Friday, 6 June 2014


प्रवास एका मुंडक्याचा...
- - - - - - - - - - - - - - - -
"ससून रुग्णालयातून एका मृतदेहाचे मुंडके गायब... 'चार वर्षांपूर्वीही बातमी वृत्तपत्रांतून झळकली अन सगळीकडे एकच खळबळ उडाली. ससून रुग्णालयाच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा हा प्रकार घडला होता. रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या वृत्ताने धुराळा उडाला. पोलीस खडबडून जागे झाले. एका आगळ्यावेगळ्या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात झाली होती. केवळ
वैद्यकीय वर्तुळातच नव्हे, तर समाजाच्या सर्व क्षेत्रांत या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. नेमका प्रकार कसा आणि काय घडला असावा?याबाबत उलटसुलट तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. घडलेला प्रकार विचित्र पण संवेदनशील होता. दोन एप्रिल 2008 ची ही घटना पोलीस कधीच विसरू शकणार नाहीत. त्या दिवशी ससून रुग्णालयाच्या शवागारातून चक्क एका मृतदेहाचे मुंडकेच गायब झाले होते. मुंडके गेले कुठे?हा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला होता. ते एका तरूण रिक्षाचालकाचे शीर होते. कुष्ठरोगाने तो रुग्णालयातच मरण पावला. त्या रात्री त्याचा मृतदेह शवागारात ठेवला होता. त्याच्या देहाचे मुंडकेच कोणीतरी गायब केल्याचे सकाळी निदर्शनास आले आणि तेथील कर्मचा-यांची पाचावर धारण बसली. त्यांनी वरिष्ठांना हा प्रकार कळवला. एका मृतदेहाचे मुंडकेच गायब झाल्याचे समजल्यावर ते ही हतबद्ध झाले. पुढचे सोपस्कार सुरू झाले. स्थानिक बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस आले. पंचनामा केला. उपस्थितांचे जाबजबाब झाले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी आले. त्यांच्या बैठका सुरू झाल्या. पोलीसही घडल्या प्रकाराने अचंबित झाले होते. या अधिका-यांनी त्यांच्या आयुष्यात भल्याभल्या गुंडांना वठणीवर आणले. चो-या-मा-यांचे गुन्हे उघडकीस आणले, कितीतरी गुंतागुंतीच्या खुनांच्या घटनांची उकल केली. पण, त्यांनाही ही घटना बुचकाळ्यात टाकणारी होती. तपास करायचा तरी कोणत्या पद्धतीने हेच त्यांना समजेनासे झाले. कारण, असा प्रकारच त्यांच्या आयुष्यात कधी घडला नव्हता. अश्या गुन्ह्याचा तपास कधी त्यांनी केला नव्हता. कारणही साहजिक आहे. उभ्या महाराष्ट्रात असा प्रकार कधी घडला नव्हता. पोलिसांसमोर आव्हान उभे राहीले होते.
साध्या पोलिसापासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत आणि गृहमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच पुण्यातील या विचित्र गुन्ह्याची नोंद घेतली. या संदर्भात नेमका कोणता गुन्हा दाखल करायचा येथपासून ते तपास कसा करायचा अशा विविध मुद्दयांवर पोलिसांच्या बैठका सुरू झाल्या. स्वत: पोलीस आयुक्त जातीने त्याचा आढावा घेत होते. नागरिकांमध्ये काहीशी घबराट होती. एका मृतदेहाचे शीर कापून नेणे हा प्रकार विकृत व्यक्तीने केला असावा असा एकंदर सूर होता. तांत्रिक-मांत्रिकांनी एखाद्या गुप्त कामासाठी हे मुंडके पळवले असावे अशी शंका काहीजण व्यक्त करीत होते. हे मुंडके ज्याचे होते,त्या तरुणाच्या नातलगांवर तर आधीच त्याच्या मृत्युमुळे आभाळ कोसळले होते. त्यातच त्याच्या देहाचे शीर गायब झाल्यावर तर त्यांच्या दु:खाला आणखी डागण्या बसल्या. त्यांनी शीर नसलेला हा मृतदेह स्विकारायला साफ नकार दिला. डॉक्टरांनी आणि पोलिसांनी नातलगांच्या विनवण्या केल्यावर कुठे त्यांनी हा देह स्विकारून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, पोलिसांचा शोध जोमाने सुरू झाला होता. नागरिकांकडून माहिती मिळण्यावरच पोलिसांची मदार होती. पुण्याच्या सजग नागरिकांनी ती सार्थ ठरवली. चार दिवसानंतर हडपसरजवळच्या कालव्यामध्ये हे शीर तरंगत असल्याचे तेथील महिलांनी पाहिले. तेथील बच्चुसिंग टाक यांना वृत्तपत्रामुळे हा प्रकार समजला होता. त्यांनी ही माहिती तातडीने नजिकच्या पोलीस चौकीत कळवली. एका प्लास्टीकच्या पिशवीमध्ये ठेवलेले हे मुंडके पोलिसांनी बाहेर काढले. ते ससूनमधून चोरीला गेलेलेच मुंडके असल्याची खात्री वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आली. नातलगांनीही ते शीर ओळखले. तपासामधील निम्मा टप्पा सर झाला होता. आता ते मुंडके ससून रुग्णालयातून तेथे कसे गेले?या प्रवासाचा मार्ग पोलिसांना उलगडायचा होता.सगळेच पोलीस हा तपास करीत होते. खब-यांना पैसे वाटले गेले. हॉटेल-बारमधील वेटर्सना सतर्क करण्यात आले. एसटी,रेल्वेस्थानकावरील सूत्रांना सावध करण्यात आले. तांत्रिक-मांत्रिकांवर नजर ठेवण्यात आली. जागोजागी शोध सुरू झाला. पण, नेमके यश काही मिळत नव्हते. पण, पोलीस हिंमत हारले नव्हते. गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन निरीक्षक राम जाधव 16ऑगस्टला नेहमीप्रमाणे कामात व्यग्र होते. अचानक एका फोनने ते चमकले. हे मुंडके चोरून नेणा-याचे नाव त्यांच्या खब-याने दिले होते. चाणाक्ष जाधवसाहेबांनी मग आजिबात विलंब केला नाही. त्यांच्या पथकाने तातडीने कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये जाऊन शोएब शेख याच्या मुसक्या आवळल्या. जाधवसाहेबांनी त्याला विश्वासात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा शोएब पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने गडबडला. अखेर, त्यांच्यापुढे शरणागती पत्करून त्याने आपणच हे कृत्य केल्याची कबुली दिली. कुमार शिरसाट, युनुस शेख आणि प्रविण वाघिरे हे शोएबचे मित्र. नेहमी ते एकत्र मद्य पित बसत. एका दिवशी ते असेच पार्टी करीत होते. मद्याच्या नशेत त्यांच्या बढाया सुरू झाल्या. आपण किती शूर आहोत याच्या बढाया शोएब मारू लागला. त्यावर, '' तू तर मेलेल्या माणसालाही मारू शकत नाही, असे कुमारने त्याला डिवचले. त्याचे ते बोलणे शोएबच्या वर्मी लागले. तो प्रविण व युनूससोबत सारसबागेजवळ पावभाजी खायला गेला. तेथे गप्पा सुरू असतानाच ससूनमधून मुंडके पळवून ते कुमारला दाखवण्याची क्लुप्ती त्याला सुचली. त्यानुसार, ते तिघे तेथे गेले. मध्यरात्रीचा सुमार असल्याने शवागाराजवळ फारसे कर्मचारी नव्हते. शोएबसह तिघे आत घुसले. तेथे जवळच एक मृतदेह होता. त्यांनी धारदार शस्त्राने त्या देहाचे शीर कापले आणि सोबत नेलेल्या प्लास्टीकच्या पिशवीत घेऊन पळ काढला. त्या मध्यरात्रीच त्यांनी ते मुंडके कुमारला दाखवून आपली कथित मर्दानगी दाखवली. सकाळी उजाडल्यावर मात्र त्यांची पाचावर धारण बसली. आपण भलतेच कृत्य करून बसलोय हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आधी हे मुंडके झाडीत लपवले होते. पण, त्याची दुर्गंधी सुटली. भटकी कुत्री तेथे घुटमळू लागली. आपले बिंग फुटेल म्हणून त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गुपचूप हे मुंडके प्लास्टीकच्या पिशवीत घेऊन कालव्यात फेकले. ते वाहत वाहत सकाळी हडपसरमधील कालव्यात आले आणि अखेर या मुंडक्याला वाचा फुटली. शोएब व त्याचे मित्र घडल्या प्रकाराने भयभीत झाले होते. प्रसार माध्यमांमधून या घटनेबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्यावर ते आणखी घाबरले. त्यांचे मद्यपान वाढले. रात्रीच नव्हे, तर दिवसाही ते मद्य पिऊन झिंगू लागले. त्यांच्यातील हा बदल अनेकांच्या लक्षात आला. त्यातच एकदाते चौघेही दाऊ पिऊन गप्पा मारत असताना त्यात या मुंडक्याचा विषय निघाला आणि तो एकाने ऐकला. त्याने तातडीने पोलीस निरीक्षक राम जाधव यांना हा प्रकार कळवला आणि या गूढ प्रकाराची उकल झाली. मुंडक्याचा प्रवास कायमचा थांबला. . .. . . 

No comments:

Post a Comment