Thursday, 5 June 2014

च्याऊ...एक किरवंत
- - - - - - - - - -
नितीन कुलकर्णी हे त्याचं नाव... पाच फूट उंची....सावळा वर्ण...सरळ नाक....त्याला च्याऊ हे नाव नेमकं कधी आणि का पडलं हे लक्षात नाही आता.....पण तो आमचा खास दोस्त....आमच्याच चाळीतला....माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठा.........त्यामुळं त्याचं सर्कल मोठ्या पोरांचं......दर शुक्रवारी फर्स्ट् डे फर्स्ट शो पिक्चर बघायचा त्याला भारी नाद....कुठल्याही पिक्चरचा रेफ्ररन्स विचारा.... मिनिटांत डिटेल सांगणार ....दर शुक्रवारी मस्त आंघोळ बिंघोळ करून कडक इस्त्रीचे कपडे घालून हा कुठल्यातरी थिएटरला जायचा...एकटाच......फर्स्ट डे फर्स्ट शोवाल्या एकेकट्या मंडळींचा एक ग्रुपच झाला होता त्यांचा....पिक्चर सुटला की लगेच हे ठरवणार ...खुद्दार येतोय ...पुढच्या शुक्रवारी नीलायमला भेटू....असं काहीतरी....आणि भेटायचे हे सारे.....बरं च्याऊचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय काय? तर...मटका आणि नंतर लॉटरी.....खूप मटका खेळायचा....आणि बहुदा त्याला लागतही असावा ....कारण आर्थिक परीस्थिती चांगली होती.....कॅरम उत्कृष्ठ खेळायचा.....क्रिकेटची मॅच जीव की प्राण......या त्याच्या छंदांमुळं त्याची दोस्ती खूप....एसपी समोरच्या उदय विहारला रात्र रात्रभर कॅरम खेळत बसायचा...कुणी दोस्त भेटले तर दिवस दिवस रमी खेळत बसायचा...पण चाळीत राहून फार कधी आमच्यात मिसळला नाही...कधी वासुगिरी फारशी केली नाही...हाणामा-या त्याचा प्रांतच नव्हता....क्रिकेट सिनेमा आणि मटका यातच तो मश्गुल असायचा आणि त्या क्षेत्रातील खूप लोक त्याला चांगली ओळखायची...अर्थात असं असलं ना तरी त्याचा स्वभाव पापभीरू होता...फारसा कुणाच्या अध्यामध्यात कधी पडला नाही....नाही म्हणायला त्याच्या जवानीत एक पोरगी घेऊन पळून गेला होता....पण आठवडाभराने हा याच्या घरात.... ती तिच्या घरात....सुखाने नांदू लागले....चाळीतला मामला...त्यामुळे हाक ना बोंब करायचा शिरस्ता...एवढा एक प्रसंगवगळता च्याऊ फार कधी कोणत्या कारणाने लक्षात राहीला नाही...त्याची ती खटारा ल्यूना घेऊन तो गुमान कॉलनीबाहेर जायचा...एसपीच्या कट्ट्यावर थांबायचा....येता-जाता चाळीसमोरच्या कट्ट्यावर बसलेल्या आमच्याकडं बघून हसायचा..एवढंच... चाळीतल्या गणपतीत लांबून लांबून असायचा....तसा तो काही आम्हाला तुच्छ लेखायचा नाही...पण त्याचं विश्व निराळं होतं....

अलिकडच्या काळात च्याऊमधे खूप बदल झाला....काकांच्या जागेवर तो कार्पोरेशनला नोकरीला लागला....आमच्या पिढीतली पोरं निरनिराळ्या क्षेत्रात 'चमकायला' लागल्यावर तो आवर्जून ओळख द्यायला लागला...कॉलनीतल्या नव्या पिढीतले भाई जड जातील हे लक्षात आल्यावर मात्र आमच्या कट्ट्याचा तो मेंबरच झाला....आमचं कवच असल्यानं निर्धास्त रहायला लागला....निरनिराळे किस्से सांगायचा तो...आम्ही अवाक्‌ होऊन ऐकत बसायचो....त्याचं एक झालं...ते म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टींना उशीर होत गेला...चाळीशीनंतर नोकरीत तो काहीसा स्थिरावला....त्यानंतर त्याने मुली पहायला सुरूवात केली... तोपर्यंत खूपच उशीर झाला होता...काही स्थळं याने नाकारली...काहींनी त्याला नापसंती कळवली....कार्पोरेशनच्या नोकरीत असताना त्याची बदली वैकुंठ स्मशानभूमीत झाली.....सुरुवातीला त्याला ते आवडलं नाही...नंतर रमला तिथंही.....वैकुंठातील प्रत्येक पार्थिवावर वैदीक संस्कार करणं मोघे गुरूजींना शक्य व्हायचं नाही....मग नितीन त्यांच्याकडून शिकला....आणि किरवंताचं काम त्यानं सुरू केलं.....आम्ही उडालोच...कधी काळी जुगार, मटका खेळणारा च्याऊ एकदम किरवंत वगैरे झाला हे आमच्या पचनीच पडत नव्हतं....खूप थट्टा करायचो त्याची...पण तो कधी चिडला नाही....त्याने शांतपणे त्याचं काम सुरू ठेवलं....आणि महत्वाचं म्हणजे सर्व नाद पूर्णपणे सोडून दिले.....त्याचं विश्व बदललं होतं...आणि त्यातही तो पूर्णपणे रममाण झाला होता....त्याचा गरीब स्वभाव पाहून वैकुंठातल्या काहीजणांनी त्याला त्रास दिला....खूप सोसल्यावर मग एकदा फोन केला त्यानं...त्याचं बोलणंही साधं आणि थोडक्यात असायचं....'' ए आबिद्द्....त्या ***** याच्याकडं बघ रे जरा.....उगा त्रास देतोय....हां..का...''बस्स...एवढं सागून फोन बंद...मग आपणच पोरांना विचारायचं...माहिती घ्यायची...कुणाला तरी तिकडं धाडायचं......मग दोन-चार दिवसांनी पुन्हा त्याचा फोन...'' आबिद्द्....तो आला बरं का जाग्यावर...आता तू काय करू नको.....हां का..'' बस्स एवढंच..काय? का? कसं ? कशासाठी? हे तो सांगायचा नाही....मी विचारायचो नाही....तेवढं अंडरस्टॅन्डींग होतं आमच्यात....एकदा एका प्लॉटवरून तिथल्या देशपांडे सरांनी याला बराच मोठा गंडा घातला....बर तो मास्तर पोलिसांना आणि काही गुन्हेगारांना धरून होता...ब-याच जणांना त्याने असंच फसवलं...नोकरी-व्यवसाय करून साठवलेल्या पाच लाख रूपयांचा फटका बसल्यानं च्याऊ सैरभैर झाला होता....काय ....कसा तिढा सोडवावा या विचारात असतानाच दत्ताच्या पोरांनी त्या देशपांडे सरांना अशाच प्रकरणात बडवलं ......हे एके दिवशी समजलं....लगेच दुस-याच दिवशी आम्ही त्या सरांची वरातच काढली पार वैकुंठात....विद्युत दाहिनीत टाकतो म्हटल्यावर हादरला...च्याऊचे पैसे दिले त्याने...थोडेफार राहीले असतील....पण त्यामुळं च्याऊ खूप खुष झाला होता...कट्ट्यावर पार्टी वगैरे द्यायचं बोलू लागला ....त्याच्या नजरेतला आनंद खूप समाधान देणारा होता.....तो सर्वकाळ वैकुंठातच असल्यानं कुणा प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झालं, गुंडाची मयत आली की मला हमखास फोन करायचा....माझा हा दोस्त माझा चांगला सोर्सही झाला होता...माझ्या ओळखीतल्या कुणाचं निधन झालं की मी त्याला फोन लावायचो....तो वैदीक संस्कार तर करायचाच; पण आम्ही जाईपर्यंत सर्व चोख व्यवस्था तयार ठेवायचा....

मध्यंतरी एकदा कट्ट्यावर बसलो होतो...सहज वर पाहिलं...तिस-या मजल्यावरच्या गॅलरीत च्याऊ हातात माळ घेऊन जप करत होता....मी विचारलं एकाला....पार्थिवावर वैदीक संस्कार करणा-या किरवंतांना भूतप्रेतांचा त्रास होऊ नये म्हणून काही विशिष्ठ जप असतात. तो जप तो करायचा..पण त्याचा हा किरवंताचा व्यवसाय त्याच्या वैवाहिक जीवनासाठी अडथळा ठरला...पूर्वी काही स्थळं यायची तरी त्याच्यासाठी....या व्यवसायामुळं ती ही बंद झाली....

च्याऊविषयी आज या आणि कित्येक आठवणी दाटून आल्या....झालं काय की गेले 2-4 दिवस खूप धावपळीत होतो....आज सकाळी साडेसहाच्या सुमारास विक्रमचा फोन आला...च्याऊ गेला.....सुन्न झालो....मी कॉलनी सोडून जवळपास 18 वर्षं झालीत...आमच्यापैकी सारेच कुठं कुठं बाहेर पांगलेत...पण चाळीतल्या कट्ट्‌य़ावर जमतोच नेहमी......या कॉलनीतल्या, चाळीतल्या आमच्या दुनियादारीचे एकेक बुरूज ढासळायला लागलेत आता.....मागं विज्या पवार असाच गेला..तो तर आमचा हिरोच होता....त्याआधी सागर मांढरे गेला....तो आमच्या टोळीचा सरदार आहे....असं लोक चिडून बोलायचे... एकदा तो घरातनं गेला तो गेलाच....परागंदाच झाला ...राजा पळसकर गेला...भूषण गेला..संजा वैद्य गेला...अंत्या गेला....नन्या बेंद्रे..अनिल बेंद्रे.....कितीतरी गेले.....निरनिराळ्या मार्गांनी गेले...च्याऊ तर काल रात्री घरात टीव्हीवर मॅच बघत बसला होता....अचानक उचकी लागली...उलटी आली म्हणून बेसिनकडं पळाला....तिथंच खेळ खलास.....सकाळी वैकुंठात गेलो....इतकी वर्ष आमच्या ओळखीतल्या कुणाचीही बॉडी असली की कसल्याही सोपस्कारांची वाट न पाहता ज्याच्यामुळे पटकन सारी कामे मार्गी लागायची; त्या च्याऊचं पार्थिव 'मृत्यु पास' नाही म्हणून अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहीलं होतं.....रमेश काळे, सुनील कदम वगैरे मंडळी आली.....त्यांनी धावपळ केली.....पासाचं काम झालं आणि आमच्या आयुष्यात आलेल्या या किरवंताने आमचा अखेरचा निरोप घेतला . . . . .

No comments:

Post a Comment