Friday, 6 June 2014

दुनियादारी.....
-  -  -  -  -  -  -
. . .
अखेर धाडस करून काल दुनियादारी पाहिला. धाडस करून म्हणायचे कारण म्हणजे दुनियादारीची पारायणे करणा-या पिढीचा मी एक सदस्य आहे. पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये शिकत असतानाच सुहास शिरवळकरांची अर्थातच सुशिंची          '' दुनियादारी'' कादंबरी हाती पडली आणि पुढे जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या कादंबरीतील अनेक पात्रे आम्ही पाहिलीत, प्रसंग अनुभवलेत. अद्यापही एखाद्या शिरीनची, डीएसपीची, अशक्याची भेट होत असते. या कादंबरीतील उत्कटता, भावनिक प्रसंग ख़ास करून श्रेयस-शिरीनचा धुक्यातील भेटीचा तरल प्रसंग, साईनाथच्या संघर्षाचा थरार, कॉलेजमध्ये वट असलेला पण प्रेयसीचे लग्न झाल्याने कोलमडून गेलेला डीएसपी, श्रेयसच्या आईच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेला श्रेयस आणि चटका लावणारा त्यांचा मृत्यू हे आणि कित्येक प्रसंग कायमचे मनावर कोरले गेलेत. ही सशक्त कलाकृती चित्रपटाच्या माध्यमात बसू शकणार नाही हे मत काल चित्रपट पाहिल्यावर अधोरेखित झालं. केवळ एक चित्रपट म्हणून '' दुनियादारी'' बरा आहे. पण मूळ कादंबरीच्या तुलनेत चित्रपट जमलाच नाही. कोणतीही कलाकृती मग ती चित्रपट, नाटक, कथा,कादंबरी काहीही असो हे ज्या त्या फॉर्ममध्येच फिट्ट बसतात. त्याला फारच कमी अपवाद आहेत.('' गॉडफादर'' हा सणसणीत अपवाद आहे हे मान्यच्‌) शोले,शराबी,आराधना, दीवार अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांवर कादंब-या काय कपाळ लिहिणार?? वपुंच्या '' पार्टनर'' वर नाटकही आलं आणि मध्यंतरी चित्रपटही..पण, मूळ कादंबरीची सर दोन्हींना आली का??? '' दुनियादारी '' हे सप्तरंगीच नव्हे तर या दुनियेतील तमाम रंगांनी सजलेलं बहारदार इंद्रधनुष्य आहे.चित्रपट कादंबरीशी सुसंगत बनला नाही ही त्या दिग्दर्शकाची आजिबात चूक नाही. केवळ एका चित्रपटात बसणारी ही कादंबरीच नाही. तिच्यातील निरनिराळे रंग चिमटीत पकडणे सहजसाध्य बाब नाही. त्यामुळे ती कादंबरीच्याच रसरशीत रुपात राहीली असती, तर ते अधिक उचित झाले असते. त्यातच दिग्दर्शकाने त्यात केलेले कित्येक बदलही आक्षेपार्ह वाटले. उदा. कादंबरीतील रांगडा व्हिलन साईनाथ हा चित्रपटात चक्क तृतीयपंथी का दाखवला? हेच समजत नाही. एसके चा मृत्यू चटका लावणारा वाटत नाही. कादंबरीतील शिरीन उच्चवर्गिय पण शालीन आहे. चित्रपटातील शिरीन नव्या पिढीच्या भाषेत ''आंटी'' वाटते.कादंबरीतील शिरीन व श्रेयस ही दोन्ही मुख्य पात्रेच चित्रपटात फसली व कलाकारांचीही निवड चुकली हेच या चित्रपटाचे मोठे अपयश असावे. नाही म्हणायला अंकुश चौधरीचा डीएसपी भाव खाऊन जातो. ('' दुनियादारी'' या कादंबरीपोटी असलेल्या अतिव प्रेमाने माझे हे वैयक्तिक मत मांडले आहे. सुशींची '' मधुचंद्र'' कादंबरी यश चोप्रांच्या हाती पडली असती तर एक नितांत सुंदर चित्रपट हिंदी चित्रसृष्टीत जमा झाला असता.)

No comments:

Post a Comment