Thursday, 5 June 2014

डॉक्टर,गाईड ....आणि सर्वकाही :
- - - - - - - - - - - - - - - - - - - -
साधारणत: 1995-96 ची गोष्ट...सदाशिव पेठेतील 25 वर्षांच्या वास्तव्यानंतर थेट विश्रांतवाडी हा पैलतीर गाठला होता....मुळा रोडला रात्री खूप थंडी वाजायची....एका बाजूला जंगल...विस्तीर्ण शेती....आणि बाजूला नदी...संध्याकाळनंतर सगळाच निर्जन परिसर...आणि मी घरी जायचो रात्री एक-दोनवाजता...कमालीची थंडी असायची....गावात रहायचो तेव्हा असं काही नव्हतं...मग.. व्हायचा तोच परिणाम झाला....एकदम आजारीच पडलो.....तेव्हा डॉ. श्रीनिवास देशपांडे आमचे डॉक्टर होते ....रास्ता पेठेतल्या त्यांच्या दवाखान्यात जायचो.....साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजे होमिओपॅथीचं औषध द्यायचे ते...राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेला मोठा माणूस.....एरवी डॉक्टरकडे जाण्याचा कधी प्रसंगच यायचा नाही....फॅमिली डॉक्टर कुणी नव्हतंच....साधारण औषधं घेऊन मला काही बरं वाटेना...ताप हटत नव्हता....फ्लू सारखी लक्षणं होती बहुदा....एवढे आजारी झालो पडलोय...नेमकं काय झालं असावं या विचारानं जरा धास्तावलो होतो...घरची मंडळीही चिंताक्रांत झाली होती... दोन दिवसांनी निसार घरी आला...म्हणाला चल डॉक्टरकडे....असं लोकल औषधं घेऊन बरं वाटणार नाही...निसारही सकाळमध्येच होता...मला सिनीयर...मस्त, मायाळू माणूस....बळेबळेच तो स्कूटरवरून दवाखान्यात घेऊन गेला.....डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी झालेली ती पहिली भेट झाली.........काही माणसं विशेषत: डॉक्टर्स आणि मसाजिस्ट दिव्यस्पर्शी असतात. डॉक्टर भोंडवे हे असेच दिव्यस्पर्शी... .कित्येकदा केवळ नजरेनंच ते पेशंटचा आजार ओळखतात...अचूक निदान आणि नेमकी औषध योजना हे मला भावलेलं त्यांचं वैशिष्ठ्य...त्यांच्या औषधांनी चार दिवसांत खडखडीत बरा झालो...घरची मंडळी खुष झाली....मग डॉक्टरांशी अधूनमधून भेटी होऊ लागल्या...गावठाणात त्यांचं क्लिनिक....आफीसमधून घरी जाताना त्यांच्याकडं भेटायचो... कित्येकदा 'सूरभी'मध्ये कॉफी पीत छान गप्पा ...डॉक्टर आणि वकील नेहमी आपले खास मैत्रीतील किंवा आपल्या घरातील असावेत असं म्हणतात...मला या दोन्हीची चांगलीच प्रचिती आलीये...प्रताप परदेशींच्या रुपात माझ्याकडे घरचा वकील आहे आणि डॉक्टरांच्या रुपात एक घरचा देवदूत आहे...उगाच कुणाची स्तुती करणं तसं मला कधी जमत नाही...पण डॉक्टरांचं सदाबहार व्यक्तिमत्वच असं आहे की त्याबाबत उल्लेख करताना ती स्तुती आहे असं वाटणं साहजिक आहे...

               डॉक्टर शिवाजीनगरमध्ये प्रॅक्टीस करत असले, तरी गावठाणासह पुण्यातील निरनिराळ्या भागांतून त्यांच्याकडे येणा-या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.....अगदी सर्दी-खोकल्यापासून ते निरनिराळ्या चित्रविचित्र,किचकट आजारांबाबत त्यांच्याकडे औषधे घ्यायला लोक येतात...परगावी, विदेशी जाताना काय न्यावं ...काय नेऊ नये...काय पथ्य पाळावीत वगैरे असंख्य प्रकारचे सल्ले विचारायला बरीच गर्दी होते...त्यांचा फोन कायम एंगेज राहतो....ही त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाची आणि कौशल्याला मिळालेली पावतीच आहे जणु....एकतर शिवाजीनगर गावठाणासारख्या रावडी परिसरात प्रॅक्टीस करणे तशी
जिकीरीचीच बाब आहे...पण डॉक्टरांनी कित्येक वर्षे तिथं यशस्वीपणे चालवून दाखवलीय...
तिथल्या नागरिकांचा विश्वास जिंकलाय....त्यांची मन जिंकलीय आणि तिथल्या बहुतेक घरांचे ते चार पिढ्यांचे डॉक्टर आहेत...वैद्यकीय व्यवसाय करतानाच डॉक्टरांनी जोडलेले मैत्र हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल...एकाच घरातील तीन-चार पिढ्या त्यांच्याकडे औषधे घेत असल्याची कित्येक उदाहरणे आहेत...रूग्णही सर्व स्तरातील आणि सर्व वर्गातील आहेत...सर्वसामान्य नागरिकांपासून, मजुरापासून ते पत्रकारीता, पोलीस, प्रशासन, सांस्कृतिक,क्रीडा अशा बहुतेक सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या डॉक्टरांचे पेशंट आहेत....दररोज इतक्या प्रकारची माणसे तपासताना, शेकडो माणसांना भेटताना कुठेही ते संयम ढळू देत नाहीत....सर्वांशी सारख्याच आत्मियतेने, आपुलकीने ते संवाद साधतात....वयोपरत्वे ते कमालीचे प्रगल्भ होत चाललेत...त्यांची ज्ञान संपादन करण्याची आस त्यांच्या देहबोलीमध्ये दिसून येते...अष्टावधानी हा शब्दप्रयोग डॉक्टर भेटण्यापूर्वी मी फक्त पुस्तकातच वाचला होता....पण, त्यांच्याशी निकटचा परिचय झाल्यावर हा शब्द त्यांना अगदी चपखल असल्याचं लक्षात येतं..
एकीकडे वैद्यकीय पेशाचा व्याप सांभाळतानाच ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक संघटनांमध्येही जोडले गेले आहेत....आयएमए, रोटरी क्लब, आम्ही नूमविय यांसह कित्येक संघटनांमध्ये ते छान सक्रीय आहेत....कालानुरूप बदल करवून घेण्यातही ते तत्पर ...त्यामुळे तर कधी कागदी पॅडवर लिखित असणारे डॉक्टर लिलया कम्प्युटरवर लेख लिहितात...कथा लिहितात...वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन बदलांची, तंत्रांची माहिती देणा-या उत्तम पोस्ट ते फेसबुकवर लिहितात....चित्रपट आणि चित्रपट संगीत हा एक त्यांचा आवडीचा विषय... ते उत्तम लेखक आहेत...आघाडीच्या बहुतेक सर्व वृत्तपत्रांमध्ये त्यांचे सातत्याने लेखन व स्तंभलेखन सुरू असते...ते खूप चांगले वक्तेही आहेत....महाविद्यालयीन कालखंडामध्ये वक्तृत्वस्पर्धांचा फड त्यांनी गाजवून सोडलाय...आता निरनिराळ्या संस्थांमध्ये आरोग्याविषयी नेहमी काही ना काही व्याख्याने देतात....खूप मान्यवर संस्थांकडून त्यासाठी त्यांना आवर्जून आमंत्रणे येतात..त्यांचा स्वभाव अत्यंत परखड आणि स्पष्टवक्ता....त्यामुळे त्यांना जवळून ओळखणारी मंडळी त्यांच्याशी वाद करण्याच्या फंदात पडत नाही.....अगदी मुद्देसूदपणे ते समोरच्याचा चुकीचा मुद्दा खोडून काढतात.....त्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्लीश वाचन खूप चांगलं आहे आणि ते वाचतात हे त्यांच्या लेखणीतून,बोलण्यातून सहजपणे जाणवतं....मला तर बातम्यांचे कित्येक विषय ते सुचवतात...लेखांसाठी मुद्दे सुचवतात...पेपरमध्ये कोणत्या विषयावर काय आलं पाहिजे हे नेमकेपणाने सांगतात...'' कथा एका डॉनची '' हे माझं पहिलंवहिलं पुस्तक आलं ते केवळ डॉक़्टरांमुळेच....माझ्या पाठीशी लागून त्यांनी ते सगळं लिहून घेतलं...सुरुवातीला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचो हे लक्षात न आल्याने गोंधळलो होतो....ती स्टाईलही त्यांनी सांगितली आणि माझं हस्तलिखित प्रकाशकाला देऊन पुस्तक प्रकाशित करण्याबाबत शब्द टाकला आणि पुस्तक प्रकाशितही करून टाकलं.....

             
डॉक्टर महत्वाचं म्हणजे ते खूप चांगले माणूस आहेत.....प्रसन्न, ताज्यातवान्या व्यक्तिमत्वाचे डॉक्टर खूप चांगले गाईड आहेत.....समस्या कोणतीही असो..तटस्थपणे खोलवर विचार करून ती मुळापासून सोडवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याचा अचूक सल्ला ते देतात....माझ्यासारख्या कित्येकांसाठी ते गाईड आहेत....खरंच सांगतो, मला कधीही कोणतीही समस्या भेडसावू लागली अथवा मला कसलाही सल्ला हवा असेल...मग ते वैयक्तिक संबंधांबाबत, वाहन् खरेदीबाबत, करीयरबाबत किंवा अगदी कसल्याहीबाबतीत असो...पावलं आपसुक गावठाणाच्या दिशेने वळतात आणि कितीही व्यापात बुडालेले असले, तरी खूप काळजीपूर्वक म्हणणं ऐकून घेऊन डॉक्टर त्यांचं मत देतात आणि माझ्यासारख्या कित्येकांसाठी तो फायनल डिसिजन असतो..
डॉक्टर खरंच खूप अभिमान वाटतो..तुमच्या संपर्कात आल्याचा..तुमच्याशी ओळख झाल्याचा आणि तुमच्याशी मैत्र जुळल्याचा...आज तुमचा वाढदिवस . . .तुम्हाला आभाळभरून शुभेच्छा . . . .

No comments:

Post a Comment