Thursday, 5 June 2014


मैत्रीचा 'दीपक'
- - - - - - - - - - -
साधारणत: वीस वर्षांपूर्वीचा 1991 या वर्षातील हा किस्सा...कार्पोरेशनच्या निवडणुका लागलेल्या...लोकसत्तात मी नवखा पत्रकार होतो..भवानी पेठ मतदारसंघातील वॉर्डसच्या वार्तांकनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती...सोमवार पेठ आणि रास्ता पेठेच्या मधल्या भागातील एका वॉर्डमध्ये कॉंग्रेसकडून सुरेश करंडे जोरात होते. शिवसेनेचा उमेदवार नवखा होता..माझ्या वार्तापत्रामध्ये मी लिहिलं की शिवसेनेचा उमेदवार स्थानिक नसल्याचा फायदा कॉंग्रेसला होऊ शकतो...झाऽऽलं......दुस-या दिवशी मी आफीसला पोचायच्या आधी 'तो' उमेदवार 70 - 80 कार्यकर्त्यांसह रेशनकार्ड घेऊन वाट पहात होता.. मग त्या मुद्द्यावर गरम चर्चा झडली... त्यावेळी 'त्याची' आणि माझी चांगलीच बाचाबाची झाली. ..'त्याचं' नेटवर्क मोठं...स्वभाव निर्भिड....हाताशी पाचपन्नास पोरं....मी.त्यावेळी आंबिल ओढा कॉलनीत रहायचो..एसपीतून नुकताच पासआऊट झालेलो..त्यामुळं कुणाला घाबरायचा प्र्श्नच नव्हता. मी ही माघार घेत नव्हतो...आमच्या सहका-यांनी कसंबसं प्रकरण निपटलं...पण 'तो' चांगलाच लक्षात राहीला...आणि बहुदा मी ही त्याच्या नजरेत आलो...पुढे तो नगरसेवक झाला...विरोधी पक्ष नेता झाला...राज ठाकरेंचा खंदा समर्थक झाला. मधल्या काळात नेमके कधी व कसे आमचे रस्ते एकत्र आले हे लक्षात नाही...पण चांगलीच दोस्ती झाली...कॉलनीतल्या घरी कधीही यायचा तो...रात्री 1-2 किंवा सकाळी 6-8 अशा आडनिड्या वेळी दार वाजलं की डोळे झाकूनही मला समजायचं की 'तो' आलाय...आमचे संबंध कमालीचे गाढ झालेले..तो घरातलाच झालेला .त्याच्या पक्षाचे विचार मला कधीच न पटणारे...पण ते आमच्या मैत्रीच्या कधीच आड आले नाहीत... सेनेचा असूनही भवानी पेठेतल्या मुस्लीमबहुल एरीयातून तो प्रचंड मतांनी विजयी व्हायचा हे विशेष...अर्थातच त्याला कारण त्याचे ग्रासरूटला असलेले संबंध...पुढे हा दोनवेळा आमदार झाला...पण मैत्रीत कधी फरक पडला नाही त्याच्या..गाडीतून चालला असला आणि मी दिसलो,तर गाडीतून उतरायचा आणि माझ्या स्कूटरवर बसून यायचा इतका साधा स्वभाव. अर्थात स्वभाव साधा असला, तरी दृष्टीकोन विशाल...त्यातूनच त्याने बॅंकेचं...शाळा-महाविद्यालयाचं, सहकारी भांडाराचं, भोजनालयांचं विशाल जाळं उभारलं....मला आठवतयं साधारणत: 1995 च्या सुमारास येरवड्याच्या मनोरुग्णालयाच्या दूरावस्थेबाबत काहीबाही कानावर येत होतं....तिथला कॉन्टॅक्ट मिळवून मी दिवसभर फिरलो...तिथली दारूण अवस्था पाहिली..तेथून परतताना भवानी पेठेत 'हा' दिसला...उद्वेगाने मी म्हणालो,'' काय राव ..कसलं तुमचं सरकार? बघ त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन जरा...''. तो थबकला...या विषयाबाबत त्याने माहिती घेतली सगळी...क्षणभर त्याने विचार केला . .. .वरून पाऊस कोसळू लागला होता...अचानक तो म्हणाला, चल आणि त्या पावसात आम्ही पुन्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलो...त्याने तेव्हाचे डीन डॉ.पारस लव्हात्रे यांना बोलावून घेतलं...आम्ही पुन्हा एकदा सगळी पाहणी केली. वरकरणी कठोर भासणा-या माझ्या या मित्राच्या मनाची संवेदनशीलता मला तिथं लक्षात आली. मनोरुग्णांना दिल्या जाणा-या जेवणबद्दल,त्यांच्या वाईट राहणीमानाबाबत त्याने डॉ. लव्हात्रे यांना पार फैलावरच घेतलं....त्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी सकाळीही आम्ही पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेलो...खूप बारीकसारीक माहिती घेतली......'मनोरुग्णांच्या नरकयातना' या नावाने मी या रुग्णालयातील दुरावस्थेची मालिका 'सकाळ' मध्ये प्रसिद्ध केली ...त्याबाबत सरकारकडून काय उपाययोजना करता येतील याची माहिती घेऊन त्याने विधानसभेत हा मुद्दा लावून धरला . .. .खूप तळमळीने त्याने मेंटल हॉस्पिटलचा मुद्दा लावून धरला आणि तेथे भरीव सुधारणा घडवून आणल्या हे विशेष...हा एकच प्रश्न नाही....पुण्याच्या अनेक भागातील मूलभूत समस्यांना हात घालून ते सोडवण्यासाठी त्याने पाठपुरावा केला...अख्ख्या पुण्यात त्याचे सॉलीड्ड कॉन्टॅकट्स...भले तो शिवसेनेचा असला, तरी सर्व पक्षातील, सर्व जातीधर्मातील कार्यकर्त्यांचं मोहोळ त्याच्याकडे आहे..सर्व स्तरातील नागरिकांशी उत्तम संबंध आहेत.. दहा वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक तिस-यांदा लढताना पक्षाच्या शहराध्यक्षांसह सर्व कार्यकारीणीने त्याच्याविरोधात राजीनामे देऊन त्याला एकाकी पाडलं...पण हा डगमगला नाही....जिगरीने निवडणूक लढवली आणि अवघ्या 254 मतांनी त्याला हार पत्करावी लागली...तरीही दुस-या दिवशी प्रसन्न मुद्रेने तो आफीसवर जाऊन बसला.. हसतमुखाने कार्यकर्त्यांना भेटला....यापूर्वीचे विजय जसे त्याने पचवले तसा हा पराभवही त्याने पचवला....पक्षात दोन उभे गट पडल्यावर राज यांच्या बाजूने खंबीर उभा राहून तो सक्रीय राजकारणातून काहीस अलिप्त झाला....बॅंक, शैक्षणिक विस्ताराच्या योजना आखल्या आणि प्रत्यक्षातही आणल्या....या सगळ्या प्रवासात त्याच्या आणि माझ्या वाटांमध्ये काही बदल झाले...पण त्याचं प्रेम, लोभ कायम राहीला . . .दहा वर्षांपूर्वी माझ्यावर तर पोलीस केसबाबत आणि आजाराबाबत गंभीर आफत ओढावली...पण खंबीरपणे हा माझ्या पाठीशी उभा राहिला....दोस्ती आणि वैर कसं करायचं आणि निभावायचं हे फक्त त्याच्याकडूनच शिकावं...निवडणुकीचं त्याचं तंत्र खूपच आगळं आणि सहजपणे न कळण्याजोगं असतं...त्याच्या बहुतेक निवडणुकांच्या आदल्या रात्रीची आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीची आम्हा दोघांची बुलेटवरील सैर हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो.. . माझा हा मित्र ...नाव दीपक पायगुडे...आमच्या पुण्यात यावेळी मनसेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरलाय....माझ्यासारख्या हजारो मित्रांकडून त्याला खूप खूप शुभेच्छा...

No comments:

Post a Comment