Friday, 6 June 2014

संमेलनात भेटले नारायण ख़ानू देसाई :
- - - -- - - -- - - - - - - - - - - - - - - - - - - - 
उंची जवळपास पावणेसहा फूट...वय सत्तर..पण ताठ कणा...नजर धारदार...अंगात बाराबंदी आणि आखुड धोतर...डोइला मुंडासे, खांद्यावर जाड घोंगडी, पायात दणकट जोडा, हातात मजबुत सोटा, भाली भंडा-याचा मळवट, भरघोस दाढी राख़लेल्या या गृहस्थांकडे सासवड येथे भरलेल्या ८७व्या साहित्य संमेलनातील अनेकांच्या नजरा ख़िळायच्या. पण, एकंदर भारदस्त व्यक्तिमत्वामुळे लोक थेट बोलायला जायला काहीसे कचरत होते. मंडपात बसल्यावर त्यांना खास बोलावून घेतलं आणि मग गप्पांतून नारायण ख़ानू देसाई या अनोख्या व्यक्तिमत्वाचा पट उलगडला... फेसबुकवर गाजत असलेल्या ‘तिच्या डोळयात पाहून त्याने विचारले‘ या कवितेच्या जनकाचाही शोध या निमित्ताने लागला.
देसाई यांचे व्यक्तिमत्वच आगळे. गेली पन्नास वर्षे ते प्रतिवर्षी साहित्य संमेलनांना आवर्जून हजेरी लावतात. कवी कट्टयावर आपल्या कविता गाऊन दाख़वतात. त्यांचा आवाज कमालीचा सुरेल असेल अशी यत्किंचितही कल्पना त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाकडे पाहून येत नाही. पण एकदा का ते कविता म्हणायला लागले की सारा सभा मंडप त्यांच्या रचनेवर डोलू लागतो. सुरुवातीला हलकी फुलकी वाटणारी त्यांची काव्यरचना अंताला काळजाचा ठाव घेते आणि पापणीच्या कडेला अश्रू तरळल्याशिवाय राहत नाही. देसाई यांच्या शब्दांची ती ताकद आहे. फेसबुकवर गेले वर्षभर ‘तो तिला म्हणाला डोळयांत तुझ्या पाहू दे...‘ ही कविता निरनिराळया पेजेसवर कमालीची गाजली. सोशल नेटवर्कींगवर सक्रीय असलेल्या तरुणाईमध्ये ही कविता खूप प्रिय झाली. शेकडो लाईक्स या रचनेला मिळाले. पण, ही कविता देसाई यांनी लिहिलेली आहे याची कल्पना फारच कमी लोकांना आहे. गप्पा रंगल्या असतानाच देसाई यांनी ही कविता गाऊन दाख़वली आणि आतापर्यंत अज्ञात असलेल्या या कवितेच्या जनकाचाही शोध लागला.
कोल्हापूरपासून अठरा किलोमीटरवर असलेले पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) हे देसाई यांचे मूळ गाव. घरचा व्यवसाय मेंढीपालनाचा. त्यांचे वडिल तेथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बीरदेव मंदीरात पुजारी होते. या मंदीरात वैशाख़ शुध्द् चतुर्थीला साज-या होणा-या श्री बिरदेव जन्मकाळ या उत्सवाला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा व कर्नाटकातून लाखो भक्त येतात. या धार्मिक पार्श्वभूमीतून आलेल्या देसाई यांना लहानपणापासूनच वाचनाचे अतोनात वेड. शाळकरी वयापासून ते कविता करतात. किशोरवयापासूनच साहित्यविषयक कार्यक्रम असतील तेथे ते आवर्जून जाऊ लागले. पुढे चरितार्थासाठी ते पाच मे १९६५ ला पोलीस दलात दाख़ल झाले. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. अमरावतीमधील दर्यापूर येथून दोन आक्टोबर २००२ ला ते पोलीस उपअधिक्षक पदावरून निवृत्त झाले. अर्थातच, पोलीस दलात कार्यरत असतानाही त्यांनी वाचनाचा छंद जपला. रजा का़ढून ते आवर्जून उपस्थित बहुतेक सगळया साहित्य संमेलनांना ते उपस्थित राहीले; एवढेच नव्हे आपल्या आशयघन रचनांनी रसिकांची मनेही जिंकली. पोलीस दलातून निवृत्त होण्यापूर्वीच त्यांच्याकडे वंशपरंपरागत बिरोबाची काठी आली. त्यांनी श्रेी. विठ्ठल बिरदेव ग्रंथाचे पारायणही सुरू केले. निवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य मेंढपाळ धनगर समाज संघटनेच्या कार्याला वाहून घेतले. वर्षाचे बाराही महिने ते पारंपारिक पोषा़ख़ परिधान करतात. समाजबांधवांवर काही अन्याय झाल्याचे समजले की मदतीसाठी तेथे धावून जातात. जमेल ती मदत करतात. पोलीस दलात असल्याने कायद्याच्या ज्ञानावर त्यांचे प्रभुत्व आहे. राज्यभर त्यांची भटकंती चालू असते. सर्व थरातील नागरिकांशी संपर्क येत राहतो. निरनिराळया समस्या समजतात. या सगळया धावपळीतूनही त्यांचे चौफेर वाचन सुरूच असते. कवितांचीही निर्मिती सुरू असते. आतापर्यंत एकाहून एक सरस रचनांनी साहित्यप्रेमींची मने जिंकलेल्या देसाईंच्या कवितेला आता सोशल नेटवर्कींग साइट्सवरही अनेक चाहते मिळाले आहेत हे विशेष.

*नारायण खानू देसाई यांची कविता . .. .
= == = = = = = = = = = = = = ==
तो तिला म्हणाला डोळ्यात तुझ्या पाहू दे
ती म्हणाली पोळी करपेल, थांब जरा राहू दे
तो म्हणाला काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?
ती म्हणाली आई रागावतील, दूध उतू गेलं तर?
ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ
पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ
बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू
नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू
तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट
बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून
दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला
थोडासा त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग
माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवलं
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवलं
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललंस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललंस…
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?
बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी तेव्हाच माझं जग
तुझ्या जगात नाही का विरघळलं?......

No comments:

Post a Comment