Thursday, 5 June 2014

विक्रमी विजयाचे इंगित
- - - - - - - - - - -
भारतीय जनता पक्षाच्या अनिल शिरोळे यांनी सोळाव्या लोकसभेत चमकदार विजय नोंदवतानाच एक आगळा विक्रमही केला आहे. पुण्यातून सर्वाधिक मताधिक्कयाने विजय नोंदवण्याच्या विक्रमाबरोबरच सर्वाधिक मताधिक्कयाने विजयी होण्यात राज्यात त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. पाच वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या सुरेश कलमाडी यांच्याकडून २६ हजार मतांनी पराभूत झालेल्या शिरोळे यांनी गेल्या खेपेपेक्षा तब्बल तीन लाख़ १५ हजारांपेक्षा अधिक मते मिळवून प्रतिस्पर्धी पक्षांची बोलतीच बंद करून टाकली. एवढेच नव्हे, तर पुण्यातील सर्व सहाही मतदारसंघांमधून घवघवीत आघाडी मिळवून सर्वांनाच चकीत करून टाकले. तीन लाख़ १५ हजारांच्या दणदणीत मताधिक्कयाने निवडून येताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या तीन जागाही धोक्यात असल्याची सूचना दिली आहे. शिरोळे यांच्या या विजयाने भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांनाही विचार करायला लावले आहे. कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला शिरोळे यांनी कसा भुईसपाट केला? याबाबत सर्वच पक्षांमध्ये जोरदार चर्चा आहेत.
देशभर असलेली नरेंद्र मोदींची लाट, त्यामध्ये कॉंग्रेसच्या अख़ेरपर्यंत लक्षात न आलेल्या प्रस्थापितांविरोधात असलेल्या जोरदार सुप्त लाटेची पडलेली भर, भाजपाचे चोख़ नियोजन व शिवसेना, रिपब्लिकन पक्षातर्फे राबवलेली प्रभावी प्रचार यंत्रणा, कॉंग्रेसचे फसलेले नियोजन, स्थानिक कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ, नेत्यांनी दाख़वलेला ठेंगा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) फुटलेला फुगा या बाबींमुळे शिरोळे यांना हा विक्रमी विजय मिळवता आला.
पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघाने कायम धर्मनिरपेक्ष शक्तींनाच साथ दिल्याचे दिसून येते. यापूर्वीच्या पंधरा निवडणुकांमध्ये अण्णा जोशी व प्रदीप रावत यांच्या रुपाने फक्त दोनवेळा भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली होती. १९९१ ला कॉंग्रेसमधील काही नगरसेवकांनी तत्कालीन ख़ासदार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्याविरोधात बंड केले होते. पुण्याची सत्ता आपल्याकडे राहवी यासाठी शरद पवार यांनीच हे बंड घडवून भाजपाच्या अण्णा जोशींना निवडून आणल्याचे आजही बोलले जाते. अर्थात निम्मे नगरसेवक विरोधात जाऊनही बॅ. गाडगीळ यांचा जेमतेम १७ हजार मतांनी पराभव झाला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर १९९९ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल तुपे यांच्याविरोधात भाजपच्या प्रदीप रावत यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या मतांचे तुपे व जोशी यांच्यात विभाजन झाले आणि भाजपाची एकगठ्ठा मते मिळवून रावत विजयी झाले. त्यावेळी जोशी व तुपे यांच्या मतांची बेरीज रावत यांच्या मतांपेक्षा सव्वापटीने अधिक होती. हे दोन अपवाद वगळता भाजपाला पुण्यात कधीही संधी मिळाली नव्हती. १९५२ला कॉंग्रेसचे काकासाहेब गाडगीळ, १९५७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे ना.ग. गोरे, १९६२ मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव मोरे, १९६७ मध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे एस.एम. जोशी, १९७१ व १९७७ ला जनता पार्टीचे मोहन धारीया, १९८०, १९८४ व १९८९ असे सलग तीन निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, १९९६ ला कॉंग्रेसचे सुरेश कलमाडी, १९९८ ला कॉंग्रेसचे विठ्ठल तुपे, २००४ व २००९ ला कॉंग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले. १९८४ मध्ये बॅ. गाडगीळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या जगन्नाथराव जोशी यांच्याविरूद्ध एक लाख़ ९८ हजार मतांनी मिळालेला विजय आतापर्यंत सर्वात मोठा मानला जात होता. श्री. शिरोळे यांनी त्यावर कडी करत तब्बल तीन लाख़ १५ हजार ७६९ मतांनी विजय मिळवत मताधिक्कयाचा विक्रम केला.
शिरोळे यांच्या या दणदणीत विजयाचे वैशिष्ठ्य म्हणजे शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांमधून त्यांनी मोठी आघाडी घेतली. शिवाजीनगरमधून विनायक निम्हण, कॅन्टॉन्मेन्टमधून रमेश बागवे हे कॉंग्रेसचे, तर वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. कसबा पेठेतून भाजपाचे गिरीश बापट आमदार असले, तरी गेल्या खेपेस त्यांचा अवघा सहा हजार मतांनी निसटता विजय झाला होता. २००९ च्या निवडणुकीत शिरोळे यांना कोथरूडमधून २१ हजार ८७, पर्वतीमधून चार हजार ५५३ व कसब्यातून आठ हजार ४९८ मतांची आघाडी मिळाली होती. कॉंग्रेसच्या सुरेश कलमाडींना शिवाजीनगरमधून ११ हजार २२०, वडगाव शेरीतून २१ हजार ५८१ व कॅन्टोन्मेन्टमधून २७ हजार ८४ मतांची निर्णायक आघाडी मिळाली होती. शिरोळे यांनी भाजपाला आघाडी मिळत असलेल्या मतदारसंघांमधून मताधिक्य वाढण्यासाठी निकराचे प्रयत्न केले आणि जेथे कॉंग्रेसला आघाडी मिळते, तेथे ती मोडून काढण्यासाठी व्यूहरचना आख़ली. सारे तळागाळातील कार्यकर्ते कामाला लावले. पक्ष-संघटनेशी संबंधीत सर्व यंत्रणा सक्रीय केल्या. त्यांच्या मदतीसाठी परगावचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. बूथनिहाय कार्यकर्त्यांचे केडर, संघाचे स्वयंसेवक, गल्लीबोळातील कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ मंडळींनाही प्रचार यंत्रणेत, नियोजनात सामावून घेण्याची क्लुप्ती, शिवसेनेच्या व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना पहिल्यापासून विश्वासात घेऊन ख़रीखुरी साधलेली युती, मोदींच्या विकासाची छबी मतदारांपर्यंत पोचवण्याबरोबरच कॉंग्रेस शासनाची, लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता चव्हाट्यावर मांडण्याची आख़णी, महागाईबरोबरच बीआरटी, एलबीटीसाऱख़्या सामान्य जनतेच्या, व्यापा-यांच्या कळीच्या मुद्द्यांना घातलेला हात यामुळे शिरोळेंचे पारडे सरस ठरले. कोथरूडमधील २१ हजार मतांची आघाडी त्यांनी तब्बल ९१ हजारांपर्यंत वाढवली. शिवाजीनगरमधील गेल्या खेपेस असलेले कॉंग्रेसचे ११ हजारांचे मताधिक्य मोडून काढून तब्बल ३९ हजारांची आघाडी घेतली.पर्वतीमधील चार हजारांचे मताधिक्य तब्बल ६९ हजारांपर्यंत, तर कसब्यातील आठ हजारांचे मताधिक्य ५८ हजारांपर्यंत वाढवले. वडगावशेरीतील २१ हजारांचे व कॅन्टॉन्मेंटमधील २७ हजारांचे कॉंग्रेसचे मताधिक्य मोडून काढत तेथून अनुक्रमे तब्बल ४२ हजारांची व १३ हजारांची आघाडी घेतली. शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे नेमके नियोजन अख़ेरच्या क्षणापर्यंत कायम राहील्यानेच शिरोळे यांना हा मोठा विजय मिळवणे शक्य झाले.

पहिल्या टप्प्यात ही निवडणूक खूप अटीतटीची होईल, असे चित्र होते. कारण, कॉंग्रेसचे विश्वजीत कदम व मनसेचे दीपक पायगुडे हे काही किरकोळ उमेदवार नव्हते. कदम यांच्यासाठी शहर पातळीवरील काही कार्यकर्ते काम करीत असले, तरी बहुसंख़्य कार्यकर्त्यांना त्यांची उमेदवारी रुचलीच नव्हती हे आता निकालावरून स्पष्ट झाले आहे. वडिल पतंगराव कदम यांचा राजकारणातील दांडगा अनुभव, श्वशूर अविनाश भोसले यांचे सर्वपक्षिय नेत्यांशी असलेले उत्तम संबंध, कार्यकर्त्यांचे ‘भारती‘ जाळे यांमुळे कदम हेविवेट उमेदवार होते. पण स्थानिक कार्यकर्त्यांशी यापूर्वी आजिबात नसलेला संबंध, प्रचाराच्या नियोजनात, आख़णीत सांगलीच्या कार्यकर्त्यांवर टाकलेल्या विश्वासामुळे स्थानिक कार्यकर्ते दुख़ावले गेले. त्यांची नाराजी अख़ेरपर्यंत दूर झाली नाही. प्रचारामध्ये कॉंग्रेसचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मनापासून सहभागी असल्याचे चित्र कधी दिसले नाही. कॉंग्रेसच्या प्रचारामध्ये नेहमी असणारा जोष यावेळी आजिबात जाणवला नाही. कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व नेते समरसून प्रचार करताना जाणवले नाहीत. कॉंग्रेस आघाडीचे आमदार असलेल्या मतदारसंघांतून शिरोळे यांना मिळालेले ९५ हजारांचे मताधिक्य हे या नेत्यांनी निवडणुकीत नेमके काय काम केले हे सूचित करणारे आहे.

या निवडणुकीत मनसेचा कॉंग्रेसला फायदा होईल हा होराही फोल ठरला. वास्तविक, दोनवेळा आमदार झालेले दीपक पायगुडे हे नक्कीच तगडे उमेदवार होते. पायगुडे यांचा सर्वधर्मिय नागरिकांशी असलेला दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि जिगरबाज स्वभाव लक्षात घेता त्यांची उमेदवारी शिरोळे यांना धोकादायक ठरेल अशी चिन्हे होती. २००९ च्या निवडणुकीत मनसेच्या रणजीत शिरोळे या अगदीच नवख्या उमेदवाराने तब्बल ७६ हजार मते घेतली. त्यावेळी अनिल शिरोळे २६ हजार मतांनी पराभूत झाले होते. रणजीत शिरोळेंच्या तुलनेत पायगुडे किमान अडिच लाख़ मते घेतील अशी चर्चा होती. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या. पायगुडे जेवढी मते घेतील, तितके शिरोळे धोक्यात येतील व कदम सुरक्षित होतील असा कार्यकर्त्यांचा होरा होता. पायगुडेंनी पहिल्या टप्प्यात प्रचाराची राळ उडवून दिली. पण, ती लय टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. मनसेच्या प्रचारात नियोजनाचा अभाव होता. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे जुने नेते नव्हते. राज यांच्या सभेचा काहीही प्रभाव पडला नाही. प्रचाराची पहिलीच सभा फारशी प्रभावी न ठरल्याने पायगुडे यांच्या प्रचाराची धार कमी होत गेली. पक्षातील गटबाजी अख़ेरपर्यंत सांधली गेली नाही अथवा पायगुडेंनी तसे प्रयत्न केले नाहीत. एरवी राज यांच्यासोबत असलेल्या तरुणाईने यंदा मनसेकडे सपशेल पाठ फिरवली. राज यांचे ख़ासदार मोदींनाच पाठींबा देणार असतील, तर थेट भाजपालाच मतदान का करू नये? तसेच मनसेला मतदान केले, तर शिरोळे धोक्यात येतील हा संदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे तरुणाईपर्यंत पोचवला. निवडणुकीच्या दोन दिवस आधीपासून पायगुडे यांनी कदम यांच्याविरूद्ध पैसे वाटल्याचा गुन्हा दाख़ल करण्यासाठी प्रचार सोडून आरंभलेले उपोषण सर्वांनाच बुचकाळयात टाकणारे ठरले. ही निवडणूक मनसेने सोडून दिली असा संदेश त्यामुळे गेला व त्याबाबत पक्षाचे नेते काही प्रतिवाद करू शकले नाहीत. त्याचेच फलीत म्हणून प्रचाराच्या दुस-या-तिस-या टप्प्यात आघाडीवर असलेल्या पायगुडे यांच्या इंजिनाचा वेग उत्तरोत्तर मंदावत गेला. अवघ्या ९३ हजार मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. एकंदरीतच कॉंग्रेसचा उमेदवार स्थानिक नसल्याचा प्रचार, मनसेचा प्रभावहीन प्रचार आणि याउलट पक्षातील आणि युतीतील कार्यकर्त्यांसोबत एकदिलाने नियोजनबद्ध लढा देत असलेले भाजपाचे कार्यकर्ते अशा या निवडणुकीत शिरोळेंनी विक्रम केला नसता, तरच नवल. 

No comments:

Post a Comment