Friday, 6 June 2014

किणींचा मेंदू ..ते सनमचे हृदय . .
-  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -

कोणत्याही संशयास्पद मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदनात समजले नाही तर व्हिसेरा राखून ठेवला जातो. न्याय वैद्यक प्रयोगशाळेत हा व्हिसेरा बारकाईने तपासला जातो. व्हिसेरामध्ये पोटातील अन्नघटकांचे नमुने, शरीराच्या विविध अवयवांचे काही भाग असतात. त्यामध्ये हृदयाचा, किडनीचा, गुप्तांगाचेही काही अंश असतात. त्यांच्या विश्लेषणातून संबंधीत व्यक्तीच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकते.?

वडगाव शेरी परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या सनम हसन या युवतीच्या मृत्युचे गूढ अधिक गडद होत चालले असून व्हिसेरामध्ये तिच्याऐवजी एका पुरुषाचे हृदय आढळल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. शवविच्छेदनातील या गडबडीमुळे ९0 च्या दशकात राज्यात खळबळ उडवून दिलेल्या किणी प्रकरणाच्या स्मृतींना उजाळा मिळाला. मुंबईकर रमेश किणी यांचा शहरात गूढ मृत्यू झाला. त्या प्रकरणाने एका बड्या राजकीय नेत्याची झोप उडवली होती. किणी यांच्या शवविच्छेदनानंतर त्यांचा मेंदू बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सनम हसनच्या प्रकरणामुळे वीस वर्षांपूर्वीच्या किणी प्रकरणाच्या स्मृती ताज्या झाल्या.

सनम हसन ही युवती मूळची मुंबईची. येथील खासगी महाविद्यालयामध्ये ती फॅशन डिझायनींगच्या द्वितीय वर्षाच्या वर्गात शिकत होती. गेल्या वर्षी तीन अॉक्टोबरला वाढदिवसानिमित्त तिच्या मित्रांनी वडगाव शेरीमधील एका फ्लॅटमध्ये मध्यरात्री पार्टीचे आयोजन केले होते. तेथेच तिचा गूढरीत्या मृत्यू झाला. त्याबाबत सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक तपास करीत असून त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. सनमचा म्हणून राखून ठेवलेल्या व्हिसेरामध्ये हृदयाचा असलेला भाग तिचा नसून प्रौढ पुरुषाचा असल्याचे मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे मत आहे. त्या व्हिसेर्‍यामध्ये असलेले योनीस्त्रावाचे नमुनेही अन्य स्त्रीचे असल्याचे मत या प्रयोगशाळेने नोंदवले आहे. या स्त्रावातील डीएनए सनमच्या माता-पित्यांशी मिळत नसल्याचाही निष्कर्ष नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कबरीतून सनमचा मृतदेह काढून तपास करण्याशिवाय पोलिसांना गत्यंतर उरलेले नाही.

ससून रुग्णालयात शवविच्छेदन करताना सनमच्या व्हिसेराची अदलाबदल झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या रुग्णालयातील यास्वरुपाच्या किणी प्रकरणामुळे १९९६ साली शिवसेना-भाजपा युती शासन डळमळू लागले होते. मुंबईच्या माटुंगा भागात राहणार्‍या रमेश किणींची राहती इमारत पुनर्विकसनासाठीचे प्रयत्न सुरू होते. त्यास किणी यांनी कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय लक्ष्मीकांत शाह, सुमन शाह, आशुतोष राणे हे पुनर्विकसनाचे काम करीत होते. ही मंडळी आपल्याला धमक्या देत असल्याची फिर्याद किणी यांनी नोंदवली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले. शहरातील अलका चित्रपटगृहात २३ जुलै १९९६ ला किणी मृतावस्थेत आढळले. विषारी द्रव प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. शवविच्छेदनानंतर त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. हा तपास 'सीआयडी' कडे गेल्यावर पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी, किणी यांच्या शरीरात मेंदू नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावपळ करून 'हरवलेला' किणींचा मेंदू 'सापडल्याचे' सांगितले. प्रत्यक्षात तो मेंदुही भलत्याच व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले.

किणी यांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अखेरपर्यंत स्पष्ट झाले नाही. राज ठाकरे यांनीच किणी यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप किणी यांच्या पत्नी शीला यांनी करून वादळ उठवून दिले होते. अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईक याचाही या प्रकरणात हात असल्याचे बोलले जात होते. पण, पुढे या प्रकरणावर पडदा पडला.

रमेश किणी काय किंवा सनम हसन काय यांच्या मृत्युचे रहस्य कायम राहण्यामागे सरकारी रुग्णालयांतील शवागार आणि शवविच्छेदन कक्षातील भोंगळ कारभारच कारणीभूत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ससून रुग्णालयामधील शवविच्छेदनानंतर मृतदेह आणि राखून ठेवलेला व्हिसेरा पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. पोलीस हा व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दाखल करतात. मध्यंतरीच्या काळात ससूनच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात आलेल्या व्हिसेरांचे प्रकरण गाजले होते. शवविच्छेदन विभागातील कामकाजातील भोंगळपणा ९0च्या दशकामध्ये रमेश किणी यांच्या मृत्युमुळे उघड झाला होता. त्यावेळी काही कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. पण, आजही तेथील कामकाज समाधानकारक नसल्याचेच चित्र सनम हसनच्या व्हिसेर्‍यावरून स्पष्ट झाले आहे. अन्यथा सतरा वर्षीय सनमच्या व्हिसेर्‍यामध्ये हृदयरोगाने जर्जर झालेल्या पन्नास वर्षीय पुरुषाचे हृदय आणि प्रौढ महिलेचा योनीस्त्राव कसा? हा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment