Thursday, 5 June 2014

रेड . .
- - - - -

      गुळाचे व्यापारी चतुरचंद पहाटेची देवपुजा आटोपून हिशेबाचे काम करीत बसले होते. नोकरचाकरांची सकाळच्या कामाची धांदल उडाली होती. चतुरचंद आणि त्यांचे कुटुंबिय पक्के धार्मिक. पहाटेच सगळी आन्हिके आटोपून सर्वजण आपापल्या कामात व्यग्र होते. वृद्ध मंडळींचे चहापाणी चालले होते. आकाशात सूर्योदयापूर्वीची लालिमा हळूहळू पुसट होत चालली होती. सकाळचे सात वाजले होते. अचानक मोटारीचे करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. त्यासरशी सारेच चमकले. बंगल्याच्या दारात काही दुर्घटना तर घडली नाही ना हे पाहण्यासाठी चाकरमंडळी तेथे धावली. पण ते दाराबाहेर जाण्यापूर्वीच सहा तगडे लोक आत आले. त्यांनी बंगल्याचा मुख़्य दरवाजा लावून घेतला. करड्या रंगाचा सफारी घातलेल्या त्यांच्या म्होरक्याने आपले ओळख़पत्र दा़ख़वून आपण इन्कमटॅक्स विभागातून घरी रेड करायला आलो असल्याचे सांगितले. तोवर चतुरचंद व त्यांचे कुटुंबियही बाहेर आले. इन्कमटॅक्सची रेड म्हटल्यावर ते हादरलेच. दोन वर्षापूर्वी घरी झालेल्या इन्कमटॅक्सच्या छाप्याचा त्यांना अनुभव होता. त्या अधिका-यांच्या आक्रमक कार्यपद्धतीचा त्यांनी चांगलाच धसका घेतला होता.

       प्राप्तिकर विभागाचे हे अधिकारी बंगल्यात आले. सर्वांना शांत बसण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. टेलिफोनच्या केबल्स त्यांनी कापून टाकल्या. चतुरचंद यांच्या कुटुंबातील सर्वांना त्यांनी निरनिराळया खोल्यांमध्ये स्वतंत्रपणे बसवले व घराची झडती सुरू केली. कपाटातील वस्तुंची तपासणी ते करू लागले. त्यांनी फायली धुंडाळल्या. घरात कोठे चोरकप्पे आहेत याचा ते शोध घेत होते. अधिका-यांच्या या अवताराने सगळेच भेदरले. पण, सरकारी अधिका-यांपुढे बोलायचे कोणी? चतुरचंद यांनी काही बोलायचा प्रयत्न केला; पण उत्तरादाख़ल त्यांना त्या अधिका-याची थप्पड ख़ावी लागली. त्यामुळे सगळेच चिडीचूप बसले. त्या अधिका-यांच्या आदेशानुसार, चतुरचंदनी कपाटातील तीन लाख़ाची रोकड व सव्वा दोन लाख़ रुपये किंमतीचे दागिने काढून या अधिका-यांच्या हवाली केले. एक अधिकारी चतुरचंद यांच्याकडे चौकशी करीत होता. अन्य पाच अधिकारी सर्व बंगल्याचा शोध घेत होते. पण, त्यांच्या हाती काही लागले नाही.

        दरम्यान, कपाटात मिळालेले दागिने व रोकड घेऊन आपल्यासमवेत कार्यालयात यायचा हुकूम एका अधिका-याने चतुरचंदजींना केला. दागिने कधी ख़रेदी केले, कोणत्या दुकानातून घेतले, किती रकमेला घेतले? ही रक्कम कोठून आणली? कपाटातील रोकड नेमक्या कोणत्या व्यवहाराची आहे? या सर्व बाबींचे लेख़ी स्पष्टीकरण द्यावे लागेल असे त्यांना सांगितले. त्यानुसार तो ऐवज एका बॅगेत भरून चतुरचंद या अधिका-यांसमवेत प्राप्तिकर कार्यालयात निघाले. त्यांच्यासमवेत दोघेजण रिक्षात होते. अन्य चौघे एका कारमधून त्यांच्यामागून येत होते. ख़ात्याची कार असूनही आपल्याला रिक्षातून का नेले जात आहे हे चतुरचंद यांना समजले नाही. गुलटेकडीपासून निघालेली ही रिक्षा शनिपारजवळ थांबवण्यात आली. तेथील एका हॉटेलमध्ये हे अधिकारी चहा प्यायले. चतुरचंदनाही त्यांनी चहा दिला. तेथून दुस-या रिक्षाने ते वाकडेवाडीला गेले. तेथे ती रिक्षा सोडून तिस-या रिक्षाने ते आरटीओजवळ गेले. तेथे पुन्हा रिक्षा बदलून ते चौथ्या रिक्षाने शिवाजीनगरकडे निघाले. आपण असे का करतो आहोत? हे विचारण्याचा प्रयत्न चतुरचंद यांनी केला. पण त्या अधिका-यांनी त्यांना दमदाटी करून गप्प बसवले. अधिका-यांच्या या कार्यपद्धतीमुळे चतुरचंद यांना संशय येऊ लागला व तो ख़राही ठरला. शिवाजीनगरजवळ या अधिका-यांनी ऐवज असलेली बॅग आपल्याकडे ठेवून त्यांना ख़ाली उतरवले व हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आपण लुबाडलो गेलो आहोत हे चतुरचंदजींच्या लक्षात आले.

             मार्केटयार्डातील व्यापा-याला भल्या सकाळी लुबाडले गेल्याचे समजल्यावर अनेक व्यापारी मंडळी चतुरचंद यांच्या घरी जमली. पोलीसही आले. दारा इराणी हा उमदा अधिकारी तेव्हा स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणुकीस होता. या प्रकरणाचा तपशील ऐकून इराणीही बुचकाळयात पडले. अत्यंत पद्धतशीरपणे बनाव रचून चतुरचंद यांना फसवले होते. इन्कमटॅक्सचे अधिकारी बनून आलेल्या लुटारुंनी चतुरचंद यांची तपशीलवार माहिती काढली होती असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चतुरचंद यांच्या घरी दोन वर्षांपूर्वी प्राप्तिकर विभागाने छापा मारला होता हे या भामट्यांना माहिती होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले आहे याचीही माहिती त्यांना होती. मराठी, इंग्रजी व गुजरातीमध्ये संभाषण करणारे हे भामटे आंतरराज्य टोळीचे सदस्य असावेत असा पोलिसांना संशय आहे. त्याचकाळात नांदेडमध्येही अनेक सराफांना या टोळीने गंडा घातला होता. तसेच गुजराथ, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही या टोळीने इन्कमटॅक्स ख़ात्याचे अधिकारी असल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांची माया गोळी केली असल्याचेही पोलिसांना समजले. पुण्यात चतुरचंद यांना फसवल्याचा प्रकार तब्बल पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २० आक्टोबर १९९८ ला घडला. पण, आजतागायात या टोळीचा तपास लागलेला नाही. या घटनेवरूनच अक्षयकुमारच्या मध्यंतरी गाजलेल्या ‘स्पेशल २६‘ या चित्रपटाची निर्मिती झाली नाही ना?

No comments:

Post a Comment