Friday, 6 June 2014

डायनॅमिक अश्विनी....
= = = == = = = = =
एक जानेवारीची सकाळ...मीन्स अकरा-बारा वाजलेले. . .मोबाईलची रिंग वाजली...अश्विनीचा फोन होता...
''सर..निगडीजवळ मर्डर आहे...मी वायसीएमला चाललेय....''
''बरं''
''परवा आम्हाला रॅली काढायचीय...डीसीपी परवानगी देत नाहीये''
''बरं...बरं...बघू आपण...''
''आणखी एक.....''
''काऽऽऽऽऽय?''
'' पिंपरीजवळ आत्ताच एकाला कानाखाली वाजवलीय.... वर्षाचं खातं पहिल्याचं दिवशी उघडलं....''
'' म्हणजे...?''
''काय विशेष नाही..रस्त्यात घोळका करून काही पोरं उभी होती...हॉर्न देतीये...देतीये...तरी बाजूला होत नव्हती....मग काय....उतरले... गाडी लावली ....आणि सरळ कानाखाली पेटवली....गेला कान चोळत''
''कोण होता तो?''
''माहित नाही...''
''गाडीचा नंबर पाहिलास का त्याच्या?''
''नाही... जाऊ दे...जस्ट कानावर घातलं...''
नंतर बाईसाहेब हा विषय विसरूनही गेल्या...नेहमीच्या कामात गढल्या...पत्रकारीता आणि समाजकार्य दोन्हींची सांगड घालून आश्विनीची गाडी जोमात सुरू आहे...निर्भिड आणि स्पष्टवक्ता स्वभाव, कामाला नेहमीच तत्पर....अत्यंत उत्साही आणि मनमोकळा स्वभाव...बाबा आढाव, भाई वैद्य, सुभाष वारे यांच्यासारख्या कितीतरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींचा निकटचा सहवास लाभलेली अश्विनी एक उत्तम क्राईम रिपोर्टर आहे...पिंपरी-चिचवड भागात ती गेली 8-10 वर्षे काम करतेय...स्थानिक पोलीसांशी, निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी दांडगा संपर्क.....एखादी घटना घडल्याचं कानावर आलं की मी लगेच कळवतो तिला...पण ती आलरेडी स्पॉटवर पोचलेली असते....त्यामुळं अलिकडे मी तिला काही कळवायच्या फंदातच पडत नाही...जात,पात,भाषा, धर्म असा कोणताही भेद तिला मान्य नाही..तिच्या रक्तातच् नाही ते...स्त्री-पुरुष या भेदाचेही अवडंबर तिला खपत नाही...पिंपरीत तिच्या वाटेला कोणी जात नाही...मूळची गाववाली असल्याचा अभिमान ती नेहमी मिरवते...आणि तो तिला शोभतोही.. तसं पत्रकारीतेमध्ये क्राईम बीट पाहणा-या मुली तुलनेत कमीच.... अलिकडच्या काळातल्या महिला पत्रकारांमध्ये अश्विनी भारी......बरं ती ठिक असली, तर काहीच प्रॉब्लेम नसतो...पण कुणी विनाकारण पंगा घ्यायच्या भानगडीत पडलं तर त्यांचे कसे बुरे हाल झालेत हे बहुतेक सर्व क्षेत्रातील मंडळींनी अनुभवलंय.....दर दोन-चार महिन्यांनी ती कुठेतरी धडपडते . . .आपटते .. . पडते...एखादं हाड मोडून बसते....चार-पाच वर्षांपूर्वी मोठा अपघात झालेला . . . दोन-तीन शस्त्रक्रिया झालेल्या...........त्यामुळं गळ्याला स्पॉंडिलायटीसचा पट्टा बांधावा लागतोय . .. मध्यंतरी पायाला फ्रॅक्चर झालं होतं....पण तिला फिकीर नाही....कुठेही कधीही बिंधास्तपणे फिरत असते...मिळेल त्या वाहनाने.....गेल्या आठवड्यात तर कळसुबाईला जायचा विचार होता हे ऐकूनच मी उडालो......
                         अश्विनी राष्ट्र सेवा दलाची राष्ट्रीय महामंत्री आहे....राज्यभर, देशभर ती सेवादलाच्या कामासाठी फिरत असते....निरनिराळे कार्यक्रम, उपक्रम घेत असते...डॉ. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हाही ती असंच कुठेतरी दौ-यावर चालली होती....तिथूनच थेट ती सातारला अंत्यदर्शनाला गेली. लगेच सर्व समाजवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी निषेध सभा मोजून दुस-याच दिवशी पुण्यात घेतली...मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर त्या सभेनेच अनेकांना माहिती झाले...डॉक्टरांच्या हत्येचा तपास लागेपर्यंत फेसबुकच्या प्रोफाईलला काळी फ्रेम ठेवण्याचा निर्धार अद्याप तिने पाळलाय..कालच साने गुरूजी स्मारकावर तिने 'सलाम सावित्रीच्या लेकींचा' हा सुरेख कार्यक्रम घेतला होता.....त्यानिमित्त सकाळी भिडे वाड्यापासून सकाळी युवतींच्या दुचाकीच्या रॅलीचं नेतृत्व तिनं केलं....रॅली सेनापती बापट रस्त्याने पुढे येत असताना पोलिसांना चकवा देत या मुलींनी चक्क विद्यापीठाच्या कमानीवर चढून ''ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' असा प्रतिकात्मक नामविस्ताराचा बॅनर लावून सगळ्यांना चकीत केले....तिची गोड मुलगी गार्गी साडी वगैरे नेसून छोटी सावित्री बनली होती काल. ..
                   

आपल्या आसपास काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या केवळ अस्तित्वानेच आपण आश्वस्त, निश्चिंत, रिलॅक्स असतो...सुदैवाने मला असे खूप मित्र मिळालेत...अश्विनीही त्यातलीच एक....ती केवळ सोबत आहे या विचारानेच माझ्यासारखे तिचे कितीतरी मित्र निर्धास्त असतात....हो .. . हे सर्व सांगायचं प्रयोजन म्हणजे....अकोल्यामधील सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय संस्थेतर्फे आश्विनीला यंदाचा राजमाता जिजाऊ मॉं साहेब प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे....अकोट (जि. अकोला) येथे सहा जानेवारीला पुरस्कार वितरण समारंभ आहे....बहुदा या कार्यक्रमासाठी नेहमीच्या उत्साहाने आज-उद्या ती एसटीने तेथे रवाना होईल.....हॅट्स आफ Ashwini Satav-Doke...किती भारी वाटतं ना अशा भारी व्यक्ती आपल्या मित्र असतात तेव्हा. . . . . .

No comments:

Post a Comment