Friday, 6 June 2014

''भारतरत्न'' ला हवेत निकष :-----
सचिनला भारतरत्न दिल्यानंतर खूप उलटसुलट प्रतिक्रिया समाजाच्या सर्वच स्तरातून उमटल्या. त्यामध्ये अगदी सचिन कसा अपात्र आहे यापासून ते राजश्री शाहू महाराज,महात्मा फुले, बाबा आमटे यांना हा पुरस्कार देणे कसे आवश्यक आहे अशा निरनिराळ्या मते मतांतरांनी फेसबुकचा कट्टा घुसळून निघाला. हा पुरस्कार देऊन कॉंग्रेसने स्वार्थ साधल्याचे काहींचे मत आहे..तर लोकप्रियता पार रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला या 'रत्न' च्या टेकू चा काही फायदा हो्णार नाही अशा टोकाच्या प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या. या सर्व विचारमंथनातून एक महत्वाची बाब लक्षात आली, ती म्हणजे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला द्यायचे याबाबत कोणतेही निश्चित निकष नाहीत. हे निकष निश्चित केले गेले तर कोणाच्याही निवडीबाबत घोळ निर्माण होणार नाही. देशाला भारतमातेच्या शेकडो-हजारो पुत्रांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व राष्ट्रउभारणीसाठी निरनिराळ्या स्तरावर अमूल्य कार्य केले आहे. त्याशिवाय अज्ञात क्रांतीकारकांची माहिती कायमचीच पडद्याआड राहीली आहे..पण त्यातील कितीजणांना भारतरत्न देणार??? मुळात कोणतीही व्यक्ती मरण पावल्यावर पुरस्कार देणे मनाला पटतच नाही...काय त्या व्यक्तीला मेल्यावर समजणार आहे का? आपल्याला पुरस्कार मिळालाय ते??
त्यापेक्षा हयात व्यक्तीलाच पुरस्कार दिला तर आपल्या कार्याचे चीज झाल्याचे समाधान त्याला मिळेल...त्यामुळे राष्ट्रपुरुष असोत अथवा क्रांतीकारक अथवा विज्ञान, संशोधन क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती..भारतरत्न पुरस्कार हयातीतच दिले गेले पाहिजे. शिक्षण. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक कार्य या क्षेत्रांमधील मूलभूत कामाने देशाच्या प्रगतीला हातभार लागतो यात काहीच शंका नाही....पण त्याबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरीनेही देशाचा तिरंगा जगभर झळकतो हे ही मान्य केलेच पाहिजे. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना घसघशीत मोबदला मिळत असल्याने त्यांना हा पुरस्कार देणे उचित नाही असा एक आक्षेप घेतला जातो. तसं असेल, तर मग संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनाही त्यांच्या कामाचा काही ना काही मोबदला मिळत असतो हे ही मान्य करायलाच हवे. पण मग पुरस्काराला असे काही आर्थिक निकष असतील तर भारतरत्न केवळ देशासाठी बलिदान केलेल्या, स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे काम केलेल्या राष्ट्रपुरुषांपुरताच मर्यादीत राहील. पण त्यावेळीही राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड अशा कितीतरी श्रीमंत राजघराण्यातील राष्ट्रपुरुषांनी अतिशय मोलाचे काम केले आहे. मग त्यांची नावे पुरस्कारातून बाजूला करायची का? हयात व्यक्तींनाच हा पुरस्कार देण्याचा निकष लावला तर किमान राष्ट्रपुरुषांमधील समर्थकांमध्ये फाटाफूट होणार नाही..आरोपांची चिखलफेक होणार नाही.. सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी बजावलेल्या उत्तुंग व्यक्तींना त्यांच्या हयातीतच हा पुरस्कार दिला जावा. त्यासाठीचे निकष चार तज्ज्ञ व्यक्तींनी चर्चा करून निश्चित करावेत..म्हणजे हा पुरस्कार देणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊन पुरस्काराचे अवमूल्यन होणार नाही
( ता.क.:- सचिन यू आर ग्रेट.. तुझ्या खेळाला सलाम...एवढी कीर्ती, प्रतिष्ठा, पैसा मिळूनही पाय मातीत ठेवण्याच्या तुझ्या वृत्तीला सलाम..तुझ्या निगर्वी, विनम्र
स्वभावाला सलाम... .माहिती आहे सा-या जगाचे डोळे परवा तुझ्या मनोगताकडे लागले होते..आयुष्यात पहिल्यांदाच एवढे मोठे भाषण करताना तू
एकतरी मराठी शब्द बोलला असता तर आमची कॉलर ताठ झाली असती..किमान भाषणाअखेरीस जय महाराष्ट्र म्हणाला असतास तरी मन उंचबळून आलं असतं...जाऊ दे. . . तुझ्यावर किती प्रचंऽऽड ताण असेल याची जाणीव आहे. निवृत्तीनंतर तुझे बरेच काही प्लॅन्स असणारच...एकच माफक अपेक्षा..तू महाराष्ट्राचा ब्रॅंड अँबेसिडर हो...) 

No comments:

Post a Comment