गणपतराव देशमुख आणि ब्रेक्रींग न्यूज
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - --
राज्य विधीमंडळात सलग पन्नास वर्षे कार्यरत असलेले सर्वात ज्येष्ठ सदस्य, स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांची नुकतीच एका चॅनेलवर मुलाखत लागली होती. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून 1962 पासून तब्बल अकरावेळा निवडून येण्याची किमया करणा--या या विनम्र, अभ्यासू नेत्याची मुलाखत चालू असतानाच "राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल, मुख्यमंत्र्यांची सोनियांशी चर्चा' या आशयाची ब्रेक्रींग न्यूज टीव्हीच्या स्क्रीनवर झळकली. महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत विधीमंडळात आणि राजकारणात कसे बदल होत गेले याचे अभ्यासपूर्ण विवेचन गणपतराव करीत असतानाच झळकलेली ही ब्रेक्रींग न्यूज त्यांनी अनुभवाने सांगितलेल्या गोष्टी अधोरेखित करणारी ठरली. मतदारसंघातील छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्यांवर नियमित संपर्क ठेवणे, या मतदारांचे काय प्रश्न आपण सभागृहात मांडले, त्यांच्या कोणत्या समस्यांची तड लागली, शासनाने कोणते नवे निर्णय घेतले, कोणते नवे कायदे केले, त्याचा आपल्या भागातील जनतेला काय आणि कसा फायदा होईल, त्यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजे, नव्या समस्या कोणत्या निर्माण झाल्या आहेत याची बित्तंबातमी देशमुख स्वत: गावोगावी फिरून देतात. अत्यंत साधे राहणीमान, सतत मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि त्यामुळेच मतदारांनाही आपला हक्काचा प्रतिनिधी वाटणा-या सांगोलेकरांनी त्यामुळेच इतकी वर्षे गणपतरावांवर भरभरून प्रेम केले. त्यांना विधीमंडळातील आपला कायमचा प्रतिनिधी मानले.
राज्याच्या राजकारणामध्ये मराठा व माळी समाजानंतर धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. पण तो विखुरला गेला आहे. या समाजाला राष्ट्रीय अथवा राजकीय पातळीवर भक्कम राजकीय व सामाजिक नेतृत्व कधी लाभले नाही. तसेच या समाजाला राजकारणामध्येही लोकसंख्येच्या तुलनेत फारसे कधी प्रतिनिधीत्व मिळाले नाही. गणपतरावांबरोबरच कवठेमहांकाळचे शिवाजीरावशेंडगे, सांगलीचे अण्णा डांगे आणि माळशिरसचे शिवाजीराव पाटीलही अपवादात्मक उदाहरणे आहेत. शेकापचा वारसा असल्याने गणपतरावांनी तळागाळातील जनतेच्या, वंचितांच्या विकासाचे स्वप्नं पाहिले. कोणत्याही विशिष्ठ जातीधर्माचे प्रतिनिधीत्व केले नाही. सांगोल्यातील सा-या जनतेलाच त्यांनी आपला समाज मानला आणि त्यांच्यासाठी आज वयाच्या 80 व्या वर्षीही ते तितकेच तडफेने कार्यरत आहेत. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेण्णूर हे त्यांचे मूळ गाव. या गावावर स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांचा पगडा. जाधव कॉंग्रेसमधून शेकापमध्ये गेले. त्यामुळे सारा गावही त्या पक्षाचा झाला. पुढे त्याच विचारांची आणि तत्त्वांची मशाल घेऊन देशमुख सांगोल्यात आले. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, एस. एम. पाटील, कमलाताई भागवत, वसंतराव तुळपुळे या मार्क्सवादी नेत्यांचा देशमुख यांच्यावर प्रभाव होता. त्याकाळची परिस्थिती लक्षात घेऊन गणपतराव यांनी सामाजिक कार्यासाठी आपली एक चौकट आखून घेतली आणि त्या परिघातच ते काम करीत राहीले. त्यामुळेच, आजही सांगोल्याची जनता लोकवर्गणी काढून देशमुखांना निवडून देते हे सध्याच्या काळात अप्रुपच मानले पाहीजे. अलिकडच्या काळात साधी नगरसेवक झालेली व्यक्ती एका वर्षात आलिशान गाडीत फिरून रूबाब करू लागते. सत्तेच्या माध्यमातून बक्कळ माया गोळा करते. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असे विचित्र समीकरण अलिकडच्या काळात बनले आहे. त्याला काही सन्माननीय अपवाद असतीलही. विधीमंडळात गणपतराव अशा वृत्तीला खणखणीत अपवाद ठरले आहेत. पूर्वी बैलगाडीतून ते प्रचारासाठी जात असत. आता जीपमधून जातात, एवढाच काय तो बदल. पण पैशांच्याबाबतीत आजही त्यांची स्थिती सध्याच्या राजकारण्यांच्या तुलनेत कफल्लक अशीच म्हणावी लागेल. कारण, त्यांनी सत्ता मिळविण्यासाठी पैसा वापरला नाही आणि सत्ता मिळविल्यानंतरही कधी पैसा कमविला नाही. अकरावेळा आमदारकी आणि एकवेळा मंत्रीपद मिळालेल्या या लोकनेत्याला त्यांच्या आयुष्यात काय कमी आमिषे दाखवली गेली असतील?अगदी मुख्यमंत्रीपदाचीही ऑफर त्यांना मध्यंतरी होती. पण आपल्याला निवडून देणा-या दुष्काळी भागातील भकास शेतक-याचा चेहरा समोर येतो आणि त्यामुळे मी सगळे मोह पूर्णत: टाळत आलो हे गणपतरावांचे विधान आताच्या बहुतांश लोकप्रतिनिधींनी लक्षात घेण्यासारखे आहे.
मनीपॉवर, मसलपॉवर यांवर भिस्त असलेले सध्याचे लोकप्रतिनिधी, कोणत्याही किरकोळ समस्येसाठी दिल्लीला धाव घेणारे अथवा सभागृहात अभ्यासाशिवाय काहीही प्रश्न विचारणारे आणि त्याला त्याच पद्धतीची उत्तरे देणारे नेते पाहिले की गणपतराव व्यथित होतात. 1962 पासून विधीमंडळात निवडून जाणा-या गणपतरावांना हे चित्र काहीसे भयचकीत करणारे वाटते. पिढीतील बदल म्हणून ते त्याकडे पाहतात. पण, सभागृहात काय निर्णय घ्यायचा? हे दिल्लीतील हायकमांडच्या आदेशावरून ठरवणारे अथवा त्यांना विचारून पुढील कृती करणारे नेते पाहिले की ते कमालीचे अस्वस्थ होतात. सामाजिक प्रश्नांची जाण नसलेले, तळागाळातील लोकांबद्दल आस्था नसलेले आमदार पाहिले की त्यांचा जीव तळमळतो. यशवंतराव चव्हाण, कृष्णराव धुळप, आचार्य अत्रे, एफ.एम.पिंटो, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील अशा एकाहून एक दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकलेल्या, त्यांच्या सहवासात राहिलेल्या गणपतरावांना किरकोळ कारणांसाठी मुख्यमंत्री अथवा अन्य नेते दिल्ली दरबारी पळतात हे मनाला खरोखर रूचत असेल काय? दिल्लीत महाराष्ट्राची मान ताठ ठेवणारे यशवंतराव चव्हाण, 1972 मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भयाण दुष्काळात लाखो हातांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, गोरगरीब जनतेसमवेत चटणी-भाकरी खाणारे वसंतदादा पाटील आदी मुख्यमंत्री व नेते जवळून पाहिलेल्या गणपतरावांना आजचे राजकारण कितपत रूचत असेल?प्रदेशाध्यक्षांना मंत्रीपद दिले काय किंवा मंत्र्याला प्रदेशाध्यक्षपद दिले काय?सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात काहीही फरक न पडणा-या निर्णयांसाठी दिल्ली दरबारी धाव घेणा-या मंत्र्यांची गणपतरावांना किवच वाटत असेल. त्यांनी हे बोलून दाखवले नसले, तरी त्यांच्या चेह-यावर तरळणारे भाव शब्दांवाचून सर्व काही बोलत होते. सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देणा-या गणपतरावांनी राजकीय वाटचालीतील काही प्रश्नांबाबत मात्र आपल्या तत्त्वांना जागून सूचक मौन बाळगणे पसंत केले. विधीमंडळामध्ये सोन्याने मढलेल्या गोल्डमॅनला अवघ्या सहा महिन्यात मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि त्याच सभागृहात सलग 50 वर्षे सक्रीय असलेल्या गणपतरावांची झालेली उपेक्षा यातच बहुदा त्या मौनाचे उत्तर सामावले असावे.

No comments:
Post a Comment