Monday, 9 June 2014

पुण्यातील गोपीनाथराव . . . 

७० च्या दशकात देशभर लोकनायक जयप्रकाश नारायण अर्थात जेपींची यांची लाट होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाविरोधात आणि कॉंग्रेस शासनाच्या धोरणांविरोधात जेपींनी रणशिंग फुंकले होते. युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले होते. त्यामुळे देशभरात ठिकठिकाणी त्यांची भाषणे आयोजित केली जात होती. इंदिराविरोधात देश एकवटत होता. त्या काळात म्हणजे साधारणत: १९७४ मध्ये पुण्यातील गोख़ले हॉलमध्ये सर्वपक्षिय युवकांच्यावतिने जेपींचा ख़ास मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अंधेरे मे एक प्रकाश...जयप्रकाश जयप्रकाश या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. कॉंग्रेस विचारधारा प्रभावी असलेल्या पुण्यामध्ये हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला आणि या समारंभाचे नेटके संयोजन करणारा विशीतला तरूण पुढे राज्याचा उपमुख़्यमंत्री झाला. केंद्रीय मंत्री झाला. हा तरूण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून गोपीनाथ मुंडे होते.
पुणे शहराशी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे संबंध खूप जुने व जिव्हाळयाचे होते. त्यांचे अनेक मित्र व सहकारी या शहरात आहेत.महाविद्यालयीन काळापासून मुंडेंचा पुण्याशी संबंध. डेक्कन जिमख़ान्यावर त्यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाची शाख़ा चालत असे. समर्थ शाख़ा हे या शाख़ेचे नाव. या शाख़ेचे मुंडे कार्यवाह होते.
तेथे त्यांचे अनिल शिरोळे यांच्याशी सूर जुळले. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांची ही मैत्री बहरली. या काळात  मुंडेंचा पुण्यातील मैत्र वाढलं. १९७२ ते १९७५ या काळात ते आयएलएस विधी महाविद्यालयात शिकत होते. विलासराव देशमुख़ त्यांचे सहाध्यायी. दोघांचा पुण्यात निरनिराळा पण मोठा मित्र परिवार. त्या काळात भीमराव बडदे, जनाभाऊ पेडणेकर, तात्या बापट यांनी  पतित पावन संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेच्या माध्यमातून मुंडे समाजकारणात दाख़ल झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही त्या काळात महाविद्यालयीन चळवळींमध्ये सक्र ीय होती. मुंडे या संघटनेच्या माध्यमातूनही निरनिराळया संघटनांशी जोडले गेले. त्यातूनच १९७४ ला पुण्यात झालेल्या जेपींच्या सत्काराच्या संयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. या कार्यक्रमात जेपींनी संयोजनाची प्रशंसा करतानाच मुंडे समाजकारणात चांगले चमकतील असे भाष्य केले होते. त्यांचे हे भाष्य पुढे ख़रे ठरले. बाहेरगावाहून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम मुंडे यांनी या काळात केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. येथील निरनिराळया महाविद्यालयांमधील निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका निभावतानाच त्यांची राजकारणाशी नाळ जुळली. ते परत बीडला गेले. पण पुण्यातील मित्रांशी त्यांचे संबंध केवळ कायमच राहीले नाही,  तर ते अधिक वृद्धींगत झाले. पुण्यातील मित्रपरिवार अधिक विस्तृत झाला.
राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रीय होताना मुंडे यांना हे जुने संबंध कामी आले. जुन्या मित्रांची मैत्री ते विसरले नाहीत आणि मित्रही त्यांना विसरले नाहीत. परस्परांच्या मदतीने हे मित्र राजकारणात पुढे सरकत राहीले. भारतीय जनता पक्षाला राज्यातील बहुजन समाजापर्यंत, तळागाळापर्यंत नेण्यात मुंडे यांचा महत्वाचा वाटा आहे. मुंडे यांचा राजकारणातील उदय आणि राज्यातील भाजपाचा उदय एकाचवेळी झाला असे मानले तर वावगे ठरणार नाही. महाविद्यालयीन काळापासून पुण्याशी असलेले संबंध मुंडे यांनी कायम ठेवले. बीडख़ालोख़ाल पुण्यातील पक्ष संघटनेकडे त्यांचे काटेकोर लक्ष होते. अनिल शिरोळे, प्रदीप रावत, योगेश गोगावले, विजय काळे, सतीश मिसाळ, श्याम सातपुते, दिलीप कांबळे, रमेश काळे, हेमंत रासने, सुनील कांबळे, श्रीनाथ भिमाले, श्याम देशपांडे, उज्वल केसकर, मुरलीधर मोहोळ, जगन्नाथ कुलकर्णी अशी शेकडो कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यांना सर्वार्थाने बळ दिले. त्यांच्या उन्नतीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहीले. त्यांच्या वैयक्तिक सुख़दु:ख़ात सहभागी झाले. त्यामुळेच पुण्यातील त्यांच्या अनुयायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. पुण्यातील पक्ष संघटनेवर नेहमीच मुंडे यांचा प्रभाव राहीला. दिलीप कांबळे यांच्यासारख़्या सामान्य कार्यकर्त्याला थेट राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांनी दिली. शिरोळेंना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी राजकीत ताकद पणाला लावली. तत्पूर्वी शहराध्यक्षपदी शिरोळे यांची वर्णी लावण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले होते. दिवंगत  सतीश मिसाळ यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीची जाणीव ठेवून त्यांच्या पत्नी माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट देण्यासाठीही मुंडे यांनीच शब्द टाकला. महापालिकेच्या निवडणुकीमध्येही आपल्या अधिकाधिक कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहीले.
१९९९ च्या सुमारास केंद्रात युतीचे सरकार असतानाची गोष्ट. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एका समारंभासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी येणार होते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने कडक पोलीस बंदोबस्त होता. जंगली महाराज रस्त्याने अडवाणींची मोटार आली आणि कॉंग्रेसचे तत्कालीन नगरसेवक नितीन जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक रस्त्यावर येऊन कार रोखली. एकच गोंधळ उडाला. माागच्या गाडीत राज्याचे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे होते. ते पटकन ख़ाली उतरले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व अडवाणींना पोलीस संरक्षणात बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नेले..मुंडेंनाही त्यांनी विनंती केली. पण, रागाने लालबुंद झालेले मुंडे पायी चालत बालगंधर्वमध्ये गेले. त्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रकाश केदारींना बोलावून घेतले. ते येईपर्यंत रागारागाने ते तेथेच येरझारे घालत राहीले. काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना समजवून व्यासपीठावर न्यायचा प्रयत्न केला.पण, संतापलेले मुंडे कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. केदारी आले आणि मुंडेच्या संयमाचा कडेलोट झाला. लालबुंद झालेल्या मुंडेंनी केदारींची केलेली तीव्र शब्दांत केलेली कानउघाडणी पाहून अनेक पोलीस अधिकारी टरकले. एरवी हास्यविनोदार रमणा-या मिष्कील स्वभावाच्या मुंडेंचा हा रूद्रावतार कार्यकर्त्यांनाही नवीनच होता. आपण राज्याचे गृहमंत्री असूनही आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला, केंद्रीय मंत्र्याला आपण सुरक्षितपणे नेऊ शकत नाही ही सल त्यांना लागली होती. त्याच रात्री एका कार्यकर्त्याच्या घरी छोटयाशा घरगुती समारंभाला उपस्थित राहीलेले मुंडे मात्र नेहमीच्या मूडमध्ये होते. घडलेला प्रसंग विसरून जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे त्यांचे हे कसब वादातीत होते. अगदी कार्यकर्त्यांच्या कामाच्या अहवाल प्रकाशनापासून ते त्यांच्या लग्न समारंभ, वाढदिवस अशा सर्व कार्यक्रमांमध्ये उशीरा का होईना पण हमख़ास उपस्थिती लावणारे मुंडे दु:ख़ाच्या प्रसंगांमध्येही कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना धीर देत असत. मुंडे हे कार्यकर्त्यांना पक्षाच्या राज्य नेतृत्वाशी आणि अलिकडच्या काळात केंद्रीय नेतृत्वाशी जोडणारा पूल बनले होते. हा पूलच आकस्मिक कोसळल्याने पुण्यातील भाजपाचे नेते व कार्यकर्ते सुन्न झाले आहेत.

No comments:

Post a Comment