हे ठरवणार ...खुद्दार येतोय ...पुढच्या शुक्रवारी नीलायमला भेटू....असं काहीतरी....आणि भेटायचे हे सारे.....बरं च्याऊचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय काय? तर...मटका आणि नंतर लॉटरी.....खूप मटका खेळायचा....आणि बहुदा त्याला लागतही असावा ....कारण आर्थिक परीस्थिती चांगली होती.....कॅरम उत्कृष्ठ खेळायचा.....क्रिकेटची मॅच जीव की प्राण......या त्याच्या छंदांमुळं त्याची दोस्ती खूप....एसपी समोरच्या उदय विहारला रात्र रात्रभर कॅरम खेळत बसायचा...कुणी दोस्त भेटले तर दिवस दिवस रमी खेळत बसायचा...पण चाळीत राहून फार कधी आमच्यात मिसळला नाही...कधी वासुगिरी फारशी केली नाही...हाणामा-या त्याचा प्रांतच नव्हता....क्रिकेट सिनेमा आणि मटका यातच तो मश्गुल असायचा आणि त्या क्षेत्रातील खूप लोक त्याला चांगली ओळखायची...अर्थात असं असलं ना तरी त्याचा स्वभाव पापभीरू होता...फारसा कुणाच्या अध्यामध्यात कधी पडला नाही....नाही म्हणायला त्याच्या जवानीत एक पोरगी घेऊन पळून गेला होता....पण आठवडाभराने हा याच्या घरात.... ती तिच्या घरात....सुखाने नांदू लागले....चाळीतला मामला...त्यामुळे हाक ना बोंब करायचा शिरस्ता...एवढा एक प्रसंगवगळता च्याऊ फार कधी कोणत्या कारणाने लक्षात राहीला नाही...त्याची ती खटारा ल्यूना घेऊन तो गुमान कॉलनीबाहेर जायचा...एसपीच्या कट्ट्यावर  थांबायचा....येता-जाता चाळीसमोरच्या कट्ट्यावर बसलेल्या आमच्याकडं बघून हसायचा..एवढंच... चाळीतल्या गणपतीत लांबून लांबून असायचा....तसा तो काही आम्हाला तुच्छ लेखायचा नाही...पण त्याचं विश्व निराळं होतं....

                     अलिकडच्या काळात च्याऊमधे खूप बदल झाला....काकांच्या जागेवर तो कार्पोरेशनला नोकरीला लागला....आमच्या पिढीतली पोरं निरनिराळ्या क्षेत्रात 'चमकायला' लागल्यावर तो आवर्जून ओळख द्यायला लागला...आमच्या कट्ट्याचा तो मेंबरच झाला........निरनिराळे किस्से सांगायचा तो...आम्ही अवाक्‌ होऊन ऐकत बसायचो....त्याचं एक झालं...ते म्हणजे  त्याच्या सगळ्याच गोष्टींना उशीर होत गेला...चाळीशीनंतर  नोकरीत तो काहीसा स्थिरावला....त्यानंतर त्याने मुली पहायला सुरूवात केली... तोपर्यंत खूपच उशीर झाला होता...काही स्थळं याने नाकारली...काहींनी त्याला नापसंती कळवली....कार्पोरेशनच्या नोकरीत असताना त्याची बदली वैकुंठ स्मशानभूमीत झाली.....सुरुवातीला त्याला ते आवडलं नाही...नंतर रमला तिथंही.....वैकुंठातील प्रत्येक पार्थिवावर वैदीक संस्कार करणं मोघे गुरूजींना शक्य व्हायचं नाही....मग नितीन त्यांच्याकडून शिकला....आणि किरवंताचं काम त्यानं सुरू केलं.....आम्ही उडालोच...कधी काळी जुगार, मटका खेळणारा च्याऊ एकदम किरवंत वगैरे झाला हे आमच्या पचनीच पडत नव्हतं....खूप थट्टा करायचो त्याची...पण तो कधी चिडला नाही....त्याने शांतपणे  त्याचं काम सुरू ठेवलं....आणि महत्वाचं म्हणजे सर्व नाद पूर्णपणे सोडून दिले.....त्याचं विश्व बदललं होतं...आणि त्यातही तो पूर्णपणे रममाण झाला होता....त्याचा गरीब स्वभाव पाहून वैकुंठातल्या काहीजणांनी त्याला त्रास दिला....खूप सोसल्यावर मग एकदा फोन केला त्यानं...त्याचं बोलणंही साधं आणि थोडक्यात असायचं....''  ए आबिद्द्....त्या ***** याच्याकडं बघ रे जरा.....उगा त्रास देतोय....हां..का...'' बस्स...एवढं सागून फोन बंद...मग आपणच पोरांना विचारायचं...माहिती घ्यायची...कुणाला तरी तिकडं धाडायचं......मग दोन-चार दिवसांनी पुन्हा त्याचा फोन...'' आबिद्द्....तो आला बरं का जाग्यावर...आता तू काय करू नको.....हां  का..'' बस्स एवढंच..काय?  का?  कसं ? कशासाठी?  हे तो सांगायचा नाही....मी विचारायचो नाही....तेवढं अंडरस्टॅन्डींग होतं आमच्यात....एकदा एका प्लॉटवरून तिथल्या देशपांडे सरांनी याला बराच मोठा गंडा घातला....बर तो मास्तर पोलिसांना आणि काही गुन्हेगारांना धरून होता...ब-याच जणांना त्याने असंच फसवलं...नोकरी-व्यवसाय करून साठवलेल्या पाच लाख रूपयांचा फटका बसल्यानं  च्याऊ सैरभैर झाला होता....काय ....कसा तिढा सोडवावा या विचारात असतानाच अशाच प्रकरणात एका ग्रुपच्या पोरांनी त्या देशपांडे सरांना  बडवलं ......हे एके दिवशी समजलं....लगेच  दुस-याच दिवशी आम्ही त्या सरांची वरातच काढली पार वैकुंठात....विद्युत दाहिनीत टाकतो म्हटल्यावर हादरला...च्याऊचे पैसे दिले त्याने...थोडेफार राहीले असतील....पण त्यामुळं च्याऊ खूप खुष झाला होता...कट्ट्यावर पार्टी वगैरे द्यायचं बोलू लागला ....त्याच्या नजरेतला आनंद खूप समाधान देणारा होता.....तो सर्वकाळ वैकुंठातच असल्यानं कुणा प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झालं, गुंडाची मयत आली की मला हमखास फोन करायचा....माझा हा दोस्त माझा चांगला सोर्सही झाला होता. ओळखीतल्या कुणाचं निधन झालं की मी त्याला फोन लावायचो....तो वैदीक संस्कार तर करायचाच; पण आम्ही जाईपर्यंत सर्व चोख व्यवस्था तयार ठेवायचा....

                              मध्यंतरी एकदा कट्ट्यावर बसलो होतो...सहज वर पाहिलं...तिस-या मजल्यावरच्या गॅलरीत च्याऊ हातात माळ घेऊन जप करत होता....मी विचारलं एकाला....पार्थिवावर वैदीक संस्कार करणा-या किरवंतांना  भूतप्रेतांचा त्रास होऊ नये म्हणून काही विशिष्ठ जप असतात. तो जप तो करायचा..पण त्याचा हा किरवंताचा व्यवसाय त्याच्या वैवाहिक जीवनासाठी अडथळा ठरला...पूर्वी काही स्थळं यायची तरी त्याच्यासाठी....या व्यवसायामुळं ती ही बंद झाली....

                   च्याऊविषयी आज या आणि कित्येक आठवणी दाटून आल्या....झालं काय की गेले 2-4 दिवस खूप धावपळीत होतो....आज सकाळी साडेसहाच्या सुमारास विक्रमचा फोन आला...च्याऊ गेला.....सुन्न झालो....मी कॉलनी सोडून जवळपास 18 वर्षं झालीत...आमच्यापैकी सारेच कुठं कुठं बाहेर पांगलेत...पण चाळीतल्या कट्ट्‌य़ावर जमतोच नेहमी......या कॉलनीतल्या, चाळीतल्या आमच्या दुनियादारीचे एकेक बुरूज ढासळायला लागलेत आता.....मागं विज्या पवार असाच गेला..तो तर आमचा हिरोच होता....त्याआधी सागर मांढरे गेला....तो आमच्या टोळीचा सरदार आहे....असं लोक चिडून बोलायचे... एकदा तो घरातनं गेला तो गेलाच....परागंदाच झाला ...राजा पळसकर गेला...भूषण गेला..संजा वैद्य गेला...अंत्या गेला....नन्या बेंद्रे..अनिल बेंद्रे.....कितीतरी गेले.....निरनिराळ्या मार्गांनी गेले...च्याऊ तर काल रात्री घरात टीव्हीवर मॅच बघत बसला होता....अचानक उचकी लागली...उलटी आली म्हणून बेसिनकडं पळाला....तिथंच खेळ खलास.....सकाळी वैकुंठात गेलो....इतकी वर्ष आमच्या ओळखीतल्या कुणाचीही बॉडी असली की कसल्याही सोपस्कारांची वाट न पाहता ज्याच्यामुळे पटकन सारी कामे मार्गी लागायची; त्या च्याऊचं पार्थिव 'मृत्यु पास' नाही म्हणून अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहीलं होतं.....रमेश काळे, सुनील कदम वगैरे मंडळी आली.....त्यांनी धावपळ केली.....पासाचं काम झालं आणि आमच्या आयुष्यात आलेल्या या किरवंताने  आमचा अखेरचा निरोप घेतला . . . . .

जव्हार विक्रमगडची कैफियत

जव्हार-विक्रमगडची कैफीयत :-
 -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  - 
 आदिवासी जमात म्हणजे डोक्याला पिसं खोचणारे, रंगिबेरंगी पोषाख घालणारे, भडक मेकअप करणारे, धनुष्यबाणानं शिकार करणारे लोक अशी एक प्रतिमा मनात होती....त्यांचा राजा मस्तपैकी शहामृगाच्या पिसांचे मुकुट घालून बसलाय...रात्री हरणांची शिकार करून विस्तवावर ते भाजतायेत.....चहुबाजूला आदिवासी लोक छानपैकी नृत्य करताहेत...राजाबरोबर खास मेहमान म्हणून मातीच्या वाडग्यातून कसल्याशा प्राण्याचं रक्त प्राशन करतोय...मोहाची दारू पितोय वगैरे..वगैरे...स्वप्नं पडली होती काहीवेळा.....सिनेमातली दृश्य पाहून...कथा-कादंब-यांमधील वर्णन वाचून तशी प्रतिमा तयार झाली असावी....पण परवाच्या दौ-यात पार छेद गेला या प्रतिमांना....वास्तव समोर आलं...वास्तव जवळून पाहिलं..वास्तव अनुभवलं.....  वाईट वाटलं....अस्वस्थ झालो... ऐषोरामी, विलासी राहणीमानाची लाज वाटली....आपल्याकडे कुटुंबातील माणसांपेक्षा घरातील वाहनांची संख्या जास्त....पण ठाणे, मुंबई, नाशिकपासून जेमतेम शंभर कि.मी. अंतरावरील या आदिवासी पाड्यांवर रोजच्या जगण्याची मारामार...दोनवेळा पोट भरण्याची मारामार....इथं प्रदुषण नाही...कसलंच...वाहनं नाहीत...कारखाने नाहीत....धूर,धूळ येणार कुठून?? ओझोन आहे खूप...पण नुस्ता ओझोन मिळून पोट तर भरत नाही ना??? जव्हार-विक्रमगड परिसरातील शेकडो पाड्यांची ही कैफीयत आहे....

 जेमतेम आठ-दहा हजार लोकसंख्या आहे जव्हारची.....आजुबाजूला...पार द-याखो-यांमध्ये, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा दुर्गम भागात शंभरएक पाडे आहेत....तिवसपाडा, वेहेलपाडा, पासोडीपाडा, वाघीपाडा अशा नावांचे....कशिवली, खुडेद अशा नावाच्या छोट्या वस्त्या.....सर्व पाड्यांवर विहीरी...आणि पाणी एकातही नाही....नळ वगैरे अजून पोचलेलेच नाहीत....कोरड्या ठणठणीत पडलेल्या विहिरींच्या पार तळाशी गेलेलं पाणी आणायला बायका-मुलांना चार-पाच मैल लांब जावं लागतं.....एसटीसाठीही किमान असंच अंतर कापावं लागतं... एसटीने गेले, तर परतायचं पायी...किंवा पायी गेले तर येताना एसटी...दोनवेळा एसटीही परवडतं  कुणाला....? खूप गरीब आणि साधी भोळी माणसं आहेत इथंली.....परीस्थितीनं हतबल केलंय त्यांना...भात आणि नागली एवढीच दोन पिकं घेता येतात तिथं...त्याचीही विक्री नाही....कुटुंबाचं कसंबसं पोट भागेल इतकंच पिक मिळतं.... मेथी, शेपू, चवळी, माठ, अंबाडी, गवार...असली एकही भाजी नाही...सा-या रानभाज्या....कुणाकडं समारंभ असला तर तिथं वांग्या-बटाट्याची भाजी.....तसं तर वांग्या-बटाट्याची भाजी मला खूप आवडते...पण, परवा तिवसपाड्याला प्रियांका धूमच्या हळदीला गेलो.. तिथं खाल्लेल्या वांग्याबटाट्याच्या भाजीइतकी चविष्ठ भाजी कधी खाल्ल्याचं स्मरत नाही........इकडं लग्नापेक्षा हळदीला महत्व जास्त....सगळे पै-पावणे हळदीला येणार...दुपारी सगळे विधी झाले,की पांढरा भात, वरण आणि वांग़्या बटाट्याच्या भाजीचं जेवण....इथला हाच मेनू असतो... आपल्यासारखी जिलेबी, लाडू, गुलाबजाम अशी स्वीट डीश नाही....चांगल्या परीस्थितीतलं लग्न असलं तर कोंबड्या कापतात... पण गोड नाही.....रात्री बाजावाले येतात.....मोहाच्या दारूच्या नशेत म्युझिकच्या तालावर सगळे मस्त ताल धरून नाचतात...मोहाची दारू इथं अनिवार्य....मी ही चाखली....मोहाच्या फुलांचा उग्र गंध, कडवट चव आणि त्यात गावठी गुळाचा गोडवा....एकाच ग्लासमध्ये तरंगायला लागलो होतो...खूप काळजी घेतात हे लोक पाहुण्यांची....पाड्यावर त्या दिवशी कुणाकडेच नव्हती...पण,  मला हवी आहे म्हटल्यावर कितीतरीजण निरनिराळ्या पाड्यांवर धावले ....खरंतर परत जायला निघालो होतो...पण त्यांनी थांबवलं आग्रह करून..आणि कुठून कुठून आणलेल्या बाटल्या आणल्या...त्या पाहूनच चक्रावलो...म्हटलं आता महिनाभर झोपतोय इथंच पाड्यावर.... .. पण..तसं काही घडलं नाही..... रात्री पुन्हा यायचं आश्वासन देऊन मी जव्हारला परतलो...

 जव्हार, विक्रमगड, मोखाडा भागात आदिवासींच्या वारली, कातकरी, ठाकूर, महादेव कोळी, ढोर कोळी, कोकणा अशा अनेक जमाती.... हा समाज मुळातच उत्सवप्रिय...म्हणूनच त्यांच्या जीवनात नृत्याचं मोठं स्थान .. ... तारा नृत्य, डांग नृत्य, टिपरी नाच, वाघोबा नृत्य, तबला नाच, ढोल नाच, कोंबडी नाच, सांगळे नाच, तूर नाच, गौंड नाच असे नाचाचे काही प्रकार ... तारपा नृत्य हे सर्वाधिक प्रसिध्द..पावसाळ्यानंतर आलेल्या पिकाच्यावेळी, नवीन भाताच्या लावणीच्यावेळी , घरी आणलेल्या पिकाच्या पूजेच्यावेळी  नृत्याच्या माध्यमातून उत्सव साजरा करतात.... .... दुधी भोपळ्यापासून तारपा बनवतात.  शेतीची कामं आटोपली की रात्री ढोलकीच्या तालावर फेर धरून कामड्यांचा नाच करतात. निसर्गाच्या कोपामुळे बऱ्याच वेळा पाऊस वेळेवर न पडल्यास गीत व नृत्यामधून मेघदेवतेची आळवणी करतात....

 इथल्या लोकांना बच्चन कळत नाही....दाऊद कळत नाही...मोदी कळत नाही आणि मुशर्रफही कळत नाही...त्यांना पुरेसं पौष्टीक अन्न नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही....रहायला साधी मातीची,कुडाची घर आहेत....करायचयं काय यांना राजकारणाशी? कुठला गॅंगस्टर इथं राज्य करणार??कशासाठी??? इथं भौतिक संपत्तीच नाही........इथल्या माणसांना आता मोबाईल कळतो...पण बोलणार काय? अन कुणाशी??? लग्नात इथं हुंडावगैरे काही नाही....सारा खर्च मुलाने करायचा...भांडणं नाही . . .तंटा नाही.....पत्रिकेमध्ये प्रेषकांमध्ये फक्त पुरुषाची नावे...बाकी सर्व नावे महिलांची.....मुलांची नावं काकडी, माडी, सोमी, रिफील, सेहवाग, शिडी, चमिक्षा अशी काहीही ...त्याला काय अर्थच नाही...आवडलं म्हणून ठेवलेलं....पण म्हणून ही माणसं वेडी नाहीत ....हे कळत नाही म्हणून त्यांचं काही अडतही नाही....पाऊस पडतो...हे भात पिकवतात....भात खातात...मोहाची बाटली पितात....सणसमारंभ करतात...देव पूजतात...नाच करतात...इकडच्या पाड्यावरची मुलगी तिकडच्या पाड्यावर दिली जाते......पाड्या पाड्यांवरच नातीगोती होतात....इथं देवदेवस्की करणारे भगत आहेत...पण ज्योतिष, भविष्य सांगण्याच्या नावाखाली लुटणारे ज्योतिषी नाहीत...या समाजात राशी बघितल्या जात नाहीत...कुंडली बघत नाहीत.....पण लगिन झोकात करतात..........

 या आदिवासींचं अवघं जीवन हलाखीत गेलं.....पण उगवती पिढी आश्वासक आहे....डॉ. भरतकुमार महाले  त्याचं सर्वोत्तम प्रतिक...इथल्याच आदिवासी पाड्यांवर वाढलेले भरतकुमार जिद्दीने शिकले...एमबीबीएस झाले...स्त्रीरोग विषयांत प्राविण्य मिळवलं...पुढं पदव्या मिळवल्या...पुण्या-मुंबईसारख्या महानगरातूनच नव्हे, तर विदेशातूनही खूप मागणी असूनही ते इथंच सरकारी नोकरीत राहीले ..आदिवासी बांधवांची सेवा करायला....डॉक्टरांचं समर्पित वृत्तीने सुरू असलेलं काम थक्क करणारं आहे....किती तळमळीने राबतो हा माणूस...इथलं कॉटेज हॉस्पिटल म्हणजे शासकीय रुग्णालय आपल्याकडल्या कुठल्याही ग्रामीण रुग्णालयांपेक्षा कितीतरी उत्कृष्ठ....खूप समर्पित वृत्तीने काम चालतं इथे....त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनिता पाटील यांचं त्यांना तितकंच तोलामोलाचं सहकार्य लाभलंय....डॉक्टर मॅडमचा रिच खूप...खूप निरनिराळे कॉन्टॅक्टस जपलेले... माणसं जमवलेली.....त्यांच्या हॉस्पिटलमधील नर्स सविता भेटली...ती ही दुर्गम पाड्यावरची....पण शिकली ती जिद्दीने....चांगलं काम करतेय....हळदी समारंभात छोटीशी चेतना धूम भेटली...तिला विचारलं कितवीत आहेस....ती म्हणाली....सेव्हनथ्‌ स्टॅन्डर्ड......मी चमकलो...तिच्या वडिलांनी ठाण्यात नोकरी धरली...आई-बाबांसोबत चेतनाही तिथं गेली...छानपैकी इंग्रजी शाळेत शिकते...अशोक जाधवही याच पाड्यावरचा....ठाण्याच्या टोल नाक्यावर नोकरी करतो...रबाळ्याला राहतो..त्याचीही मुलगी छान चुणचुणीत...मुलं शिकू लागलीत....इथं असं राहून उपयोगाचं नाही..हे लक्षात आलंय त्यांच्या....कुणी कंडक्टर...कुणी सुरक्षा रक्षक...कुणी मिळेल ते काम करतंय....प्रियांका कामाडी....चक्क पोलीस दलात....तिच्याशी सहज गप्पांमधून आदिवासी रीतीभातींची बरीच माहिती समजली... .... पूर्ण आदिम अशा आदिवासी पाड्यातून तिचं कुटुंब जव्हारला स्थलांतरीत झालेलं...ती बारावीपर्यंत शिकली...पुढं कॉलेज करत असताना पोलीस भरती जाहीर झाली....तिने परीक्षा दिली ....फिजिकलला जिद्दीने धावली...पळाली...उड्या मारल्या...वजनं उचलली...आणि सिलेक्ट झाली....ठाणे पोलीस दलात आहे आता ती...काळी सावळी,  चुणचुणीत प्रियांका मूळ प्रवाहाशी तोल सावरताना आदिवासी भागाशी असलेली मूळ नाळ विसरली नाही....वेळ मिळेल, सुटी मिळेल तशी येते ती जव्हारला... सगळ्याच पाड्यांवर लोक छान बोलले....सध्या बाएफ, प्रगती प्रतिष्ठानसारख्या एनजीओंनी चांगलं काम चालवलंय इथं....त्यांच्यामुळं काजूपाडे...आंबापाडे उभे राहू लागलेत..इथल्या झेंडू, मोग-याचा सुगंध ठाणे, मुंबई, नाशिकमध्ये घमघमू लागलाय....

 ......रात्री पुन्हा गेलो मी तिवसपाड्यावर....लोक लाईट यायची वाट बघत होते...रात्री दहाला लाईट आले...मग बाजा सुरू झाला....एक तीन-चार वर्षांची मुलगी आली  . . . एकटीच डाव्या हाताची तर्जनी वर करून नाचू लागली...मग एक स्त्री आली...एक-दोन मुले....एकेक करत माहोल बनत गेला...आणि थोड्याच वेळात  सगळेच नाचू लागले...मी ही ठेका धरला...इथं हाताचे बोट वर करून नाचायची एक वेगळीच पद्धत आहे....ते त्यांच्या रक्तातच भिनलंय की काय कल्पना नाही...पण मग ती मुलगी कशी आपोआप तशी नाचू लागली...?
.रात्र चढत चालली होती....हळदी समारंभाने जोर पकडला होता.... 'मोहा' चा अंमल वाढू लागला होता .....बॅंड बाजाचे सूर टीपेला पोचले होते......नवरी नाचायला आली...हळदीने नखशिखांत माखलेली नवरी एक बोट वर करून ताल धरू लागली..

..'' गो-या गो-या गालावरी

चढली लाजेची लालीऽऽऽगं...

पोरी नवरी आली."....चे स्वर घुमू लागले ..

... मुलं-बाळं, पुरुष, स्त्रिया, वृद्ध, सारे सारे एका लयीत बोट वर करून नाचू लागले होते.............त्या माहोलमध्ये माझ्या पायांनी कधी ताल धरला समजलाच नाही....नाचता नाचता सहज नजर गेली.....नवरी छान ठुमकत नाचत होती खरी....
.कुणाचं फारसं लक्ष नसल्याचं पाहून
आसवांत गोठवलेल्या नदीला तिनं हळूच मार्ग करून दिला होता.....

अत्तराचे दिवस

अत्तराचे दिवस
 - - - - - - - - -
 बारा-पंधरा वर्षांपूर्वीची घटना. . .अरविंद इनामदार राज्याचे पोलीस महासंचालक झाले होते..त्यांची खास मुलाखत घ्यायला मुंबईला गेलो होतो...इनामदार साहेबांचा स्वभाव मनमोकळा....त्यांच्याशी परीचयही आधीपासूनच होता..त्यामुळं छान गप्पा रंगल्या..तिथून पुण्याला निघालो...मग..लक्षात आलं की आग्रीपाडा पोलीस स्टेशनला जायचंय..विजय साळसकर तेव्हा तिथं नेमणुकीस होते.. त्यांच्याशी फोन झाला होता...ते वाट पाहत थांबले होते...पण मलाच जास्त उशीर झाल्यानं ते निघाले होते...त्यांची पांढरी शुभ्र टाटा सिएरा पोलीस स्टेशनच्या दारातच आमच्या फियाटला क्रॉस झाली..मी चटकन गाडीतून उतरलो..ते त्यांच्या लक्षात आलं...गाडी थांबवून ते उतरले...एका नजरेतच मला ओळखलं ...दणकट पंजानं हस्तांदोलन केलं..थोडंफार बोलणं झालं...खूप आपुलकीनं विचारपूस केली त्यांनी...त्यांना अर्जंट कुठतरी जायचं होतं..कीप इन टच म्हणून ते निघाले...साळसकर साहेबांची ती माझी पहिली ओळख...

 साळसकरांचं व्यक्तिमत्व उमदं..स्वभाव ऋजू..मितभाषी.. आमच्या अनेकदा भेटी झाल्या..कधी मुंबईत, कधी पुण्यात.....त्यांची पोस्टींग पुण्यात कधी नव्हती...त्यांचं नाव गाजलं ते मुंबईत.....ते ही अंडरवर्ल्ड ऐन भरात असताना..... 90 च्या दशकात   गॅंग़वॉरमुळं मुंबापुरी भयभीत झाली होती.....दाऊद इब्राहिम, अमर नाईक, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या टोळ्या मुंबईवर वर्चस्व ठेवण्यासाठी झुंजत होत्या..शोध प्रतिशोधाच्या नाट्‌य़ाने भरदिवसा रक्ताचे सडे रस्त्यावर पडत होते.. ..अखेर,  गोळीला गोळीनेच उत्तर देण्याचे आदेश निघाले अन्‌ मुंबई पोलीस दलातील शूटर्स रस्त्यावर उतरले..प्रदीप शर्मा, दया नायक, प्रफुल्ल भोसले,रवींद्रनाथ आंग्रे, प्रदीप सावंत अशा जिगरबाज पोलीस अधिका-यांच्या या फळीत  साळसकर  अग्रभागी होते..गुन्हेगारी टोळ्यांमधील आघाडीचे मोहरे तर साळसकर यांनी टिपलेच...पण, अमर नाईकला लोळवून एका बड्या डॉनला यमसदनी पाठवण्याची अतुलनीय कामगिरीही त्यांनी केली...त्यामुळंच आदरानं त्यांना अनेकजण `महाराज' म्हणू लागले होते...असा हा शूटरोंका शूटर असलेला हा मित्र प्रत्यक्षात खूप मृदू स्वभावाचा आणि कसलाही अभिनिवेश नसलेला...पांढरी टाटा सिएरा त्यांची लाडकी गाडी..परफ्युम्सची खूप आवड..त्यामुळं आमच्यात नेहमीच अत्तराच्या कुप्यांची देवाणघेवाण व्हायची..कुठलं अनोखं अत्तर मिळालं की ते आवर्जून पाठवायचे..मुंबईत अफाट जनसंपर्क असलेल्या साळसकर साहेबांचे पुण्यातही अनेक मित्र होते...स्टेशनजवळच्या एका लॉजमध्ये ते अनेकदा उतरत..तिथंच गाडी लावून रिक्षानं ते पुण्यात फिरायचे...त्यांची कामं काय असायची हे त्यांनी कधी कळू दिलं नाही...मी ही विचारायचो नाही...ते ही सांगायचे नाहीत..पण आमच्या गप्पा दिलखुलास व्हायच्या...मितभाषी असलेल्या या मित्राकडून अंडरवर्ल्डमधील एकेक कहाण्या उलगडत गेल्या...बातम्यांमागील बातम्या लक्षात आल्या..

 एकदा साळसकर यांच्यासोबत पुण्यातल्या पॅनकार्ड क्लबला बसलो होतो..समोरच्या उघड्या जागेत एक मुलगा लघुशंका करताना दिसला..संतापाने त्यांनी हातातला चमचा त्याला फेकून मारला...पोरगा होता स्थानिक..आपल्या एरीयातच आपल्याला कुणी मारायचा प्रयत्न केला हे काही त्याला सहनच झालं नाही..तो गेला वस्तीत धावत....तिथल्या भाईला सांगितलं..पोरांची जमवाजमव केली.....ते सारे क्लबबाहेर दबा धरून बसले...थोड्या वेळानं आम्ही तिथून बाहेर पडलो.....बाहेर तरुणांचं मोठं टोळकं...हल्ल्याच्या तयारीत..पण, तिथंला भाई चलाख होता...त्याने ओळखलं.. हे तर साळसकर साहेब... धावत जाऊन त्यानं अक्षरश: लोटांगण घातलं ... त्या पोरालाही माफी मागायला लावली...साळसकरांचा स्वभाव उमदा...त्यांनीही तिथंच विषय संपवून टाकला .. ती आख्खी पोरं कायमची त्यांची फॅन बनली..पुण्या-मुंबईतल्या कित्येक एरीयातली पोरं त्यांनी अशी जोडली होती...त्यांचं खब-यांचं नेटवर्क सर्वोत्तम होतं...कोणत्याही कामासाठी सदैव सज्ज असलेली तरुणांची मोठी फौजच त्यांच्या उमदेपणामुळे तयार झाली होती..त्यामुळं अंडरवर्ल्डमधल्या भल्याभल्यांना धडकी भरवणारा हा महाराज कधी कुणाला घाबरला नाही...कुणापुढं झुकला नाही...कुणी त्याला वाकवू शकलं नाही...कुणी त्याला घाबरवू शकलं नाही....अत्यंत निडर असलेल्या या अधिका-याचा कमालीचा दरारा अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झाला..आणि पोलीस खात्यात क्रेझ..
 मधल्या काळात माझी साळसकरांशी मैत्री चांगलीच फुलली होती..फोनवरून नेहमीच आम्ही संपर्कात असायचो..26 नोव्हेंबर 2008 ला गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा अन्वर याला दुबईच्या विमानतळावर अटक झाल्याची माहिती मला समजली...काहीजण ती अफवा असल्याचं सांगत होते...त्यामुळं संभ्रमात पडलो...दुपारी साळसकरांना फोन लावला..थोड्या ख्याली-खुशालीच्या गप्पा झाल्या..त्यांना अन्वरच्या अटकेबाबत विचारलं...ते म्हटले...कानावर आलंय खरं....संध्याकाळी फोन कर...मी कन्फर्म करून सांगतो..

 संध्याकाळी एक निराळंच झंगट मागं लागलं.. त्यात गुंतून राहीलो होतो...अन्वरच्या बातमीचा तपशीलही दरम्यान एकाकडून समजला...त्यामुळं साळसकरांना फोन करायचं राहून गेलं..संध्याकाळच्या कामाची गडबड सुरू असतानाच मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ल्या केल्याची बातमी येऊन थडकली .. सा-यांचीच धावपळ उडाली...मग लक्षात आलं साळसकरांना फोन करायचा राहून गेलाय..हल्ल्याच्या बातमीबाबत त्यांना फोन करावा असा मी विचार करत होतो...अन तितक्यात
 ' एन्काउंटर स्पेशालीस्ट विजय साळसकर शहिद' ....अशी ब्रेकींग न्यूज टीव्हीच्या स्क्रीनवर झळकली..काळजाचा ठोकाच् चुकला...अक्षरश: मुळासकट हादरलो..छातीत धडधडू लागलं...अंगातलं त्राणच गेलं...मी मटकन्‌ खुर्चीत बसलो..हे कटु वास्तव मन स्विकारतच नव्हतं..हेमंत करकरे, अशोक कामटे या जिगरबाज अधिका-यांसोबत अतिरेक्यांशी दोन हात करायला गेलेले साळसकर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले होते..त्यांचा फ्रेममधला फोटो टीव्हीच्या स्क्रीनवर झळकू लागला होता..भल्याभल्या गुन्हेगारांना धडकी भरवणा-या या उमद्या मित्राशी काही तासांपूर्वी बोलतो काय? त्यांच्याबाबत विचार करतो काय? आणि तेच फोटोच्या चौकटीत जाऊन बसतात काय? . .  सारंच अनाकलनीय...अविश्वसनीयच...आजंही अत्तराची कुपी घेताना साळसकरांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो.. त्यासाठी वारंवार अत्तरं खरेदी करतो....ते अत्तराचे दिवस पुन्हा परत येणार नाहीत हे माहित असूनही.....

दूर-ए-नजफ

दूर ए नजफ
........................
पेठांचा परिसर आणि रुपाली, वैशाली हॉटेलचे कट्टे म्हणजेच पुणं असं समजणारा किंवा त्या भ्रमात असणारा एक वर्ग पुण्यात पूर्वापार नांदतोय..खरं तर पुण्याच्या पूर्वेला असलेल्या कॅम्प एरियाला पेठेइतकीच् पुरातन संस्कृती आहे..तिथली जुनी घरं, वाडे अद्याप टिकून आहेत. हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि इराणी लोक तिथं वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात आणि ते ही अस्सल पुणेकरच् आहेत..याच कॅम्पमध्ये एकदा अंगठया, इराणी रत्न, खडे विकणाऱ्या नझर अली ची दहा-बारा वर्षांपूर्वी ओळख झाली..पुढे  काही ना काही कारणाने ते नेहमी भेटत राहिले.... पुढे हे रत्न माझ्या मित्रांच्या खजिन्यात कायमचं सामावलं गेलं..

         नझरअली अली अकबर सांची हे त्यांचं पूर्ण नाव....कालच्या भेटीत विचारलं तेव्हा समजलं...एरवी ते माझ्यासाठी फक्त नझर अली..आणि त्यांच्या भाषेत मी जर्नालिस्ट.. त्यांचे आजोबा वगैरे नातलग इराणचे रहिवासी..पन्नास च्या दशकात तिथं मोठा दुष्काळ पडला...तेव्हा त्यांचे वडिल पुण्यात आले.. नझर अलींचा जन्म इथल्याच् ससून हॉस्पिटलमधला..ते आधी पर्शियन शाळेत शिकले..मग उर्दू, मग इंग्रजी माध्यमात...बुधवार पेठेतल्या सराफ कट्ट्यावर व्यापाऱ्यांशी जेव्हा ते खड्यांच्या भावात घासाघीस करतात,तेव्हा त्यांचं मराठीवरचंही प्रभुत्व लक्षात येतं.. पुण्यात शिया पंथीय मुस्लिम फारच कमी, जेमतेम पाच-सात हजार आहेत...नझर अली त्यांच्यापैकी एक. पूर्वज,नातलग इराणचे असल्यानं तिथलं आकर्षण त्यांच्या मनात नक्कीच् आहे...अन् पुण्याबद्दलचं  प्रेमही तितकंच सच्च आहे.. शिया समाजाची एकमेव मशीद कॅम्पमध्ये आहे...इमामबाडा या नावाने ती ओळखली जाते....परिसर मोठा, प्रशस्त आहे...नझर अली त्याच भागात लहानाचे मोठे  झाले...तिथल्या इंचाइंचावर त्यांच्या काही ना काही आठवणी दडलेल्या आहेत...त्यामुळं आजही दिवसातून बराचसा वेळ ते तिथंच असतात..ग्रहांची उपरत्न, विशेषतः इराणी रत्न विकण्याचा त्यांचा मूळ व्यवसाय..म्हणजे कसं की साधारण पुष्कराज, माणिक, हिरा, मोती, पाचू अशी  ग्रहांची रत्ने आपल्याकडं जास्त वापरली जातात...काही लोक ओपल, चंद्रमणी, फिरोझा, अकिक अशी उपरत्न वापरतात...त्यातले बहुतांश खडे इराणमधून येतात..तिथून पुण्यामुबंईला येणारे नझर अलींचे मित्र खास त्यांच्यासाठी ही रत्न आणतात..इराणचे बसरा मोतीही त्याच्याकडं मस्त मिळतात.. ग्रहांचे खडे वापरावे की नाहीत ? त्यावर कुणी किती विश्वास ठेवायचा ? हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय...नझर अलींचं वैशिष्ठय म्हणजे ते निरनिराळ्या विकारांवर म्हणजे विकार बरे होण्यास उपयुक्त ठरतील अशी रत्ने देतात..त्यातली त्यांना खोल माहिती आहे....त्यालाही  एक पार्श्वभूमी आहे..ऐन तारुण्यात त्यांच्यावर एक निराळाच् बाका प्रसंग उद्भवला...निरनिराळ्या मार्गाने त्यांनी त्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला ...पण, उलट ते त्या समस्येच्या गर्तेत अधिक अडकत गेले...अखेर, मध्यप्रदेशमधल्या रतलामजवळ असलेल्या हुसैनी टेकडीवर सर्वशक्तिमान विधात्याला ते शरण गेले..तिथल्या धार्मिक संकुलात चार सहा महिने राहिले. मनोभावे उपासना केली..त्या काळात  तिथं बरेच मित्र झाले..तिथं लखनौहून अली खान नावाचे एक अवलिया गृहस्थ आले होते..ते रत्न शास्त्रात पारंगत होते..त्यांनी नझर अलींना या शास्त्राची माहिती दिली..ते ही मन लावून सारं शिकले....तिथून परतल्यावर त्यांनी पुण्यात हा व्यवसाय सुरू केला...आता या गोष्टीला जवळपास तीन दशकं उलटून गेलीत.... पण, मर्यादित वर्तुळातच् त्यांचा हा व्यवसाय चालतो..रत्नांची माहिती आहे म्हणून त्याचा त्यांनी बाजार मांडला नाही..गरजू माणसाच्या भावनेचा कधी गैरफायदा घेतला नाही...मुळात फक्त पैसे कमवण्याचं त्यांचं हे साधन नाही..त्यांना त्या गुरूनं सांगितलंय की हे फकिरी काम आहे..फसवाफसवी करायची नाही..खोटंनाटं काम करायचं नाही...नकली खडे कधी विकायचे नाही... अस्सल खड्यांची उपलब्धता कमी असल्यानं इतर छोटी मोठी कामं करत ते हा व्यवसाय करतात.....इमामबाड्यात दिवसभर बसून ते शिया समाजाची कॅलेंडर्स, खास इराणहून मागवलेली पिस्त्याची मिठाई, सुकामेवा विकतात..इराणहून आलेल्या पर्यटकांसाठी पुण्यामुंबईत गाईडचं, दुभाषांचं काम करतात...ते दिसायला  साधेसुधे..राहणीमान अगदी साधं...पण इथल्या प्रत्येक  इराणी माणसाच्या गळ्यातला ते ताईत आहेत..इथल्या प्रत्येक इराणी कुटुंबाची, प्रत्येक माणसाची त्यांना खडानखडा माहिती आहे..कुठल्याही इराणी माणसाकडं पोचायचा नझर अली पासवर्ड आहे..
       नझर अलींशी गप्पा मारायला खूप मजा येते....दूर ए नजफ, दाना फिरंगी, जबरजद्द, कंटकीज, जहर मोहरा, यूक्लेज, कालसी डोनी, निलीयर, स्वर्णमख्खी, संगे माहेमरीम, मुए नजफ अशी एरवी फारशी माहिती नसलेल्या रत्नांची नावं त्यांच्या बोलण्यातून समजत जातात..आणि ही रत्न योगानेच एकाकडून दुसऱ्याकडे जातात असं ते मानतात..त्या योगायोगांवर त्यांचा विश्वास आहे...छोट्या कागदी पुड्यांच्या विशिष्ठ घड्या करून त्यात त्यांनी हे खडे ठेवलेले असतात...आधी ते या रत्नाच्या तयार अंगठ्या विकायचे..मागे एकदा त्यांच्या घरीही गेलो होतो..त्यांच्याकडच्या दुर्मिळ रत्नांचा खजिना पाहून आलो. नाना पेठेतल्या  छोटेखानी घरात इराणी हलवा आणि  बरेचसे स्वादिष्ट पदार्थ त्यांनी प्रेमाने खाऊ घातले होते..एकदा  इराणहून एका मित्राने  'दूर ए नजफ' नावाचा एक अस्सल खडा त्यांना दिला..तो त्यांना बेहद्द आवडला होता...पण, नंतर तो कसा काय पण त्यांच्याकडे असलेल्या रत्नांमध्ये मिसळला गेला..आणि विकलाही गेला.त्यांनी खूप शोधलं.अनेकांना विचारलं..पुन्हा तसा खडा घ्यायचा खूप प्रयत्न केला..पण, पुन्हा तसलं रत्न काही त्यांच्या हाती लागलं नाही...खूप हळहळले ते....तो खडा पुन्हा त्याच्याकडं येईल अशी त्यांना आशा आहे...पण तेव्हापासून त्यांनी पुन्हा  कुठलं रत्न धारण केलं नाही....आणि हा व्यवसायही कमी करून टाकला..
      ..साधारणतः आपण कुणाला काही प्रश्न विचारला आणि ती व्यक्ती डाव्या भुवईच्या कोपऱ्यात पहात विचार करू लागलं की ती खरं उत्तर देत असते असा एक अनुभव आहे..उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला बघत उत्तरं देणारे विचार करत असल्याचं  फक्त भासवत असतात असं वाटतं.. नझर अली कुठल्याही प्रश्नाचं उत्तर डावीकडे वर बघत देत असतात..त्यांचा सच्चेपणा, भाबडेपणा त्यातनं जाणवत असतो..ते लहान मुलासारखे निरागस आहेत अन् मिश्किलही....त्यांच्या गप्पा म्हणजे मस्त मेजवानीच् असते..खास इराणी पद्धतीचा चहा पाजून ते निरनिराळे किस्से चष्म्याआड  डोळ्यांची विशिष्ठ मिचमीच् करत मिश्किलपणे सांगत राहतात..इराणी लोकांचे रीतीरिवाज, परंपरा, खाद्यसंस्कृती, वैशिष्ट्यपूर्ण  स्थळांची,वस्तुंची, रत्नांची माहिती देत असतात.. गप्पा मारत असतानाच्  सलमान आणि हुसैनी कॅलेंडरची, मिठाईचीही विक्री सुरू असते..तसं तर इराणी वर्तुळाबाहेरच्या फार कमी लोकांशी त्यांचा संपर्क आहे..वयाच्या साठीतही त्यांचा  सायकलवरून प्रवास आणि व्यवसाय सुरू असतो...आपण बरं आणि आपला व्यवसाय बरा या वृत्तीनं त्यांचं काम सुरू असतं... त्यांना माझी रत्नाबाबतची रुची माहित आहे..मी नेहमी निरनिराळी  रत्न बदलत असतो म्हणून ते वैतागतातही...त्यांना चिडवायला आवडतं मला.. .बऱ्याच दिवसांनी काल ते भेटले...गप्पा मारता मारता मुद्दाम त्यांना म्हटलो..मला द्या हो एखादा एकदम हटके खडा....अल्लाउदिनचा दिव्यासारखाच् निघाला पाह्यजे...ते काहीसे चिडले..मला म्हटले, " तुम ज्यादा इस झंझट में मत पडो हा, फकीर बनके घुमते रहोगे..." .आमचं बोलणं चालू असताना एकजण आला.त्यांनी ओळख करून दिली..तो शाह आलम होता...नुकताच इराणहून काही कामासाठी आला होता..आम्ही तिघे गप्पा मारत होतो..नझर अली काहीसे अस्वस्थ वाटले..त्यांची नजर काहीतरी बेचैन वाटली.. त्याच्या अंगठ्या ते निरखून पाहत होते..बोलत असतानाच एकाएकी त्यांच्या नजरेत चमक आली .  तो  निघाला... उभयतांमध्ये पर्शियन भाषेत काही बोलणं झालं..त्यानं पट्कन आपल्या बोटातली अंगठी काढून नझर अलींच्या बोटात घातली...त्यांनी त्याला गाढ आलिंगन दिलं..आधी काही लक्षात आलं नाही....पण नंतर काहीसा  अंदाज आला.. मी नझर अलींकडं पाह्यलं...आनंद भरलेल्या डोळ्यांनी डाव्या कोनातून पहात त्यांनी हात उंचावला...अनामिकेमधलं रत्न लकाकलं.... बहुदा त्यांना त्यांचा  'दूर ए नजफ' गवसला होता....

हनिमून

हनिमून
 - - - - -
 भल्या पहाटे सक़ाळी आठलाच मोबाईलच्या रिंगने जाग आली..खरंतर इतक्या सकाळी फोन घेणं होतच् नाही...अर्धवट मिटल्या डोळ्यांनी स्क्रीन पाहिला....त्यावर ' चम्या'  हे नाव झळकलेल पाहिलं.. मग पटकन कॉल घेतला..
'हॅलो' . . . . माझा झोपाळलेला आवाज....
'भाऊ झोपलाय का?' चम्याचा नेहमीप्रमाणे उत्साहाने फसफसणारा आवाज...
'नाही..रेऽऽऽपहाटेच उठलोय...चारलाच....
'बस्स का भाऊ ...आपणच होतो की तीनपर्यंत....'
अरे मग भडव्या...मी झोपेतच असणार ना??
या शिवराळपणाचं त्याला कधीच काही वाटत नाही
कारण मी असाच बोलतो हे तो चड्डीत असल्यापासून बघत ऐकत आलाय...उग़ा जरा स्वच्छ वाणीत सज्जनपणे बोललो की....भाऊचा मूड नाही हे चम्या मिनिटभरात गावभर पसरवणार....
'बोल रे पटकन?'
भाऊ काय तरी सांगा ना?
कसलं? आता लगीनबिगिन झालंय तुझं...आता काय अक्कल शिकवू तुला? माझा आटा सरकायला लागला होता....कारण चम्या कधी कुणाची ओढत बसेल हे सांगता येत नाही...तसा वयानं बराच लहान माझ्यापेक्षा...पण तो कट्ट्‌य़ावर आम्हा मोठ्या मुलांसमोर लहानाचा मोठा झालायं.....त्यामुळं आमच्यापैकी सर्वांनाच तो बिनदिक्कत अरे कारे बोलतो...आमची इज्जत काढतो.कधीही काहीही बोलतो...पहिल्यांदा रागच यायचा मला...कॉलेजमधे असताना मी मैत्रिणींबरोबर असलो की हा बिनदिक्कत...भाऊ शर्ट दे ना परश्याचा..आई बोंबलायला लागलीय त्याची...असं म्हणून इज्जत काढायचा...बरं पोरींसमोर शिव्या घालायचीही पंचाईत..हा डोळा मारत...दात काढत पळून जायचा...पण काय आहे हा बोलतो काहीही...खांद्याच्या वरचा भाग बहुदा देवानंच कमी दिलाय... पण कमालीचा हळवाही आहे तो आणि मनानं निर्मळ...त्यामुळं कुणीही याच्या मदतीला पटकन धावून येतं..बरं आमचं फार धड नसलेल्या पुढच्या चौकातली पोरंही याला वर्ज्य नसतात बरंका......जेमतेम पस्तीस-चाळीस किलोचा, काळासावळा छडमाड शरीरयष्टीचा चम्या हा पुलंचा नारायण आहे...'टाईमपास'चा दगडू आहे...रस्त्यावरून जाणारी प्रत्येक मुलगी याची लाईन आणि कुठल्याही हिंदी, मराठी, दाक्षिणात्य पिक्चरमधली हिरॉईन याचा माल..कुणाचीही काहीही अगदी पान बिडी आणण्यापासून ते एखाद्या मुला-मुलीला आयटमचा निरोप, चिठ्ठ्या देण्यापर्यंत, एखाद्या काकुंचं वाणसामान आणण्यापासून कॉलनीत कुणाचीही मयत झाली की जणुकाही फार मोठं कुणीतरी गेल्यासारखं अख्ख्या गावाला निरोप देऊन  मर्तिकाचं सामान आणण्यापर्यंत काहीही कामं तो करतो...बरं चम्या अख्ख्या कॉलनीचा...त्यामुळं उत्सवांमध्ये तो वर्गणी मागायला एका मंडळाबरोबर, नाचायला दुस-या मंडळाबरोबर आणि भांडण मारामा-या करायला भलत्याच ठिकाणी असतो...बरं वाट्टेल ती काम करतो ..अतिशयोक्ती वाटेल पण एकदा शेजारच्या चाळीतल्या भुवडांच्या जावयाची डेक्कन क्विन चुकली असती..पण या चम्याने काय तरी फोन केला आणि डेक्कन थांबवली ना...त्याचा हा फंडा भयानक आहे...जाहीरपणे न सांगण्यासारखा नसला...तरी तो मात्र बिंधास्त ती क्लुप्ती कधीही निर्लज्जपणे वापरतो...

         आमच्यासमोर चड्डीत असलेला चम्या आमच्यासमोरच मोठा झाला..शाळा कॉलेज कसंतरी शिकला...कॉलेज अर्धवट झालेलं...मग एका दुकानात कामाला लागला...याच्या ओळखी पाहून पहिल्या आठवड्यापासूनच त्याचा शेठच त्याला वचकून राहू लागला... याला काय बोलायची त्याची बिषाद उरली नाही..काहीही झालं की एका मिनिटांत कॉलनीतल्या पोरांना बोलावून घ्यायचा. आणि शेठला ढोस द्यायचा...धंद्यात काळ्याची पांढरी केस झालेल्या शेठलाच त्या व्यवसायातली मेख समजावून सांगायचा आगावूपणा चम्या न चुकता करायचा...चम्याचं आयुष्य म्हणजे सगळाच कल्ला......लता त्याची सख्खी शेजारीण...दोघांच्या घराची भिंतच कॉमन..त्याच्याच वयाची..दोघंही लहानपणापासून एकत्रच बागडलेले...एकाच शाळेत शिकलेले .लताची मोठी बहिण स्वाती...तिला हा बहिण मानायचा आणि लतावर लाईन मारायचा...याचं काहीच कधी नीट समजलं नाही...पण एक नक्की..याची भावना खूप सच्ची असायची....म्हणजे स्वातीला बहिण म्हटला ना तर खरंच सच्च्या भावासारखी तिच्यावर माया करायचा..आणि कुणीही कितीही सांगितलं ना तरी लतावर मनापासनं मरायचा...बरं ती पोरगी याच्यासारखीच चलाख...तिच्या हजार भानगडी....तिनं काहीतरी लफडं करून ठेवायचं आणि यानं निस्तारत बसायचं...याचे जसे अनेक 'डाव'...तसेच तिचेही....ती याच्यावर प्रेम करत होती का माहित नाही...पण तिची अनेक लफडी माहिती असूनही हा तिच्यावर खूप प्रेम करायचा...खूप हळवा होता तिच्याबाबत....आणि दोघांच्या घरच्यांचा विरोध असूनही त्यानं लग्न केलं तिच्याशीच...एरवी कॉलनीतल्या कुणाच्याही लग्नात घरचंच लग्न मानून दिवसभर राबल्यावर संध्याकाळी हा टाईट व्हायचा आणि रात्री वरातीत दिल खोलून तुफान नाचायचा...हा परिपाठ त्यानं त्याच्या लग्नातही मोडला नाही..लग्न झाल्यावर पोरांनी संध्याकाळी वरातीत त्याला नाचायचा आग्रह धरला..आणि  पडत्या फळाची आज्ञा शिरसांवंद्य मानून हा धमाल नाचला.. पोरं थकली पण हा दमला नाही....सगळ्यांचीच अगदी रथात बसलेल्या लताचीही हसून हसून मुरकुंडी वळाली.. ते लक्षात आल्यावर याने थेट तिलाही नाचायला खेचलं...''.ज्युली ज्युली...जॉनी का दिल तुमपे आया ज्युली...'' गाण्यावर दोघंही भन्नाट थिरकले....कॉलनीत कुणाचीही नसेल अशी भव्य वरात झाली...बरं आता बसावं ना घरात....हा रात्री पुन्हा कट्ट्यावर....पोरं म्हटली जा..बाबा आता घरात....काय करू जाऊन..? पूजा व्हायचीय उद्या... मग नंतर जात जाईल रात्री लवकर ...तो नेहमीच्या निर्लज्जपणे की निर्विकारपणे म्हणाला...पोरांनी कपाळालाच हात लावला...ए पिंट्या एक बॅगपायपर आण रेऽऽऽऽऽको-या नोटा पुढं करत त्याने आवाज दिला.......त्याची म्हातारी आणि लताच्याही घरच्यांच्या नजरा कट्ट्याकडे होत्या...लग्नाच्या दिवशी हा टाईट होणार आणि ठपका आमच्यावर येणार म्हणून आम्ही गपचूप कल्टी मारली......तासाभराने हा गच्चीवरच्या ठिय्यावर आला...अंगावरचा लग्नातला ड्रेस वगळता त्याच्यात काहीच फरक नव्हता.....आला लडखडत आणि ढाबळीतनं कबुतरं काढू लागला...जीते है शानसे वगैरे बडबडू लागला......रात्री अडिच-तीनपर्यंत त्याच्या गप्पा चालल्या होत्या....आम्हीच डोक्यावर पांघरूण घेऊन झोपलो ..मग कधीतरी  हा निघून गेला...

                सकाळच्या चम्याच्या फोनने कालचा त्याचा लग्नाचा दिवस डोळ्यासमोरून गेला....काय रे चम्या कशाला फोन केलायऽऽऽ? मी कातावून म्हणालो....' भाऊ कायतर सांग ना?
कसलं काय सांगू बाबा?
नाय आज पूजा उरकून लगीच जाणारेय हनीमूनला...म्हणून विचारलं
मग काय? काय पाहिजे तुला? पैशे बिशे देऊ का?
नाय रे तसं नाय?
मग?
काय तरी खास सांग ना?
कसलं खास?
आता मी हनीमून करणार...मला पोरं होणार
अरे.. आज हनिमूनला गेल्यावर काय लगीच उद्या पोरगं होत नाय....माझा आटा सटकायला लागला होता..आवाज तापला होता..
नाय भाऊ ..म्हंजे कसंय तू जरा अनुभवी ना?
चम्या काय म्हणतोय हे आता जरा लक्षात यायला लागलं होतं आणि त्याला दोन कानाखानी लावू की काय असं वाटू लागलं...पण कालच लग्न झालंय..तर त्याला खूप रागवावंही वाटेना...बरं तो माझी खेचतोय का खरंच सिरीयसली बोलतोय हे ही समजेना...
''.... अरे चम्या......काय आसनंबिसनं विचारायला फोन केला का काय रे मला? मी तापत्या आवाजात विचारलं.....
'....नाय तसं नाय...पन आपलं पोरगं कसं गोरंपान व्हायला पायजेल......'
'...अरे भाड**.......काय सुचंना का तुला? आणि तसं काय असतं तर आमची मनी झाली नसती काऽऽरे गोरीगोरी.......??'
'मनी गोरी नाय...पन त्या राणीचं पोरगं तर चांगलं गोरं गुटगुटीत झालंय की......' निर्विकारपणे बोलून चम्यानं माझी विकेट काढली....
' अरे तसं काय नसतं....'
' ....आनि मला लतीला जाणून घ्यायचंय....'
अरे चम्या कपडे घालायची अक्कल नव्हती तेव्हापासनं तुम्ही दोघं एकमेकांसोबत आहात...आणि पुढं आमच्या आपरोक्ष तुम्ही कापडंही काढलीत....हे मला काय अख्ख्या कॉलनीला माहितीय....आणि कसलं घंट्‌य़ाचं जाणून घेतोस आता तिला...कशाला बोलायला लावतोस बाबा...आता बायको आहे तुझी ती.....असं काय बोलायला लावू नकोस...जा ..मस्तपैकी हनिमूनला...

 ..एकतर पहाटेच्या सुमाराला झोपलेलो....नंतर कसलं तर बोअरवेलचं काम सुरू होतं त्याचा प्रचंड आवाज...त्यामुळं अर्धवट झालेली झोप आणि सकाळ सकाळी चम्यानं डोकं खाल्ल्यामुळं वैतागलो होतो...दिवस आळसातच गेला...संध्याकाळी चम्याच्या घरी पूजा झाली....दुस-या दिवशी तो पाचगणीला जाणार होता... शेठ फियाटमधून कामासाठी त्याचबाजूला जाणार होता.. त्यानं चम्याला आणि लताला कारमधून न्यायचं कबूल केलं...त्यामुळं आमच्यासमोर लहानाचं मोठं झालेलं हे जोडपं कारमधून हनीमूनला रवाना झालं...किती छान वाटतं ना.. एखादं मूल आपल्यासमोर लहानाचं मोठं होतं...त्याचं लग्न होतं आणि नंतर बाळाला घेऊन तो येतो ना ...तेव्हा ती भावनाच खूप न्यारी असते...आता चम्याचंही तसंच होणार होतं..कारमध्ये बसण्यापूर्वी
पोरांनी चिडवून चिडवून चम्याला आणि लताला अक्षरश: नकोनको केलं..चाळीतल्या सा-या मंडळींनी कौतुकानं आणि आनंदानं त्यांना निरोप दिला..त्या रात्री आम्हा पोरांची गच्चीवर जंगी पार्टी झाली...अर्थातच पार्टी करायला काही ना काही निमित्तच लागायचं म्हणा...पहाटे झोपलो आम्ही....मस्त, थंडगार वारं सुटलं होतं...गोधडीच्या उबेत कधी झोप लागली समजलंच नाही....जागा झालो ते सॅंडीच्या आवाजानं....भाऊ...भाऊ...तो एकसारख्या हाका मारत होता....मी उठलो...इतर पोरंही जागी झाली...उन्हं चांगलीच वर आली होती...दम लागल्यासारखा सॅंडीचा आवाज येत होता.. चार जिने चढून आल्यावर कोणाचंही तसंच होतं म्हणा...पण सॅंडीचं सारं शरीर कापत होतं...चेहरा घामेजला होता....अरे बोल नाऽऽऽऽमी तडकून म्हणालो......भाऊ ...भाऊ....आपला चम्या गेलाऽऽऽऽऽऽ
मला काहीच कळेना....खाली नजर टाकली....चाळकरी मंडळी जमली होती..वातावरण गंभीर होतं....हलक्या आवाजात कुजबूज सुरू होती..काहीच समजेना...तितक्यात चम्याऽऽऽऽऽऽऽ असा त्याच्या आईने फोडलेला हंबरडा कानावर पडला आणि अंगातलं त्राणचं गेलं सगळं...डोळ्यापुढं अंधारी आल्यासारखी झाली...कसबसं तोंड धुवून मी खाली पळालो...पोरंही आली..चम्या बसलेल्या गाडीला मध्यरात्री अपघात झाला....गाडीचं काही नुकसान झालं नाही...शेठ एकदम सेफ होता...लतालाही साधं खरचटलं नव्हतं...पण आमची जान असलेला चम्या मात्र जीवानिशी गेला होता....पहाटेच त्याला तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये आडमिट केलेलं...पण...नाही...चम्या कुणाच्याच हातात उरला नव्हता....मानसिक धक्का बसल्यानं शेठ आणि लता काही बोलूच शकत नव्हते....त्यामुळं कॉलनीत हे सारं कळायला उशीर झाला होता..

 चम्या मला कायम म्हणायचा...'भाऊ...तू एवढं सारं लिहितो....कधीतरी माझा फोटो छाप ना पेप्रात....' त्या दिवशी फोटोसह बातमी दिली त्याच्या निधनाची....चम्या गेला...आमच्या ग्रुपचं चैतन्यच हरवलं....आज सकाळी पुन्हा सॅंडीचाच फोन....म्हटलं काय रे? 
' भाऊ.. आज 22 आगस्ट...'
'मग ? '
' आज दहा वर्षं झाली चम्याला..म्हणत त्यानं फोन ठेवला...माझ्या डोळ्यांत आसवं तरळली....