Thursday, 5 June 2014

अंकलची सावली - - -
- - - - - - - - - - - - - -
       मडगाव एक्स्प्रेसचा प्रवास कधी कंटाळवाणा होत नाही. . तरी पण त्या दिवशी का कुणास ठावूक प्रवास संथ वाटत होता...संध्याकाळी पुण्याहून सुटलेली गाडी काही केल्या दौंडजच्यापुढे जातच नव्हती....डब्यात ओळखीचे प्रवासी कुणी नव्हते....आणि खास ओळखही कुणाशी झाली नव्हती....अधूनमधून पुस्तकवाचन...अधूनमधून निरीक्षण...अधूनमधून माणसांचं वाचन चालू होतं...नेहमीच्या रेल्वे प्रवासात असतात, तशा टिपिकल काही फॅमिलीज होत्या...एक डॉक्टर होते साठीकडं झुकलेले...पत्नीसमवेत गोव्याला चालले होते....पत्ते खेळत छान गप्पा चालल्या होत्या त्यांच्या....एक चौकोनी कुटुंब होतं...पण त्यांची नेमकी नाती काय असावीत हेच समजत नव्हतं...कारण, जो प्रमुख पुरुष वाटत होता त्याची पत्नी कोण, बहिण कोण आणि मुलगी कोण? असा संभ्रम वाटत होता....की ते सगळेच भाऊ बहिण होते याचा उलगडा झाला नव्हता....कॉलेजच्या पोरांचा एक ग्रुप होता.....मिथून नावाचा त्यांचा एक मित्र सहा महिन्यांपूर्वी वाघा बीचवरून बेपत्ता झालेला ...त्याच्या शोधासाठी ते दर महिन्याला जायचे...तसेच आताही चालले होते....एक नवविवाहित युगूल होतं....मधुचंद्राला चाललेलं. . .म्हाता-या आजीबाई आणि त्यांची छोटीशी नात होती मस्त...ओळखीचं कु्णी दिसतंय का हे पाहत माझी नजर भिरभिरत होती.....दोन बाकांमागच्या आडव्या बाकावर नजर जाऊन पुन्हा स्थिरावली...ती व्यक्ती ओळखीची वाटत होती खरी; पण नेमकं लक्षातच येत नव्हतं...नेहमी खाकी गणवेशात दिसणारा पोस्टमन एखाद्या दिवशी अचानक साध्या वेशात मंडईत वगैरे भेटल्यावर त्याची ओळख पटवताना आपण कसं चक्रावून जातो?...तसं काहीसं झालेलं. . .
साठ-पासष्ठ वय, काळा वर्ण, तेल चोपडून मागे वळवलेले केस, उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये लखलखणारी अंगठी लक्ष वेधून घेत होती...पाठीला पोक आलेला....नजर खाली झुकलेली..... काळसर ओठ...माणूस तर ओळखीचा वाटत होता...पण लक्षातच येईना....सोबतची स्त्री बहुदा त्यांची पत्नी असावी . . पार जुन्या पोलीस आफीसर्सपासून जुन्या दादा मंडळींपर्यंत चेहरे आठवून पाहिले...पण छ्या...लक्षातच येईना. . . विचारचक्र सुरूच होते...खरंतर असं व्हायला लागलं की अस्वस्थता जास्तच वाढते. . . ... मधूनच दूरवर घुमणारा रेल्वेच्या शिटीचा आवाज आला...आसमंतात काळोख पसरला होता....उष्म्यामुळे घशाला कोरड पडत होती....'त्या' व्यक्तीसोबत असलेल्या त्या स्त्रीने प्यायला पाण्याची बाटली उघडली....पिताना काहीशी ती हेंदकाळली..तिच्या अंगावर पाणी उडाले....मंद स्मित करत त्या व्यक्तीने तिच्या हातून पाण्याची बाटली घेतली....जवळच्या बॅगेतून काचेचा ग्लास काढला....नॅपकीनने स्वच्छ पुसला....आणि बाटलीतील पाणी ओतून कमालीच्या अदबीने पत्नीच्या हातात दिला....माझं लक्ष होतंच....ती बाटली धरण्याची, ओतण्याची स्टाईल ओळखीची वाटली . .. बस्स! ओळख पटली........तो अंकल असावा .....आधी शंका होती...मग तो अंदाज झाला...शंकाही खरी ठरली आणि अंदाजही.....मी आवाज दिला ..अंकऽऽल....तो चमकला....आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि आलो सायेऽऽब म्हणत लगबगीने आलाही....

           अंकल ....अख्ख्या शिवाजीनगरमध्ये फेमस होता...वयानं जास्त असला..तरी सगळे त्याला अरेतुरे करायचे...मी...ही....शिवाजीनगर नाक्यावरच्या रूचिरा बारमध्ये अंकल वेटर होता...वर्षानुवर्षे.....मरून कलरच्या शर्ट पॅंटशिवाय आज प्रथमच त्याला पांढरा शुभ्र झब्बा-पायजम्यासारख्या निराळ्या पोशाखात पाहत होतो...गेली जवळपास सुमारे पंधरा वर्षं ओळखायचो त्याला....पण नेमकं नाव माहिती नाही....बारमधला सर्वात बुजूर्ग वेटर म्हणून बहुदा त्याला अंकल म्हणायचे....नाक्यावरच बार असल्याने नेहमी तिथं भांडणं तटा व्हायचा...पण अंकल असला की सगळं कसं शांत व्हायचं....टेबल कुठलंही असो...ओळखीचा कस्टमर अंकलला आवाज दिल्याशिवाय रहायचा नाही....अनेक लोक जातानाही आवर्जून अंकलला बोलावून टीप दिल्याशिवाय निघायचे नाहीत....कुणीही कितीही आवाज चढवला, तरी अंकल कमालीच्या शांतपणाने सामोरा जायचा....त्यामुळे वातावरण निवळायचं...

आमच्या शाळेजवळच आहे हा बार....तेथून आफीसही जवळ ....शाळेतले बहुतेक मित्र गावठाणातले....त्यामुळं मी बिंधास्त असतो या एरीयात. . कुणा गेस्टला पार्टी द्यायची झाली, की आवर्जून रूचिरामध्ये जायचो...एकतर तिथं फूड खूप मस्त आणि सिलेक्टीव्ह . .. ड्रिंक्सही ओरिजिनल .. .त्यामुळं कायमच हा बार ओसंडून वाहत असतो.. तिथला मॅनेजर गावडे माझा स्कूलमेट.....आपल्या गेस्टना भारी सर्व्हीस देणार...वर घसघशीत डिस्काऊंटही.....बारमध्ये कसलंही लफडं झालं की त्याचा फोन यायचा....भांडणतंटा असला तर मी गावठाणातून कुणा मित्राला बोलावून घेऊन मिटवायचो...पोलिसांची भानगड असली की गोड बोलून प्रसंग निभावून न्यायचो...तिथल्या नेहमीच्या जाण्यानं अंकल चांगला ओळखीचा झालेला....मी गेलो की तो कुठल्याही टेबलला असला, तरी मला आवडते म्हणून आवर्जून काकडी किंवा कैरी आणून देणारच . . .कितीही मासे खावेसे वाटले आणि ते चांगले नसले, तर फिश घेऊ नका आज...फ्रेश नाही असं स्पष्टपणे सांगणार....स्वभाव कमालीचा गरीब...कुणीही यावे-टिक्की मारूनी जावे असा....बारच्या वॉचमनपासून मॅनेजर-मालकापर्यंत कुणीही वस्सकन त्याच्यावर ओरडायचे....गि-हाईक तर जणु हा आपला घरगडी असल्याच्या थाटातच त्याला वागवायचे.....आणि त्यांच्याकडून मिळणा-या दहा-वीस रुपयांच्या टीपने अंकल हरखून जायचा...पण एक होतं की अंकल नसला की त्या बारमध्ये काहीतरी उणीव हमखास जाणवायची....

              मध्यंतरी बरेच दिवस तो दिसला नाही....भेटल्यावर मी विचारलं त्याला....पोटात दुखतं साहेब खूप....इथल्या डाक्टरला दाखवलं....पण ते म्हटले की आप्रेशन करावं लागेल....मग गेलो गावाला....तिथं केलं दवापाणी..आता ठिक आहे....अरे अंकल लोक जगातनं येतात पुण्यात...आणि तू जातो गावाला....मी बोललो....त्यावर, परवडत नाही सायेब इथले डाक्टर आन औषधही...त्याच्या या उत्तरावर मी गप्प बसलो....सहज चौकशी केली त्याची....अंकल, मूळचा भागलपूर, बिहारचा....दोन मुलं आणि पत्नी तिथं....मुलं खासगी संस्थांमध्ये काम करतात..हा इकडे 12-15 हजार रुपये कमावतो...गावाला पाठवतो...इकडं राहणं -खाणं फुकट....त्यामुळं त्याला पुणं परवडायचं. .. एकदा बोलता बोलता तो म्हणाला... दिवसभर आणि रात्रभर मिळून 8-10 तास उभं रहावं लागतं....वरच्या भटारखान्यातून पन्नासवेळा खाली वर करावं लागतं...आता झेपत नाही ..पण घरची जबाबदारी आहे...न करून कुणाला सांगायचं??? पोक काढून अंकल उभा होता....मंद बल्बच्या उजेडातही त्याची सावली पलिकडच्या भिंतीवर पडली होती....हा बार....हेच त्याचं विश्व आहे हे अधोरेखित करत होती...

                  मध्यंतरी, जवळपास सहा-आठ महिने माझी रूचिराला चक्कर नव्हती...एकतर गावडेने नोकरी      
सोडलेली....त्यामुळं तिथून फोनही यायचा प्रश्न नव्हता....मी गोव्याला चाललेलो....आणि आता अंकल आकस्मिकपणे भेटलेला....चेह-यावर काहीसं तेज होतं समाधानाचं...तृप्त, निवांत दिसत होता अंकल....बारमध्ये नेहमी दिसणा-या थकल्याभागल्या चेह-यात आणि आताच्या अंकलच्या चेह-यात कमालीचा फरक दिसत होता....मी जरा गप्पा मारल्या त्याच्याशी....त्याची माहिती घेत होतो....आणि एकेका उत्तरासरशी अवाक्‌‌ होत होतो. . .बिहारहून अंकलने सारा बाडबिस्तारा गोव्याला हलवला होता. . .मडगावला एक छोटेखानी हॉटेल टाकलं होतं...त्याची बायको, दोन मुलं ते हॉटेल पाहत होते....पुण्याच्या हॉटेलचं घसघशीत भाडं येत होतं...बायका-मुलांच्या आग्रहाने अंकलही पुणं सोडून मडगावला स्थायिक व्हायला निघाला होता.....आता हॉटेलचं भाडं कसलं..तर ते रूचिरा अंकलच्याच मालकीचं होतं,... हे ऐकून मला भोवळ यायचीच बाकी राहिली....अंकलच्या वडिलांचं होतं ते हॉटेल....भागीदारीमध्ये फसवणूक झाल्यानं वडिल परागंदा झालेले...मग अंकलने त्याच हॉटेलमध्येच काम पत्करलं....त्या जोडीला त्यानं कोर्टात केसही लावली होती....त्यामुळं मालक खार खाऊन असायचा..पण मधाळ बोलणं आणि विनयशील स्वभावानं अंकलचे अनेक बड्या कस्टमर्ससोबत उत्तम रिलेशन्स जपलेले...त्यामुळे प्रत्येकाने काही ना काही मदत केली...एका वकील साहेबांनी त्याचा खटला चक्क फुकट लढवला....काही बड्या मंडळींनी एक्साईजच्या लोकांना सांगून मालकाला ताकीद द्यायला लावली....अलिकडेच एकाने मडगावला हॉटेल घेण्यात मदत केली .. . .तसा अंकल कष्टात कधीच कमी पडला नाही...पण, कुठेतरी हे हॉटेल आपलंच आहे....आपण या हॉटेलचे मालक आहोत...आपले वडील या हॉटेलपायीच परागंदा झाले....याच हॉटेलपायी कुटुंब विस्कटलं हे त्याच्या मनात कायम चालू असायचं....एक ना एक दिवस पुन्हा हे हॉटेल आपण मालकीचं होईल, असं स्वप्न दिसत असावं बहुदा त्याला...पण, दिवसाचे 18-18 तास राबूनही त्याची लढायची उमेद काही संपली नव्हती....त्याच्या या काबाडकष्टांना अखेर न्याय मिळाला होता...कोर्टाच्या निकालानं हॉटेल चक्क अंकलच्या मालकीचं झालं होतं...वेटर्स मंडळींनी अक्षरश: दिवाळी साजरी केली म्हणतात त्या दिवशी....सगळे कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर अंकलने रीतसर हॉटेलचा ताबा घेतला....नंतर ते हॉटेल सरळ भाड्याने चालवायला देऊन अंकल गोव्यात स्थायिक व्हायला चाललेला. . .नियतीचे हे फेरे पाहून मी अवाक् झालो...
गोव्याची ट्रीप उरकून मी परत आलो...नेहमीच्या कामाच्या रगाड्यात रमलो. . .आणि एका रात्री फोन खणखणला...गावडेचा होता तो फोन....रूचिरामध्ये काहीतरी गडबड झालेली.... बुलेट काढून पोचलो तिथं....दोन ग्रुपमध्ये राडा चाललेला....पोलीसही पोचले होते...आम्ही कसंबसं आटोक्यात आणलं सगळं.....मग जरा खुर्चीवर विसावलो...'' साहेब, घ्या पाणी...जास्त थंड नाहीये.......'' आवाजानेच मी दचकलो....हो.....तो अंकलच होता....मी पाहतच बसलो त्याच्याकडं.....तोच मरून ड्रेस अंगावर . .. इतर वेटर्ससोबत तो नेहमीप्रमाणे कामात गढलेला....त्याने काऊंटरकडे इशारा केला...मी पाहिलं....एक तरतरीत तरूण काऊंटरच्या कामात गढलेला...अंकल जवळ आला म्हणाला....तो रोहन . . धाकटा मुलगा...मला नाही करमत गोव्यात...इतक्या वर्षांची कामाची सवय स्वस्थ बसू देत नाही आणि या हॉटेलशिवाय करमत नाही....मग आलो इकडंच...मग रोहनही आला....तो म्हटला मी लक्ष घालीन आता....माझीही ना नाही...सगळा जुना स्टाफ बोलावून घेतला...सगळ्यांना चांगला पगार देतोय...मला समाधान वाटतं...नव्या कस्टमरला समजत नाही, मीच मालक आहे म्हणून....ते वेटर समजूनच कामं सांगतात आणि तेच माझ्या अंगवळणी पडलंय....लक्ष असू द्या तुमचं....म्हणत अंकलने रोहनची ओळख करून दिली....त्याला काहीतरी कानात सांगितलं.....मी निघताना पाया पडला रोहन...आता अधूनमधून कधीतरी येतो फोन रूचिरामधून ''अंकल, पापलेट भेजू क्या? फ्रेश हैं....'' अंकलचा चेहरा डोळ्यासमोर तरळतो अन्‌ मी मनोमन हसतो. . .

No comments:

Post a Comment