Friday, 6 June 2014

चोर मद्या . . .
========
पत्रकारीतेमधील गेल्या 23 वर्षांत खूप निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तिंशी परिचय झाला. विशेषत: क्राईम व पोलिटीकल रिपोर्टींग करताना निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तिंना जवळून पाहता आले. निरखता आले. अभ्यासता आले. त्यापैकी काही कायमचे मित्र बनले . शरद पवारांपासून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यापर्यंत, अण्णा हजारे, बाबा आढाव यांच्यापासून ते अनिल अवचट,कुमार सप्तर्षींपर्यंत कितीतरीजणांच्या मुलाखती घ्यायची संधी मिळाली. सामान्यांना, व पोलिसांनाही सहजपणे गाठता येत नाहीत अशा अंडर्वर्ल्डमधील कितीतरी हस्ती निकटच्या परिचयाच्या झाल्या. त्या सर्वांत हा चोर मद्या हे अफलातून व्यक्तिमत्व. मधुकर मनोहर प्रभाकर या त्याच्या पूर्ण नावापासूनच याचे वेगळेपण जाणवते. महाराष्ट्रातील बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद आणि फोटो आहे. सर्वप्रकारे लिलया चो-या करण्यात हा पटाईत. पण कधीही प्रत्यक्ष चोरी करताना पकडला गेला नाही. गेल्या 20 वर्षांत त्याच्याविरुद्ध एकही केस ''नोंदली' गेली नाही. (याचा अर्थ असा नाही की तो सक्रीय नाही.) पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, बडोदा येथील अनेक धनदांडग्यांना त्याने 'हाथ की सफाई' दाखवली आहे. एवढेच नव्हे, तर हिंदी अभिनेत्री नर्गिस हिच्या घरातून त्याने हि-याची अंगठी पळवली होती. ती घ्यायला सुनील दत्त याच्या पुण्यातील घरी आला होता. पण चोरलेली वस्तू मी कधी परत करत नाही पण माझ्या घरातील कोणतीही वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता असे त्याने सांगितले होते अशी वदंता आहे. पुण्यात त्याची चार मजली भव्य इमारत, दुमजली हॉटेल आणि कोरेगाव पार्कसारख्या पॉश एरियात बंगला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व केसेसमधून तो निर्दोष सुटला. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पाच किलो सोने त्याला परत द्यायचा आदेश न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिला. एक दिवंगत गृहराज्यमंत्री मद्याचे सख्खे मावसबंधू आहेत. चोर मद्या या नावाने परीचित असलेला मद्या दहा वर्षांपूर्वी फक्त 54 मतांनी माजी महापौरांविरोधात महापालिकेची निवडणूक हरला. अनेक पोलीस मद्यामुळे गबर झालेत. कित्येकदा त्यांना हफ्ते देण्यासाठीच त्याचा चो-या कराव्या लागतात हे दुर्दैव. त्याचे घर, मुख्य दरवाजा, त्याला आतून असलेल्या 13 निरनिराळ्या प्रकारच्या कड्या हे सारे काही अतर्क्य आहे. मी 20 वर्षांपासून त्याल चांगला ओळखतो. तो काल शिवाजीनगर एरियात असल्याचे समजल्यावर त्याला आफीसला बोलवून घेतले. तुम्हालाही चोरमद्या पहायला मिळावा या उद्देशाने एक फोटोही क्लिक केला

No comments:

Post a Comment